बैठकीत गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या भाजपाच्या मंत्र्यांना सरसकट क्लीन चिट दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा झाली. ही क्लीन चिट त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दिली की पक्षनेता म्हणून, यावरही बराच ऊहापोह झाला. या गदारोळात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या समारोपीय भाषणाकडे दुर्लक्ष झालं. नरेंद्र मोदी व अमित शहा यांचं आज भाजपावर एकछत्री साम्राज्य असताना मोदींच्या कलाने भाजपा चालत नाही, हे जाहीरपणे सांगण्याची हिंमत गडकरींनी त्या भाषणात केली. ‘ही पार्टी ना कधी अटलजी-अडवाणींच्या मनाने चालली; मी पक्षाचा अध्यक्ष होतो, तेव्हा ना माझ्या मनाने चालली, ना ही पार्टी आता मोदी-शहांच्या कलाने चालत. या पक्षात कोणाच्या मनासारखे काहीही होत नाही, हे मी स्वानुभवावरून खात्रीने सांगतो,’ असे गडकरी बोललेत. ते रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. राजकीय परिणामांची फार चिंता न करता ते फटकेबाजी करीत असतात. मात्र, पुण्यातील त्यांचं भाषण हे फटकेबाजी प्रकारातलं नव्हतं; तर वास्तव होतं, हे भाजपातील जाणत्यांच्या लक्षात आलं असेल. भारतीय जनता पक्षावर संघाचं नियंत्रण असते, हे आता सार्यांनाच माहीत आहे आणि संघाची कार्यपद्धती काय आहे, हे गडकरींएवढं उत्तम फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे सत्तेच्या मस्तीत जास्त उडू नका. कधी पंख कापले जातील, याचा नेम नाही, असा इशाराच मोदी-शहांपासून तर इकडे एकनाथ खडसे, पकंजा मुंडे, विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी देऊन टाकला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटनबांधणी व कार्यपद्धती ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाने अभ्यास करावी, अशी आहे. माणूस व त्याच्या वैयक्तिक आकांक्षा याला किती महत्त्व द्यायचे, याबाबत त्यांच्या डोक्यात गोंधळ नाही. आधी देश, नंतर संघटन आणि शेवटी माणूस हे सूत्र संघपरिवारातील संघटनांच्या प्रत्येक बैठकीत, सभांमध्ये गिरवून घेतल्या जाते. संघ व भाजपाने आपल्या संघटनांची बांधणीच अशी केली आहे की, त्या-त्या काळात एखादा माणूस केंद्रस्थानी दिसतो. हीरो वाटतो. काही काळ यांच्यामुळे ही संघटना उभी आहे, असा आभासही होतो. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्ते व संघपरिवार त्यांच्यामागे जोपर्यंत उभे असतात, तोपर्यंतच त्याचं वलय टिकते. त्यामुळे संघाने फ्यूज काढला की, कितीही मोठा नेता असो, त्याची हवा निघून जाते. (ज्यांना संघाची कार्यपद्धती माहीत नाही ते मोदींना सर्वशक्तिमान मानतात. मात्र, आणखी पाच वर्षांनी मोदींचा अडवाणी झाला, तर काहीही आश्चर्य वाटायचं कारण नाही.) संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यकर्ता वा नेता हे एक साधन आहे. त्या-त्या परिस्थितीत कुठला माणूस कुठल्या कामासाठी योग्य आहे, हे ठरवून त्याला त्या दृष्टीने ‘प्रोजेक्ट’ करायचं काम संघपरिवार करतो. या प्रक्रियेत एखाद्याच्या डोक्यात हवा गेली की, त्याला अलगद जमिनीवर आणण्याचं कामही संघ हुशारीने करतो. संघाच्या या कार्यपद्धतीबद्दल अनेक विचारवंतांना, व्यक्तिस्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांना आक्षेप आहे. मात्र, संघाच्या संघटनबांधणीची कार्यपद्धती जोपर्यंत समजून घेत नाही; तोपर्यंत संघपरिवार हा देशभर कसा विस्तारला, हे समजून घेता येत नाही.
संघ-भाजपाच्या नेत्यांमधे मतभेद होत नाही, बंडखोरी होत नाही, अशातला भाग नाही. मात्र, इतर पक्ष-संघटनांतील नेते जसे बाहेर पडून आपली मुळं नव्याने रुजवू शकतात, तसे संघ-भाजपातून बाहेर पडलेल्यांबाबत फारच अभावाने होते. जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या बलराज मधोक यांनी संघाच्या जनसंघावरील वर्चस्वाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या कार्यपद्धतीबाबतही अप्रत्यक्ष नाराजी त्यांनी व्यक्त केली होती, तेव्हा काही काळातच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. गंमत म्हणजे अटलबिहारी वाजपेयी तेव्हा हार्ड कोअर संघवाले मानले जात. मधोक जरा जास्त उदारमतवादी आहे, अशी कुजबुज तेव्हा संघात असायची. संघाने हाकलल्यानंतर बलराज मधोक संपूर्ण आयुष्यात राजकीयदृष्ट्या उभे होऊ शकले नाहीत. (याच मधोकांनी अटलबिहारी वाजपेयी व नानाजी देशमुख यांनी दीनदयाल उपाध्याय यांचा खून केला होता, असा आरोप करून खळबळ उडवून दिली होती.) मधोक व दीनदयाल उपाध्याय यांच्यानंतर दीर्घ काळ अटलबिहारी वाजपेयी हे भाजपाचा चेहरा होते. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली एका र्मयादेपर्यंत यश मिळत नाही, हे लक्षात येताच रामजन्मभूमी आंदोलनाच्या निमित्ताने कट्टर हिंदुत्ववादी मानल्या जाणार्या लालकृष्ण अडवाणींना समोर आणण्यात आले. ९0 ते ९८ ही आठ वर्षे अटलजींना अडगळीत टाकण्यात आले होते. मात्र, पहिल्यांदा भाजपाची सत्ता आल्यानंतर या देशातील जनतेला करिष्माई नेतृत्व आवडते, हे लक्षात ठेवून अटलजींना पंतप्रधान करण्यात आले ही संघाची हुशारी.
थोडक्यात, जेव्हा ज्या माणसाची गरज आहे त्याला ‘प्रोजेक्ट’ करायचे. मात्र, त्याने संघटनेच्या विचारप्रवाहाविरुद्ध काही वेगळं मत व्यक्त केलं… वा स्वत:चं स्तोम माजविण्याचा प्रय▪केला की, त्याला दुधातल्या माशीसारखं काढून फेकायचं हे संघ-भाजपात बेमालूमपणे केल्या जाते. अडवाणींसारख्या दिग्गज नेत्याला याची प्रचिती आली आहे. जवळपास दोन दशके जो माणूस संघपरिवाराचा हीरो होता, त्या अडवाणींनी पाकिस्तानात औपचारिकता म्हणून जिनांची तारीफ केली आणि अडवाणींची पुण्याई एका क्षणात गंगेत वाहून गेली. ज्या भाजपात अडवाणींच्या इशार्याशिवाय पानही हलत नव्हतं, त्या अडवाणींना आपण एकाएकी निष्प्रभ कसं झालो, हे कळायला अनेक दिवस लागलेत. अशी अनेक उदाहरणं आहेत. रामजन्मभूमी आंदोलनाचा नायक म्हणून ज्यांचा गौरव झाला, ते कल्याणसिंह कसे अडगळीत फेकल्या गेलेत कोणाला पत्ताही लागला नाही. ज्या मुलायमसिंह यादवांची मुल्ला मुलायम म्हणून कल्याणसिंहानी संभावना केली होती, त्यांच्याच आश्रयाला जाण्याची पाळी त्यांच्यावर आली. मात्र, तिथेही काही खरं नाही, हे लक्षात येताच कल्याणसिंह निमूटपणे भाजपात परत आले. आता त्यांच्या एवढय़ा वर्षांच्या सेवेची पावती म्हणून त्यांची जयपूरच्या राजभवन या वृद्धाश्रमात सोय लावून देण्यात आली आहे. उमा भारती, येदियुरप्पांची हालत अशीच. बंडखोरी करून वेगळे दुकान त्यांनी थाटून पाहिले, पण जमत नाही, हे लक्षात येताच मुकाटपणे संघाच्या कळपात पुन्हा सामील झाले. महाराष्ट्रातही असे प्रयोग झाले आहेत. प्रमोद महाजनांच्या डोक्यात भरपूर मस्ती गेल्यानंतर नितीन गडकरींना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष करण्याचा प्रयोग महाजनांच्या हयातीतच झाला होता. गोपीनाथ मुंडेंना त्यांची जागा दाखविण्याचे काम वेळोवळी संघाने केले आहे. गडकरींना हा इतिहास चांगला माहीत आहे. रेशीमबागेपासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे भाजपातल्याच नाही, तर संघातल्या बंडखोरांची गत काय होते, हे ते चांगले जाणून आहेत. म्हणूनच भाजपा हा मोदी आणि शहांच्याही मताने चालत नाही, हे वास्तव त्यांनी सांगितले. शहाण्या भाजपा नेत्यांनी ते समजून घ्यायचं. कारण पुण्यात गडकरींच्या तोंडातून संघानेच इशारा दिला आहे.
गडकरींचा संघीय इशारा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती काय आहे, हे गडकरींएवढं उत्तम फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे सत्तेच्या मस्तीत हवेत उडू नका. कधी पंख कापले जातील, याचा नेम नाही, असा इशाराच नरेंद्र मोदी, अमित शहांपासून तर इकडे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडेंपर्यंत सगळ्यांना त्यांनी देऊन टाकला. एका अर्थाने हा संघाचाच इशारा आहे.
.………………………………………………………………………………………………………….
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या
Enlightened once again
chan ani kare aahe