भाजपावाल्यांचं एक वैशिष्ट्य आहे़ ते
एखाद्या कल्पनेच्या प्रेमात पडतात आणि त्यातच रममाण होतात़. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात प्रमोद महाजनांना देशात सर्व काही आलबेल आहे, असं वाटत होतं. त्यातूनच त्यांना ‘फील गुड’ चा साक्षात्कार झाला होता़. ‘इंडिया शायनिंग’ असा नाराही त्यांनी दिला होता़. त्या आत्मविश्वासातून सहा महिने अगोदर त्यांनी लोकसभा निवडणूक घेतली़. तेव्हा ‘रिलायन्स’ च्या विमानात कायम हवेत राहणारे महाजनांना जमिनीवर काय चालले आहे, माहीतच नव्हते़. त्याचा परिणाम म्हणजे २००४ च्या निवडणुकीत लोकांनी असा काही हग्या मार दिला की, भाजपा दहा वर्ष कोमात गेली़. आता प्रमोद महाजनांची भूमिका अमित शहा बजावित आहेत. हे शहा अशा संस्कृतीतून आले आहेत की जिथे प्रत्येक गोष्ट मॅनेज करणे म्हणजे कर्तबगारी, असे मानले जाते़. प्रत्यक्षात जमिनीवरचं वास्तव काही असो पण आभास असा निर्माण करायचा की, लोकांना वाटलं पाहिजे की, सगळं काही ठीक आहे . या मॅनेज तंत्रातूनच त्यांनी अलीकडे एक सर्वेक्षण घडवून आणले़. एक वृत्तवाहिनी व सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून देशाचा मूड काय आहे, हे त्यांनी लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे़. या सर्वेक्षणाचे जे निष्कर्ष समोर आले आहेत ते नमोभक्त व संघ परिवाराला स्वाभाविकच सुखावणारे आहेत . देशात आज जर लोकसभा निवडणूक झाली, तर भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३०१ जागा मिळतील़. थोडक्यात भाजपाला पुन्हा एकदा निर्णायक बहुमत मिळेल, असे हे सर्वेक्षण सांगते़. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत . मोदी सरकारच्या कार्यकाळात देशातील जीवनमान सुधारलं आहे़. सरकारचा कारभार , पंतप्रधानांची कारकीर्द समाधानकारक आहे, असे अनेक निष्कर्ष या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत . सर्वात चकीत करणारी गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी हे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे सर्वोत्तम पंतप्रधान आहे, असे हे सर्वेक्षण सांगते़. पंडित नेहरु, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंहराव हे कर्तबगार नेते जाऊ द्या, अगदी अटलबिहारी वाजपेयींपेक्षाही मोदी सर्वोत्तम असल्याचा निष्कर्ष केवळ वीस महिन्याच्या कारभारावरुन देशाने काढला आहे, असे हे सर्वेक्षण सांगते़.
कुठलंही निमित्त नसताना देशाचा मूड तपासण्याच्या नावाखाली हे जे काही निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत, त्यामागची कारणं समजून घेतली पाहिजे़. भारतीय जनता पक्ष कितीही आव आणत असला तरी देशातील जनतेचा मोदी सरकारबद्दल भ्रमनिरास झाला आहे, हे संघ परिवाराच्या लक्षात आलं आहे. त्यावरुन लक्ष वळविण्यासाठी हे सर्वेक्षण आहे़ हे सर्वेक्षण फसवं आहे, हे सहज लक्षात येतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, बिहार या मोठ्या राज्यात भाजपाने विक्रमी जागा जिंकल्या होत्या़. आज भाजपा तेवढ्या जागा कायम ठेवू शकेल, असा भाजपाचा कट्टर समर्थकही मान्य करणार नाही़. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात या भाजपाशासित प्रदेशातही जनभावना भाजपाच्या विरोधात आहे़, हे अलीकडच्या पोटनिवडणुकीच्या निकालात स्पष्ट झाल. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या भ्रष्ट कारभारामुळे कंटाळलेले सर्व जातीसमूह व सर्व आर्थिक स्तरातील जनतेने भाजपाच्या पदरात भरभरुन मते टाकली होती़ . नरेंद्र मोदींचा पूर्वेतिहासाकडे दुर्लक्ष करुन दलित व मुस्लिम जनतेनेही काही प्रमाणात भाजपाला पसंती दर्शविली होती . मोदींनी गुजरातचा कायापालट केला असा यशस्वी प्रपोगंडा भाजपाने केल्याने यांना एक संधी देऊन बघू, असा अनेकांचा मूड होता . खरं तर भाजपा आणि मोदींसाठी ही अतिशय उत्तम संधी होती़. पण ती संधी त्यांनी आपल्या वर्तनाने गमावली आहे . भाजप-संघाचा प्रॉब्लेम हा आहे की या देशाची बहुभाषिक, बहुधार्मिक परंपरा, त्यांच्या समजूनच घेता येत नाही़. त्यामुळे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या एकाच दिशेने सर्वांना दामटण्याचा प्रयत्न केला जातो़. भाजपावाले कबूल करो वा ना करो, गेल्या वीस महिन्यातील अनेक घटनांमुळे भाजप व संघाची मुस्लिम आणि दलितविरोधी प्रतिमा अधिक गडद झाली आहे़ दादरीचं महम्मद अखलाकची गोमास प्रकरणावरुन घडलेली हत्या, हरियाणातील फरिदाबादच्या दलित मुलांना जाळून मारण्याचं प्रकरण, अलीकडचं हैद्राबादचं रोहित वेमुला या दलित तरुणाची आत्महत्या़. या सर्व विषयात संघ, विश्व हिंदू परिषद व भाजपच्या नेत्यांनी केलेले शब्दांचे खेळ प्रचंड चीड आणणारे आहेत़ रोहितच्या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघ परिवारातील विद्यार्थी संघटना ज्या पद्धतीचा उन्माद दाखवत आहे, तोही संतापजनक आहे . या व यापद्धतीच्या अनेक छोट्या मोठ्या घटकांमुळे मुस्लिम व दलित हे दोन मोठे घटक पुन्हा एकदा भाजपाकडे संर्पूणत: पाठ फिरवतील, हे स्पष्ट दिसते आहे . इतर जाती-धर्मातील ज्या समाजघटकांनी कॉंग्रेसमुळे निराश होऊन मोदींना एक संधी दिली पाहिजे या भावनेतून भाजपाला मतदान केले होते, त्यांचीही गेल्या वीस महिन्यात निराशा झाली आहे . हे घटक काही भाजपाचे समर्थक नाही, पण बदल करून पाहू या विचारातून त्यांनी भाजपाला मतदान केले होते़. मात्र देशासमोर अनेक महत्वाचे विषय असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी गोमांस बंदी, आरक्षण पुनर्विचार, राममंदिर, अभ्यासक्रमातील बदल अशा सरकारचा कुठलाही संबंध नसणा-या विषयात भारतीय जनता पक्षाला अधिक रस आहे. नरेंद्र मोदींमध्ये स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्याची तीव्र इच्छा असली तरी अटलबिहारी वाजपेयींप्रमाणेच ते सुद्धा संघाच्या अजेंडासमोर हतबल आहेत, हे आता लोकांच्या लक्षात येत आहे . त्यामुळे देशाचा मूड बदलतो आहे, हे खरं आहे़ मात्र संघ परिवार ज्या भ्रमात आहे, त्या भ्रमात देश नक्कीच नाही़
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
8888744796
www.avinashdudhe.com