प्रतिभाताईंच्या खात्यात वजाबाकीच अधिक

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील मंगळवारी निवृत्त झाल्यात. त्या अशाही पहिल्या राष्ट्रपती ठरल्यात की, ज्यांना पुन्हा संधी देऊ नये, याबाबत त्यांनी ज्या पक्षात संपूर्ण हयात घालविली त्या कॉंग्रेससहित सार्‍या राजकीय पक्षांमध्ये एकमत होतं. प्रतिभाताईंना पुन्हा राष्ट्रपती करा, अशी मागणी चुकूनही कोणी केली नाही. साधारणत: नवीन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची वेळ आली की, विद्यमान राष्ट्रपतींना पुन्हा एक संधी द्यावी, अशी मागणी होत असते. मीडियातही त्याबाबत चर्चा होत असते. यावेळी पाच वर्षापूर्वी निवृत्त झालेले डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव समोर आले, मात्र प्रतिभाताईंचे नाव ना कुठल्या राजकीय राजकीय पक्षाने रेटले, ना मीडियात त्यांच्याबाबत चर्चा झाली. पाच वर्षापूर्वी ज्या महाराष्ट्राला त्यांच्या निवडीचा प्रचंड अभिमान वाटला होता, तेथेही त्यांच्या निवृत्तीचे कुठलेही पडसाद उमटले नाहीत. उलट बरे झाले! संपला एकदाचा कार्यकाळ, अशाच प्रतिक्रिया समोर आल्या. त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे काही महिने, तर त्या कायम वादाच्या भोवर्‍यात होत्या. गेल्या तीन-चार महिन्यात माध्यमांनी त्यांना चांगलंच आडव्या हाताने घेतलं. राष्ट्रपतीपदावर बसलेल्या व्यक्तीवर टीका करणं सहसा माध्यम टाळतात. मात्र इंडिया टुडे, इंडियन एक्सप्रेस, टाईम्स आदी देशातील आघाडीच्या माध्यम समूहांनी ‘शर्मिन्दगी भरा रेकॉर्ड’, ‘वर्स्ट प्रेसिडन्ट’, ‘पोकळ प्रतिभा’, ‘राष्ट्रपती की महाराष्ट्रपती?’ असे मथळे आणि विशेषणांनी त्यांचा उद्धार केला. याच कालावधीत ‘फेसबुक’सारख्या सोशल नेटवर्किग साईटवर अतिशय उपहासात्मक मजकूर त्यांच्याबद्दल प्रसिद्ध होत होता. शेवटच्या काळात कोणीही त्यांना गांभीर्याने घ्यायला तयार नव्हतं. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीबाबत एवढी टोकाची नापसंती आजपर्यंत फारच कमीवेळा निर्माण झाली आहे.

या सार्‍या अधोगतीला खुद्द प्रतिभाताई आणि त्यांचे कुटुंब जबाबदार आहे. राष्ट्रपतीपदाचा कुठलाही आब न राखता ते पद स्वत:च्या कुटुंबाचे हितसंबंध जपण्यासाठी आणि मुलाला राजकारणात जबरदस्तीने घुसविण्यासाठी वापरल्याने प्रतिभाताई देशवासीयांच्या मनातून उतरल्या. त्यांच्या प्राथमिकता वेगळ्या असल्याचे सोनिया गांधींसहित संपूर्ण देशाला लवकरच लक्षात आले. महिला राष्ट्रपती म्हणून प्रारंभीचा कौतुक सोहळा आटोपल्यानंतर 2009 मध्ये त्या पहिल्यांदा वेगळ्या अर्थाने चर्चेत आल्या. त्यांचे सुपूत्र रावसाहेब शेखावत हे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, अशी बातमी आल्याने सारेच चमकले होते. राष्ट्रपतींचा मुलगा निवडणूक लढवू इच्छितो किंवा राजकारणात करिअर करू इच्छितो, याचं हे नवल नव्हतं., तर तेव्हाच्या राज्य मंत्रिमंडळातील कर्तबगार मंत्री असा लौकिक मिळविलेल्या डॉ. सुनील देशमुखांना घरी बसवून त्यांची जागा बळकविण्याचा राष्ट्रपतीपुत्राचा हट्ट देशाला तेव्हा चकीत करून गेला होता. सत्ता नावाचा प्रकार एखाद्याला काही क्षणात होत्याचा नव्हता करून टाकते, याचा प्रत्यय तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींसह सार्‍यांना आला होता. दिल्लीतील कॉंग्रेस नेतृत्व सुनील देशमुखांची तिकीट कारण नसतांना कापण्यासाठी अनुकूल नसतांना प्रतिभाताईंनी प्रतिष्ठेचा विषय करून रावसाहेबांसाठी तिकीटं खेचून आणलं. त्यानंतर देशाचं लक्ष अमरावतीच्या निवडणुकीकडे लागलं होतं. प्रणव रॉय, शेखर गुप्ता, नलिनी सिंह असे देशपातळीवरील एकापेक्षा एक दिग्गज संपादक तेव्हा अमरावतीत येऊन गेले होते. त्या निवडणुकीत मुलाला निवडून आणण्यासाठी राष्ट्रपती भवनाचा खुलेआम वापर करण्यात आल्याचे त्यांनी अनुभवले. निवडणूक जिंकण्यासाठी सोयीची असलेली अमरावतीतील माणसं तेव्हा भरभरून दिल्लीला पाठविण्यात येत होती. तेथे राष्ट्रपती भवनाच्या खर्चाने त्यांचा पाहुणचार केला जात होता. दिल्ली, आग्रा, अजमेर, दर्शन घडविलं जातं होतं. त्या काळात अमरावतीच्या लोकांना भेटणं एवढाच राष्ट्रपतींचा एककलमी कार्यक्रम होता. रावसाहेब शेखावत निवडून येणे हा तेव्हा राष्ट्रपती भवनाच्या प्रतिष्ठेचा आणि इज्जतीचाही विषय झाला होता. त्यासाठी सारे फंडे वापरले गेले. समाजातल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठितांना थेट राष्ट्रपती भवनातून फोन येत होते. सर्व प्रमुख जातीच्या अखिल भारतीय नेत्यांना तेव्हा अमरावतीत आणून बसविण्यात आले होते. सार्‍या शासकीय यंत्रणांनाही कामी लावण्यात आले होते. राष्ट्रपतीपुत्राला निवडून दिलं, तर आता आहे, त्यापेक्षा दहा पट विकास होईल, असं गाजरही तेव्हा दाखविण्यात आलं होतं. (तेव्हाच्या सार्‍याच घडामोडी एका रंजक पुस्तकाचा विषय आहे.)

एवढय़ा भक्कम प्रयासानंतर रावसाहेब शेखावत निवडून न आले, तरच नवल होतं. त्यानंतर मुलाचे राजकारणातील पाय मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याचाच भाग म्हणून गेल्या तीन वर्षात काही महत्वाचे प्रकल्प त्यांनी अमरावतीला दिलेत. प्रतिभाताईंचा राष्ट्रपतीपदावर असण्याचा अमरावतीकरांना काय फायदा झाला, हे सांगायचं झाल्यास अमरावतीच्या रेल्वे स्टेशनला पुनर्जीवन मिळालं. ते मॉडेल स्टेशन झालं. अमरावतीवरून मुंबई, तिरूपती, जबलपूर, नागपूर, सुरत या शहरांसाठी थेट रेल्वेगाडय़ा सुरू झाल्यात. अमरावती-नरखेड मार्ग पूर्णत्वास गेला. (यात खासदार आनंदराव अडसुळांचाही मोठा वाटा आहे) अचलपूरची फिनले मिल सुरू झाली. बडनेरात रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखाना आणि नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये भारत डायनामिक्सचा क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे भूमिपूजन झाले. विमानतळासाठी जागा संपादित झाली. प्रतिभाताईंच्या राष्ट्रपतीपदाची अमरावतीसाठी उपलब्धी म्हणायची झाल्यास, तर ही एवढीच. केंद्रीय विद्यापीठ, मुलींसाठी आयआयटीचं नवीन केंद्र आदी काही गोष्टी त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आलं नाही. राष्ट्रपतीपदावरील प्रतिभाताई अमरावतीचा अगदी कायापालट करून टाकतील, अशी लोकांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष सत्ता आणि अप्रत्यक्ष सत्ता यात शेवटी फरक असतो. एक गोष्ट मात्र खरी आपल्यापरीने जेवढं करता येईलं, तेवढं करण्याचा शेखावत दाम्पत्याने प्रयत्न केला. त्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल.

मात्र आज निवृत्त झाल्यानंतर प्रतिभाताईंच्या कारकिर्दीचा ताळेबंद तपासला, तर दुर्दैवाने जमेपेक्षा वजाबाकीच त्यांच्या खात्यावर अधिक आढळते. मुलाच्या राजकारणासाठी राष्ट्रपतीपदाचा केलेला वापर ही गोष्ट बाजूला जरी ठेवली तरी इतर विषयात कुठलीही छाप सोडण्यात त्या संपूर्णपणे अयशस्वी ठरल्या. राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प असतो, त्याला फार काही करायला स्कोप नसतो, हे जरी खरं असलं तरी आपल्या वेगळेपणाने स्मरणात राहता येतं. डॉ. राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन व अलीकडच्या काळात डॉ. कलाम यांनी ते दाखवून दिलं आहे. मात्र प्रतिभाताईंच्या खात्यात लक्षात ठेवावी, अशी एकही गोष्ट नाही. सरकारच्या तिजोरीला 205 कोटीचा चुना लावणारे 23 देशांचे परदेश दौरे, आपल्या गृहराज्यात शंभरपेक्षा जास्त दिवसांचं वास्तव्य, फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या 35 आरोपींना दया दाखविणे (यामध्ये एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाचाही समावेश होता.) अशा कारणांनी त्या वादग्रस्त ठरल्या. अमरावतीत एनसीसीची जागा बळकविण्याचा आरोप, निवृत्तीनंतर पुण्यातील सरंक्षण विभागाची 26 हजार चौरस फुटाच्या जागेची बंगल्यासाठी केलेली मागणी, या सार्‍या प्रकारांनी त्यांची प्रतिमा चांगलीच मलीन झाली. पुण्याचं प्रकरण, तर कोर्टात गेलं. प्रतिभाताईंनी माघार घेतली म्हणून बरं झालं, नाहीतर मोठय़ा नामुष्कीला सामोरं जावं लागलं असतं. थोडक्यात प्रतिभाताईंची कारकीर्द ही चुकीच्या परंपरा पाडणारी आणि लक्षात न ठेवावी अशीच आहे. राष्ट्रपतीपदावर निवड होण्याअगोदर त्यांची जी प्रतिमा होती, ती प्रतिमाही गेल्या पाच वर्षात पुसून गेली आहे. एका वाक्यात सांगायचं झाल्यास प्रतिभाताईंचा राष्ट्रपतीपदाचा प्रवास हा एका अधोगतीचा प्रवास होता.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत.)

मो. 8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top