21व्या शतकात आता जात-पात नावाचा प्रकार कुठे उरला हो, असं आमच्यातील पुरोगामी म्हणविणारी मंडळी कितीही सांगत असली तरी प्रत्यक्षात जात नावाचा प्रकार भारतीय माणूस किती घट्ट कवटाळून बसला आहे, याचे विदारक वास्तव दर्शन आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाने देशाला झालं. या देशात जन्माला आल्यापासून जातीचा जो स्टॅम्प लागतो, तो मरणानंतरही मिटत नाही., ही वस्तुस्थिती या कार्यक्रमाने नव्याने अधोरेखित केली. अलीकडे तर सार्या जाती समूहांनी आपल्या जाती-पातीच्या तटबंदी अधिक मजबूत करण्याचं काम सुरू केलं की काय, असं वाटावं, असं वातावरण आहे. शेकडो समाजसुधारकांनी या विषयात केलेलं काम मातीमोल ठरविण्याचं काम आम्ही मिळून सारे करत आहोत. काळाचे काटे उलटे फिरविण्याचा हा मानवी पराक्रम विषण्ण करणारा आहे. माणसं अधिक शिकत आहे, स्वयंपूर्ण होत आहे, आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित होत आहे तरीही जातीच्या वळचणीला जाण्याची वृत्ती कायम आहे. कोण, कुठल्या जातीत जन्माला यावा, कोणत्या घरी जन्माला यावं, यात माणसाचा वैयक्तिक कुठलाही पराक्रम नसताना
माणसं आयुष्यभर एका जीवशास्त्रीय अपघाताचा, योगायोगाचा अभिमान का कुरवाळत बसतात, ही आकलनापलीकडची गोष्ट आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’ या गाजलेल्या कादंबरीत जातीचा अभिमान हा किती फसवा आणि निर्थक असतो, याचं अतिशय परिणामकारक चित्र रेखाटण्यात आलं आहे. लाखो वर्षांच्या माणसाच्या इतिहासात वेगवेगळय़ा जाती समूहातील स्त्री-पुरुषांचे कसे संकर झाले आणि त्यातून कशी पिढी निर्माण झाली, हा इतिहास माहीत नसताना आम्हीच शुद्ध रक्ताचे हा अभिमान मिरवणार्या त्या कादंबरीतील चरित्र नायक श्रीनिवास श्रोत्रीला आपल्या जन्माची हकीकत कळल्यानंतर शेवटी जबर धक्का बसतो. (आमच्यापैकी अनेकांना आपल्या घराण्यातील असा संकराचा इतिहास माहीत नाही, म्हणून बरं आहे.) खरं तर जात हा मुळात मिरविण्याचा विषयच नाही. कर्तृत्व आणि पराक्रमाला जात अडवू शकत नाही, याची वर्तमानाप्रमाणेच इतिहासातही शेकडो उदाहरणे आहेत. तरीही माणसं जातीवरूनच एखाद्याचं कर्तृत्व जोखण्याचा नादाणपणा करतात. माणसाचा जन्म हा त्याच्या अगोदरच्या जन्मातील कर्मावर अवलंबून असतो, ही अत्यंत चुकीची व अशास्त्रीय समजूत या देशातील बहुसंख्य माणसांमध्ये रूढ असल्याने माणसं जातीला चिपकून बसली आहेत. खरं तर जात आणि धर्म या दोन प्रकाराने देशाचं जेवढं नुकसान झालं, तेवढं दुसरं कशानेही झालं नाही. इतिहास याला साक्षी आहे. अतिशय छोटय़ा-छोटय़ा कारणांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’, म्हणणार्यांच्या पूर्वजांनी खालच्या जातीतील लोकांना धर्माबाहेर काढले आहे. पाकिस्तानची निर्मिती करणार्या मोहम्मद अली जिनांचे पणजोबा कट्टर हिंदू होते. पुंजाजी वालजी ठक्कर असे त्यांचे नाव. वैष्णव लोहाणा समाजातील श्रीकृष्णाचे उपासक असलेल्या पुंजाजीने सौराष्ट्रात एका वर्षी दुष्काळ पडल्यामुळे उदरनिर्वाहासाठी मासोळी विकण्याचा व्यवसाय केला. बस्स.. तेवढय़ा एका कारणाने त्यांना धर्माबाहेर काढण्यात आले. असं करू नका. आपल्याला धर्माबाहेर काढू नका. आपण पोटासाठी हे सारं केलं, अशा विनवण्या पुंजाजीने केल्या. पण धर्माचे ठेकदार ऐकायला तयार नव्हते. पुढे 100 वर्षाने याच पुंजाजीच्या पणतूने धर्माचाच आधार घेऊन देश तोडला. अशी शेकडो उदाहरणं आहेत. कोणी पाव खाल्ला म्हणून, तर कोणी समुद्र प्रवास केला म्हणून जाती-धर्माबाहेर काढण्यात आलं आहे. दलित समाजासोबत तर येथील उच्चभ्रू समाज अमानवी असाच वागला आहे. कायम गावकुसाबाहेर ठेवलेल्या या समाजाला युद्धाच्या आघाडीवर अशीच बहिष्कृत वागणूक मिळत असे. ज्या पानिपतच्या लढाईतील पतनाचं तुम्हां-आम्हांला दु:ख आहे, त्या लढाईदरम्यानही दलित सैनिकांना आपला स्वयंपाक वेगळाच करावा लागत असल्याच्या नोंदी आहेत. असे हजारो अपमानस्पद प्रसंग गाठीशी असतानाही दलित समाजाने या देशासोबत आपली नाळ तोडली नाही, हे त्यांचे या देशावर उपकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या द्रष्टय़ा व सुजाण नेत्याने या मातीतील बौद्ध धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारला असता तर देशाचे आणखी तुकडे पडायला वेळ लागला नसता. इतिहासातील या धडय़ापासून आम्ही काहीही शिकायला तयार नाही, ही आमची शोकांतिका आहे. वरून आम्ही कोणतेही मुखवटे पांघरून असलो तरी मनातील जातीयता जिवंत आहे, याचे ठिकठिकाणी प्रत्यंतर येते. कुठल्याही मोठय़ा वर्तमानपत्रातील ‘वर-वधू पाहिजे’च्या जाहिराती काळजीपूर्वक वाचा. स्वत:चं रंग, रूप, घर, सुसंस्कृत, सुस्थापितपणा आदींचं वर्णन केल्यानंतर कुठल्याही जाती-धर्मातील स्थळ चालेल, असं सांगितलं असतं. मात्र लगेच शेवटी कंसात एससी, एसटी क्षमस्व असं ठळकपणे नमूद केलं असतं. उच्च जातीतील सुसंस्कृत म्हणविणार्यांचा हा खरा चेहरा असतो. हे असे बनावटी चेहरे समाजात ठायी ठायी दिसतात. आंबेडकरी जनतेने समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविली असतानाही, हे नाही सुधारायचे असं म्हणत अजूनही त्यांना हिणविलं जाते. खासगी कंपन्यात अजूनही दलित कर्मचार्याची नेमणूक करताना शंभरदा विचार केला जातो. महाराष्ट्रातील एका वृत्तपत्र समूहात दलित कर्मचार्याला महत्त्वाची जागा मिळणार नाही, याची प्रकर्षाने काळजी घेतली जाते. सामाजिक समरसतेचा दावा करणारे काही वेगळं वागत नाही. ते सोयीसाठी फुले-आंबेडकरांचा गजर करतील, पण घरी आंबेडकरांची प्रतिमा लावण्याची हिंमत त्यांच्याकडून होत नाही. हा असा बेगडीपणा आपल्या सार्या समाजाचा आता स्थायीभाव झाला की काय, असे वाटायला लागले आहे. सार्यांना आपापल्या जातीच्या कुंपणात सुरक्षित वाटायला लागले आहे. त्यामुळे जाती-पातीच्या तटबंद्या अधिक मजबूत केल्या जात आहे. त्यासाठी ठिकठिकाणी जाती-पातीचे मेळावे, संमेलने भरविली जातात. या अशा मेळाव्यांना उपस्थित राहताना कुठल्याही सुशिक्षिताला आपण काही चुकीचं करतो, असं वाटत नाही. त्यांना तसं वाटू नये, त्यासाठी प्रत्येक समाजाच्या ठेकेदारांनी महापुरुषांचीही जात शोधून त्यांना आपल्यापुरतं मर्यादित ठेवण्याचं उद्योग सुरू केला आहे. आणि हे सगळं बिनबोभाट सुरू असताना आम्ही मात्र आता कुठे हो जात-पात? पूर्वीसारखं काही उरलं नाही, असे म्हणायला मोकळे आहोत. (लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत.) भ्रमणध्वनी – 8888744796 |