दुग्धक्रांतीच्या जनकाचा विलक्षण प्रवास

भारतातील दुग्धक्रांतीचे जनक आणि जगातील सर्वात जास्त दुग्धोत्पादन करणारा देश म्हणून भारताला लौकिक मिळवून देणारे डॉ. वर्गीस कुरियन यांचं रविवारी निधन झालं. डॉ. कुरियन यांच्याबद्दल आपल्यापैकी बहुतेकांना फारच कमी माहिती आहे. ‘अमूल’ला मात्र आपण सारेच ओळखतो. Utteraly…Butterly…Delicious  ही जाहिरात गेल्या तीन पिढय़ांपासून लहानथोर सार्‍यांच्या तोंडपाठ आहे. या अमूलचे जनक म्हणजेच डॉ. वर्गीस कुरियन. गुजरातमधील आणंद या छोटय़ाशा खेडय़ातून धवलक्रांती घडविणार्‍या डॉ. कुरियन यांची कहाणी मोठी विलक्षण आहे. ती समजून घेण्याअगोदर टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा त्यांच्याबद्दल काय म्हणतात पाहा- ‘भारतातील दुग्धव्यवसायाकरिता त्यांनी जे काही केलं, ते खर्‍या अर्थाने अचंबित करणारं आहे. हे अशा प्रकारचं द्रष्टेपण, अशा प्रकारची बांधिलकी, निष्ठा आणि राष्ट्रीयत्वाची ज्वलंत भावना असणारे एक हजार कुरियन मिळते, तर आज आपला देश कुठल्या कुठे असता.’ 57 वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंनीही त्यांच्याबद्दल असेच गौरवोद्गार काढले होते. ‘असाध्य ते साध्य करायला धडाडीने पुढे जाणारी कुरियनसारखी माणसं आपल्या देशात आहेत, याचा मला विलक्षण अभिमान वाटतो.’ थोरामोठय़ांच्या गौरवास पात्र ठरलेले डॉ. कुरियन मूळचे केरळच्या कालिकतचे. सिरियन ºिश्चन कुटुंबात 26 नोव्हेंबर 1921 ला त्यांचा जन्म झाला. चेन्नईजवळच्या गिंडी येथून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर लष्करात जाण्याचं वेड त्यांनी घेतलं होतं. मात्र आईच्या इच्छेखातर टाटा स्टील कंपनीत त्यांनी नोकरी पत्करली. मात्र आईचे मामा तेव्हाचे केंद्रीय मंत्री आणि टाटा स्टीलचे संचालक जॉन मथाई यांच्यामुळे कंपनीत आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळते हे लक्षात आल्याने त्यांनी तेथून बाहेर पडण्याचे ठरविले. तेव्हाच्या ब्रिटिश सरकारकडे त्यांनी उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्तीकरिता अर्ज केला. इंग्लंड किंवा अमेरिकेत जाऊन मेटलर्जी किंवा न्यूक्लिअर फिजिक्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा होती. मात्र शिष्यवृत्ती निवड समितीने त्यांची डेअरी इंजिनिअरिंगच्या शिष्यवृत्तीसाठी निवड केली. टाटा स्टीलमधून बाहेर पडायचं असल्याने नाइलाजाने त्यांनी ही शिष्यवृत्ती पत्करून अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचा रस्ता पकडला. तेथे मात्र त्यांनी डेअरी इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्याऐवजी मेटलर्जी आणि न्यूक्लिअर फिजिक्स या अभ्यासक्रमालाच पसंती दिली. मात्र 1948 मध्ये भारतात परत आल्यानंतर सरकारी लालफीतशाही काय असते, हे त्यांना समजले. तुमच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून सरकारने 30 हजार खर्च केले असल्याने तुम्हाला सरकार सांगेल तेथे जाऊन पाच वर्षे नोकरी करावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. तसे न केल्यास खटला दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. लगेचच मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर बडोद्यापासून 40 किलोमीटर अंतरावरील आणंद येथील सरकारी दुधावरील साय संशोधन केंद्रात दुग्धव्यवसाय अभियंतापदी त्यांची नेमणूक करण्यात आली.

झगमगतं न्यूयॉर्क ते धुळीने भरलेलं भकास आणंद. डॉ. कुरियनसाठी हा मोठा धक्का होता. एखाद्या मोठय़ा संस्थेमध्ये नोकरी करून मस्त आरामात जगायचं असं कुरियननी ठरविलं होतं. मात्र नाइलाज असल्याने आणंदमधून कसं पळून जायचं यावर विचार करत अतिशय अनिच्छेने त्यांनी कामाला सुरुवात केली. मात्र तेथे करण्याजोगं काहीच नसल्याने आपल्याला सरकार फुकटात पगार देत आहे असे म्हणत काही दिवसांतच त्यांनी आपला राजीनामा कृषी मंत्रालयाकडे पाठविला. जवळपास आठ महिने वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर त्यांचा राजीनामा मंजूर झाला. मात्र आणंदमध्ये त्यांच्या हातून इतिहास घडायचा होता. आणंदच्या सरकारी संशोधन केंद्राच्याच जागेत भाडय़ाने असलेल्या कैरा जिल्हा सहकारी दुग्धोत्पादक संघाचे अध्यक्ष त्रिभुवनदास पटेल यांनी कुरियनमधील वेगळेपण हेरलं होतं. ज्या दिवशी कुरियन आणंदहून परत जाणार, त्या दिवशी ते त्यांच्या घरी आले. नवीन नोकरी वा इतर काही करेपर्यंत तुम्ही इथेच का राहत नाही, अशी गळ त्यांनी घातली. पटेल हे कैरा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांची सहकारी संस्था चालवीत होते. त्यांनी 600 रुपये पगारावर कुरियनना संघाच्या सरव्यवस्थापकपदी

नेमले. तो काळ खासगी दूध व्यावसायिकांच्या मक्तेदारीचा होता. पोल्सन डेअरी आणि मुंबईजवळील काही अन्य व्यावसायिक दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांना अतिशय कमी भाव देऊन स्वत: मात्र भरमसाट नफा कमवीत होते. त्रिभुवनदासजींना ही गोष्ट अस्वस्थ करीत होती. त्रिभुवनदासजी स्वातंर्त्यसंग्राम सैनिक होते. काँग्रेसच्या वतरुळात त्यांना खूप मान होता. वल्लभभाई पटेल व मोरारजी देसाई त्यांचा शब्द खाली पडू देत नसे. अतिशय परिश्रमी, त्यागी व मेहनती असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी दूध व्यावसायिकांची एकाधिकारशाही मोडीत काढायचं ठरविलं. शेतकर्‍यांबद्दलची त्यांची तळमळ कुरियन पाहत असे. त्यामुळेच आणंदला थांबण्याचा त्यांचा आग्रह त्यांनी मानला. त्रिभुवनदासजींनी शेतकर्‍यांना जागरूक करण्याचं काम सुरू केलं, तर कुरियननी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संस्थेचा कायापालट करणं सुरू केले. कुरियनच्या व्यावसायिक कौशल्याची साथ मिळताच कैरा दुग्ध उत्पादक संघाचं दूध संकलन अवघ्या चार वर्षांत 200 लिटरवरून 20,000 लिटरपर्यंत पोहोचलं. अनेक खेडय़ातील दुग्ध उत्पादक त्यांच्यासोबत आले. दूध संकलन एवढं वाढलं की, काही महिन्यांतच रेल्वेच्या खास वाघिणींतून दूध मुंबईला जायला लागलं. सहकारी चळवळीतील या प्रयोगाने सार्‍या गुजरातचं लक्ष आणंदकडे वेधलं गेलं. एवढंच नव्हे, तर कैरा संघाच्या कामाची ख्याती दिल्लीपर्यंत पोहोचली. त्रिभुवनदासजी पटेल आणि कुरियननी लवकरच नवीन डेअरी उभारण्याचा निर्णय घेतला. पुढे अमूल डेअरी म्हणून नावाजलेल्या त्या डेअरीच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसादांना आमंत्रित करण्यात आलं होतं. वर्षभरातच पंतप्रधान पंडित नेहरूंच्या हस्ते त्या डेअरीचं उद्घाटन झालं. त्यानंतरचा इतिहास सर्वानी जाणून घ्यावा असा आहे. कैरा जिल्ह्यातील ही सहकारी चळवळ संपूर्ण गुजरातेत फोफावली. काही वर्षांतच जगातील सर्वात मोठी दुग्ध उत्पादक सहकारी संस्था असा नावलौकिक अमूलला मिळाला. (‘अमूल’ हे अपरपव चळश्रज्ञ णपळेप ङळाळींशव चं लघुरूप आहे. एका केमिस्टच्या डोक्यातून या नावाचा जन्म झाला आहे. सहकारी चळवळीमागची प्रतिमा, भूमिका, तत्त्व ज्यात डोकावेल, असं नाव कुरियनना हवं होतं. हे नाव सर्वांना पसंत पडलं) त्यानंतर काही वर्षांतच ‘ऑपरेशन फ्लड’ (दुधाचा महापूर) अभियान हाती घेण्यात आलं. आज 27 राज्यातले दोन कोटींपेक्षा अधिक शेतकरी हजारो दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून या चळवळीशी जोडले गेले आहेत. या चळवळीवर श्याम बेनेगलने ‘मंथन’ नावाचा चित्रपटही काढला आहे. स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसीरूद्दीन शहा, अमरीश पुरी आदींनी त्यात काम केलं आहे.

डॉ. वर्गीस कुरियननी ‘माझंही एक स्वप्न होतं’, या

आत्मकथनात हा संपूर्ण प्रवास अतिशय वेधकपणे रेखाटला आहे. हे पुस्तक वाचताना या माणसाचं चिंतनही मोठं आहे, हे पदोपदी जाणवतं. त्या पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्या नातवाला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘सर्व मूल्यांमध्ये प्रामाणिकपणा किंवा सचोटी माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे. आपण जर आपल्याशी प्रामाणिक असलो तर इतरांशी सचोटीनं वागताना फारसे कष्ट पडत नाही. आयुष्य म्हणजे संचित आहे आणि ते वाया घालविणं म्हणजे गुन्हाच, हे मी शिकलो आहे. सर्वाच्या भल्याकरिता काम करणं, आपल्या बुद्धीचा सर्वाधिक चांगल्या प्रकारे वापरं करणं आणि स्वत:ची जबाबदारी स्वत:च घेणं ही त्रिसूत्री आयुष्य नावाचं संचित जगताना लक्षात ठेवायची असते. आपल्या स्वप्नातल्या भारताच्या उभारणीसाठी आपापल्या कुवतीप्रमाणे हातभार लावणं हे सर्वात भव्योदात्त कर्म होय. त्यासाठी जगण्याची एक विशिष्ट दिशा निवडणे याचाच अर्थ इतर वैकल्पिक गोष्टींचा पाठपुरावा करण्याच्या इच्छेला तिलांजली देणे होय. शेवटी महत्त्वाचं काय, तर दुसर्‍यावर प्रेम करण्याची हिंमत आपल्यामध्ये असेल, इतरांच्या आनंदात सहभागी होण्याइतका उमदेपणा असेल आणि सर्वाना सहजपणे पुरेल इतकी सुप्त समृद्धी आसमंतामध्ये आहे, हे समजण्याचं शहाणपणं असेल, तर आपण आपलं आयुष्य भरभरून जगलो, असं म्हणता येईल.’ दुग्ध उत्पादक शेतकरी आणि देशाला आपल्याजवळचं सारं काही भरभरून देणार्‍या डॉ. कुरियनच्या कर्तृत्व आणि विचारांना सलाम.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत)

भ्रमणध्वनी-8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top