दिवाळीचा रंग वेगळा !

दिवाळी हा आनंदाचा सण आहे. लहान – थोर, श्रीमंत – गरीब सर्वांच्या मनात चैतन्याच्या पणती पेटविणार्‍या या सणाला माणसं तन – मनाने मोहरून जातात. या सणामागची ऐतिहासिक पाश्र्वभूमी, त्यामागील पुराणकथा जाऊ द्या. मात्र जगाच्या कानाकोपर्‍यात जिथे कुठे भारतीय माणूस आहे, तेथे अमाप उत्साहात साजरा होणारा हा सण आहे. काळानुसार प्रत्येक गोष्टींचे संदर्भ बदलतात. मानवी समूहाच्या आनंद मिळविण्याच्या कल्पनाही बदलतात. आमच्या सार्‍याच आनंदांना आता बाजाराचा स्पर्श झाला आहे. दिवाळी त्यातून वेगळी राहणं कठीण असलं, तरी हा सण मनं झंकारून टाकतो, यात वादच नाही.


दिवाळी पूर्वीची उरली नाही, असं आपल्यापैकी अनेकजण म्हणतात. ते खरंही आहे. आज चाळीस – पंचेचाळीसीत व त्यापुढची जी पिढी आहे, त्यांच्या दिवाळीची खुमारी काही और होती. तेव्हा कोजागिरी आटोपताच दिवाळीचे वेध लागायचे. खेडय़ांमध्ये घरांच्या साफसफाईला, रंगरंगोटीला सुरूवात व्हायची. घरातील तांब्या – पितळीची वापरात असलेली – नसलेली सारी भांडी घासूनपुसून लख्ख व्हायची. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत गावातील मंदिरांमध्ये काकड आरती चालायची. लोक भल्या पहाटे उठून काकडा व हरिपाठात सहभागी व्हायचे. घरातील गृहिणींची लगबग ती वेगळीच असायची. रोज सकाळ – संध्याकाळ घरासमोर सडा शिंपडणे, रांगोळ्या काढणे, पहाटे घराच्या अंगणात गायीच्या शेणाचे गोधन थापणे, दिवसभर चिवडा, चकल्या, करंजी, शंकरपाळे, अनारसे, लाडू तयार करणे, दिवे लागणीच्यावेळी संपूर्ण घरा-दारात पणत्या ठेवणे, असं खूप काही व्हायचं. थोडक्यात सारा आसमंतच दिवाळीच्या तयारीने व्यापून उरायचा.

दिवाळीच्या त्या पाच दिवसात आनंदाला तोटा म्हणून असा नसायचाच, लहान मुलांची तर चंगळ असायची. नवीन कपडे, फटाके, दिवसभर खेळणे – हुंदडणे, अभ्यंगस्नान हा हवाहवासा आणि पहाटे उठावं लागतं म्हणून नको वाटणाराही प्रकार होता. वसूबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा प्रत्येक दिवसाचे स्वत:चं एक वैशिष्टय़ असायचं. हे सारं आजही आहे, नाही असं नाही. पण अब वो बात नही, हेच खरं ! हे असं का झालं याची अनेक कारणे आहेत. माणसाने भौतिक सुख – समृद्धी मिळविली तसा तो साध्या – साध्या आनंदाला मुकायला लागला आहे. आता माणसांना कोणत्याच गोष्टीचं अप्रूप वाटत नाही. शहरातील सरकारी कर्मचार्‍यांचे दिवाळीच्या आनंदापेक्षा सलग सुट्टी किती मिळते, याकडे जास्त लक्ष असते. दिवाळीत बोनस किती मिळणार? अरिअर्स मिळणार की नाही? हे यांच्या प्रायोरिटीचे विषय असतात. शहरातील श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांसाठी दिवसाचे 24 तास, वर्षाचे 365 दिवस दिवाळीच असते. नवीन कपडय़ातील आनंद काय असतो, फटाके फोडण्याची गंमत काय असते, आईच्या हातचा फराळ चाखण्याची लज्जत काय असते, लहान मुलांच्या किल्ले बांधण्यातील रंगत काय असते, या सार्‍याच प्रकारांशी अशा चौकटीतील माणसांना फारसे देणेघेणे नसते. 

अशा लोकांची संख्या सतत वाढते आहे. हाती असलेल्या मोबाईल नावाच्या यंत्रातून निर्जीव, ह्रदयाला कुठेही न भिडणार्‍या गुळगुळीत शब्दांचे शुभेच्छा संदेश (एसएमएस) पाठविणे, एवढय़ापुरत्याच या अशा माणसांच्या सदिच्छा मर्यादित झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने माणसाला फायदा भरपूर झाला आहे, मात्र माणसं त्यामुळे नैसर्गिक, उत्स्फूर्त भावभावनाच विसरून गेले आहेत. संवादाची एकापेक्षा एक सरस साधनं आली आहेत. विसंगती मात्र अशी की अशा साधनांचा ताफा बाळगून असणारी माणसं एकमेकांसोबतचा संवादच हरवून बसले आहेत. फोन, फॅक्स, मोबाईल, ई-मेल, फेसबुक, ट्विटर अशी संवादाची साधनं वाढली आहेत. काही बटणं दाबली, तर जगाच्या कोपर्‍यात कुठेही काही सेकंदात संपर्क साधला जाऊ शकतो. मात्र एकमेकांसोबत बोलायची आमची इच्छाच मेली आहे. दूरचे जाऊ द्या, घरातील माणसांशी, शेजार्‍यांशी बोलायला आम्हाला वेळ नाही. आमची घर पूर्वीपेक्षा खूप मोठी झाली आहेत, मनं मात्र तेवढीच छोटी झाली आहेत. समाजातील वंचितांच्या व्यथा – वेदनाने आमचं मन आता पिळवटून निघत नाही. आमच्या काळजाला भोकं पडत नाही. आमच्या सिमेंटच्या महालात आम्ही त्यांच्या समस्यांबद्दल वांझोटी चर्चा तेवढी करतो. या दिवाळीनिमित्त माणसामाणसांतील संवाद अधिक वाढावा, माणसांची हरवलेली संवेदनशीलता परत यावी आणि किमान आपल्या सभोवताचा अंधार दूर करण्याची प्रेरणा आपल्याला मिळावी, हीच कामना आपण करूया.
                                         दिवाळीची कामना
                                          

सारा अंधारच प्यावा

अशी लागावी तहान

एका साध्या सत्यासाठी

देता यावे पंचप्राण



                                            व्हावे एवढे लहान

                                         सारी मनो कळो यावी

                                           असा लाभावा जिव्हाळा

                                           पाषाणाची फुले व्हावी



                                             सर्व काही देता यावे

                                           श्रेय राहू नये हाती

                                          यावी लावता कपाळी

                                          भक्ती भावनेने माती



                                         फक्त मोठी असो छाती

                                         दु:ख सारे मापायला

                                          गळो लाज, गळो खंत

                                         काही नको झाकायला



                                           राहो बनून आकाश

                                            माझा शेवटला श्वास

                                           मना मनात उरावा

                                           फक्त प्रेमाचा सुवास
                                                                   म. म. देशपांडे

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – 8888744796

Scroll to Top