राहुलबाबांचं कौतुक आता खूप झालं!

प्रिय, राहुल गांधी
सप्रेम नमस्कार

सरलेल्या आठवड्यात तुम्ही नागपूर आणि पुण्याला येऊन गेलेत. तुमच्या देशभरातील इतर दौर्‍यांप्रमाणे या दौर्‍यातही तुम्ही प्रसिद्धिमाध्यमांना दूर ठेवले होते, पण तुमचे काँग्रेसचे कार्यकर्ते भारी हुशार. तुमचं विमान उडत नाही तोच तुमच्या दौर्‍यातील खडा न् खडा माहिती बाहेर आली. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील लोकांसोबत काय बोलले, कोणत्या मंत्र्याबाबत नाराजी व्यक्त केली, मंत्री व आमदारांकडे दुर्लक्ष करून पक्ष पदाधिकार्‍यांना बोलण्याची संधी तुम्ही कशी दिली? अशी बारीकसारीक माहिती चौफेर पसरली. तुम्ही काँग्रेसचे युवराज असल्याने तुमचं किती कौतुक करू न किती नाही, असं तुमच्या पदाधिकार्‍यांना झालं होतं. साक्षात तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, तुमच्यासमोर बोलायला मिळालं यामुळे स्वाभाविकच ते हवेत होते. 

 
तुमच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच माध्यमांचेही प्रतिनिधी भारून गेले होते. शेवटी तीसुद्धा माणसंच आहेत. शेवटी तुमच्या घराण्याची जादू आहे ती आहेच. ती नाकारण्यात अर्थ नाही. स्वाभाविकच तुम्ही आल्यामुळे काँग्रेस पदाधिकारी कसे भारावून गेले, कार्यकर्त्यांमध्ये कसं नवचैतन्य निर्माण झालं, या आशयाच्या बातम्या सगळीकडे छापून आल्यात. या बातम्यांच्या गर्दीत नव्या पिढीतील लोकप्रिय लेखक चेतन भगत यांच्या एका स्टेटमेंटने लक्ष वेधून घेतलं. ते म्हणतात, ”राहुल गांधींचे गुण मला कुणी सांगितले, तर मी संपूर्ण देशात त्यांचा प्रसार करीन. त्यांच्याजवळ देशाला देण्याजोगं काय आहे? काही असेल, तर फक्त आई आणि आईच आहे. त्यापेक्षा अधिक काय आहे, हे मला माहीत नाही.” चेतन भगत यांचं हे स्टेटमेंट तुमच्या चाहत्यांसह अनेकांना पटण्याची शक्यता नाही. काहीसं उठवळ, खळबळ निर्माण करण्यासाठी केलेली ही बडबड आहे, असं त्यांचं मत पडेल. देशातील अनेक जाणती माणसं तुमच्यामध्ये देशाचं भवितव्य शोधताहेत. तुम्ही देशातील परिस्थितीत नक्कीच मोठा फरक पाडाल, असं काय कोण जाणे त्यांना विश्‍वास वाटतोय. स्वाभाविकच त्यांना हे आवडणार नाही.

पण राहुलजी, बाष्कळ बडबड म्हणून सोडून द्यावा, एवढा चेतन भगत छोटा माणूस नक्कीच नाही. त्याचं चिंतन, आकलन मोठं आहे. त्याला तुमच्याबद्दल जसं वाटतंय, तसं अनेकांना वाटत असल्यास नवीन काही नाही . तुम्ही गेल्या पाच वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहात. देशाच्या कानाकोपर्‍यात फिरून देश समजून घेण्याचा प्रय▪करीत आहात. तुमच्या आजी इंदिरा गांधींप्रमाणे देशातील शेवटच्या माणसाचं दु:ख जाणून घेत आहात. त्यासाठी कधी एखाद्या दलिताच्या घरी मुक्काम करून तिथेच जेवण घेता, कधी रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करता, तर कधी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची विधवा असलेल्या कलावतीचे आसू पुसता (तुमचे विरोधक याला इमेज बिल्डअप करण्याचा प्रकार मानतात. मध्यंतरी काही इंग्रजी साप्ताहिकांमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करण्यासाठी तुमच्या थिंक टँकने ठरवून प्लान केलेल्या या इव्हेंट होत्या, असंही लिहून आलं होतं.) हे तुम्ही ठरवून करत असाल वा अंतरीच्या कळवळ्यातून प्रामाणिकपणे करत असाल, तुमच्या या प्रयत्नाकडे देश मात्र कौतुकानेच पाहत होता. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला राजकुमार देश समजून घेतो आहे, याचं सार्‍यांनाचं कौतुक वाटत होतं. याचे पणजोबा, आजी व वडिलांना जे जमलं नाही, ते व्यवस्था परिवर्तनाचं काम हा नक्कीच करेल, असा भाबडा विश्‍वासही अनेकांना तुमच्याबद्दल वाटायला लागला होता. पण…पण दिवस सरत गेले, वर्ष उलटत गेले, पण तुमचं आपलं तेच सुरू आहे. शेवटच्या माणसापर्यंत सत्तेचा लाभ पोहोचला पाहिजे, सत्तेच्या दलालांना हाकला, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सत्ता पोहोचली पाहिजे, त्यांना सन्मान मिळाला पाहिजे. असं आणि असंच काहीतरी…

राहुलजी, प्रारंभी हे खूप छान वाटलं. तुम्हाला यामुळे प्रसिद्धीही भरपूर मिळाली, पण गेल्या पाच वर्षांत यातील काय झालं? परवा नागपूर, पुण्यात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांना बाहेर बसवून तुम्ही काँग्रेस पदाधिकार्‍यांशी बोलले, त्यांना सत्तेत वाटा देण्याचं आश्‍वासन दिलं. पदाधिकारी यामुळे मोहरले. पण खरंच काँग्रेसच्या आजच्या व्यवस्थेत सामान्य कार्यकर्त्याला काही संधी आहे? दीड वर्षापूर्वी युवक काँग्रेसमध्ये जे कार्यकर्ते मेहनत करतील, अधिकाधिक सदस्य नोंदणी करतील त्यांना पदाधिकारी करण्याची योजना तुम्ही आणली होती. काय झालं त्याचं? सार्‍या नेत्यांच्या पोरांनी भरभक्कम पैसा ओतून ढिगानं सदस्य नोंदणी केली आणि सारी पदं बळकावली. तुम्ही ज्या अपेक्षेने नवीन व्यवस्था आणली होती, त्याचा त्यांनी पार बँडबाजा वाजविला. (तसंही कुठलीही चांगली व्यवस्था वा योजनेचे बारा वाजविण्यात काँग्रेसवाल्यांची मास्टरकी आहे.) तुम्ही आणि तुमची थिंक टँक पाहत राहण्याशिवाय काही करू शकले नाही. आता सहा महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही कार्यकर्त्याला बळ देण्याची भाषा करत आहात.खरंच तुम्ही ते करणार? नरेंद्र मोदींसोबतच्या लढाईत एकेक जागा महत्त्वाची असताना सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळेल, हे संभवतच नाही. जे प्रस्थापित आहेत आणि ज्यांच्याजवळ चिक्कार पैसा आहे, अशांनाच तिकीट जाणार. निवडणुकीच्या समीकरणात तुमची सारी आदर्श तत्त्वं बाजूला पडणारं राहुलजी. उगाच कशाला कार्यकर्त्यांना गाजर दाखविता… राजकारण हे शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी असते, हे समजण्याइतपत एव्हाना तुम्ही हुशार झाला आहात. त्यामुळे निवडणुकी जिंकण्यासाठी तुमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांचं पाठबळ लाभावं, त्यासाठी त्यांना चार्ज करावं, यासाठी तुम्ही बोलला असाल, तर हरकत नाही. कारण एखादा-दुसरा अपवाद वगळता सच्च्या कार्यकर्त्याला काँग्रेस तिकीट देणार नाही, तिकीट देताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’चाच विचार होईल, हे तुम्हाला माहीत नाही, असं कसं म्हणता येईल…

माफ करा राहुलजी, गेल्या पाच वर्षांत पडद्यामागून काँग्रेसची सारी सूत्रं तुम्ही हलवताहेत. मात्र तुमच्या पक्षात गुणात्मक फरक असा काहीच दिसत नाही. तुम्ही सत्तेतील दलाल संपवा, असं म्हटलं होतं, पण जिथे जिथे तुमची सत्ता आहे, तिथे हे दलाल वाढलेलेच दिसताहेत. काँग्रेसशासित राज्यांमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. तुमचे मंत्री अधिक गब्बर होताहेत. सतरंजी उचलणार्‍या कार्यकर्त्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिष्ठा, पदं मिळाल्याचं कुठेच दिसत नाही. मंत्र्यांची, आमदारांची पोरंच नवीन नेते म्हणून उदयास येत आहेत. पक्षातील लाचारी, लाळघोटेपणाचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. जो अधिक लाचार, त्याला अधिक संधी असा मामला आहे. एकंदरीत परिस्थितीत काहीही फरक पडला नाहीय. हे सारं असं असताना तुम्ही वारंवार तीच कॅसेट वाजवाहेत. सत्तेचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, काँग्रेस कार्यकर्त्याला अधिक सन्मान मिळाला पाहिजे. हे करायला तुम्हाला कोणी रोखलं आहे? काँग्रेस पक्षात तुमचं चालत नाही, हे आता सांगू नका. तुम्ही वाकायला सांगितलं, तरी रांगणार्‍यांचा हा पक्ष आहे. तरीही बदल का होत नाही? याचं कारणं असं तर नाही की, तुम्हाला फक्त गुडी-गुडी बोलणं जमतं, कृतीच्या नावाखाली आनंदी-आनंदच आहे. तुमच्या थिंक टँकचे सदस्य तुमच्या व्हिजनबद्दल, सामान्य माणसाबद्दल तुमच्या मनात असलेल्या तळमळीबद्दल नेहमी सांगतात. पण हे सारं कागदावरच असावं असं दिसतंय, प्रत्यक्षात बदल असा काहीच दिसत नाही.

राहुलजी, न्यायालयाने दोषी ठरविलेल्या लोकप्रतिनिधींना अपात्र ठरविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सरकारने जो अध्यादेश काढला त्याबाबतचीही तुमची प्रतिक्रिया आश्‍चर्यजनक आहे. ‘हा अध्यादेश बकवास आहे व फाडून फेकण्याच्या लायकीचा आहे,’ असे तुम्ही म्हणाले. सरकार असा काही अध्यादेश काढत आहे, हे खरंच तुम्हाला माहीत नव्हतं? काँग्रेसमध्ये सोनियाची व तुमच्या परवानगीशिवाय काडीही हालत नाही, असे असताना या अध्यादेशाबद्दल तुम्हाला माहीत नव्हतं यावर तुमचे कट्टर सर्मथकही विश्‍वास ठेवणार नाही. राहुलजी, असं तर नव्हतं ना, सरकारने मुद्दामहूनच हा अध्यादेश काढून जनतेची नाराजी ओढवून घ्यायची आणि नंतर तुम्ही त्याला विरोध दर्शवून लोकांमध्ये हिरो व्हायचं? तुमच्या थिंक टॅँकची तर ही योजना नव्हती? राहुलजी, अशा नौटंक्या फार दिवस चालत नाही बरं! लोक शहाणे झाले आता. त्यांना सारं लक्षात येतं.

राहुलजी, आता फार काळ मात्र हे चालणार नाही. केवळ शब्दांचे बुडबुडे तसेही खूप दिवस टिकत नसतात. सत्ता आणि पक्षसंघटनेवर तुमचं आणि तुमच्या आईचं एकछत्री साम्राज्य असूनही असे प्रकार होत असेल, व्यवस्थेत कुठलाही बदल होत नसेल, तर नाइलाजाने तुम्ही कमी पडत आहात, असंच म्हणावं लागेल. व्यवस्थेच्या बाहेर राहून परिवर्तन घडविता येत नसेल, तर सत्तेत जाण्यास तुम्हाला कोणी रोखलं आहे? (तुमच्या वयात तुमचे वडील पंतप्रधान होते.) तुम्ही आणखी किती काळ आव्हानांपासून पळणार? तसंही सत्तेचे, व्यवस्थेचे सारे लाभ घ्यायचे आणि जबाबदारी मात्र काहीच घ्यायची नाही, यामुळे देशातील एक मोठा वर्ग तुम्हा मायलेकावर नाराज आहे. चांगलं काही घडलं, तर त्याचं श्रेय सोनिया गांधी, राहुल गांधींना… आणि वाईट झालं, तर मनमोहनसिंग आणि सरकारच्या माथी त्यांचं दोषारोपण. अन्नसुरक्षा कायदा हा सोनिया गांधींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, हे सांगितलं गेलं. पण त्यामुळे देशाच्या तिजोरीवर अब्जावधी रुपयांचा भार पडून अर्थव्यवस्था मोडकळीस येणार… ते अपश्रेय घेण्याची तुमची तयारी नाही. देशातील दंगली, दहशतवादी कारवाया, नक्षलवाद, शेजारी राष्ट्रांची घुसखोरी, रुपयांचं कोसळणं या सार्‍या विषयात तुमची जबाबदारी काय असते? लोकांना लुभविणार्‍या विषयात मात्र तुमचं मार्केटिंग करण्यात तुमचे भाट सदैव तत्पर असतात. राहुलजी, बाहेरून आदर्श बोल ऐकविणं खूप झालं. आता जरा मैदानात या. सत्तेत, व्यवस्थेत येऊन तुमची कर्तबगारी दाखवा. आहे याची तयारी?

आपला

एक चाहता

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Scroll to Top