केजरीवालांच्या विरोधात व्यवस्थेच्या ठेकेदारांचा जळफळाट

ऐनवेळेवर काँग्रेसने काही कोलांटउड्या घेतल्या नाही, तर शनिवारी अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, हे जवळपास निश्‍चित आहे. मात्र काँग्रेस-भाजपाचे नेते आणि प्रस्थापित बुद्धिवंतांना मात्र ही गोष्ट काही पचनी पडताना दिसत नाही. येनकेन प्रकारेन केजरीवाल आणि आम जनता पार्टीवर ते टीकेची झोड उठवीत आहे. यामध्ये शरद पवारांपासून नितीन गडकरींपर्यंत आणि कुमार केतकरांपासून कुमार सप्तर्षीपर्यंत अनेक मोठमोठय़ा महानुभावांचा समावेश आहे. केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांना आता देव आठवतील… वीजदरात ५0 टक्के कपात आणि दररोज ७00 लिटर पाणी देण्याचं वचन आता प्रत्यक्षात आणा म्हणा…महागाईवर आवाज उठविणारे ती कशी नियंत्रणात आणतात, पाहता येईल…२४ तास तत्त्व-आदर्शाच्या माळा ओढणारे आता दहा टक्के तरी आश्‍वासनं पूर्ण करतात काय, पाहायचं…अशा आणि यासारख्या असंख्य प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत. या प्रतिक्रियांचा उपहासात्मक सूर पाहिला, तर केजरीवाल अपयशी व्हावे, त्यांची फजिती व्हावी, यासाठी ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत, हे लक्षात येते. केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या यशामुळे व्यवस्थेचे लाभ उठविणार्‍या सार्‍या प्रस्थापितांचा असाच जळफळाट, चरफडाट झाल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे लोकपाल आंदोलनादरम्यानही त्यांच्यावर टीका होत होती आणि आता जनतेचा कौल मिळवून सत्ता मिळवीत असतानाही विरोधकांचं पोट दुखणं काही थांबत नाहीय.

यानिमित्ताने सर्वांना माहीत असलेली गाढवाचं ओझं ही कथा आठवते. एकदा एक माणूस आपल्या मुलासह गाढव खरेदी करायला बाजारात जातो. गाढव खरेदी करून घराकडे परत येत असताना रस्त्यात काही माणसं भेटतात. अरे, एवढं चांगलं गाढव आहे. पायी काय चालता… मुलाला त्याच्यावर बसवा. तो माणूसही विचार करतो, बरोबर आहे. एवढं गाढव असताना दोघांनीही पायी चालण्यात काय अर्थ? त्यानंतर मुलाला गाढवावर बसून ते चालायला लागतात. काही वेळ जात नाही तोच आणखी काही माणसं भेटतात. ते म्हणतात, वा रे मुलगा, बाप एवढा थकला आहे. हा चांगला गाढवावर बसला आहे. मुलगा शरमतो. त्याला वाटतं खरंच आहे. वडील थकले आहेत. तो खाली उतरतो आणि वडिलाला गाढवावर बसायला लावतो. त्यानंतर पुन्हा प्रवास सुरू होतो. काही वेळानंतर आणखी नवीन माणसं भेटतात. ते म्हणतात, कमाल आहे. एवढय़ा लहान मुलाला पायी चालवून हा बाप गाढवाची सवारी करतो आहे..काय युग आलं आहे. कठीण आहे… बापाला काय करावं समजत नाही. शेवटी तो मुलालाही वर उचलून घेतो आणि दोघेही गाढवावर बसून घराच्या मार्गाला लागतात. मात्र काही वेळात आणखी माणसं भेटतात. ते म्हणतात, अरे माणसं आहात की राक्षस…तुमच्या दोघांच्या ओझ्याने ते गाढवं पार वाकलं आहे आणि तुम्ही मात्र मजेत त्याच्यावर बसले आहेत. त्याची काही फिकीर करणार आहे की नाही? बापलेकाला नेमकं कोणाचं ऐकावं आणि काय करावं समजत नाही. केजरीवाल आणि सहकार्‍यांच्या विषयात असंच काहीसं झालं आहे. ‘लोकपाल’साठी ते आंदोलन करत असताना रस्त्यावर आंदोलनं करणं सोपं आहे. व्यवस्था परिवर्तनाचा एवढा पुळका आहे, तर जनतेतून निवडून येऊन दाखवा. सत्ता मिळवा आणि बदल करा, असे आव्हान त्यांना मिळत होतं. केजरीवालांनी ते आव्हान स्वीकारून आम आदमी पार्टीची स्थापना केली. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही प्रस्थापित पक्षांना अद्दल घडवीत निवडणुकीत प्रचंड यश मिळविलं. मात्र आम्हाला बहुमत नसल्यामुळे आम्ही सत्ता मिळविण्याचा प्रय▪करणार नाही, असं नम्रपणे सांगितलं. मात्र लगेच त्यांच्यावर टीका सुरू झाली. यांचा लोकशाही व्यवस्थेवर विश्‍वास नाही. यांना केवळ सनसनाटी निर्माण करायची आहे. जबाबदारीपासून हे दूर पळताहेत…वगैरे. शेवटी मीडियातील शहाण्यांचा रेटा वाढल्यानंतर आम आदमी पक्षाने आम आदमीला विश्‍वासात घेऊन आम्ही निर्णय घेऊ, असे घोषित केले. त्यावरही टीका झाली. हे अशा पद्धतीने निर्णय घेत असतात का? यांच्याकडे आत्मविश्‍वास नाही. लोकांकडे जाण्याची पद्धत हास्यास्पद आहे.. असं बरंच काही. त्यानंतर जवळपास २५0 च्या वर चौक सभा घेऊन लोकांचं मत जाणून घेतल्यानंतर त्यांनी सरकार स्थापना करण्याचा निर्णय घेतला. तर आता ज्या काँग्रेसविरुद्ध रान उठविलं, त्यांच्याच सर्मथनाने हे कसे काय सरकार बनवितात, यांनाही सत्तेचा मोह सुटत नाही, अशी टीका सुरू झाली. थोडक्यात गाढवाच्या ओझ्यासारखीच कथा आहे.

या सगळ्या घटनाक्रमाचा व टीकाटिप्पणीचा बारकाईने विचार केला, तर लक्षात येतं की, राजकीय असो वा माध्यमातील ठेकेदार, त्यांना चांगुलपणाचंच वावडं आहे. एखादा समूह काही मूल्य, तत्त्व, आदर्श घेऊन पुढे येतो. त्यासाठी लढतो आणि जिंकतो, ही गोष्ट त्यांना पचविणे जड जात आहे. त्यामुळे आता व्यवस्था कशी थोर, तिच्यात राहूनच कसे परिवर्तन केले पाहिजे, याचे पाठ वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांतून पढविले जात आहेत.ही सारी तथाकथित शहाणी माणसं म्हणतात त्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर कदाचित केजरीवालांचा आदर्शवाद टिकणार नाही. आदर्श आणि व्यवहारात किती तफावत असते, हे त्यांना समजेल. प्रशासकीय व्यवस्थेतील दोष दूर केल्याशिवाय सामान्य माणसांपर्यंत सत्तेचे लाभ पोहोचविता येत नाही, हे त्यांच्या लक्षात येईल. या सार्‍या गोष्टी खर्‍या मानल्या तरी केजरीवाल आणि आम जनता पार्टीने अतिशय अल्प कालावधीत भारतातील प्रस्थापित राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घातलं आहे. त्यांना एक नवीन धडा दिला आहे, हे त्यांचं योगदान स्वयंघोषित शहाण्यांच्या लक्षातच येत नाहीय. चेकद्वारे मिळालेल्या देणगीतून निवडणूक लढविता येते. दारू, पैसा न वाटता निवडणूक जिंकता येतात, गुन्हेगारांना तिकीट नाकारूनही यश मिळविता येतं, अशा अनेक अव्यवहार्य व अशक्यप्राय मानल्या जाणार्‍या गोष्टी त्यांनी करून दाखविल्या आहेत. आताही समजा त्यांनी दिलेल्या आश्‍वासनापैकी अनेक आश्‍वासन पूर्ण करण्यात त्यांना यश येणार नाही, असं मानलं तरी एक मुख्यमंत्री आणि त्याचे आमदार सरकारी निवासस्थान नाकारतात, कुठलीही सुरक्षाव्यवस्था घेण्यास नकार देतात. सरकारी वाहन घेत नाहीत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणार नाही, असं सांगतात. आमदार निधीचा विषय संपविण्याचं ठरवितात. या सार्‍या गोष्टी काही अंशी व्यवस्था परिवर्तनाकडे घेऊन जाणार्‍या आहेत की नाहीत? उद्या आम पार्टीच्या कार्यपद्धतीमुळे प्रभावित होऊन राजकारणातील काही टक्के लोकप्रतिनिधींनी जरी असं वागायचं ठरविलं, तरी किती मोठा बदल होईल. ‘आम आदमी पार्टीकडून आम्हाला बरंच काही शिकता येईल,’ असं राहुल गांधींनी जे म्हटलं, ते काही खोटं नाही. त्यामुळे टीकाकारांना काहीही म्हणू द्या. केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने येथील व्यवस्थेच्या ठेकेदारांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसांनी मनात आणलं, तर या व्यवस्थेत बदल घडविता येतो, हा आत्मविश्‍वास त्यांनी सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला आहे. त्यामुळे केजरीवालांचं सरकार एक महिना टिकते, सहा महिने की वर्षभर, हे महत्त्वाचं नाही. त्यांनी निर्माण केलेला चांगुलपणावरील विश्‍वास आणि दाखविलेली परिवर्तनाची दिशा चिरस्थायी ठरणार आहे.

                             चांगुलपणाला मरण नाही

चांगुलपणावरील विश्‍वास वाढावा अशी आणखी एक घटना वाशीममध्ये घडली आहे. वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धनज बु. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन अमदाबादकर चक्क विजयी झाले आहेत.जयप्रकाश नारायणांची चळवळ व शरद जोशी आणि आता राजू शेट्टींच्या शेतकरी संघटनेत आयुष्य झोकून देणार्‍या या फकीर कार्यकर्त्याचा विजय हा समाजासाठी काही करणार्‍या माणसांची उमेद वाढविणारा आहे. अंगात खादीचा झब्बा, खांद्यावर शबनम, त्यात चार-पाच डायर्‍या आणि रोज रात्री बीबीसीची हिंदी सेवा ऐकण्यासाठी असलेला रेडिओ आणि घरातून निघताना न चुकता घेतलेली शिदोरी, या अवतारातला हा माणूस महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात वेगवेगळय़ा चळवळीत काम करणार्‍या माणसांना परिचितच नाही, तर त्यांचा लाडकाही आहे. जयप्रकाश नारायणांपासून आज राष्ट्रीय राजकारणात अग्रणी असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शरद यादव, लालूप्रसाद यादव यांच्यासोबतीने खांद्याला खांदा लावून सभा गाजविलेला हा माणूस आहे. हिंदी आणि उर्दूवर अशी हुकमत आहे की, हिंदी पट्टय़ातील माणूस लाजेल. शेरोशायरीचा प्रचंड साठा. प्रसंग सांगा. सेकंदाच्या आत सर्मपक शेर सांगणार म्हणजे सांगणार. प्रारंभी छात्र युवा संघर्ष वाहिनी आणि नंतर चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, विजय विल्हेकर यांच्या साथीने शेतकरी संघटनेत पायाला भिंगरी लावून काम करताना लौकिक मोठेपणाची चिंता न करता सारं आयुष्य कष्टकरी व शेतकर्‍यांसाठी झोकून दिलेलं. हे करताना कुठलीही अपेक्षा नाही. परिणामी वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या व कुटुंबाच्या वाट्याला यायची ती परवड आलीच. पण त्याबद्दल कुठेही तक्रारीचा सूर न लावता हा कलंदर आपल्या मस्तीत आयुष्य जगत राहिला. आताही जिल्हा परिषदेच्या निवडणुकी लढताना, ‘मी काही तुम्हाला मतांची भीक मागायला आलो नाही. तुम्हाला वाटत असेल, तर द्या. नाहीतर नका देऊ,’ ही मस्ती होतीच. मात्र गजाननरावांच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी मात्र मतदारांच्या सद्सद्विवेकबुद्धीला हात घातला. खेडोपाडी स्वत:च सतरंजी व हातात छोटा लाऊडस्पिकर घेऊन सभा भरविणारे तुपकर म्हणायचे, ‘या माणसाला यश-अपयशाचं काही नाही. पण उद्या यांच्या मुलींनी विचारलं की, ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यभर लढला, झिजला त्यांनी तुम्हाला साधं मतही दिलं नाही, तर हे काय उत्तर देणार ? असा प्रश्न यांच्या वाट्याला येऊ नये वाटत असेल, तर यांना एक संधी द्या.’ रविकांत तुपकरांनी काळजातून घातलेल्या सादेला मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी गृहमंत्री व शासकीय यंत्रणा राबली असतानाही खेड्यापाड्यातील माणसांनी लाडगावच्या फाटक्या गजाननला निवडून दिलं. त्यांच्या स्वत:च्या जातीची आठ-दहा घरे नसतानाही मतदारांनी हा चमत्कार घडवून आणला. चांगुलपणाला कधीच मरण नसतं, हे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं. या यशानिमित्त गजानन अमदाबादकर(९८५0५३५१९0) आणि रविकांत तुपकर (९४२२९४१५४४) यांचं अभिनंदन करायला विसरूनका. आणि हो जाता जाता गजाननरावांच्या शब्दात त्यांचा संघर्ष सांगणारा हा त्यांनीच सांगितलेला शेर..

         ‘उजालो के लिए ऐसी हिमाकत कौन करता है

         जलाकर घर अपना अंधेरो से बगावत कौन करता है

        तुम भी आकर जरा शहर मे देखो

        किन सरफेरी हवाओसे चरागोकी हिफाजत करते है’

    (लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Scroll to Top