प्रिय बापू,
आज तुमची पुण्यतिथी. तुम्ही गेल्यापासून देशाच्या कानाकोपर्यात आम्ही तुमचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी मोठय़ा उत्साहाने साजरी करतो. या दिवशी दिल्लीच्या राजघाटापासून अगदी अंदमान-निकोबारमधल्या दुर्गम बेटावरसुद्धा तुम्हांला अभिवादन केलं जातं. असं कौतुकानं सांगितलं जातं की, या देशात असं शहर नाही, गाव नाही, जिथे तुमच्या नावाचा चौक वा पुतळा नाही. आजच्या दिवशी अशा सार्या पुतळ्यांना आम्ही अभिवादन करतो. तुमच्या प्रतिमांना वंदन करतो. पण बापू, तुमचं हे कौतुक येथेच संपतं. 30 जानेवारी 1948 रोजी काही मानवी जनावरांनी तुमचं भौतिक अस्तित्व संपविल्यापासून आम्ही तुम्हांला पुतळ्यात व प्रतिमेत बंदिस्त करून टाकलं ते कायमचं! त्या दिवसापासून आम्ही तुमची तत्त्वंसुद्धा तुमच्या प्रतिमेसारखीच खुंटीला टांगून ठेवली आहेत.
तसंही बापू, या देशाला मोठय़ा माणसांना प्रतिमेत बंदिस्त करून त्याला देवत्व बहाल करण्याची सवय आहे. त्याला देव केलं की, आम्ही तर साधी माणसं आहोत. आम्हांला त्यांच्यासारखं वागणं कसं जमणार? असं समर्थन करण्याची सोय आम्ही करून घेतो. बापू, तुम्हांला तर प्रतिमेत बंदिस्त करून ठेवण्याची आमची खूपच गरज होती. कारण तुमचं कुठलंच तत्त्व आमच्या सोयीचं नाही. तुम्ही सत्याचा आग्रह धरा असं सांगता. तुम्ही सदसद्विवेकबुद्धीचा वापर करायला सांगता. तुम्ही आवश्यक तेवढाच पैशाचा संचय करा असंही सांगता. चार्त्यि जोपासण्याचा आग्रह करता. संयम बाळगण्याचा उपदेश करता. सत्ता ही सर्वोच्च नाही, तिच्यापासून दूर राहा, असं काहीबाही सांगता. बापू, यातील एकही गोष्ट आमच्या सोयीची नाही. तुम्ही आयुष्यभर तुमच्या आतील आवाजासोबत प्रामाणिक राहिले. आम्ही आम्हांला जेव्हापासून समजायला लागलं तेव्हापासून तो आवाज दाबण्यातच धन्यता मानणारे आहोत. त्यामुळे आम्हांला हे पटण्याची सुतराम शक्यता नाही.
बापू, तुम्ही गेल्यानंतर तुमचा विचार या देशात रुजणार नाही याची आमच्या राज्यकत्र्यांसह आम्ही सर्वानीच काळजी घेतली. त्यामुळेच तुम्ही सगळीकडेच आहात, पण कुठेच नाही अशी स्थिती आहे. विडंबना बघा. या देशातील प्रत्येक राजकीय पक्ष व सामाजिक संस्था-संघटनांचे पदाधिकारी सार्वजनिक जीवनात तुमच्या नावाचा महिमा गात असतात. मात्र प्रत्यक्षात तुम्ही कोणालाच नको आहे. समाजवादी, साम्यवादी, आंबेडकरवादी, संघवाले, काँग्रेसवाले..सारेच तुमच्या विचारांना मोडीत काढायला निघाले आहेत. समाजवादी वरवर तुमच्याबद्दल प्रेम दाखवितात. प्रत्यक्षात तुमच्या विचारांची पोथी वाचण्याशिवाय ठोस त्यांनी काही केलं नाही. अंगावर खादीचा कुर्ता चढवून ढोंगीपणे वागण्यात त्यांच्यापैकी अनेकांनी आयुष्य घालविलं. साम्यवादांना तुम्ही कधी चाललाच नाही. त्यांची सारी श्रद्धास्थानं रशिया, चीनमध्ये असल्याने तुमचं मोठेपण ते मान्य करतील याची शक्यताच नाही. आंबेडकरवाद्यांनाही तुमच्याबद्दल आक्षेप आहेच. पुणे करारामुळे बाबासाहेबांना माघार घ्यावी लागली हे शल्य अद्याप त्यांना विसरता येत नाही. संघवाल्यांना तर तुमची कायम अँलर्जी राहिली आहे. या देशात ज्या काही समस्या आहेत त्याला गांधी नावाचा खलपुरुष जबाबदार आहे असंच ते मानतात. त्यामुळेच त्यांनी कायम तुमची हेटाळणी करण्यातच धन्यता मानली आहे. जग तुम्हांला मानते म्हटल्यानंतर संघाच्या सकाळच्या प्रार्थनेत नाइलाजाने त्यांनी तुमच्या नावाचा समावेश केला. पण त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा द्वेष कायम आहे. काँग्रेसवाल्यांबद्दल काय सांगायचं.. तुमच्या नावाचा सर्वाधिक फायदा त्यांनी करून घेतला. मात्र तुमच्या तत्त्वांचा सर्वात मोठा पराभव कोणी केला असेल, तर तो त्यांनीच केला. डोक्यावर गांधी टोपी चढवून तुमच्या सार्या विचारांची ऐशीतैशी करून वर ‘गांधी बाप्पा की जय..! म्हणण्याचा निलाजरेपणा त्यांनाच साधू शकतो.
तसंही बापू, कोणाकोणाला दोष द्यायचा? अनेकदा तर असं वाटतं की, या देशाला तुम्ही कळलेच नाही. स्वातंर्त्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीसमोर खरा गांधी कोणी मांडलाच नाही. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ असंच आम्हांला शिकविण्यात आलं. आमच्यापुढे पराभूत, थकलेला गांधीच मांडण्यात आला. बापू, प्रामाणिकपणे तुम्हांला समजून घेतल्यानंतर लक्षात येतं तुम्ही कधीच थकले नव्हता. पराभूत झाले नव्हता. आफ्रिकेतील तुमच्या संघर्षापासून चंपारण, दांडी, असहकार, करो या मरो आंदोलनापर्यंत आणि अगदी शेवटी नौखालीच्या दिवसापर्यंत तुमचं आयुष्य तपासलं तर ठिकठिकाणी संघर्षच दिसून येतो. गांधी हताश होऊन बसले आहेत असं कुठेही दिसत नाही. मात्र आमच्या पिढीसमोर काठी टेकवत जाणारा, आधार घेऊन चालणारा हतबल गांधीच मांडण्यात आला. बापू, वाईट याचं वाटतं की, तुमचा ‘मोहनलाल करमचंद गांधी ते महात्मा गांधी’ हा प्रवास आम्ही समजूनच घेतला नाही. एका अगदी सामान्य माणसाचा ‘महात्मा’ कसा होतो हे या देशाने समजून घेतलं असतं तर स्वातंर्त्यानंतरचा इतिहास काही वेगळा राहिला असता. खरं सांगायचं ना बापू, भारताबाहेरील जगाला तुम्ही जेवढे कळले ना, तेवढे आम्हांला नाही समजले. तुम्हांला समजून घेण्यासाठी तो रिचर्ड अँटनबरो नावाचा परदेशी माणूसच आमच्या कामी आला. तुमच्यावर परदेशी माणसांनी किती भरभरून लिहलंय. (जगात सर्वाधिक पुस्तकं तुमच्यावर लिहिली गेली आहेत आणि सर्वाधिक खपसुद्धा त्यांचाच आहे हेसुद्धा आमच्यापैकी फार कमी लोकांना माहीत आहे.) तुम्ही असामान्य आहात, अद्वितीय आहात हे त्यांनी केव्हाच ओळखलं होतं. जगाला तुमचं मोठेपण समजणार नाही हेसुद्धा त्यांच्यापैकी काहींच्या लक्षात आलं होतं. उगाचच नाहीआईन्स्टाईन म्हणून गेला होता, ‘गांधी नावाचा हाडामासाचा माणूस या जगात होऊन गेला यावर भविष्यात कोणी विश्वास ठेवणार नाही.’
बापू, आम्ही खरंच करंटे आहोत. जग आम्हांला महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखतो. पण आम्ही तुमच्या विचारांशी, त्याच्या ताकदीशी अपरिचित. जगातील अनेक माणसं तुमच्या वाटेवर चालून इतिहास घडवितात तेव्हा आम्हांला तुमच्या विचारांची ताकद कळते. खरं तर जगात जिथे कुठे असमानता, मानवता, हुकूमशाहीविरुद्ध लढा सुरू असतो, जिथे कुठे माणसाला माणसासारखी वागणूक मिळत नाही तिथे तुम्हांला समोर ठेवूनच लढा लढला जातो. मार्टिन ल्युथर किंग असो वा नेल्सन मंडेला, तुमच्या मार्गाने जाऊनच त्यांनी इतिहासाच्या पानात आपलं नाव कोरलंय. सर्वशक्तिमान अमेरिकेच्या अध्यक्षपदावर दुसर्यांदा विराजमान झालेले बराक ओबामा जेव्हा सांगतात की, ‘गांधी हे माझं प्रेरणास्थान आहे’ तेव्हा ते केवळ पोकळ शब्द नसतात. त्यांना समृद्ध करून गेलेली ती अनुभूती असते. बापू, जगात कुठेही मोठी समस्या निर्माण झाली की, शेवटी तुमचाच मार्ग परिणामकारक ठरतो हे आता अनेकदा सिद्ध झालं आहे. अलीकडेच अण्णा हजारे, अरविंद केजरीवालांनी तुमच्या विचारांचा सशक्त आविष्कार दाखविला तेव्हा सारा देश विस्मयचकित झाला होता. त्यामुळेच बापू, हा देश तुमच्या विचारांसोबत वेळोवेळी कृतघA झाला असला, आम्ही सार्यांनी तुमच्या तत्त्वांना दडपण्याचा प्रयत्न केला तरी तुमचा विचार शाश्वत आहे. तो कधीच संपू शकत नाही हे आता आम्हांला उशिरा का होईना पटायला लागलं आहे. सत्य, अहिंसा ही तुमची मूल्यं कुठल्याही काळात तेवढीच महत्त्वाची आहेत हेसुद्धा आमच्या लक्षात यायला लागलं आहे. तुमच्या विचारांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे हेसुद्धा समजत आहे. बापू, उशीर खूप झाला आहे. पण तुमच्या मार्गावर चालत राहिल्यास नवीन पहाट निश्चित होईल असा विश्वास आता वाटायला लागला आहे.
तुमचा
एक भारतीय
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)
भ्रमणध्वनी – 8888744796 |