|
|
गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या खर्याखुर्या संत परंपरेतील शेवटची कडी काल अच्युत महाराजांच्या जाण्याने निखळली. 88 वर्षाचं कृतार्थ आयुष्य महाराज जगले. मात्र त्यांचं हे अवचित जाणं त्यांच्या लाखो भक्तांना, चाहत्यांना चटका लावणारं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत समाजातील शेवटच्या माणसासाठी धडपडणार्या महाराजांचं देहावसान एका ध्यासकथेचा समारोप आहे. झगमगाटापासून कायम दूर राहिलेल्या अच्युत महाराजांनी कर्म आणि सेवा या दोनच गोष्टीला आपल्या आयुष्यात प्राथमिकता दिली. गीतेतला कर्मयोग प्रत्यक्ष आचरणात आणणारे आणि भक्तांमध्ये तो रूजविणारे महाराज अतिशय सरळसाधं आयुष्य जगले. आजच्या संत, महाराजांप्रमाणे कधीही त्यांनी आपल्याभोवती गूढतेचं आवरणं उभं होऊ दिलं नाही. त्यांचं आयुष्य म्हणजे सर्वासाठी खुलं पुस्तक होतं. गाडगेबाबांचा निर्मोही दृष्टीकोन आणि तुकडोजी महाराजांचा रोकडा धर्मविचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली.
महाराजांनी आपल्या आयुष्यात असंख्य भागवत कथा केल्यात. मात्र देव, धर्म, अध्यात्म, मोक्ष या नावाने त्यांनी कधी पोपटपंची केली नाही वा दुकानं उघडलं नाही. ‘सामान्य माणसाची सेवा हीच परमेश्वर सेवा’ या एका सुत्राभोवती ते कथा गुंफत असतं. इतर महाराजांप्रमाणे त्यांनाही चमत्कार चिपकविण्याचे, त्यांच्याबाबत वेगवेगळ्या अद्भुत कथा प्रसविण्याचे प्रयत्न झाले. पण महाराजांनी ते कायम हाणून पाडले. चमत्कार नसतो, हेच त्यांनी कायम रोखठोकपणे सांगितले. धागा, दोरा, गंडे, जादूटोणा या सार्या प्रकारापासून दूर राहा, असेच ते भक्तांना सांगत असे. चमत्काराच्या कथा सांगून लोकांना फसविण्यापेक्षा सामान्य माणसाच्या सामूहिक शक्तीतून समाजासमोरील सर्वप्रकारचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा कायम भर होता. आयुष्याच्या पूर्वार्धात त्यांनी धर्मग्रंथाचं अध्ययन केलं. त्यानंतर संपूर्ण देश फिरून वेगवेगळ्या भागातील माणसं, त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. उत्तरार्धात मात्र त्या व्यथांवर उतारा शोधण्याचंच काम त्यांनी केलं. शिवाजीराव पटवर्धन यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या कामाची दिशा आणखी स्पष्ट झाली. तपोवनात राहून त्यांनी शिवाजीरावांसोबत कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासोबत इतर सेवाकार्याला वाहून घेतलं. देव-धर्माचा समाजावर मोठा प्रभाव आहे, हे लक्षात घेऊन जनतेच्या देवाधर्मावरील श्रद्धेचा उपयोग विधायक कामासाठी करण्याचा त्यांनी निश्चय केला. वर्षात तीनशेपेक्षा जास्त ठिकाणी ते प्रवचन, भागवत कथा ऐकवित. प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबांची दशसूत्री लोकांच्या मनावर बिंबविण्याचं काम त्यांनी केलं. एकदा दर्यापुरात असाच भागवत सप्ताह सुरू असताना त्यांना ते राहत असलेल्या ठिकाणापासून प्रवचनस्थळापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी एका मुसलमान सायकल रिक्शावाल्याकडे होती. एक दिवस तो उदास दिसल्याने महाराजांनी त्याची विचारपूस केली. आपली 14 वर्षाची मुलगी नसिमबानो हृदयविकाराने पीडित आहे, मात्र आपल्याजवळ तिच्या ऑपरेशनसाठी पैसे नसल्याने आपण चिंतेत आहे, असे त्या रिक्शावाल्याने त्यांना सांगितले. त्याची ती वेदना महाराजांना भिडली. त्या दिवशी प्रवचन संपल्यानंतर महाराजांनी नसिमबानोची कहाणी सांगून भक्तांना मदतीचे आवाहन केले. हाच प्रसंग अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचा मुहूर्तमेढ रोवणारा ठरला. नसिमबानोप्रमाणे गरीब कुटुंबातील हजारो व्यक्ती हृदयरोगावर उपचार करू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी अमरावतीत अद्ययावत हार्ट हास्पिटल उभारण्याचा निर्धार केला. पुढील काळात तेच त्यांच जिवितकार्य झालं. त्यानंतर महाराज जेथे कुठे प्रवचन, भागवत कथा करतं तेथे आरतीतून गोळा होणारी रक्कम हॉस्पिटलच्या उभारणीसाठी देत. त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त जमा झालेली 55 लाखाची रक्कमही त्यांनी हॉस्पिटलला दान केली. महाराजांनापासून प्रेरणा अनेक भक्तांनीही प्रत्येकी एक लाख रूपये हॉस्पिटलसाठी दिले. भक्तांचा सेवाभाव एवढा प्रखर होता की, हॉस्पिटलमधील शस्त्रक्रियेची अत्याधुनिक साधनं खरेदी करण्यासाठी अनेकांनी आपली घरं स्टेट बॅंकेकडे गहाण ठेवली. या सामूहिक पुरूषार्थातून 2005 मध्ये हॉस्पिटल सुरू झालं. डॉ. अशोक भोयर या सेवाभावी डॉक्टरने मुंबईतील सहा आकडी पगाराची नोकरी सोडून येथे काम सुरू केलं. त्यानंतरचा इतिहास सार्यांना माहीत आहे. आतापर्यंत 900 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया येथे झाल्या आहेत. ज्यांच्यावर येथे उपचार शक्य नाही, त्यांना मुंबईला पाठवून त्यांच्या उपचाराचा खर्चही महाराजांची संस्था करते. हृदयरोग्यांच्या सेवेसोबतच नेत्रचिकित्सा शिबीर, व्यसनमुक्ती, आरोग्य सेवा केंद्र, कृषी मेळावा, महिला सेवा फंड, विद्यार्थी सेवा फंड असे शेकडो उपक्रम महाराज राबवित असे. हे सारं करतांना महाराजांनी कधीही गाजावाजा वा मार्केटिंग केलं नाही. त्यांच्या हार्ट हॉस्पिटलसाठी पैशाची नितांत गरज असतांनाही त्यांनी चुकीच्या माणसांसमोर हात पसरला नाही. आधी आपण सर्वानी ताकद लावायची, समाजाला आपलं काम योग्य वाटलं, तर पैसे आपोआप मिळतील, असे महाराज सांगतं. त्यांचं म्हणनं पुढे खरंही ठरलं. चांगल्या कामासाठी समाजाने त्यांना पैशाची कधीही कमी पडू दिली नाही. महाराज आज लौकिकार्थाने आपल्यातून गेले आहे. मात्र त्यांचं सेवाकार्य लोकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. ते कार्य त्याच ताकदीने पुढे नेणं हीच या कर्मयोग्याला खरी श्रद्धांजली ठरणार आहे.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)
मो.8888744796 |