संजय खोडके: मेहनत, निष्ठा व सहनशीलतेने मिळाली आमदारकी

-अविनाश दुधे

 

संजय खोडके या नावाची पहिली ओळख २००५ मध्ये झाली. ‘लोकमत’ मध्ये यवतमाळवरून नुकताच अमरावतीला बदलून आलो होतो. अमरावतीचे राजकारण समजून घेण्यास सुरुवात केली होती. तेव्हा अमरावतीच्या राजकारणात काँग्रेस नेते व तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्यासह संजय खोडके यांच्या नावाचा दबदबा होता. खोडके तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे ओएसडी होते. जिल्ह्यातील राजकारणासह सर्वच क्षेत्रात ते लक्ष देत होते. पत्नी सुलभाताई खोडके आमदार असल्या तरी सर्वत्र संचार संजुभाऊंचा होता. मात्र वर्तमानपत्रात त्यांच्या नावाचा उल्लेख क्वचितच होत होता. फोटो तर चुकूनही कुठेच येत नव्हता.

मी ‘लोकमत’ मधील संपादकीय विभागातील सहकाऱ्यांकडे चौकशी केली-#संजुभाऊंचा फोटो का नाही?’

उत्तर मिळाले-‘त्यांना आवडत नाही त्यांचा फोटो किंवा उल्लेख आलेला.’

मला नवल वाटले. मी म्हटलं- ‘ते सगळीकडे असतात. आमदार जरी सुलभाताई असल्या तरी राजकारण तेच करतात, मग फोटो का नको?’ मी एका कौटुंबिक कार्यक्रमातील त्यांचा फोटो मिळवून एका रविवारी वार्तापत्रात छापला. वर्तमानपत्राने त्यांचा फोटो छापण्याची ती बहुतेक पहिली वेळ होती.

माझे सहकारी काहीसे धास्तावून होते. तेव्हा त्यांच्यावर लिहिण्याची हिंमत जिल्ह्यात कोणी करत नव्हतं. मी ‘खोडकेंची सक्सेस स्टोरी’ व ‘खोडकेंचा संताप’ असे दोन लेख लागोपाठच्या आठवड्यात लिहिलेत. ते प्रचंड गाजले. खोडके नाराज झाल्याचे रिपोर्टही मिळाले. मात्र त्यांनी एक-दोन दिवसानंतर मला फोन केला. ‘तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. त्याबाबत काही म्हणणं नाही. पण फोटो तर चांगला टाका भाऊ’, असं ते बोलले. तणाव क्षणात निवळला. आम्ही दोघेही दिलखुलास हसलो. तेव्हापासून खोडके चांगले मित्र आहेत.

पुढे अनेकदा असे प्रसंग घडले. रविवारच्या माझ्या वार्तपत्रात खोडके व खोडकेच्या राजकारणावर टीका असायची आणि संध्याकाळी कुठेतरी आम्ही भोजन एकत्र करत असू. येथे एक गोष्ट मात्र सांगितली पाहिजे, त्यांनी एवढ्या वर्षात कधीही ‘तुम्ही असे का लिहिले, जे लिहिले ते चुकीचे आहे..वगैरे कधीही काही म्हटले नाही’. किंबहुना वर्तमानपत्रातील लेखाबाबत ते बोलतच नसत. राज्यातील राजकारण आणि इतर विषयांबाबत आमचं बोलणं होत असे. ((खोडकेच नव्हे तर माजी मंत्री सुनील देशमुख, माजी खासदार अनंत गुढे यांनाही लेखनाची उत्तम समज होती. पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्याचा आदर ते करत.)

यातून एक गोष्ट लक्षात आली. संजय खोडके या माणसाला लेखनाची चांगली समज आहे. पुढे ओळख अधिक चांगली झाली तेव्हा लक्षात आलं, राज्यातील अनेक प्रख्यात पत्रकार त्यांचे उत्तम मित्र होते. २००८ मध्ये अमरावतीचे रघुनाथ पांडे, शिवराय कुलकर्णी, मोहन अटाळकर व मी असे आम्ही काही पत्रकार मुंबईला गेलो. तेव्हा संजय खोडके हे काय ‘प्रस्थ’ आहे आणि मंत्रालयात त्यांचा काय दबदबा आहे, हे फार जवळून पाहता आले.

अशोक चव्हाण, छगन भुजबळ, आर. आर. पाटील व इतर अनेक दिगग्ज मंत्र्याच्या केबिनमध्ये आम्हाला ते घेऊन गेलेत. ‘हे आमचे अमरावतीचे पत्रकार’ अशी ओळख करून दिली. खोडकेंच्या केबिनमध्ये बसून गप्पा रंगल्या असताना अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी खोडकेंना सलाम ठोकत असल्याचाही अनुभवही तेव्हा आला. विधिमंडळ आणि मंत्रालय कव्हर करणारे पत्रकारही खोडकेंच्या प्रेमात होते. त्यांच्यासोबतही आमचे स्नेहभोजन खोडकेंनी ठेवले.

पुढे खोडकेंसोबत नियमित भेटीगाठी होत होत्या. आमची मैत्री घट्ट होत होती. मात्र पत्रकारांसोबत दोस्ताना असणाऱ्या खोडकेंपासून अमरावतीच्या इतर क्षेत्रांतील माणसे तुटायला सुरुवात झाली होती. याचं कारण त्यांचा तेव्हाचा शीघ्रकोपी स्वभाव. विरोध झाला वा मतभेद दर्शविले की खोडके लवकर संतापायचे. परिणामी नाराजी वाढत गेली. २००९ च्या निवडणुकीत भरपूर जनसंपर्क व जनसामान्यांचे मुंबईत अनेक काम करूनही सुलभाताई खोडकेंना पराभव पत्करावा लागला. रवी राणांनी त्यांना पराभूत केले. राणांनी केवळ खोडकेंना पराभूत केले नाही तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसोबत सलगी वाढवून ठिकठिकाणी संजुभाऊंची कोंडी करणे सुरू केले.

२००९ ते २०१९ हा दहा वर्षाचा कालावधी खोडकेंसाठी सत्वपरिक्षेचा होता. लागोपाठचे दोन पराभव, काही कार्यकर्त्यांचे दुरावणे, आर्थिक अडचण अशा अनेक समस्यांनी ते घेरले गेले. एकदा तुमचे वाईट दिवस सुरू झाले की काहीच चांगलं घडत नाही. चारही बाजूने समस्या येत राहतात, असे ते दिवस होते. हे कमी होते की काय म्हणून ज्या अजित पवारांनी आज संजुभाऊंना आमदार केले त्याच अजित पवारांनी त्या काळात काही प्रसंगी त्यांची अवहेलनाही केली. २०१४ मध्ये नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध दर्शविल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टीही करण्यात आली.

संजुभाऊंचे वैशिट्य म्हणजे त्यांनी हे अपमानाचे घोट अत्यंत शांतपणे पचवले. ते शांतपणे काम करत राहिले. जेव्हा तुमचे वाईट दिवस असतात, तेव्हा तुम्ही टिकून राहिलात तरी पुरे असतं. त्यांनी त्या काळात तेच केलं. पक्षाने, अजितदादांनी ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या त्यांनी निष्ठेने पार पाडल्या.

मेहनत, सातत्य, जनसंपर्क, मंत्रालय व विधिमंडळ कामकाजाची सखोल माहिती हा खोडकेंचा USP (Unique Selling Praposition) .आपल्या या वैशिट्यासह ते काम करत राहिले. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडली. हा पुन्हा परीक्षेचा काळ होता.मात्र एवढी वर्ष राज्याचे राजकारण जवळून अनुभवत असल्याने परिस्थितीचा नेमका अंदाज संजुभाऊंना घेता येतो. त्यांनी अजितदादांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नंतर कोणता पक्ष अधिकृत, पक्षचिन्ह आदी विषयातील न्यायालयीन लढाईत त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांची कसोटी होती. पण काट्याच्या लढतीत योग्य डावपेच व आखणी करत त्यांनी विजय मिळवला. …आणि आता तर विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षात अनेक इच्छुक असतानाही अजित पवारांनी त्यांना संधी देत त्यांची एवढ्या वर्षाची मेहनत, निष्ठा व सातत्याचे चीज केले आहे. संजुभाऊंनी गेल्या ३०-३५ वर्षात अनेकांचा साधा कार्यकर्ता ते आमदार-खासदार-मंत्री हा प्रवास जवळून पाहिला. अनेकांना लोकप्रतिनिधी करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. मात्र आज ते स्वतः विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात पोहचले याचा आनंद नक्कीच मोठा असणार. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे जे स्वप्न असते, ते खूप वर्षाने का होईना पूर्ण झाले आहे.

संजुभाऊ या संधीचे नक्की सोने करतील. मधल्या दहा वर्षाच्या अनुभवांमुळे त्यांच्यात भरपूर बदल झाला आहे. राजकारणाची समज आधीपासूनच त्यांच्यात उत्तम आहे. कामे कसे करून घ्यायचे, फाईल कशा हलवायच्या, कोणती गोटी कुठे फिट करायची हे कौशल्य त्यांना अवगत आहे. विधानसभा निवडणुकीतील पडझडीमुळे जिल्ह्यात निवडून आलेले बहुतांश आमदार अगदी नवखे आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजुभाऊंचे आमदार होणे, ही जिल्ह्यासाठी अतिशय चांगली गोष्ट झाली आहे. अमरावती शहर व जिल्ह्याच्या समस्या त्यांना माहित आहे. आपला अनुभव व प्रशासकीय कौशल्याचा उपयोग ते जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी नक्की करतील, हा विश्वास आहे.

 

(लेखक ‘मीडिया वॉच’  नियतकालिक, दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

Scroll to Top