विश्वामित्र नावाच्या ऋषीने प्रतिसृष्टीची रचना केली होती, असे सांगितले जाते. पुराणातील या कथा किती खऱ्या , खोट्या माहित नाही . मात्र भवरलाल जैन नावाच्या उद्योगपतीने जळगाव शहराच्या बाहेर एका उजाड माळरानावर जे नंदनवन फुलवलं आहे, ते पाहिलं की एक माणूस दूरदृष्टी, कल्पकता, नियोजन आणि मूल्यांच्या जोरावर काय किमया करू शकतो, याची प्रचिती येते.
जैन एरिगेशनने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने दोन दिवस जळगावच्या जैन हिल्सवर होतो. गेल्या सात वर्षात तिसऱ्यांदा येथे जाणे झाले. प्रत्येकवेळी मानवी परिश्रमातून काय अफाट काम होऊ शकते, जे पाहून अचंबित व्हायला होतं. अवघ्या काही वर्षांपूर्वी आज जैन हिल्स म्हणून ओळखला जाणारा हा परिसर म्हणजे एक उजाड माळरान होतं. खुरट्या जंगलाशिवाय काहीही येथे नव्हतं . पाणी तर दूरपर्यंत कुठे नव्हतं. आज अवघ्या काही वर्षात वेगवेगळ्या जातींचे लाखो वृक्ष येथे बहरले आहेत .टेकड्यांवरील पाणी अडवून ठिकठिकाणी अनेक मानवनिर्मित तलाव येथे तयार करण्यात आले आहेत.
जैन हिल्सवर पावसाच्या प्रत्येक थेंबाचा कसा उपयोग करायचा हे पावलोपावली पाहावयास मिळते. या विशाल परिसरातील प्रत्येक झाडाला ड्रीपने पाणी पुरवलं जातं. आपण देशभरात काश्मीर , हिमाचल , दार्जिलिंगपर्यंत ठिकठिकाणचे नैसर्गिक हिलस्टेशन पाहिले असतील, पण माणसांनी एकेक झाड लावून फुलविलेले असं अद्भुत हिलस्टेशन जगात दुसरं सापडणार नाही. मात्र जैन हिल्स हे हिलस्टेशन अजिबात नाही. ही आहे विज्ञान, कल्पकता आणि मेहनतीतून मानवी आयुष्य, विशेषतः शेतकऱ्यांचे आयुष्य कसं सुखकर करता येऊ शकते हे प्रात्यक्षिकासह सांगणारी प्रयोगशाळा.
या प्रयोगशाळेत काय नाही? अत्यंत कमी पाण्यात शेती कशी करायची? गहू ,तांदूळ , आंबा, केळी, पेरू, डाळिंब आदी अनेक पिकं आधुनिक पद्धतीने कशी घेतली पाहिजेत, ठिबक सिंचनावर तांदुळाचे पीक किंवा फॉगर्स आणि कृत्रिम धुक्याच्या माध्यमातून विक्रमी गहू कसा पिकवता येतो , असे अनेक प्रयोग येथे पाहावयास मिळतात. मुळात जैन हिल्स ही प्रयोगभूमीच आहे. Convert Waste Into Wealth.असे महात्मा गांधी नेहमी सांगायचे. गांधीजींचे हे वचन येथे ठिकठिकाणी गिरवले जाते. परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती आणि खत येथे तयार केले जाते. असे शेकडो प्रयोग येथे केले जातात. भविष्यातील शेती कशी असणार , याचेही एक स्वतंत्र दालन येथे आहे. ते अवश्य बघायला हवे. एक वेगळी, मानवी श्रमाच्या सुगंधातून फुलवण्यात आलेली प्रयोगभूमी पाहावयाची असल्यास कृषी महोत्सवाला नक्की भेट द्या.
जैन हिल्सवरील आणखी दोन गोष्टी अद्भुत गोष्टींबाबत सांगायला हवं. एक आहे ‘गांधी तीर्थ’. मोहन करमचंद गांधी या माणसाचा ‘मोहन ते महात्मा’ हा प्रवास कसा झाला , हे ऑडिओ ,व्हिडिओ, छायाचित्रातून उलगडून सांगणारे खूप अनोखं असं Museum येथे आहे . गांधींवरील ५ लाखांपेक्षा अधिक कागदपत्रे , गांधींनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेली हजारो पुस्तकं, गांधींची १५००० अधिक दुर्मीळ छायाचित्रे, गांधीचे १५० पेक्षा अधिक ऑडिओ ,व्हिडिओ भाषणं आणि याशिवाय खूप सारे मौल्यवान दस्तऐवज येथे आहेत. उदय महाजन आणि त्यांची टीम अतिशय आस्थेने हे दाखवतात .
हिल्सवरील दुसरी अद्भुत गोष्ट आहे ती म्हणजे जैन एरीगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेली ‘भाऊंची सृष्टी’. एखाद्या व्हिजनरी माणसाची स्मृती किती अनोख्या पद्धतीने जपली जाऊ शकते , हे येथे पाहावयास मिळते . येथे विकसित करण्यात आलेली नक्षत्र वाटिका तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाते.
जैन एरिगेशनचे Vice President (Media) अनिल जोशी Anil Joshi आणि त्यांचे सहकारी देवेंद्र पाटील , किशोर कुलकर्णी यांनी अतिशय आस्थेने आणि आपुलकीने ही एक वेगळी सफर मला आणि संतोष अरसोड, शशांक लावरे, प्रवीण पाटमासे या पत्रकार मित्रांना घडवून आणली. त्यांचे आभार मानावे तेवढे कमी.
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत.)