|
|
सरलेला आठवडा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शक्तीप्रदर्शनाने गाजला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, त्यांची लाडकी लेक सुप्रिया सुळे, बडे बेआबरू ..होऊन पुन्हा राज्य मंत्रिमंडळात आलेले अजित पवार, छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे असे राष्ट्रवादीचे सारे हेवीवेट नेते महिला मेळाव्याच्या निमित्ताने अमरावतीत आले होते. हे जसे राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन होते तसेच ते संजय व सुलभा खोडके या दाम्पत्याचेही शक्तीप्रदर्शन होते. त्यात ते शंभर टक्के यशस्वी ठरले. तसंही उत्तम आयोजन करण्यात आणि गर्दी जमविण्यात संजय खोडकेंचा हातखंडा आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार प्रथमच अमरावतीत येत असल्याने त्यांच्यासमोर आपली ताकद दाखविण्याची संधी खोडके सोडणार नव्हतेच.
खोडकेंचं काही गोष्टींबाबत कौतुक केलंच पाहिजे. विधानसभेतील पराभवानंतरचे काही महिने सोडलेत, तर काही घडलंच नाही या पद्धतीने हे दोघेही नवरा-बायको पूर्वीसारखेच काम करत आहेत. त्यांचा जनसंपर्क, कामातील तन्मयता, आत्मविश्वास हे विस्मयजनकच आहे. या दोघांकडे पाहून ते आमदार नाहीत, हे लक्षातच येत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही मानलं पाहिजे. खोडके पराभूत झाले म्हणून त्यांनी यांना दुर्लक्षित केल्याचं कधी पाहावयास मिळालं नाही. अजूनही पूर्वीसारखाच मान ते खोडकेंना देतात. अमरावती जिल्ह्यात खोडके म्हणेल, तसंच ते करतात. खोडकेंना सर्वार्थाने ताकद देतात. अर्थात खोडकेंची पूर्वपुण्याईही याला कारणीभूत आहे. शरद पवारांसहित राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांसोबत त्यांचे जे ऋणानुबंध आहेत, ते त्यांच्या कामी पडत आहेत.
संजय खोडके तुम्हाला आवडो की न आवडो, या माणसाचे काही गुण तुम्हाला कबूल करावेच लागतात. अमरावतीत सध्याच्या पिढीतला सर्वाधिक मेहनत करणारा हा नेता आहे. आठवडय़ातील पाच दिवस ते मुंबईत असले तरी त्यांचं सारं लक्ष अमरावतीतच असतं. त्यांच्याइतकी लोकांची वैयक्तिक काम करणारा दुसरा नेता आज नाही. शरद पवारांचा 24 तास राजकारण करण्याचा गुण त्यांनी घेतला आहे. (त्याचा काहीवेळा अतिरेक होतो आणि कारण नसताना माणसं दुष्मन होतात, हा भाग वेगळा.) राजकारणाबाहेर वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांशी स्नेहबंध जोपासण्यालाही ते कायम प्राधान्य देतात. मीडियातील टीका-टीपणी तटस्थपणे घेण्याची जाण अमरावतीत केवळ दोन – चार नेत्यांना आहे, त्यातही ते अग्रस्थानावर आहेत. (बाकीचे एक तर मनात अढी बाळगून बसतात वा पैशाने खरेदी करू इच्छितात.) राजकारणात त्यातही राष्ट्रवादीच्या राजकारणातील पैशाचं महत्वही ते चांगलं जाणतात. आजच्या घडीला अमरावती जिल्ह्यात त्यांचाइतका पैसा दुसरा कुठल्याही पक्षाचा नेता खर्च करत नाही. त्यांच्या या सगळ्या क्षमतेमुळेच राष्ट्रवादीचं अमरावती जिल्ह्याचं नेतृत्व निर्विवादपणे त्यांच्याकडे आलं आहे. सुरेखाताई ठाकरे कितीही डोकं काढण्याचा प्रयत्न करत असल्या तरी पारडय़ात त्या कुठेच बसत नाही, हे वास्तव आहे. हर्षवर्धन देशमुख व राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील इतर नेत्यांचीही गत अशीच आहे.
अर्थात हे असं जरी असलं तरी खोडकेंसाठी पुढची वाट एकदम सोपी आहे, असं अजिबात नाही. 2009 च्या पराभवानंतर त्यांनी काही गोष्टी दुरूस्त करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. मात्र तरी पुन्हा ते बडनेरा जिंकतीलच हे खात्रीशीरपणे सांगता येत नाही. खोडकेंचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की, त्यांना माणसं कळत नाही. अनेक चुकीची माणसं त्यांच्या नजीकच्या वतरुळात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे कार्यकर्ते त्यांच्यासमोर मोकळेपणाने व्यक्त होत नाही. अगदी त्यांचा कोअर ग्रुपही त्यांना घाबरतो. यामुळे नेमका फिडबॅक त्यांना मिळत नाही. व्यवस्थित चाललं आहे..सब ठीक चल रहा भाऊ, या नादात मागच्यावेळी त्यांचा गेम झाला. पुन्हा असं होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. कारण नसतांना नवीन विरोधक निर्माण होणार नाही, याकडे सुद्धा त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. कुठलातरी हेतू बाळगून डोक्यावर चढविणारे कोण आणि मनापासून आपलं हित पाहणारं कोणं, हे त्यांना ओळखता आलं पाहिजे. 2014 मध्ये रवी राणांसोबतच संजय बंडही रिंगणात राहिलं, याची चिन्हं दिसायला लागली आहेत. त्या परिस्थितीत मुकाबला आणखी गुंतागुंतीचा होणार आहे. हे महिला मेळाव्याचं भव्य यश वगैरे ठीक आहे. याने उत्साह वाढण्यात मदत होईल. पण राजकारणात निवडणुकीतील यशापेक्षा दुसरं महत्वाचं काहीही नसतं. खोडकेंना हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे 2014 ला बडनेरा जिंकण्यात अपयश आलं, तर आपण कुठेच उरणार नाही, हे भान ठेवून पुढची पावलं त्यांना टाकावी लागणारं आहे.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक आहेत) |