-अविनाश दुधे
गेल्या दोन दिवसापासून संततधार सुरू आहे. दरवर्षी असा पाऊस कोसळायला लागला की मन चिंब करणाऱ्या पावसाच्या खूप साऱ्या आठवणी स्मरायला लागतात.
पहिली आठवण अगदी बालपणातली आहे. ८० च्या दशकातली. तेव्हा अगदी छोट्या दीड-दोन हजार लोकवस्तीच्या एका छोट्या खेड्यात आम्ही राहायचो. गावाला अगदी खेटून एक छोटी नदी होती. तेव्हाचा पाऊस अफाट होता. आताच्या पिढीला सलग सात- आठ दिवस कोसळणारा पाऊस माहीत नाही. तेव्हा ‘झड’ नावाचा हा प्रकार प्रत्येक पावसात अनुभवायला मिळायचा. सारं जनजीवन ठप्प करणाऱ्या पावसामुळे माणसं घरात दडून राहायची. अंधाऱ्या घरात लवकर खाणे पिणे आटोपून भूताखेताच्या गोष्टीत रमायचे.

सततच्या पावसाने नदीला पूर यायचा. नदी एवढी फुगायची की अर्ध गाव पाण्याखाली यायचं. उंचावरील बंदर बाबा आणि गावातील हनुमानाचे मंदिर पाण्याखाली आले की गावकरी धास्तावायचे. आम्ही चिमुकले नदीचे अक्राळ विक्राळ रूप पाहायला धर्मशाळेच्या चौथऱ्यावर जायचो. पुराच्या पाण्याला भयंकर वेग असायचा. त्या प्रवाहात लाकडाचे मोठमोठे ओंडके, साप आणि इतर प्राणी वाहत जाताना दिसायचे.अशा भीती वाटणाऱ्या पुरात भोई समाजातील तरुण मुलं बिनधास्त उड्या मारायची आणि मोठमोठी ओंडके घेऊन किनाऱ्यावर यायची. त्यांचं कौतुक वाटायचं. पाणी मात्र थांबायला तयार नसायचं. अनेक गोरगरिबांच्या झोपड्या व घर पाण्याखाली यायची. ती बिचारी माणसं शाळेच्या आवारात आश्रय घ्यायचीत.
आम्ही ज्या जाधव यांच्या वाड्यात भाड्याने राहायचो तो उंचावर होता. मात्र प्रवेशद्वारासमोरील अर्ध्या पायऱ्या पाण्याखाली आल्या घर मालकीण बाई, जाधव काकू पूर ओसरावा, पाऊस थांबावा यासाठी दिवे पाण्यात सोडून प्रार्थना करायच्या. तोपर्यंत अंधारून आलेलं असायचं. विजेचा कडकडाट मनात धडकी भरायचा. वीजा अशा कडकडाट करायला लागल्या की माझी आजी विळा आणायची आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत बाहेर अंगणात फेकायची.

बसमधली पुरुष मंडळी आपसात मसलत करायची. नदीच्या गावाकडील भागातून कोणीतरी दोर फेकायचे. मग तो दोर पकडून आणि एकमेकांचा हात घट्ट पकडून माणसं पुराच्या पाण्यातून नदी पार करायचे. अंतर १०० -१५० मीटरचे असायचे. पण पाण्याचा वेगवान प्रवाह सर्वांची परीक्षा घ्यायचा. आम्हा लहान मुलांना कुणीतरी बाप्या खांद्यावर बसवून गावाकडे आणायचेत. खाली उतरलं की चिखलात पाय रुतवत रुतवत घरी परतायचं.
संततधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली की मला पहिली आठवण येते ती याच पावसाची. आधी बेफाम आणि नंतर एका लयीत सात-आठ दिवस सतत कोसळणाऱ्या गावातील झडीची, पुराची आणि भूताखेतांच्या गोष्टीची. पाऊस आणि या आठवणी एकमेकांना अगदी घट्ट चिपकून बसल्या आहेत
…………………………………………………..

कुठलाही विचार न करता बाहेर पडलो. ‘पावसानं झोडपणे’ म्हणजे नेमकं काय असतं, याचा पहिल्यांदा प्रत्यय आला. सू sss असा आवाज करत वाहणाऱ्या थंडगार वाऱ्याच्या साथीने मुसळधार पाऊस अंगावर कोसळायला लागला. त्यादिवशी पावसाचं झोडपण आणि मुसळाएवढ्या धारेचा पाऊस पहिल्यांदा अनुभवला. जेमतेम २००-२५० मीटर अंतर या पावसात भिजता आलं. त्यानंतर पावसाला तोंड देणे अशक्य आहे हे लक्षात येतात मुकाटपणे धावत मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.
मात्र बेफामपणे कोसळणारा पाऊस पाहून मन चार भिंतीआड बसायला तयार नव्हतं. एका चारचाकी चालकाला बाबापुता करून तयार केलं आणि त्या मुसळधार पावसात मेमना -खटकाली मार्गे सेमाडोहकडे निघालो. अंधारलेलं वातावरण, ५-६ फुटावरीचं दिसणार नाही असं दाट धुकं , सोसाट्याचा वारा, वीजांचा थरकाप उडवणारा कडकडाट आणि अतिशय घनदाट जंगलातून केलेला २५ किलोमीटरचा प्रवास आज तीस वर्षानंतरही जसाच्या तसा आठवतो. तसा अविस्मरणीय अनुभव नंतर मेळघाटातच दोनदा घेता आला.

आम्हीही हात पाय गरम करत भज्यांवर ताव मारला. गरमागरम चहा घशात रिचवला. चिखलदऱ्याला परत जाण्यासाठी घटांग मार्ग निवडला. परत जातानाही पाऊस, वारा, धुके सोबतीला होतेच. अंधार चिरत रात्री चिखलदऱ्याला परतलो. मात्र आज एवढ्या वर्षानंतरही मेळघाटातील तो तुफानी पाऊस स्मरणात कायम आहे.
पावसाच्या अशा खूप साऱ्या यादगार आठवणी आहेत . पुन्हा संततधार सुरु झाली की त्या वर येतीलच….
(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक, दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)
8888744796