देशप्रेमाची सर्टिफिकेटं कोण कोणाला देणार?

जेएनयू प्रकरणात सत्तेच्या जोरावर झुंडशाहीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रवादाची बोंब मारुन वेगवेगळ्या घटकांचे धृवीकरण करणे ही बदमाशी संघ परिवार नक्की करत आहे़. मात्र अशा विषयात कॉंग्रेस, डावे वा इतर पक्षही फार सोवळे वा नितीवान आहेत, अशातला भाग नाही़. संघपरिवार आज जे काही करत आहेत ते प्रकार आणिबाणीच्या काळात आणि नंतरही कॉंग्रेसकडून अनेकदा घडले आहेत़.
……………………………………………………………………………………………………………………………………..
         देशाच्या राजधानीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही विद्यार्थ्यांनी दिलेल्या देशविरोधी घोषणांनी गेल्या १०-१२ दिवसात संपूर्ण देश ढवळून निघाला आहे़. समाजातील बहुतेक घटकांमध्ये उभी दरार पडली आहे़. राष्ट्रप्रेमी-राष्ट्रद्रोही असे सरळसोट कप्पे करुन आपापले पूर्वग्रह व समजुतीनुसार माणसांवर तसे ठप्पे मारले जात आहेत़. चिंतेची बाब म्हणजे घटना, परिस्थिती सर्वांगाने समजून घेऊन जी माणसं आपली मतं बनवितात असं मानलं जातं, सर्वसामान्य माणसं ज्यांना विचारी, बुद्धिवान वगैरे समजतात,  असे वकील व पत्रकार सुद्धा दोन गटात विभागले गेले आहेत़. विषय सर्वार्थाने समजून घेण्याची कोणाची तयारी नाही़ तुम्ही आमचे आहे, की त्यांचे? एवढंच सांगण्याची मुभा आहे़. वेगळं काही सांगण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही राष्ट्रद्रोही ठरणार हे नक्की़. वकील, पोलीस, पत्रकार हा व्यवसाय करणारी माणसं ही इतरांसारखीच हाडामासाची माणसं असतात़. त्यांच्यामध्येही सर्वसामान्य माणसांसारखेच राग, लोभ, आग्रह, दुराग्रह अशा भावना असतात,

हे समजून जरी घेतलं तरी या व्यवसायातील माणसांनी आपलं कर्तव्य बजावताना आपली वैयक्तिक मतं, आग्रह बाजूला ठेवून निरपेक्ष राहावं, ही अपेक्षा असते़. मात्र या प्रकरणात हा संकेत विसरुन हे तीन घटक ज्या पद्धतीने वागताहेत ते लोकशाहीसाठी अतिशय धोकादायक आहे़. ज्यांनी कायदा पालनासाठी आग्रही राहायला हवं ते काळ्या कोटातील वकील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारला लाथाबुक्क्यानी मारहाण करतात. पत्रकारांना धक्काबुक्की करतात़.  त्यांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या वरिष्ठ वकीलांवर दगडफेक करतात आणि हा तमाशा केल्यानंतर हातात तिरंगा घेऊन स्वत:ला देशप्रेमी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात़. हातात तिरंगा घेतल्याबरोबर माणसं देशप्रेमी होतात का? देशप्रेम हे एवढं सवंग असतं? आमच्यापैकी कोणालाही अटक केल्यास दिल्लीतील कुठल्याही न्यायालयाचं काम चालू देणार नाही, अशा धमक्या देणारी ही माणसं  वकील आहेत की काळ्या कोटातील गुंडं आहेत, असा प्रश्न आता पडला आहे़ .

मीडियातील गुंडही यात मागे नाही़. आपण टीव्ही चॅनलच्या स्टुडिओत बसलो म्हणजे या देशातील सर्व  समस्यांबद्दल आपल्याला कळते आणि त्याविषयात राज्यकर्त्यांसह या देशातील सर्वांनी आपल्या मतानेच चाललं पाहिजे, असा दुराग्रह बाळगणाऱ्या  संपादक, पत्रकारांची या देशात कमी नाही़.  जेएनयूच्या प्रकरणात अर्णब गोस्वामी, दीपक चौरसिया व अनेक मोठ्या पत्रकारांनी अकलेचे दिवे पाजळून वातावरण बिघडविलं, चिघळविलं, हे आता स्पष्ट झालं आहे़. हे स्वत:ला मोठे संपादक म्हणविणारे महाभाग विषयाच्या खोलात न जाता देशप्रेमाचे स्वयंघोषित प्रवक्ते असल्याप्रमाणे आपली बाजू मांडणाऱ्या  विद्यार्थ्यांना निर्लज्ज, खोटारडे ठरवितात, तेव्हा यांची लायकी काय ठरवायची? दुसऱ्या  गटाकडून मिळालेल्या व्हिडीओची छाननी न करता या स्टार टीव्ही संपादकांनी  भडकलेल्या वातावरणात आणखी तेल ओतलं.  देशाला अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ, प्रशासक, कलावंत देणाऱ्या  या विद्यापीठाला एका क्षणात दहशतवाद्यांचे, माओवाद्यांचे विद्यापीठ ठरवून हे संपादक मोकळे झाले़.  या वाचाळवीरांच्या भडकविलेल्या आगीने  सोशल मीडियावरील अर्धवटरावांना चेव चढला नसता तरच नवल़. जेएनयू, त्या विद्यापीठाचा इतिहास, घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं, हे काहीही न समजून न घेता सोशल नेटवर्कवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडणं सुरु झालं.   काश्मिरातील काही विद्यार्थ्यांच्या देशविरोधी घोषणांनी जेएनयूला आतंकवाद्यांचा गड ठरविण्यात आलं.  देशावर जणू आभाळ कोसळलं असं वातावरण निर्माण करण्यात आलं.  १० तारखेला जेएनयूमध्ये भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या ही गोष्ट खरी आहे़. त्या घोषणा देणारे बहुतांश विद्यार्थी काश्मिरचे होते़. देशप्रेमाच्या भाबड्या कल्पना बाळगणाऱ्याना या घोषणांमुळे संताप येणं स्वाभाविक आहे़. पण काश्मिरी समस्येची जटीलता समजून घेतल्याशिवाय या अशा घोषणा का दिल्या जातात, हे समजून घेता येत नाही़
भारतीय जनता पक्ष काश्मिरमध्ये ज्या पीडीपीसोबत गेले दीड वर्ष सत्तेत होता, त्या पीडीपीचे जवळपास सर्व आमदार भारताला आपला देश समजत नाही़. भारताचं संविधान त्यांना नामंजूर आहे़. काश्मिर स्वतंत्र राष्ट्र आहे, असे ते मानतात़. अफजल गुरु त्यांच्यासाठी हीरो आहे़. त्यांच्यापैकी अनेकजण विधानसभेत भारतविरोधी घोषणाबाजी करतात, असे असताना भारतीय जनता पक्ष त्यांच्या मांडीला मांडी लावून कसा बसतो आणि आता पुन्हा सत्तेत बसण्यासाठी त्यांच्या दाढ्या कशा कुरवाळतो, असे प्रश्न तथाकथित राष्ट्रप्रेमींना का पडत नाहीत? या देशातील मुसलमानांना सरसकट राष्ट्रद्रोही, गद्दार ठरविणाऱ्याना राष्ट्रपित्याचा खून करणारा नथुराम गोडसे हा खूनी पूजनीय कसा वाटतो? मुसलमानांना उठसूठ देशप्रेमाचे सर्टिफिकेट मागणाऱ्याना २४ तास राष्ट्रप्रेमाचे गोडवे गाणारे स्वातंत्र्यसंग्राम चळवळीत   काय करत होते? त्यांनी माफीनामे का लिहून दिलेत? फाळणी होत असताना कराची, लाहोर, रावळपिंडी सोडून ते का पळून आलेत?, संघ मुख्यालयावर ५० वर्ष तिरंगा का फडकविला जात नव्हता, हे असे प्रश्न का विचारावेसे वाटत नाही?  खरं तर राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम याचा ठेका काही ठराविक संघटना किंवा पक्षांकडे दिला नाहीय़. हिंदुत्ववादी, जातीयवादी संघटनांच्या दुटप्पी वागणुकीबद्दल बोललं की माणूस एकदम राष्ट्रद्रोही कसा होतो? परवा राहुल गांधी जेएनयूतील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या दडपशाहीबद्दल बोलल्याबरोबर त्यांच्यावर लगेच राष्ट्रद्रोहाचा शिक्का मारण्यात आला़. हे शिक्के यांच्याकडे घाऊकपणे मिळतात का?  या मंडळींनी राष्ट्रवाद व राष्ट्रप्रेम या संकल्पना लोकांच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी वापरणे सुरु केले आहे़.
या संपूर्ण प्रकरणात सत्तेच्या जोरावर झुंडशाहीला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रवादाची बोंब मारुन वेगवेगळ्या घटकांचे धृवीकरण करणे ही बदमाशी संघ परिवार नक्की करत आहे़. मात्र अशा विषयात कॉंग्रेस, डावे वा इतर पक्षही फार सोवळे वा नितीवान आहेत, अशातला भाग नाही़. डाव्यांची बंगालमध्ये जवळपास ३५ वर्ष सत्ता होती़. त्या काळात राजकीय विरोधकांची हत्या करण्यापासून मतदान केंद्र बळकावून सत्ता कायम ठेवण्याचे प्रकार त्यांनी कसे केले हा सारा लाल इतिहास समोर आला आहे़. कॉंग्रेसचा याविषयातला ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्तच आहे़. संघपरिवार आज जे काही करत आहेत ते प्रकार आणिबाणीच्या काळात आणि नंतरही कॉंग्रेसकडून अनेकदा घडले आहेत़. इंदिरा व संजय गांधीविरुद्ध थोडा जरी वेगळा सूर लावला तरी विरोधकांना तुरुंगात टाकण्याचे प्रकार कॉंग्रेसने केले आहेत़. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ एवढं टोक गाठल्याचा इतिहास फार जुना नाही़. झुंडशाहीचा आधार करुन विरोधकांना नामोहरम करणे आणि सारं काही आपल्या मनासारखं करुन घेणे हा पाठ कॉंग्रेसनेच इतर पक्षांना शिकविला आहे़. कालपरवा नॅशनल हेराल्डच्या प्रकरणात सोनिया गांधींवर अन्याय झाल्याची बोंब ठोकण्याचा प्रकार पाहता कॉंग्रेसचे झुंडशाहीवरच प्रेम अजिबात कमी झालं नाही, हे लक्षात येतं.  कॉंग्रेसच नाही तर ज्यांना ज्यांना अनिर्बंध सत्ता मिळाली ते जयललिता,  (गेल्यावर्षी कर्नाटक हायकोर्टात जयललिता समर्थकांनी केलेला तमाशा आठवा) लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव यांनी झुंड आणि गुंडांचा आधार घेऊन विरोधकांना वाकविलं आहे़. लोकशाहीची, संविधानाची ऐसीतैशी केली आहे़. त्यामुळे जेएनयू प्रकरणाच्या निमित्ताने जे काही घडत आहे, ते चिंताजनक असलं, तरी देशाला ते नवीन नाहीय़.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
 8888744796
avinashdudhe.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top