ही अशीही माणसं असतात..

मलईदार मानल्या जाणार्‍या पाटबंधारे विभागातील मुख्य अभियंता या पदावरील माणसाची लाईफस्टाईल कशी असते? डोळे दिपविणारा बंगला, बंगल्यासमोर किमान दोन-तीन महागडय़ा गाडय़ा, शंभरेक एकर शेती, पत्नी, भाऊ, मुलांच्या नावे आठ-दहा ठिकाणी कोटय़वधींची स्थावर मालमत्ता, मुलं उच्चशिक्षित. व्यवस्थित सेटल झालेली. चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा सुखवस्तूपणा. हातात वेगवेगळ्या ग्रहांच्या सोन्यात मढविलेल्या अंगठय़ा, गळ्यात जाडसर चेन आणि दुनिया मेरी मुठ्ठी मे.ं.असा चेहर्‍यावरचा भाव. साधारणत: पाटबंधारे किंवा बांधकाम विभागाच्या उच्च पदावरील अभियंत्याबाबत तुमचा-आमचा हाच अनुभव आहे.

मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनोरुग्ण ठरविलेले आणि ज्यांच्या पत्राने महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडविला ते विजय बळवंत पांढरे हा माणूस मात्र याला अपवाद आहे. सध्या लाईमलाईटमध्ये असलेल्या या माणसाला आपण भेटलो की, एका वेगळ्याच वल्लीला भेटल्याचं समाधान मिळतं. त्यांच्या पत्राने उठलेलं वादळ अजूनही शांत झालं नाही, या माणसाच्या चेहर्‍यावर मात्र त्याच्या कुठेही खुणा नाहीत. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पांढरे सुटीवर गेलेत अशा बातम्या छापून आल्यात. मात्र त्यात काही तथ्य नाही. एक-दोन दिवस सुटी मिळाली की, पांढरेंची पावलं अनेक वर्षापासून त्यांचे गाव लाखनवाडय़ाकडे वळत असतात. सध्याही ते तिथेच आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावपासून 30 किमी अंतरावरील हे गाव अजित पवारांच्या राजीनाम्यापासून एकदम चर्चेत आलं आहे. वेगवेगळ्या संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, राजकीय नेते, माध्यमांचे प्रतिनिधी सार्‍यांची सध्या लाखनवाडय़ात गर्दी आहे. पांढरेंबद्दल सार्‍यांनाच कुतूहल आहे. प्रत्येक जण त्यांना भेटायला उत्सुक आहे. अनेकांना त्यांचा पराक्रम समजून घ्यायचा आहे. काहींना त्यांची संपूर्ण कुंडली जाणून घ्यायची आहे, तर काहींना त्यांचा वापर करता येऊ शकतो का, याची चाचपणी करायची आहे. पांढरे मात्र अगदी शांत आहेत. येणार्‍या-जाणार्‍या सर्वासोबत ते बोलतात. मात्र आपण काही वेगळं केलं असा भाव कुठेही नाही. अभिनिवेश तर अजिबात नाही. कुठलं श्रेय घेण्याचा प्रयत्नही नाही. अजितदादांच्या राजीनाम्याविषयात बोलतं करण्याचा प्रयत्न केला तरी काही हाती येत नाही. ”मी काहीही केलं नाही. अनेक वर्षापासून माझ्या खात्यातल्या

अनियमिततेबाबत, गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांना मी कळवीत असतो. अमरावती, जळगाव, पुणे व आता नाशिकमध्येही असतानाही वेळोवेळी वरिष्ठांना खात्यात काय सुरू आहे, हे पत्रव्यवहाराद्वारे सांगितलं आहे. हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे,” एवढंच ते सांगतात.

लाखनवाडय़ातले विजय पांढरे हे मुख्य अभियंता आहेत, असं वाटतचं नाही. पांढरा सदरा, पांढरा पायजमा आणि गळ्यात पांढराच शेला गुंडाळलेले पांढरे येथे असले म्हणजे मुकुंदराज महाराज संस्थानच्या मंदिरात रात्री ‘ज्ञानेश्वरी’वर, ‘गीते’वर प्रवचन करतात. ‘ज्ञानेश्वरी’ हा त्यांचा आवडता विषय. ज्ञानेश्वरीच्या पद्यमय स्वरूपाचे अतिशय सोप्या, सर्वाना समजेल अशा मराठीत त्यांनी रूपांतर केले आहे. नामवंत कवी मंगेश पाडगावकर दररोज या अनुवादाचं वाचन करतात. त्यांनी त्याबद्दल पांढरेंचा गौरवही केला आहे. मूळ संस्कृत भाषेतील ‘भगवद्गीता’, ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ आदींच्या सुलभ भाषांतराचे कामही त्यांनी केले आहे. ”ज्ञानेश्वरी, भगवद्गीता केवळ पारायण वा निरूपणासाठी नाही, तर आयुष्य जाणतेपणानं कसं जगायचं हे सांगणारे ते ग्रंथ आहेत,” असं ते मानतात. पांढरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या जगण्यात त्यांच्या चिंतनाचं प्रतिबिंब दिसतं. कमालीचं साधं जीवन हे कुटुंब जगतं. गावाच्या काहीसं बाहेर एक साधं घर पांढरेंनी बांधलंय. या घरात गरजेच्या वस्तू सोडल्या, तर कुठलाही झगमगाट नाही. चैनीच्या वस्तू तर अजिबात नाहीत. त्यांची पत्नी मंगला आणि मुलं अभिषेक आणि विशाल येथेच राहतात. या दोघांचं शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झालं. हा निर्णय पांढरेंनी समजून उमजून घेतलाय. ”आजच्या शिक्षणाचा आणि जगण्याचा काही संबंध नाही. शिक्षणानं माणूस शिक्षित होतो, शहाणा होत नाही,” असं ते मानतात. त्यामुळे लिहिण्या-वाचण्यापुरतं शिकणं पुरे असं म्हणत त्यांनी दोन्ही मुलांना शेतीत गुंतविलं. या कुटुंबाची लाखनवाडय़ात आठ एकर शेती आहे. केळी आणि सोयाबीनचं उत्पादन ते घेतात. लहानपणापासून मुलांवर श्रमसंस्कार घडतील, याची काळजी त्यांनी घेतली आहे. आपण समाजापासून वेगळे नाही. त्यांचाच एक भाग आहोत, ही भावना त्यांनी कुटुंबात रुजविली आहे. दुसर्‍या व चौथा शनिवारी आणि इतर सुटीच्या दिवशी पांढरे लाखनवाडय़ात येतात. प्रत्येक वेळी एसटीने येतात आणि एसटीनेच जातात. नाही म्हणायला एक जुनी मारोती व्हॅन त्यांच्याकडे आहे. मात्र प्रवासासाठी एसटीलाच त्यांची पसंती असते. महाविद्यालयीन जीवनात स्वामी विवेकानंदांचा पगडा असलेल्या पांढरेंच्या पूर्वजांचं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील पहूर. मात्र अनेक वर्षापूर्वी ते लाखनवाडय़ात आलेत. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ते पाटबंधारे खात्यात रुजू झाले. सुरुवातीला साहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून त्यांची नेमणूक झाली. कालांतराने कार्यकारी अभियंता म्हणून त्यांना बढती मिळाली. काही वर्षापूर्वी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधनीच्या मुख्य अभियंतापदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी जिथे जिथे सेवा दिली आहे तिथे याच पद्धतीने काम केलं आहे. आपलं काम चोख करताना चुकीचं काही होत असल्यास कर्तव्याचा भाग म्हणून व्यवस्थेच्या चौकटीत राहूनच वरिष्ठांना त्यांनी वेळोवेळी माहिती दिली. सध्या गाजत असलेल्या सिंचन घोटाळ्याबाबत तीन-चार वर्षापासून वरिष्ठांना ते सावध करीत होते.मुख्यमंत्री व राज्यपालांना लिहिलेलं आपलं पत्र कसं बाहेर आलं, याची आपल्याला खरंच कल्पना नसल्याचं ते सांगतात. शासकीय अधिकारी अध्यात्माशी जोडले गेले तर चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत, असे त्यांना वाटते. जानेवारी महिन्यात नाशिकमध्ये संतसाहित्य संमेलन झाले होते. त्या संमेलनात ‘शासकीय अधिकारी आणि अध्यात्म’ या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले होते.

आता अजित पवारांच्या एपिसोडनंतर लोक त्यांना खरोखरच बुवा, महाराज बनवायला निघाले आहेत. त्यांना शेंदूर लावण्याचा प्रयत्न अनेकांनी सुरू केला आहे. कोणाला त्यांच्यामध्ये खैरनार दिसतो आहे, कोणाला अण्णा, तर कोणाला केजरीवाल. ते मात्र स्वत:ला काहीही चिपकून घेत नाहीय. गीतेतल्या कर्मयोगावर ठाम श्रद्धा असलेले पांढरे ”आपण कुठलाही पराक्रम केला नाही. आपण कुठल्या राजकीय पक्षाविरुद्ध वा कुठल्या नेत्याविरुद्धही नाही. राजकारणाशीही आपल्याला काही देणंघेणं नाही. आपण फक्त कर्तव्य केलं. ते यापुढेही करत राहू,” एवढंच सांगतात. त्यामुळे लाखनवाडय़ातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना तरळत असते. ही अशीही वेडी माणसं असतात तर..

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top