सासू-सुनेची तीच कटू कहाणी

पारवेकर घराणं हे यवतमाळ जिल्ह्यातील तालेवार घराणं आहे. या घराण्याजवळ असलेली जमीन, संपत्ती आणि या घराण्यातील पुरुषांबद्दल यवतमाळ जिल्ह्यात भरपूर दंतकथा सांगितल्या जातात. त्या सार्‍याच कथा खर्‍या आहेत, असे मानण्याचे कारण नाही. मात्र पारवेकर घराण्याजवळ नेमकी किती जमीन आहे, हे त्यांचे त्यांनाच माहीत नाही, ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे. मध्यंतरी आंध्र प्रदेश सरकारने अमुकअमुक ठिकाणची जमीन तुमच्या मालकीची असल्याचे आमच्या रेकॉर्डवरून कळते. योग्य ती कागदपत्रे सादर करून त्याचा ताबा घ्यायला या, असे पत्र पारवेकर कुटुंबाला पाठविले होते. निजाम सरकारच्या काळात मोठे जमीनदार असलेले पारवेकर एकेकाळी आंध्र प्रदेशातील हैदराबादपासून यवतमाळपर्यंत हजारो एकर जमिनीचे मालक होते, हे वास्तव आहे. महाराष्ट्राच्या अनेक मोठय़ा शहरांत त्यांची भरपूर स्थावर मालमत्ताही आहे. असे हे गर्भश्रीमंत कुटुंब सध्या सासू-सुनेच्या वादामुळे महाराष्ट्रात गाजत आहे. या घराण्यातील तरुण कर्तबगार आमदार नीलेश पारवेकर यांच्या अपघाती निधनानंतर सत्ता आणि संपत्तीसाठी त्यांच्या घरात जे काही महाभारत घडत आहे, ते त्यांच्या घराण्यावर प्रेम करणार्‍यांसाठी कमालीचं क्लेशकारक व धक्कादायक आहे. या प्रकरणात यवतमाळच्या नवनिर्वाचित आमदार नंदिनी पारवेकर यांच्याविरोधात सासू कांताबाई पारवेकर यांनी पोलिसात नुकतीच केलेली तक्रार, नंदिनीला नीलेशच्या संपत्तीतून बेदखल करण्याचा झालेला प्रय▪आणि तिला जाणीवपूर्वक दिली जात असलेली अपमानास्पद वागणूक पाहता सुनांबद्दलच्या समाजाच्या दृष्टिकोनात काहीही फरक पडला नसल्याचे लक्षात येते. सत्ता आणि पैसा कायम ज्यांच्या घरात पाणी भरत आला आहे अशा श्रीमंत आणि प्रतिष्ठित पारवेकर कुटुंबात जर असं घडत असेल, तर ज्या कुटुंबात नवर्‍याच्या मृत्यूनंतर पत्नी स्वत: काही धडपड करू इच्छित असेल, तिला काय सहन करावं लागत असेल, याची आपण कल्पना करूशकतो. काही अपवाद वगळता महिलांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगू नये, असाच घरातील मंडळींचा प्रय▪असतो. एकीकडे राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सातत्याने प्रय▪सुरू आहे. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये महिलांना ५0 टक्के प्रतिनिधित्व मिळालं आहे. आज ना उद्या लोकसभा-विधानसभेत त्यांना ३३ टक्के वाटा निश्‍चित मिळणार आहे. मात्र असे असतानाही घरातल्या फ्रंटवर मात्र त्यांची कोंडीच सुरू आहे. ही कोंडी फोडण्याचा प्रय▪केल्यास घराबाहेर पडण्याची पाळी त्यांच्यावर येते. माहेरची वा इतर मंडळींची साथ नसली, तर बदनामीही त्यांच्या वाट्याला येते. २१ व्या शतकात महिला लोकप्रतिनिधींची ही अवस्था असेल, तर सामान्य महिलांचं काय?

नंदिनी पारवेकर आज आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते तिच्या पाठीशी आहेत, हे माहीत असतानाही कांताबाई पारवेकर टिपिकल सासू होऊन तिला छळण्याचा प्रय▪करीत आहे. आपल्याकडे सासू नावाच्या महिलांचा ‘मॉईंड सेटअप’ कसा असतो, हे यावरून स्पष्ट होते. अतिशय ढोंगी आणि मुखवटे घेऊन जगणार्‍या भारतीय समाजात पोरगा जिवंत असेपर्यंत वा ती पोरासोबत संसार करेपर्यंतच सुनेला किंमत असते. तोपर्यंतच ती गृहलक्ष्मी असते. (कुठल्याही कारणाने पोराचे सुनेसोबत मतभेद होऊन ती वेगळी झाली, तर गृहलक्ष्मी म्हणणारेच तिला छिनाल म्हणण्यात आघाडीवर असतात.) तो गेल्यानंतर सुनेने लाचार होऊन आमच्या मर्जीनुसारच जगलं पाहिजे, ही बहुतांश भारतीय कुटुंबांची मानसिकता असते. पारवेकर कुटुंबही याला अपवाद नाही. नीलेश पारवेकरांच्या मृत्यूनंतर त्यांची विधानसभेची जागा त्याचा लहान भाऊ योगेश पारवेकरला मिळावी, अशी त्याची आई कांताबाई पारवेकरांची इच्छा होती. मात्र नीलेशची पत्नी नंदिनी पारवेकर यांनी स्वत: लढविण्याची तयारी दाखविताच कांताबाईतील सासूचा ‘इगो’ दुखावला. आपल्याला न विचारता, सल्लामसलत न करता, विशेष म्हणजे आपली इच्छा नसताना ही लढते कशी, असा विषय होता. तेथून या कुटुंबातील कलहाला सुरुवात झाली. नंदिनी निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यासाठी यवतमाळात येताच कांताबाईंनी थयथयाट सुरू केला. शेवटी नंदिनीला आपल्या एका स्नेह्याकडे मुक्काम हलवावा लागला. त्यादरम्यान त्यांचा दीर योगेश पारवेकरने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून पडद्याआड बरंच काही घडलं. त्याची परिणीती म्हणजे नंदिनीला पोलीस संरक्षणाची मागणी करावी लागली. पोरगा जाऊन काही दिवस होत नाही तोच सुनेला संपत्तीपासून वंचित करण्याचा डावही कांताबाईंनी आखला होता. हे सारं पाहून निवडणूक प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले काँग्रेसचे युवानेते थक्क झाले होते. शेवटी मध्यरात्री यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांच्या केबिनमध्ये नंदिनीला तिचे हक्क मिळवून द्यावे लागले होते. निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीदरम्यान कांताबाई व योगेशला कसेबसे शांत ठेवले. निवडणुकीतील विजयानंतर सर्व ठिकठाक होईल, असे त्यांच्यासहित सर्वांना वाटत होते. पण दोन-चार दिवसांतच कांताबाईने नंदिनी पारवेकरांना घर सोडायला भाग पाडले. आता तर नंदिनीने आपल्याला मारहाण केली, अशी खोटी तक्रार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

खरं तर हा विषय पारवेकर कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे. इतरांना त्यात लुडबुड करण्याचा अधिकार नाही. मात्र लोकप्रतिनिधी असलेल्या महिलेबाबत जेव्हा असे प्रकार घडतात, तेव्हा तो विषय वैयक्तिक उरत नाही. अलीकडेच पतीचं निधन झालेल्या एका लढाऊ महिला आमदाराबाबतही असाच प्रकार घडला. आमदार विधानसभेच्या अधिवेशनात व्यस्त आहे, हे पाहताच सासरच्या मंडळींनी त्यांच्या मुलांना गोडीगुलाबीने घरी नेलं. त्यांच्याशी अतिशय प्रेमाने वागत प्रॉपर्टीच्या काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या. आमदारांना जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्या चकितच झाल्या. आपण सत्तेत असतानाही सासरच्या मंडळींची बदमाशी करण्याची हिंमत होते, हे त्यांच्यासाठी आश्‍चर्यकारक होतं. शेवटी सासरी जाऊन रौद्ररूप धारण करून त्यांनी कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली. बर्‍याच लोकप्रतिनिधी महिलांचे सासरच्या मंडळींबद्दलचे हे असे कटू अनुभव आहे. अर्थात सर्वच प्रकरणांत सासरची मंडळी खलनायक नसतात. काही प्रकरणांत सुनाही करामती असतात. देशातील सर्वांत लोकप्रिय गांधी घराण्यातील सुनेनं अशी करामत केली आहे. संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या खासदार मनेका गांधींनी आपली महत्त्वाकांक्षी आई अमतेश्‍वर आनंदच्या सल्ल्यावरून आपल्या पंतप्रधानपदावरील सासूलाच आव्हान देण्याचा प्रय▪केला. मनेका गांधींचं वय कमी असल्याने त्यांनी शिकावं, अनुभव घ्यावेत त्यानंतर राजकारणाचा विचार करावा, अशी इंदिराजींची इच्छा होती. पण मनेकाच्या आईला आणि काही विघ्नसंतोषी मंडळींना संजय गांधींचा वारसा लगेच तिने चालवावा, अशी घाई झाली होती. त्या घाईतून इंदिरा गांधी परदेश दौर्‍यावर असताना त्यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस पदाधिकार्‍यांची बैठक घेण्याचा प्रय▪केला. शेवटी इंदिरा गांधींना परदेश दौरा अर्धवट सोडून भारतात यावं लागलं. (जिज्ञासूंनी अधिक माहितीसाठी कॅथरिन फ्रँक व पुपुल जयकर यांचं इंदिराजींबद्दलचं पुस्तक अवश्य वाचावं.) इंदिराजी परत आल्यावर या विषयातील कटुता एवढी वाढली की, शेवटी मनेका गांधींना घर सोडून जावं लागलं. त्यानंतर त्या आणखीनच बेभान झाल्या. त्यांनी आपल्या सासूच्या बदनामीची मोहीम सुरू केली. ‘सूर्या’ या त्यावेळच्या गाजलेल्या मासिकात त्यांनी इंदिरा गांधींची बदनामी करणारा लेख लिहिला. पंडित नेहरूंचे सचिव एम. ओ. मथाई यांच्या आत्मचरित्रातील काही भाग प्रसिद्ध करून इंदिरा गांधींच्या चारित्र्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रय▪झाला. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये अरुण शौरींनी आणि ‘इलस्ट्रेडेड विकली ऑफ इंडिया’त खुशवंतसिंहांनीही बरंच काही उलटसुलट छापलं. या माध्यमांसहित अनेकांनी त्या वेळी इंदिराजींना सुनेचा छळ करणारी खाष्ट सासू करून टाकलं होतं. पुढे खरं काय आहे, ते बाहेर आल्यानंतर लोकांना इंदिराजींची बाजू कळली होती. शेवटी काय, घर इंदिराजींचं असो, पारवेकरांचं वा तुमचं-आमचं; सासू-सुनेची तीच कटू कहाणी आहे. यात बदल करता येणार नाही का?

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Scroll to Top