सत्ता आणि संघटना या दोन्ही गोष्टींचा विचार केला, तर कम्युनिस्ट पक्ष आज संघ-भाजपासमोर कस्पटासमान आहे. मात्र कन्हैया नावाच्या त्यांच्या छोट्या उंदराने संघ परिवाराच्या मजबूत फौजेची पार दाणादाण उडवली आहे. संघाचा चडफडाट त्यामुळे होतो आहे. एक पाच फुटी किरकोळ पोरगं आपले सारे इरादे ध्वस्त करतो. एका भाषणाने तो देशाचा हीरो होतो, या गोष्टीने संघ परिवारातील संघटना भयंकर अस्वस्थ आहेत. ………………………………………………………………………………………………………………………………….. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाने केलेले जबरदस्त भाषण संघ परिवाराला
चांगलेच झोंबलेले दिसते. घटना कितीही मोठी असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शक्यतो स्वत: तोंड उघडत नाही. या प्रकरणात मात्र संघाची प्रतिक्रिया चकीत करणारी आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी कन्हैयाची संभावना ‘उंदीर’ अशी केली आहे. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी लोककथेतील टोपीवाल्या उंदराची कहाणी सांगितली. ‘एका उंदराला रस्त्यावर एक नक्षीकाम केलेली सुंदर टोपी सापडते. ती टोपी ही जगातील सर्वात सुंदर टोपी आहे. राजाच्या राजमुकुटापेक्षाही माझी टोपी शानदार आहे, असे तो सर्वांना सांगत सुटतो. हे राजाला कळताच तो उंदराची टोपी जप्त करतो. यामुळे चिडलेला उंदीर राजाची निर्भर्त्सना करतो. राजा, तू यापेक्षा दुसरं काहीही करू शकत नाही. तू अतिशय क्षुद्र माणूस आहेस. छोट्या मनाचा आहे… असं बरंच काही उंदीर बोलत सुटतो. शेवटी दया येऊन राजा टोपी वापस करतो. चेकाळलेला उंदीर त्यामुळे सांगत सुटतो. राजा मला घाबरला. तो माझ्यामुळे भयभीत झाला. वगैरे….’ अशी ती कहाणी आहे. कन्हैया आणि तो ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतो ते कम्युनिस्ट टोपी सापडलेल्या उंदरासारखे चेकाळलेले आहेत. प्रत्यक्षात त्यांची काहीही ताकद नाही, असे संघाला सांगायचे आहे. सत्ता आणि संघटना या दोन्ही गोष्टींचा विचार केला, तर कम्युनिस्ट पक्ष आज संघ-भाजपासमोर कस्पटासमान आहे. मात्र कन्हैया नावाच्या त्यांच्या छोट्या उंदराने संघ परिवाराच्या मजबूत फौजेची पार दाणादाण उडवली आहे. संघाचा चडफडाट त्यामुळे होतो आहे. एक पाच फुटी किरकोळ पोरगं आपले सारे इरादे ध्वस्त करतो. एका भाषणाने तो देशाचा हीरो होतो, या गोष्टीने संघ परिवारातील संघटना भयंकर अस्वस्थ आहेत.
आता ‘पडलो तरी नाक वर’ या टिपिकल संघाच्या पद्धतीने कन्हैयाला जामीन मंजूर करताना न्यायालयाने कुठल्या अटी-शर्ती घातल्या हे सांगून पुन्हा एकदा देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र जेएनयू आणि कन्हैया प्रकरणात संघाची पार नामुष्की झाली आहे. त्यांनी प्लान केलेला डाव त्यांच्यावरच उलटला आहे. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसने अरविंद केजरीवालांच्या विषयात ज्या चुका केल्यात, त्याच चुका भाजपा-संघाने जेएनयू-कन्हैयाबाबत केल्या आहेत. जे प्रकरण एका विद्यापीठ कार्यक्षेत्रापुरतं र्मयादित राहिलं असतं, संघ-भाजपाच्या दुराग्रहामुळे ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं. जगविख्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठापासून नोआम चॉम्स्की, ओरहान पामुकसारख्या जागतिक विचारवंतांनी भारत सरकारच्या दडपशाहीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. संघ परिवाराचा प्रॉब्लेम हा आहे की, त्यांना स्वतंत्र विचार करणारी माणसं, तसा विचार करायला शिकवणारे विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भीड आणि स्वतंत्र विचारांची शिकवण देणार्या संस्था या सार्यांचंच वावडं आहे. त्यामुळे कन्हैयाची जीभ कापून आणणार्याला पाच लाखाचे बक्षीस देण्याची भाषा त्यांचे कार्यकर्ते करतात. मुसलमानांना या देशातून हाकलून लावा, अशी चिथावणी त्यांचे केंद्रीय मंत्री देतात. पुरोगामी आणि स्वतंत्र विचार करणार्या देशभरातील माणसांचं ऊर्जा केंद्र असलेलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अनेक वर्षांपासून संघ परिवाराच्या रडारवर आहे. गेल्या ९0 वर्षांपासून सातत्याने खोटा प्रचार आणि खोटा इतिहास मांडून फसवणूक करणार्या या परिवाराचे मनसुबे जेएनयूतील अभ्यासकांनी अनेकदा उधळून लावले आहेत. त्यामुळे या विद्यापीठाला असलेली विश्वासार्हता आणि वैचारिक क्षेत्रातील मान्यता काढून घेण्याचा प्रयत्न संघ परिवार सातत्याने करतो आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे देशविरोधी व माओवादी कार्यकर्त्यांचे केंद्र आहे. येथे राष्ट्रविरोधी कारवाया चालतात, हे संघ परिवार सातत्याने सांगतो.या वेळी हेच मुद्दे घेऊन या विद्यापीठाला घेरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राष्ट्रभक्ती व देशविरोधी घोषणा असे ज्वालाग्रही इंधन सोबतीला असल्याने यश नक्की मिळेल, असा ठाम विश्वास त्यांना होता. सुरुवातीचे एक-दोन दिवस त्यांना यश मिळालेही. संपूर्ण देशभर जेएनयूच्या विद्यार्थ्यांबद्दल संताप निर्माण झाला. मात्र अनेकांनी खोलात जाऊन हे प्रकरण तपासले तेव्हा संघ परिवारातील विद्यार्थी संघटनेने व्हिडीओमध्ये केलेली फेरफार समोर आली. ज्या कन्हैयाला खलनायक करण्याचा प्रयत्न झाला, त्याने देशविरोधी कुठलीही घोषणा केली नव्हती, हेही स्पष्ट झाले. भाजपाधाजिर्ण्या उद्योगपतींचा पैसा असलेल्या वृत्तवाहिन्यांची आणि त्यांच्या तथाकथित स्टार न्यूज अँकरची बदमाशीही बाहेर आली. आता तर या प्रकरणातील सारेच सत्य बाहेर आले आहे. त्यामुळे परिवार बिथरला आहे. या संपूर्ण प्रकरणाने भाजपा-संघाला जबरदस्त सेटबॅक बसला आहे. गेली दोन वर्ष जे काही थोडं फार कमावलं होतं, ते या प्रकरणाने पार धुवून निघालं आहे. कन्हैया आणि त्याच्या भाषणाबद्दलचा संताप त्याच्यातूनच आला आहे. कन्हैयाची उंदीर म्हणून खिल्ली उडवणे ठीक आहे. पण स्वतंत्र बुद्धीने विचार करणारे कन्हैयासारखे उंदीर देशात भरपूर आहेत, ते एकवटले तर पुन्हा एकदा वनवासात जावं लागेल, एवढं भान जरी संघ परिवाराला या प्रकरणातून आलं तर ते त्यांच्या भल्याचं असेल.
मुख्यमंत्र्यांची सत्त्वपरीक्षा..
मराठवाड्याच्या दौर्यावर गेलेल्या राज्य मंत्रिमंडळाला शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. सारं आभाळच फाटलेल्या आणि समोर केवळ वाताहतच दिसत
असलेल्या माणसांचा तो संताप आहे. अनेक वर्षांपासून तो साचला आहे. राज्यकर्ते ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’च्या गप्पा हाणत असताना एक हंडा पाण्यासाठी दहा-दहा तास वाट पहावे लागण्याचा तो संताप आहे. ही तर सुरुवात आहे. माणसं आणखी भडकणार आहेत. मराठवाड्यातील सध्याच्या स्थितीचं वर्णन करायला ‘भयानक’ याशिवाय दुसरा शब्द नाही. दुष्काळाने शेती केव्हाच उद्ध्वस्त झाली. शेतकर्यांच्या आत्महत्या अव्याहत सुरू आहेत. जनावर विकून झालीत. आता वर्षोनुवर्ष राहत असलेली गावं सोडण्याची पाळी आली आहे. आईवडिलांच्या आत्महत्येच्या भीतीने तरुण मुली लग्नाला नाही म्हणताहेत. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांचे जीव जात आहेत. लातूर, बीड, उस्मानाबादसारखी मोठी शहरं रिकामी होण्याची स्थिती आली आहे. सर्वस्व गमवावी लागलेली माणसं काहीही करू शकतात. पुढील चार महिने मुख्यमंत्री व सरकारची सत्त्वपरीक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या परवाच्या दौर्यावर भंपकपणा, नाटकबाजी अशी टीका झाली. टीका करणे सोपे आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाला मराठवाड्यात आणून सरकार याविषयात अतिशय गंभीर आहे, असा मेसेज दिला आहे. बाकी मंत्र्यांचं माहीत नाही, पण देवेंद्र फडणवीस हा नाटकं करणारा माणूस नाही. मानवी प्रयत्न व शासकीय यंत्रणेच्या जोरावर जेवढा दिलासा मराठवाड्याला देता येईल, तेवढा हा माणूस नक्की देईल, ही खात्री बाळगली पाहिजे. सध्या हाच एक विषय त्यांच्यासाठी सर्वोच्च प्रॉयोरिटीचा आहे. सध्या पिण्याचं पाणी, रोजगार, मानवी स्थलांतर या तीन विषयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. माणसं पाणी, अन्न आणि विस्थापनामुळे मरणार नाहीत, याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुंबईत शेकडो अब्जाधीश आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्या तिजोर्या मराठवाड्यासाठी मोकळ्या करायला लावल्या पाहिजेत. पैसे कितीही लागोत, माणसं जगली पाहिजेत. ही लढाई केवळ राज्य सरकारची नाही. आपली सर्वांचीच आहे. ज्याला जे शक्य आहे, ते केलं पाहिजे. (लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत) |
|
|
|