जत्रायात्रांचा हंगाम सुरू झाला आहे. ऋणमोचन व बहिरमची यात्रा ऐन भरात आली आहे. जत्रा म्हटलं की, अस्सल वर्हाडी माणसांची मनं मोहरून जातात. झंकारून उठतात. खेड्यातून शहरात स्थायिक झालेली माणसं नकळतपणे आठवणींच्या हिंदोळय़ावर झुलायला लागतात. काही क्षणातच डोळय़ांसमोर लहान असताना व तरुणपणी अनुभवलेल्या जत्रांची चित्र चलतचित्रपटाप्रमाणे सरकायला लागतात. पूर्वी पीक निघाल्यानंतर वर्षभराचा शिणवटा घालविण्यासाठी जत्रा हा प्रकार लहानथोर सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र राहत असे. देवदेवतांच्या नावाने केलेले नवस फेडणे, आपल्या गावात न भेटणार्या वस्तूंचा बाजारहाट उरकणे आणि जलसे, तमाशे व कुस्त्यांच्या दंगलीत मन रमविणे हे जत्रेला जाण्यामागचे मुख्य उद्देश असायचे.
आज बाजारहाट गावागावात भरतात. टीव्हीमुळे करमणूक घरात मिळते. नवस फेडायला कोणी जत्रेची वाट बघत नाही. आजूबाजूला असंख्य ‘जागृत’ मंदिरे झाली आहेत. बुवामहाराजांची पैदासही मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे जत्रांचं पूर्वीचं ग्लॅमर उरलं नाही. मात्र तरीही जत्रा हा प्रकार टिकून राहावा, असं मनापासून सर्वांनाच वाटतं. जत्रेच्या कितीकिती आठवणी आहेत. आज चाळिशी-पन्नाशीत असलेली पिढी तेव्हा उत्तररात्री वा भल्या पहाटे बैलगाडीनं जत्रेला निघायची. जत्रेला जाण्यासाठी सार्या घरादाराची एकच धांदल उडायची. घरची खिलारी बैलगाडीला जुंपली जायची. गाडीत बायकामाणसं आणि पोरेसोरं बसायची. पुरुष माणसं पायी वा घोड्यावर बसून निघायची. रस्त्यात बायामाणसांचा गप्पांचा बाजार असायचा. जत्रेच्या ठिकाणी पोहोचलं की सर्वांमध्ये वेगळंच चैतन्य निर्माण व्हायचं. बायांना नवस फेडण्याचे वेध लागायचे. पुरुषमंडळी राहुटी कुठे लावायची याचा शोध घ्यायचे. बालगोपाळांना देवळासमोरची नाना प्रकारची दुकानं खुणवायची. पेढे, बर्फी, बत्तासे, साखरेच्या कांड्या, चुरमुरे, फुटाणे, डाळे अशा खाद्यपदार्थांची दुकानं, आरसे, फण्या, नकली कचकड्याचे चष्मे, खुळखुळे, शिट्टय़ा, गलोली, लहानमोठे चेंडू, खेळणी असं आणखी बरंच काही असणारी ती लवलाईची दुनिया मुलांना खेचून घेत असे. आज लहानपणापासून मोठमोठी डिपार्टमेंटल स्टोअर व रेस्टॉरंटमध्ये जाणार्या आजच्या मुलांना यातील थरार कळणार नाही. तो आनंद वेगळा होता हे नक्की. तेव्हाच्या जत्रेतील दोन आण्याची साखरेची कांडी वा आकाशझुल्यातून मारलेल्या चकरेची सर आजच्या महागड्या मिठाईला वा यांत्रिक स्काय राईडला नक्कीच येणार नाही.
जत्रांच्या अशा खूप आठवणी आहेत. सांगाव्या आणि जतन करून ठेवाव्या तेवढय़ा कमी. ऋणमोचन आणि बहिरम, तर वर्हाडातील प्रसिद्ध म्हणाव्या अशा जत्रा आहेत. नामवंत लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचं अतिशय वेधक असं चित्रण आपल्या लिखाणातून केलं आहे. ‘सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारं एक झगमग स्वप्न’ असं वर्णन ज्यांनी या जत्रेचं केलं आहे. ‘दिवाळी संपते. हेमंत ऋतू नवे सोने घेऊन येतो. मग पौष महिन्याच्या काळात बहिरमची जत्रा सुरू होते. गहू ओंब्यावर येतो. आम्रवृक्षाच्या झुंडीच्या झुंडी आपल्या मोहोरची वार्ता आभाळकर करतात. त्या वेळी कास्तकारीतून मोकळे झालेले हात आणि भरलेला खिसा घेऊन वर्हाडी कास्तकार महिन्याच्या बोलीने या स्वप्नात शिरतो. विदर्भाची काळी कसदार सोनेचांदी ओकणारी जमीन. तिची वर्धेपूर्णेच्या कुशीत बागडणारी लेकरं. ही लेकरं आषाढीला ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ करीत पंढरपूरला जाणार ‘महादेवा जातो गा’ म्हणत चौर्यागडला वा सालबर्डीला जाणार. पण सातपुड्याखालचा अमरावती जिल्हा नेमका ऋणमोचन किंवा बहिरमलाच जाणार. संस्थानिकांशी बरोबरी करणारे इकडचे तेव्हाचे जमीनदार. यात्रा महिन्यावर आली की, बंड्या भरभरून त्यांचे सामान बहिरमला जाणार. तिथं मग पूर्ण महिनाभर तंबूडेरा. या तालेवारांची गोष्टच न्यारी. आपले वैभव दाखविण्यासाठी स्पर्धा लागलेले ते सारे पाटील, देशमुख राहुट्या, तंबू, डेरे यांचे मोहल्ले सातपुड्याच्या पहाडात उभे करतात. वाड्यात द्यावा तशा परस्परांना आपापल्या तंबूत मेजवान्या देतात. नुकत्याच विकलेल्या कापसाच्या रकमा ‘सदा रंग लाल, तुझ्या भांगात गुलाल’ म्हणत पेटी-तबल्यावर ठुमकणार्या कोण्या चटकचांदणीवर उधळल्या जातात. वरखेडकरांपेक्षा तळवेलकरांनी दौलतजादा जास्त दिला की स्तुतीवार्ता मग एव्हरेस्ट विजयाच्या गुमानाने दिवसभर फिरत राहते. केचे सरांनी बहिरच्या अशा खूप सार्या आठवणी लिहिल्या आहेत. त्या मुळातूनच वाचाव्या अशा आहेत. बहिरमची रम्य अशी ही जत्रा काळानुरूप बरीच बदलली आहे. आधुनिकतेमुळे माणसांची जीवनशैली व प्राथमिकता बदलली असल्याने त्याचा परिणाम इतर गोष्टींप्रमाणे जत्रेवरही होणे अगदी स्वाभाविक आहे. त्याबद्दल निव्वळ हळहळ व्यक्त करण्यापेक्षा ही जत्रा पूर्वीच्या टेचात फुलावी, बहरावी यासाठी आपण बरंच काही करू शकतो. अलीकडच्या काही वर्षांत आमदार बच्चू कडू यांनी बहिरमचा तमाशा बंद केल्याने या यात्रेची गंमत गेली, असं सांगितलं जातं. मात्र त्याला काहीही अर्थ नाही. तमाशाच्या नावाने जे गळे काढतात त्यांचे इंटरेस्ट वेगळे आहेत. जत्रेमध्ये जे काही तमाशे असतात तेथे नेमकं काय चालतं हे एकदा प्रत्यक्ष डोळय़ांनी पाहिलं, तर तमाशाचं सर्मथन कोणीच करणार नाही. लोकांचा मोठा विरोध पत्करूनही बच्चू कडूंनी तमाशाला विरोध करण्याची जी भूमिका घेतली त्याबद्दल निश्चितपणे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अशी भूमिका घ्यायला हिंमत लागते. समाजाच्या व्यापक हितासाठी प्रसंगी वाईटपण घेण्याची तयारी त्यांनी दाखविली ही गोष्ट निश्चितपणे महत्त्वाची आहे.
बहिरममध्ये तमाशा नाही म्हणून या जत्रेची मजा गेली असं मानण्याचं काही कारण नाही. पूर्वी इंग्रजांच्या काळात तहसीलदार पर्यायाने तहसील कार्यालय बहिरमला यायचं. कोर्टही येथेच भरायचं. लोक जत्रेच्या निमित्ताने येऊन आपली शासकीय कामेही करून घ्यायची. एक वर्षापूर्वी बच्चू कडूंनी काही शासकीय कार्यालय काही दिवसासाठी तेथे आणून शासकीय यात्रा भरविली होती. हा प्रयोग नित्यनेमाने झाला पाहिजे. याशिवाय महिनाभर वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, महोत्सवांचंही आयोजन केलं पाहिजे. बहिरमच्या यात्रेचं महत्त्व व वेगळेपण लक्षात घेऊन तालुका व जिल्हा प्रशासनानेही ‘बहिरम महोत्सव’ यासारखा एखादा प्रयोग करता येऊ शकतो का या दृष्टीने विचारविनिमय करून पुढाकार घेतला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पांढरपेशा मध्यमवर्गीयांनी पौष महिन्यातील एकदोन दिवस तरी तिथे मुक्कामाच्या तयारीने गेलं पाहिजे. असं झालं तरच बहिरमची यात्रा टिकेल. आपला अमूल्य धार्मिक व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी कोरडे उसासे टाकण्यापेक्षा आपण एवढं नक्कीच करू शकतो. गौरवशाली इतिहास या यात्रेचा इतिहासही गौरवशालीच आहे. १९६८ मध्ये बहिरम येथे पानसुपारी व्हायची. कारंजा बहिरम येथील शंकरराव चंद्रभानजी चौधरी यांच्याकडील चंचीला (बटवा) पानसुपारीचा मान असायचा. या यात्रेचे संपूर्ण नियोजन शंकरराव चौधरीच करायचे. यात्रेपूर्वी मंदिराजवळील विशाल झाडाखाली सतरंजी टाकली असायची आणि तेथूनच यात्रेचे नियंत्रण केले जात असे. या यात्रेला पूर्वीपासूनच सांस्कृतिक इतिहास असून पौराणिक महत्त्वही आहे. बहिरमबाबाची मूर्ती दगडाची असून त्यावर तूप आणि शेंदूर लावण्यात आले. याच ठिकाणी भैरवाची अष्टधातूची मूर्तीसुद्धा आहे.
अविनाश दुधे
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |