मंत्रालयात सर्वसामान्य माणसांना काय ट्रीटमेंट
मिळते हे माहीत नसलेल्या विद्वानांनी बच्चू कडू कसे गुंड आमदार आहेत, यावर आपली अक्कल पाजळणे सुरू केले आहे. हे बच्चू अगदीच ‘कडू’ आहेत किंवा कडू अजूनही ‘बच्चू’च आहेत, असे शब्दांचे खेळही झालेत. बाहेर सर्वसामान्य माणसांमध्ये मात्र वेगळीच प्रतिक्रिया आहे. मुजोर आणि भ्रष्ट अधिकार्यांना बच्चूंचीच भाषा कळते. संघटित झुंडशाहीच्या जोरावर सरकारला नमविणार्या अधिकार्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असा जनतेचा सूर आहे. व्यवस्थेची दुहाई देणार्यांना जनता असा विचार का करते, हे जरा समजून घेतलं पाहिजे. …………………………………………………………………………………………………………………………………………… विदर्भातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील उपसचिव भरत गावित यांना केलेल्या मारहाणीची चर्चा अद्यापही सुरू आहे. बच्चूंनी गावितांच्या खरंच थोबाडीत हाणली की नाही, हे खात्रीने एकतर बच्चू कडू सांगू शकतात किंवा गावित. एक गोष्ट मात्र नक्की. बच्चू कडूंच्या थप्पडची गुंज दोन दिवस मंत्रालयात गुंजत होती. ही थप्पड एवढी सणसणीत होती की केवळ गावितच नाही, तर मंत्रालयातील सर्वच कर्मचार्यांच्या डोळ्यासमोर भरदिवसा तारे चमकलेत.भविष्यात ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून मंत्रालय कर्मचार्यांच्या संघटनेने दोन दिवस मंत्रालय वेठीस धरलं. मंत्रालयात सर्वसामान्य माणसांना काय ट्रीटमेंट मिळते हे माहीत नसलेल्या विद्वानांनी लगेचच बच्चू कडू कसे गुंड आमदार आहेत, यावर आपली अक्कल पाजळणे सुरू केले. हे बच्चू अगदीच ‘कडू’ आहेत किंवा कडू अजूनही ‘बच्चू’च आहेत, असे शब्दांचे खेळही झालेत. बच्चू कडूंचा इतिहास कसा गुंडगिरीचा आहे, अशी लेखनकामाठीही झाली. बाहेर सर्वसामान्य माणसांमध्ये मात्र वेगळीच प्रतिक्रिया आहे. मुजोर आणि भ्रष्ट अधिकार्यांना ही बच्चूंचीच भाषा कळते. संघटित झुंडशाहीच्या जोरावर सरकारला नमविणार्या अधिकार्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असा जनतेचा सूर आहे. व्यवस्थेची दुहाई देणार्यांना जनता असा विचार का करते, हे जरा समजून घेतलं पाहिजे.
ही गोष्ट खरी आहे की, बच्चू कडूंनी याअगोदरही अनेक अधिकार्यांच्या कानाखाली जाळ काढला आहे. त्याबद्दल वेळोवेळी त्यांनी शिक्षाही भोगल्या आहेत. अर्थात या अशा प्रसंगामुळे बच्चू कडू हे अधिकार्यांना मारहाणच करत राहतात, असे जर वाटत असेल तर ते शंभर टक्के चूक आहे. बच्चू कडूंची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे. सामान्य माणसाबद्दल आणि त्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचा कळवळा हे या माणसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. त्यामुळेच सतत तिसर्यांदा ते अपक्ष म्हणून निवडून आलेत. २00४ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यापासून ते लाईमलाईटमध्ये आहेत. एकापेक्षा एक कल्पक व भन्नाट आंदोलनांमुळे ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात वनविभागाने त्यांच्या मतदारसंघात काही आदिवासी कुटुंबाची पिके नष्ट केली म्हणून त्यांनी दोन दिवस स्वत:ला जमिनीत गाडून घेतले होते. असंच एकदा वनविभागाने कुठलीही पूर्वसूचना न देता आदिवासींचे जमिनीचे पट्टे ताब्यात घेतल्यानंतर बच्चूंनी वनविभागाच्या कार्यालयात शेकडो जिवंत साप सोडून खळबळ माजवून दिली होती. जे अधिकारी जनतेसोबत उद्धट वागतात, पैशाची मागणी करतात त्यांच्या कार्यालयावर आधी काळा पट्टा मारायचा, पैसे परत केले नाही, तर इशारा म्हणून लाल पट्टा आणि त्याउपरही मुजोरी कायम राहिली तर जनतेला सोबत नेऊन अधिकार्यांना जाब विचारायचा, असंही एक आंदोलन बच्चू कडूंनी केलं होतं.
केवळ खळबळ माजवणारी, हाणामारी करणारीच आंदोलने बच्चू कडू करतात, असे म्हणणार्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या आंदोलनांचा अभ्यास नक्कीच करायला हवा. जे अधिकारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कार्यालयात हजर राहत नाहीत, त्यांच्या खुच्र्या जप्त करण्याची मोहीम बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ या संघटनेने मध्यंतरी राबविली होती. ज्या कार्यालयात विजेचा अपव्यय होतो, तेथील लाईट, फॅन काढून घेण्याचे प्रकारही त्यांनी केले आहेत. बच्चूंचे असे चिक्कार आंदोलनं आहेत. पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्यांच्या नुकसानीचा व्यवस्थित पंचनामा न केल्याच्या निषेधार्थ गणेशोत्सवाच्या काळात बच्चूंच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक तहसील कार्यालयात गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती. जोपर्यंत वस्तुनिष्ठ पंचनामे होत नाहीत तोपर्यंत विसर्जन नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शेवटी अधिकार्यांना झुकावे लागले होते. मध्यंतरी राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात जाऊन त्यांनी तेथील गरीब माणसांची घरे बांधून देण्याचं काम केलं होतं. इंदिरा आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागात घर बांधणीसाठी केवळ ३५ हजार रुपये मिळतात. या एवढय़ा पैशात घर बांधता येत नाहीत, याकडे तत्कालीन यूपीए सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ही मोहीम हाती घेतली होती. बच्चू कडूंची आंदोलने हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे. त्यावर एखादा शोधप्रबंध तयार व्हावा, एवढी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने त्यांनी केली आहेत. बच्चू कडू हे केवळ प्रसिद्धीसाठी किंवा स्टंट म्हणून आंदोलन करतात, असे म्हणणार्यांनी त्यांच्या रुग्णसेवेचा इतिहास तपासला पाहिजे. आमदार होण्याच्या अगोदरपासून कित्येक वर्षांपासून त्यांनी रुग्णसेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. बच्चू कडू मुंबईला केव्हाही जात असो, त्यांच्यासोबत हमखास एखादा-दुसरा पेशंट हा असतोच. आपला बर्थ पेशंटला देऊन हे कोपर्यात बसलेले असतात. मुंबईतील आमदार निवासातील त्यांची रूमही कायम पेशंटने खच्चून भरलेली असते. पेशंटचे उपचार, खाणे -पिणे, औषध सारा खर्च हेच करणार. मध्यंतरी पेशंटच्या उपचारासाठी पैसे संपल्याने बच्चूंनी रस्त्यावर भीकही मागितली आहे. प्रारंभीच्या काळात रुग्णांना मुंबईला नेल्यानंतर परतीच्या प्रवासात पैसे संपले म्हणून विनातिकीट केलेला प्रवास, त्यामुळे खावा लागलेला पोलिसांचा मार, पोलीस कोठडी असं बरंच काही कडूंनी अनुभवलं आहे. या अशा गोष्टी नौटंकी म्हणून दीर्घकाळ नाही करता येत.हा अंतरीचा उमाळा आहे.
गेले काही वर्षे अपंगांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून हा माणूस झगडतोय. या अपंगांमुळे त्यांच्या व्होट बॅंकेत काही भर पडेल, असं काही नाही. पण सातत्याने हा धडका मारतोय. अपंगांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करते म्हणून मुंबईतील शासकीय इमारतींच्या भिंती रंगविण्याचं काम त्यांनी मध्यंतरी केलं होतं. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अपंगांच्या अनेक मागण्या मार्गी लागल्या आहेत. अनेक पाईपलाईनमध्ये आहेत. या माणसाबद्दल सांगण्याजोगं खूप काही आहे. ही ‘बच्चू गाथा’ सांगण्याचं कारणच हे की, केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी बच्चू असे वागत नाही. व्यवस्थेबद्दलच्या संतापातून, अधिकार्यांच्या टोकाच्या हेकेखोरपणातून त्यांच्या हातून आततायीपणा घडतो. अर्थात त्यांच्या कृतीचं सर्मथन करण्याचं कारण नाही. मात्र अधिकार्यांबद्दल संताप का निर्माण होतो, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. सामान्य जनतेचं जाऊ द्या. लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करणार्या आमदारांसोबत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी कसे वागतात, हे जरा आमदारांना खासगीत विचारा. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांवर अधिकारी आपलं ऐकत नाही, हे सांगण्याची पाळी आली होती, यावरून काय ते लक्षात घ्या. अधिकारी प्रचंड उद्दाम आणि भ्रष्ट झाले आहेत, याबद्दल दुसरं मतच नाही. मंत्रालयात राज्य कोणाचंही असू द्या. राजे अधिकारीच आहेत. बच्चू कडूंनी अधिकार्याच्या कानाखाली वाजविली तर यांनी मंत्रालय डोक्यावर घेतलं; पण आपल्यातल्या भ्रष्ट अधिकार्यांबद्दल ते कधी तोंड उघडताना दिसले नाहीत. संघटित ताकदीचा केवळ हितसंबंध जपण्यासाठी वापर केला जातो. हे अधिकारी काही मनाविरुद्ध घडलं तर त्वरेने मंत्रालयातलं कामकाज बंद पाडतात. सातवा वेतन आयोग, महागाईभत्त्यासाठी सरकारचं नाक दाबतात. मात्र राज्याच्या कानाकोपर्यात गेल्या २0 वर्षांपासून शेकडो शेतकरी आत्महत्या करताहेत, त्यासाठी संघटनेच्या पातळीवर मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी संघटना काही मदत करते आहे, हे कधी दिसलं नाही. सध्या मराठवाड्यात पाण्यासाठी वणवण सुरू आहे. एकेक थेंब पाण्यासाठी माणसं सैरावैरा भटकत आहेत. त्या विषयात सरकारी उपाययोजना वेगात व्हाव्यात, यासाठीही मंत्रालय कधी हलत नाही. केवळ आपल्या बुडाला शेक लागला की हे अधिकारी जागे होतात. बच्चू कडूंनी विधानसभेत जी मागणी केली ती अगदी योग्य आहे. सरकारी अधिकार्यांची संपत्ती दरवर्षी जाहीर झाली पाहिजे. भुजबळांची संपत्ती समोर आली तर सार्यांचे डोळे दीपून गेलेत. मात्र राज्यातील आयएएस, आयपीएस लॉबी आणि बांधकाम, पाटबंधारे आदी मलाईदार खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांची संपत्ती जरा तपासली पाहिजे. अनेक सुरस गाथा बाहेर येतील. राजकारण्यांएवढेच अधिकारी भ्रष्ट आहेत. व्यवस्थेची ऐशीतैशी करण्यात यांचाही त्यांच्याएवढाच किंबहुना अधिक महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या थप्पडमुळे व्यवस्थेला धोका वगैरे निर्माण झाला आहे, असा गळा काढण्यात अर्थ नाही. व्यवस्थेत राहून ती व्यवस्था पोखरणार्यांच्या माजोरीपणामुळे हे असे प्रकार यापुढेही होणार आहे. संतापलेली माणसं शेवटी अधिकार्यांना जी भाषा कळते, त्यातच बोलणार आहेत. |
Agadi sansanit lekh ! ase sacche aamadar asatil brash shaskiy vyavsthele khil baselch ! Ghotale je hotat te ya ashyaa brasht natdrasht adhikaryanmulech…! brasht rajkarni ashya adhikaryana hatashi gheunach gotale karatat….! Khup chhan lekh aahe Dudhe sir..!
Aani manapasun Salute Bachhu Pande Sir na…!