टिपेश्वरचा वाघ

-अविनाश दुधे

 

महाराष्ट्रात सद्या ताडोबानंतर हमखास कुठे वाघाचे दर्शन होत असेल तर ते आहे टिपेश्वर अभयारण्य.

आतापर्यंत तीनदा मी येथे गेलो. तीनही वेळा जंगलाच्या राजाने निवांत दर्शन दिले. रविवारच्या सफारीत तर तब्बल २० मिनिटं ‘फोरमार्क’ या वाघिणीला पाहता आले.

जंगलातून ती थेट रुबाबदार चालीने रस्त्यावर आली. माणूस नावाच्या झुंडीने आलेल्या प्राण्यांकडे यत्किंचितही कटाक्ष न टाकता ती डौलदार चालीने चालायला लागली. तिची पावलं जसंजशी पुढे पडायला लागलीत तशा सगळ्या जिप्सी रिव्हर्स गिअरमध्ये मागे मागे सरकायला लागल्यात.

जवळपास २० मिनिटं या रुबाबदार ‘फोरमार्क’ वाघिणीचे अगदी जवळून दर्शन झाले. एकाएकी तिचा मूड बदलला ज्याप्रमाणे ती जंगलातून रस्त्यावर आली होती त्याचपद्धतीने तिने रस्ता सोडला आणि जंगलात जाणे पसंत केले.

एक अविस्मरणीय अनुभव होता हा!

टिपेश्वर अभयारण्य हे सध्या व्याघ्रप्रेमींसाठी हॉट डेस्टिनेशन आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा या तालुका ठिकाणापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर १४८.६३ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या जंगलात हमखास वाघाचे दर्शन होत असल्याने येथे वन्यजीवप्रेमींची मोठी गर्दी उसळते. सध्या येथे १५ ते २२ वाघ असल्याचे सांगितले जाते.

वाघासोबत तरस, चितळ, काळे हरिण, सांभर, जंगली डुक्कर , मोर, नीलगाय, अस्वल, बिबट आदी अनेक प्राणी या जंगलात आहेत.

दहापैकी आठ सफारीत हमखास वाघ दिसतो असा लौकीक निर्माण झाल्याने या परिसराचा कायापालट झाला आहे. टिपेश्वर अभयारण्याला लागून अनेक रिसॉर्ट, हॉटेल्स, होम स्टे, फार्म हाऊसेस उभे झाले आहेत. एका रात्रीचे १५ ते २० हजार रुपये आकारणारे फाईव्ह स्टार रिसॉर्टही परिसरात आहे.

तेलंगणाला अगदी लागूनच हे जंगल असल्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील वन्य जीव प्रेमी येथे गर्दी करतात. एका अभयारण्याने येथील अर्थकारण बदलून गेले आहे.

fEATUREDमात्र कोणत्याही परिस्थितीत वाघ पाहायचाच या हव्यासापोटी येथेही ताडोबासारखे प्रकार व्हायला लागले आहेत. एखाद्या ठिकाणी वाघ आहे ही खबर मिळताच जिप्सीचालक एकमेकांना मोबाईलने खबर देतात आणि त्यानंतर भरधाव वेगाने धुरळा उडवत सर्व जिप्सी एका ठिकाणी एकत्रित येतात आणि वाघाला घेरतात वा त्याभोवती गर्दी करतात.

रविवारच्या टायगर सफारीदरम्यान वेगात स्पॉट गाठण्याच्या घाईत एक जिप्सी वेगात दुसऱ्या जिप्सीवर आदळली. वाघ पाहण्यासाठी पर्यटक जिप्सी चालकांना ४-५ हजार रुपयांचे आमिष दाखवतात. त्यामुळे जिप्सी चालक जंगलात शर्यत लागल्याप्रमाणे गाड्या उडवतात.

बाकी टिपेश्वरचे छोटेखानी जंगल अतिशय देखणं आहे. जैवविविधता तर येथे आहेच. जंगलातील वन विभागाचे टुमदार विश्रामगृह लक्ष वेधून घेते. ज्या देवीच्या नावाने हे अभयारण्य आहे त्या ‘टिपाई’ देवीचे मंदिरही जंगलात आहे.

 

(लेखक ‘मीडिया वॉच’  नियतकालिक, दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796FF

Scroll to Top