-अविनाश दुधे
‘मीडिया वॉच’ हे पुस्तक आपल्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे. हे पुस्तक म्हणजे प्रत्येक रविवारी दैनिक ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘मीडिया वॉच’ या कॉलमचा संग्रह आहे. २००८ च्या मे महिन्यात सुरू झालेल्या या कॉलमने आज लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. थोडा आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून सांगतो, ‘अविनाश दुधे म्हणजे मीडिया वॉच आणि मीडिया वॉच म्हणजे अविनाश दुधे’ एवढं घट्ट समीकरण या कॉलमने जुळवून आणलं आहे. कोणत्याही नवीन माणसाची ओळख झाली की, तो नकळतपणे बोलून जातो, ‘अच्छा! ते मीडिया वॉचवाले अविनाश दुधे तुम्हीच का?’ हजारो वाचक असे आहेत, ज्यांनी मला पाहिलं नाही. ते मला ओळखत नाहीत; पण प्रत्येक रविवारी ‘मीडिया वॉच’ ते न चुकता वाचतात. एखादा कॉलम माणसाला एवढा लोकप्रिय करू शकतो हा माझ्यासाठी अनोखा अनुभव आहे.
दोन वर्षांपूर्वी ‘लोकमत’चा माझा सहकारी रवी खांडे याने ‘तुम्ही नियमित स्वरूपात राजकीय, सामाजिक व इतर घटनांबाबत लिहिलं पाहिजे’, अशी सूचना मला केली. ‘अमरावती जिल्ह्यातील वाचक अशा लिखाणाचं जोरदार स्वागत करतात’, हे सुद्धा त्याने मला सांगितलं. मात्र मी त्याच्या बोलण्याकडे काणाडोळा केला. नियमितपणाचं आणि माझं आधीपासून वाकडं आहे. त्यामुळे दर आठवड्याला आपल्याकडून नियमित लिहिणं होईल, याबाबत माझी मलाच शंका होती. नियमित कॉलम लिहिणं हा प्रकार कधीच सोपा नसतो. प्रत्येक आठवड्याला विषय मिळायला पाहिजे. विषय मिळाला, तर त्याची माहिती असायला हवी. नेमके संदर्भ हवे. त्यानंतर वाचकांना रुचेल, समजेल, पटेल या पद्धतीने त्याची मांडणी करणे ही एकंदर कसरतच असते. त्यात वर्तमानपत्र क्षेत्रातील इतर कामांच्या धबडग्यात हे सारं साधणं अजिबात सोपं नसतं. मी या अडचणींबाबत विचार करत होतो. मात्र रवी मागेच लागला. ‘तुम्ही ताकदीने लिहिता. तुमच्या लिखाणाची ताकद तुम्हाला माहीत नाही. तुम्ही लिहिलंच पाहिजे’, असा त्याचा सतत आग्रह होता.
अशीच एकदा चर्चा सुरू असताना अंजनगाव सुर्जीचे आमचे तालुका प्रतिनिधी सुदेश मोरे त्यात सहभागी झाले. त्यांनी ‘सर, तुम्ही ‘मीडिया वॉच’ या नावाखाली लिहा’, अशी सूचना केली. हे नाव मला खूप आवडलं. शेवटी मी लिहायचं ठरविलं. जितके दिवस लिहिता येईल तेवढं लिहू. नाही तर आपल्याला कोण विचारणार आहे, का लिहीत नाही म्हणून ? असा विचार करीत मी कॉलम सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रारंभीच्या काही आठवड्यातच वाचकांनी कॉलम डोक्यावर घेतला. कॉलम आवडत असल्याचे शेकडो फोन यायला लागले. वाचक अतिशय भरभरून बोलत होते. ‘एवढं रोखठोक आणि स्पष्ट तुम्ही लिहिता कसे?’ अशी विचारणा करीत होते. हा प्रतिसाद भारावून टाकणारा होता.
हा कॉलम सुरू करताना मी मनाशी काही गोष्टी पक्क्या ठरविल्या होत्या. यात जे काही लिहायचं ते सामान्य वाचकाच्या भूमिकेतून लिहायचं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व सामान्य माणसाच्या जगण्याशी संबंध नसलेल्या विषयावर उगाच पांडित्य न पाजळता आपल्या आजूबाजूला जे काही घडतं त्याबाबत आपलं निरीक्षण आणि विश्लेषण सडेतोडपणे मांडायचं. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत ठेवायची. हे करताना अतिशय निष्पक्ष भूमिका ठेवून ज्याच्या त्याच्या कामाचं दान त्याच्या पदरात टाकायचं. सार्वजनिक हिताचा विषय जेथे असेल तेथे कोणाला काय वाटेल, याची भीड ठेवायची नाही. हा असा दृष्टिकोन ठेवून मी हा कॉलम मी लिहीत आलो आहे. आज दोन वर्षानंतर मागे वळून पाहताना असं वाटतंय की, हे असं बॅलन्स आणि रोखठोक असण्यामुळेच हा कॉलम लोकप्रिय झाला. यात जे काही उमटतंय तो आपला आवाज आहे, ही भावना सर्वसामान्य वाचकांमध्ये निर्माण झाली. त्यामुळेच त्यांनी ‘मीडिया वॉच’ला दणकून प्रतिसाद दिला.
उत्तम व प्रभावी लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या कमी नाही. मात्र तरीही त्यांचे शब्द समाजाला भिडत नाहीत. याचं कारण म्हणजे पत्रकाराचं वैयक्तिक आचरण कसं असतं, तो कुठली मूल्यं आयुष्यात जपतो, याकडे समाजाचं बारकाईने लक्ष असतं. सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे नेहमी सांगतात, ‘रिकामं पोतं कधी उभं राहू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या पत्रकाराच्या मागे नैतिकतेचं बळ नसतं त्याचा शब्द उभा राहत नाही.’ या वास्तविकतेशी मी फार आधीपासून परिचित असल्याने काही गोष्टींचं मी अतिशय प्रकर्षानं पालन करतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्यात तरी पैसे खायचे नाहीत, हे मी माझ्यापुरतं ठरविलं आहे. १५ वर्षाच्या पत्रकारितेत अनेक आमिषे वेगवेगळ्या रूपात आलीत. मात्र विचारांची बैठक पक्की असल्याने मी प्रत्येक वेळी त्यांना ठोकरून लावू शकलो याचा मला अभिमान आहे. २००९ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरशः बाजार होता. त्या बाजारात अनेकांनी आपलं सोवळं गुंडाळून डोक्याला बांधलं. मात्र मती गुंग करणाऱ्या त्या मायावी बाजारातही मी माझं सत्त्व जोपासू शकलो. याचं सारं श्रेय माझ्या आईने व पत्रकारितेतील काही आदर्श व्यक्तींनी दिलेल्या संस्कारांमध्ये आहे.

प्रसिद्ध विचारवंत दुर्गा भागवत नेहमी सांगायच्या, ‘तुम्हाला तुमचा आत्मसन्मान व स्वातंत्र जपायचं असेल, तर स्वतःच्या गरजा मर्यादित ठेवा.’ दुर्गाबाईंचं ते वाक्य मी कायम लक्षात ठेवतो. त्यामुळे प्रतिष्ठेच्या कुठल्याही चुकीच्या कल्पना मी डोक्यात बाळगत नाही. ‘लोकमत ‘सारख्या मोठ्या वर्तमानपत्रात गेली अनेक वर्षे चांगल्या पदावर काम करूनही मला एसटीने प्रवास करण्यात कमीपणा वाटत नाही. आपल्याजवळ अद्याप कार नाही, मोठ घर नाही, याचंही शल्य मला नाही. प्रामाणिक पत्रकार आपल्या पगारातून जेवढं करू शकतो तेवढं मी करतो. अर्थात ही सारी मूल्यं जोपासण्यात माझ्या कुटुंबाची विशेषतः माझी पत्नी प्रतिभाची मला मोठी साथ आहे.
बातमी छापण्यासाठी वा न छापण्यासाठी पैसे घेणाऱ्या पत्रकाराची तुलना मी नेहमी वेश्येसोबत करतो. वेश्या जेव्हा नवीन असते, तिचं शरीर तरुण असतं तेव्हा तिला ‘भाव’ मिळतो. जसजशी ती जुनी होते… गि-हाईक म्हणतो, ‘हे एवढे आहे. मुकाट्याने वे आणि बिछान्यावर ये. पैसे घेणाऱ्या पत्रकारांचंही असंच होतं. प्रारंभी त्यांना चांगले पैसे मिळतात. नंतर देणाऱ्याकडून जेवढं मिळेल त्यावर समाधान मानावं लागतं. पैशाप्रमाणे पत्रकारांचा दुसरा विक पॉईंट असतो तो दारू. ही बया पत्रकारांना कशी लाचार करते, याचे मी असंख्य नमुने पाहिले आहेत. या प्रकारापासूनही मी कोसो दूर राहिलो आहे. दारू पिणाऱ्या कंपनीत मी बसतो, पण दारू प्यावी असं कधीच वाटलं नाही. वाटणार नाही. आपली संगत कशी असावी, याबाबतही माझा कटाक्ष असतो. बातम्या मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत संवाद साधावा लागतो तो भाग वेगळा. मात्र आपली पर्सनल कंपनी ही चांगल्या लोकांचीच असली पाहिजे याकडे माझं लक्ष असतं. मला वाटतं, या सगळ्या गोष्टी वाचकांपर्यंत कळत-नकळतपणे पोहोचतात. त्यामुळेच ‘मोडिया वॉच’ला वाचकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला असावा.
आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. आज पत्रकारिता करणारे ९९ टक्के लोक भूमिका घेणे टाळतात. याची कारणं दोन. एक तर भूमिका घेणं सोयीचं नसतं. दुसरं म्हणजे भूमिका घेतली, तर अनेकदा वाईटपणही घ्यावं लागतं. यासाठी कोणाची तयारी नसते. त्यामुळेच पत्रकार कुठल्याही विषयावर भूमिका घेण्यास कचरतात. मी मात्र माझ्या पत्रकारितेच्या प्रारंभापासून भूमिका घेत आलो आहे. अर्थात हे करताना वैयक्तिक विचार न दामटता सार्वजनिक हिताचं जे काही असेल त्याची पाठराखण मी नेहमी करतो. मला वाटतं, वाचकांचा माझ्या लिखाणाला जो काही प्रतिसाद मिळतो तो त्यामुळेच मिळत असावा. या कॉलमच्या निमित्ताने मला प्रचंड अनुभव मिळाले. त्याबद्दल लिहितो म्हटलं, तर ते एक स्वतंत्र पुस्तक होईल.
हा कॉलम सुरू झाल्यापासून रविवारची सकाळ हा माझ्यासाठी एक अपूर्व अनुभव असतो. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो लोकांचे फोन येतात. मनापासून ते बोलतात. अभिनंदन करतात. समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी असलेली लोकंही आवर्जून फोन करतात. कौतुक करतात. प्रत्यक्ष भेट झाली, तर भरभरून बोलतात. पाठीवरून हात फिरवतात. मोरपीस गालावरून फिरवावं असा हा रेशमी अनुभव असतो.
सार्वजनिक ठिकाणी कुठेही मी असलो की, ‘मीडिया वॉच’चा विषय हमखास निघणारच. (या कॉलमची ही अनोखी लोकप्रियता माझ्या काही पत्रकार मित्रांच्या असूयेचाही विषय आहे.) या कॉलममध्ये राजकारण्यांवर मी अनेकदा कोरडे ओढले आहेत.
मला अनेक लोक विचारतात, तुम्ही राजकारण्यांबद्दल एवढं थेट कसं लिहिता? तुम्हाला भीती वाटत नाही का? खरं सांगतो, मला खरंच भीती वाटत नाही. शेवटी राजकारणीही सर्वसामान्य माणसासारखी माणसंच असतात. आपल्यातूनच ती मोठी झाली असतात. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या या माणसांच्या सार्वजनिक वर्तनाची चिकित्सा ती व्हायलाच हवी.
माझ्या लिखाणाच्या स्टाईलने प्रारंभी बरेच नेते हबकून गेले होते. शंका घेणे हा राजकारण्यांचा विशेष गुण. त्यानुसार मी कोणाच्या सांगण्यावरून लिहितो, याचा शोध ते प्रारंभी घेत. म्हणजे खोडकेंविरुद्ध छापून आलं की, त्यांना वाटायचं, सुनील देशमुखांच्या कॅम्पमधून हे पेरलं असावं. देशमुखांच्या स्वभावाबद्दल काही लिहिलं, तर त्यांना वाटायचं, हा खोडकेंचा फीडबॅक असावा. अनंत गुढेंबद्दल काही आलं, तर त्यांना त्यात सोमेश्वर पुसतकरांचा हात दिसायचा. पुसतकरांचं विश्लेषण झालं, तर ‘मी तसा नाहीच, मी तुम्हाला समजलोच नाही’, अशी त्यांची कॅसेट वाजायची. थोडक्यात कुठल्याही राजकारण्याला आपल्या वर्तनाचे पोस्टमार्टम केलेलं आवडतं नाही. (या पुस्तकातील ‘माध्यमांबाबत अडाणी नेते’ या लेखात मी अमरावती जिल्ह्यातील नेत्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीवर सविस्तरपणे लिहिलंय.) मात्र जसजसा हा कॉलम पुढे सरकत गेला तसं राजकारण्यांच्या हे लक्षात यायला लागलं की, हा कोणालाच सोडत नाही. सर्वांना एकच न्याय लावतो. चांगलं असलं, तर तारीफ करतो. वाईट झालं, तर हाणतो. ही गोष्ट लक्षात येताच जिल्ह्यातील प्रत्येक राजकारणी हा कॉलम आवडीने वाचायला लागला. प्रसंगी चुका कबूल करायला लागला. सुनील देशमुख पालकमंत्री असताना त्यांचा शीघ्रकोपी स्वभाव व लोकांशी फटकून वागण्याच्या वृत्तीबद्दल मी काही वेळा लिहिलंय. अर्थातच त्यांना ते आवडत नव्हतं. मात्र एकदा त्यांचा सकाळीच फोन आला. ‘का हो, तुम्ही आमच्या घरातच खिंडार पाडलंय. ही (सोनाली वहिनी) म्हणते, ‘ते अविनाशभाऊ लिहितात ते अगदी खरं आहे. तुमचा स्वभाव असाच आहे. आता विचार करायला पाहिजे.’ या प्रसंगानंतर सुनीलभाऊ चांगले मित्र झाले. सुलभाताई व संजय खोडकेंचंही असंच. या दाम्पत्यावर लिहिण्याची हिंमत या जिल्ह्यात कोणी करत नव्हतं. ‘खोडकेंची सक्सेस स्टोरी’ व ‘खोडकेंचा संताप’ असे दोन लेख मी लिहिलेत. ते प्रचंड गाजले. खोडके नाराज झाल्याचे रिपोर्टही मिळाले. मात्र त्यांनी एक-दोन दिवसानंतर मला फोन केला. ‘तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. त्याबाबत काही म्हणणं नाही. पण फोटो तर चांगला टाका भाऊ’, असं ते बोलले. तणाव क्षणात निवळला. आम्ही दोघेही दिलखुलास हसलो. तेव्हापासून खोडकेही चांगले मित्र आहेत.
सुलभाताईंनाही आपल्या चुका कबूल करण्यात कमीपणा वाटत नाही. एकदा एका बैठकीत त्या महापौरांच्या खुर्चीवर बसल्या. मी त्याबाबत कठोरपणे लिहिलं. ताईंनी दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन केला. ‘भाऊ, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. यापुढे काळजी घेईल’, असे त्या म्हणाल्या. बहुतेक राजकारण्यांसोबत ही अशीच मैत्री झाली आहे. मात्र मैत्री करताना संबंधित नेता आपल्याला गृहीत धरणार नाही याची मी नेहमीच काळजी घेतो. अर्थात एक गोष्ट येथे आवर्जून नमूद केली पाहिजे. डॉ. देशमुख असो, खोडके, अनंतराव गुढे, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, सोमेश्वर पुसतकर वा इतर कोणीही, एकानेही मैत्री आहे म्हणून आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे, अशी अपेक्षा ठेवली नाही. मैत्री वेगळी आणि माझं लिखाण स्वातंत्र्य वेगळं याची जाण त्यांनी कायम बाळगली. राजकारण्यांसोबतच्या कडू-गोड अनुभवातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे, तुम्ही अगदी निरपेक्ष असला, कुठलीही अपेक्षा न ठेवता तटस्थपणे लिहित गेला, तर राजकारण्यांसोबत एक वेगळे स्नेहबंध निर्माण होतात. याचा अर्थ त्यांच्या वागणुकीत ते बदल करतात असा मात्र नाही. फक्त टीका पचवायला ते शिकतात एवढंच!
वाचक अनेकदा मला विचारतात, ‘तुम्ही राजकारण्यांना अतिशय कठोरपणे हाणता. त्याचवेळी काही चांगलं केलं, तर त्यांची प्रशंसाही करतात. हे कसं?’ माझं उत्तर एकच असतं. राजकारण्यांकडून मी कुठलीच अपेक्षा बाळगत नाही. कधीही वैयक्तिक कामासाठी मी त्यांच्याकडे जात नाही. त्यांच्याकडून मला काहीच मिळवायचं नसतं. त्यामुळे त्यांच्या चांगल्या किंवा वाईट वृत्तीचं भी तटस्थपणे विश्लेषण करू शकतो.
लिहिण्याजोगे असं खूप काही आहे. भरपूर आठवणी आहेत. मात्र आवरलं पाहिजे. फक्त एवढंच सांगतो. ‘मीडिया वॉच’ या कॉलमने मला एक वेगळी ओळख दिली. या कॉलमच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मी मार्गी लावू शकलो, याचं समाधान मोठं आहे. वाचकांचा माझ्या शब्दावर असलेला विश्वास मला सुखावून तर जातोच; पण जबाबदारीचीही जाणीव करून देतो. अनेक वाचक फोन करून मला त्यांच्या समस्या सांगतात. त्या सोडविण्याची विनंती करतात.
तुम्हीच ते करू शकता, असंही सांगतात. हे सारं मी ऐकतो तेव्हा भरून येतं. सामान्य वाचकांच्या या विश्वासाला आपण जागलं पाहिजे याचं भान मी सतत ठेवतो. त्यासाठी आपलं ज्ञान, वाचन अधिक वाढावं यासाठी मी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. ‘मीडिया वॉच’ लिहिताना केवळ लिहायचं म्हणून लिहायचं, असं मी कधीच करत नाही. वाचकांना जे सांगायचं ते नेमकेपणाने सोप्या भाषेत सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. माहिती देण्यासोबतच चांगलं काय, वाईट काय याची फोड करूनही सांगतो.
मला वाटतं, या वेगळेपणामुळेच वाचकांनी हा कॉलम डोक्यावर घेतला आहे. आज राजकारणी, अधिकारी, उद्योजक, डॉक्टर व समाजजीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची रविवारची सकाळ ‘मीडिया वॉच’ वाचून होते असं मी म्हटलं, तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. या कॉलमने मला अनेक नवीन मित्र, चाहते मिळालेत. किमान वीस असे वाचक मला माहीत आहेत की, ज्यांनी ‘मीडिया वॉच’ चे प्रत्येक कात्रण जपून ठेवलं आहे. अशा सर्वांनीच मला ‘मीडिया वॉच’ हे पुस्तकं स्वरूपात आणलं पाहिजे, याचा आग्रह केला. त्या प्रेमळ आग्रहातूनच हे पुस्तक आकारास आलं आहे. या पुस्तकांचं आपणाकडून जोरदार स्वागत होईल व आपलं प्रेम भविष्यातही असंच कायम राहील, याची मला दोनशे टक्के खात्री आहे. धन्यवाद !
अमरावती, दि. २७ जून २०१०
प्रस्तुत लेखकाच्या ‘मीडिया वॉच’ या पुस्तकाची ही प्रस्तावना आहे. हे पुस्तक २०१० मध्ये प्रकाशित झाले होते
(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक, दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)
8888744796