एका नालायकीचं उत्तर दुसरी नालायकी असू शकते?

               तुम बिल्कुल हम जैसे निकले, अब तक कहां छुपे थे भाई?
          वह मूरखता, वह घामड़पन, जिसमें हमने सदी गंवाई.
      आखिर पहुंची द्वार तुम्हारे, अरे बधाई, बहुत बधाई;
        भूत धरम का नाच रहा है, कायम हिन्दू राज करोगे?
       सारे उल्टे काज करोगे? अपना चमन नाराज करोगे?
तुम भी बैठे करोगे सोचा, पूरी है वैसी तैयारी,
         कौन है हिन्दू कौन नहीं है, तुम भी करोगे फतवे जारी;
        वहां भी मुश्किल होगा जीना, दांतो आ जाएगा पसीना.
  जैसे­तैसे कटा करेगी, वहां भी सबकी सांस घुटेगी;
        माथे पर सिंदूर की रेखा, कुछ भी नहीं पड़ोस से सीखा!
            क्या हमने दुर्दशा बनायी, कुछ भी तुमको नज़र न आयी?
         भाड़ में जाये शिक्षा­विक्षा, अब जाहिलपन के गुन गाना,
          आगे गड्ढा है यह मत देखो, वापस लाओ गया जमाना;
              हम जिन पर रोया करते थे, तुम ने भी वह बात अब की है.
         बहुत मलाल है हमको, लेकिन हा हा हा हा हो हो ही ही,
                कल दुख से सोचा करती थी, सोच के बहुत हँसी आज आयी.
           तुम बिल्कुल हम जैसे निकले, हम दो कौम नहीं थे भाई;
    मश्क करो तुम, आ जाएगा, उल्टे पांवों चलते जाना,
         दूजा ध्यान न मन में आए, बस पीछे ही नज़र जमाना;
     एक जाप­सा करते जाओ, बारम्बार यह ही दोहराओ.
           कितना वीर महान था भारत! कैसा आलीशान था भारत!
          फिर तुम लोग पहुंच जाओगे, बस परलोक पहुंच जाओगे!
             हम तो हैं पहले से वहां पर, तुम भी समय निकालते रहना,
             अब जिस नरक में जाओ, वहां से चिट्ठी­विट्ठी डालते रहना!
 पाकिस्तानातील कवयित्री फहमिजा रियाज यांची ही कविता़  भारताची राजधानी नवी दिल्लीनजीकच्या दादरी या गावात गायीचे मास खाण्याच्या संशयावरुन मोहम्मद अखलाक या मुस्लीम वृद्धाच्या निर्घृण हत्येनंतर शेजारी राष्ट्रातील या कवयित्रीने लिहिलेल्या या कवितेतला उपरोध चटके देणारा आहे़ बोचणारा आहे़  देशातील आजच्या वर्तमानावर नेमकं बोटं ठेवणारा आहे़ कुठल्याही संवेदनशील माणसाने सुन्न व्हावी, अशीच दादरीची घटना आहे़ राजपूत हिंदूंच्या वस्तीत राहत असलेल्या मोहम्मद अखलाक यांनी खरंच गोमास खाल्लं की नाही याची कुठलीही खातरजमा न करता डोकं ठेचून त्यांची हत्या करण्यात आली़ सारासार विवेकबुद्धी हरविलेला जमाव एवढा संतप्त होता की, त्यांनी अखलाकच्या घराचा दरवाजा तोडून टाकला़ सिलाई मशीनची तोडफोड करुन ती उचलून अखलाकच्या डोक्यात घालण्यात आली़ त्यांचं डोकं घराच्या खिडकीच्या ग्रिलवर आपटण्यात आलं. अखलाकची तरुण मुलगी जिवाच्या आकांताने कळवळून सांगत होती की तुम्ही संपूर्ण घर तपासा़ घरात कुठेही गोमास नाही़ मात्र डोळ्यात खून उतरलेल्या जमावाने जंगली जनावरांनाही लाज वाटावी असं क्रौर्य दाखवत वीटांनी डोकं ठेचून अखलाक यांना संपविलं़ त्यांचा मुलगा मृत्यूसोबत झुंज देत आहे़ हे सारं अतिशय भयानक आहे़ सिरिया व इराकमधील मुस्लीम अतिरेकी संघटना आयसीसच्या खुनशीपणाची आठवण करुन देणारी ही घटना आहे़
 हे सारं कमी की काय म्हणून झालेल्या

प्रकाराबद्दल दादरीवासीयांना अजिबात वैषम्य नाही़ पश्चाताप नाही़ मारेकरी कोण होते हे आम्हाला माहीत नाही़ आमच्या गावातले ते नव्हते, अशी उत्तरं पोलिसांना मिळत आहे़ हे मुसलमान देशाच्या फाळणीच्या वेळीच तिकडे पाकिस्तानात का गेले नाहीत? गांधी, नेहरुंनी यांना येथे कशाला थांबवून घेतलं?, असे प्रश्न तेथील तरुणाई माध्यमांच्या लोकांना करते आहे़ धर्मव्देषाचं विष किती खोलपर्यंत पसरलं आहे, याचा हा नमुना आहे़ सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियाही तपासल्या तर मोजके अपवाद वगळता अखलाकच्या खूनाबद्दल संताप व्यक्त होण्यापेक्षा गायीची पवित्रता, हिंदूंच्या श्रद्धा, परंपरा याचे गोडवे गाणारेच अधिक दिसत आहेत़ सारी स्पर्धा काही धर्मवेड्या मुसलमानांच्या निर्बुद्धपणासोबत आहे़ ते फाळणीच्या वेळी कसे वागलेत? नौखाली, कोलकाता, लाहोर, कराचीत त्यांनी कसे लाखो हिंदू कापून टाकलेत़़…मुस्लीम राज्यकर्त्यांच्या राजवटीतही त्यांनी किती आणि कसे अत्याचार केलेत़़… जबरदस्तीने धर्मांतर कसे केले़…ग़ोधराला रामभक्तांच्या गाडीवर पेट्रोल टाकून हिंदूंना कसे जिवंत जाळलेत…इतिहासातील अशा शेकडो घटनांची यादी देऊन हिंदूंच्या श्रद्धा, परंपरांची तमा नसणाºयांसोबत वाईट काही घडलंही असेल तर त्याचा फार बाऊ करण्याचं कारण नाही, असे सांगत झालेल्या प्रकाराचं समर्थन होत आहे़ अर्थात हा प्रकार पहिल्यांदा होत नाहीय़ ग्रॅहम स्टेन्स या ओरिसातील ख्रिश्चन मिशनºयाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत जाळण्याची घटना फार जुनी नाही़ गोधºयातील मुस्लीमांच्या नादानपणाला तशाच खुनशीपणाने प्रत्युत्तर देऊन घडविलेलं हत्याकांडही विस्मरणात न जाणारंच़ दाभोळकर, पानसरे, कलबुर्गीचे खूऩ़़ गेल्या वर्षीचा पुण्यातील मोहसीन शेख या तरुणाचा खून… हे सारे खून, हत्याकांडांचे समर्थन करण्याची मानसिकता ही अतिशय चिंताजनक आहे़ आमच्या श्रद्धा, परंपरा, मान्यतांच्या विरोधात जे कोणी असतील त्यांची अशीच गत होईल आणि त्याबद्दल आम्हाला कवडीचंही दु:ख असणार नाही, असा अप्रत्यक्ष इशारा देणारेच हे प्रकार आहेत़

 हिंदूंच्या सहिष्णुतेचा, हिंदूंच्या समृद्ध परंपरेचे गोडवे गाताना पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश व इतर मुस्लीम देशांत माणसांना मिळणारी जनावरांसारखी वागणूक, (आपण एका मोठ्या समूहाला हजारो वर्ष जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली हा इतिहास सोयीस्करपणे दडविला जातो़)  इतर धर्मीयांबाबत त्या देशांची असहिष्णुता याबाबत नेहमीच सांगितलं जातं़ ते खरंही आहे़ केवळ धर्माच्या आधारावर निर्माण झालेल्या या देशांचा धार्मिक कट्टरतेमुळे आज नरक झाला आहे़ फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान, बांगलादेशात मोठ्या संख्येने हिंदू राहत होते, त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले वा त्यांना हाकलून लावण्यात आले, ही गोष्ट खरीच आहे़ मात्र आपण स्पर्धा या नालायकापणाशी करणार का? एका नालायकीचं उत्तर दुसरी नालायकीचं असू शकते का?  हे प्रश्न महत्वाचे आहेत़ पाकिस्तान आणि मुस्लीम राष्ट्रांमध्ये कोण अल्लाचे खरे बंदे आहेत आणि कोण काफिर आहेत याचे फतवे निघतात़ अप्रत्यक्षपणे त्यांना संपविण्याचे सूचक संदेश दिले जातात़ ‘सनातन’ सारख्या संस्थांनी इकडेही हेच प्रकार सुरु केले आहेत़ प्रत्येक गावात, शहरात, जिल्ह्यात, राज्यात कोण दुर्जन आहेत, कोण हिंदूहितविरोधी आहेत, कोण हिंदूच्या श्रद्धा, परंपरा, मान्यतांच्याविरोधात आहेत अशांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश सनातनने दिले आहेत़ गोमास खाणे हे या तथाकथित हिंदू कट्टरतावाद्यांच्या मान्यतेत बसत नाही़  त्यामुळे अशांची अखलाकसारखी गत करा, असे फतवे आगामी काळात निघालेत तर नवल नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवराचे पाणी गोदावरीत टाकल्याबरोबर त्यांना अहिंदू ठरविण्याचा आचरटपणा जिथे होतो तिथे खरा हिंदू , खोटा हिंदू असे ठरविण्याचे प्रकार आगामी काळात वारंवार होतील, याची स्पष्ट लक्षणे दिसत आहेत़ ही अशी कट्टरता परधर्मीय संपलेत की आपल्याच माणसांना संपविण्याचं काम करते हा मुस्लीम देशांचा इतिहास आहे़ आपलीही वाटचाल तिकडेच सुरु झाली आहे़  म्हणूनच फहमिजा रियाजने अगदी नेमकेपणाने सांगितलंय़़…
हम जिन पर रोया करते थे, तुम ने भी वह बात अब की है
अब जिस नरक में जाओ, वहां से चिट्ठी­विट्ठी डालते रहना!

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत़)
8888744796
Scroll to Top