क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते

क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीचे चुंबकीय नाते

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व नामवंत सिनेअभिनेत्री अनुष्का यांच्या प्रेमप्रकरणाची सध्या जोरात चर्चा आहे. अनुष्का ही कुठल्याही भारतीय क्रिकेटपटूची पहिली अशी प्रेयसी आहे की, जिला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अधिकृतपणे क्रिकेटपटू प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. गेल्या उन्हाळ्यातील इंग्लंडच्या दौर्‍यातही अनुष्का विराटसोबत होती. त्या दौर्‍यात विराट अपयशी झाल्याने त्याचे खापर त्यांच्या प्रेमप्रकरणावर फोडण्यात आले होते. मात्र सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुष्का सोबत असूनही विराट खणखणीत कामगिरी करत आहे. प्रेमामुळे, प्रेयसीमुळे कामगिरी खालावते या भारतीय मानसिकतेला विराटने चोख उत्तर दिले आहे.


 परदेशात वेगवेगळ्या प्रकारातील क्रीडापटू खुलेआम आपापल्या प्रेयसींना घेऊन दौर्‍यावर जातात. भारतीय दौर्‍यावर येणारे ऑस्ट्रेलियन, इंग्लंड, आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडीजचे क्रिकेटरही आपल्या प्रेयसींना घेऊन भारतात येत असतात. बंद दरवाज्याआड वाटेल ते करणार्‍या मात्र बाहेर सोवळं मिरवणार्‍या भारतीयांना प्रेयसीला दौर्‍यावर वगैरे घेऊन जाणं महापातक वाटत होतं.त्यात स्त्री सर्व पापाचे मूळ, स्त्री पुरुषाची कमजोरी असे येथील परंपरावाद्यांनी सातत्याने सांगितले असल्याने प्रेयसी वा पत्नींमुळे क्रिकेटपटू खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, अशी बहुतेकांची समजूत होती. या सर्व परंपरा, समजुती विराटने मोडीत काढल्यात, ते बरं झालं.

विराट आणि अनुष्का लग्नबंधनात अडकणार का याकडे आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. इतिहास असा आहे की, क्रिकेटर आणि सिनेअभिनेत्रींच्या प्रेमप्रकरणाची लांबलचक यादी असली तरी त्यापैकी फारच कमी प्रकरणं लग्नाच्या बोहल्यापर्यंत जातात. क्रिकेटर आणि अभिनेत्रीचं पहिलं यशस्वी प्रेमप्रकरण होतं ते म्हणजे भारताचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांचं. मन्सूर अली खान हा पतौडीच्या नवाबाचा वारस होता. प्रचंड संपत्तीचा मालक असलेला मन्सूर देखणा व राजबिंडा होता. दुसरीकडे शर्मिला टागोर ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची नात. १९६५ मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पतौडीने तिला पाहिले आणि प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडला. त्यानंतर तिचे मन जिंकण्यासाठी त्याने जोरदार प्रय▪केले. तेव्हा त्याने तिच्याकडे भेटीदाखल रेफ्रिजरेटर पाठविला होता. मात्र बराच काळ शर्मिलाने त्याला दाद दिली नाही. पतौडीने जिद्द सोडली नाही. तो रोज तिच्याकडे गुलाबाचे पुष्पगुच्छ आणि निरनिराळ्या भेटवस्तू पाठवीत होता. शेवटी दोन वर्षांच्या अनुनयानंतर शर्मिलाने त्याला होकार दिला. १९६७ मध्ये त्यांचे लग्न झाले. याचदरम्यान वेस्ट इंडीजचा महान क्रिकेट खेळाडू गॅरी सोबर्स आणि भारतीय अभिनेत्री अंजू महेंद्र यांची प्रेमकहाणीही गाजली. आजची पिढी अंजू महेंद्रला फार ओळखत नसली तरी ७0 च्या दशकात तिचा माहौल होता. तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्नासोबत तिचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र डिंपल कपाडियाच्या आगमनाने त्यांच्यात बिनसले. त्याचदरम्यान ती गॅरी सोबर्सच्या संपर्कात आली. १९६७ च्या भारत दौर्‍यात ते चांगलेच जवळ आले. सोबर्स आणि ती लग्न करणार अशा बातम्याही छापून आल्यात. सोबर्सने तिला एंगेजमेंट रिंगही दिली होती. मात्र दौरा संपताच त्यांच्या प्रेमाचे रंग उडायला लागले. त्यानंतर दोनेक वर्ष सोबर्स तिला भेटायला भारतात येत होता. मात्र त्याच्या सततच्या व्यस्ततेने लवकरच हे प्रकरण संपलं. पुढे सोबर्सने एका ब्रिटिश तरुणीसोबत लग्न केले. अंजू महेंद्र मात्र अजूनही अविवाहित आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेटपटूसोबत भारतीय अभिनेत्रीचं आणखी एक गाजलेलं प्रकरण म्हणजे ऑल टाईम ग्रेट क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा विव्ह रिचर्ड्स व निना गुप्ता यांची प्रेमकहाणी. हे एक वादळी प्रकरण होतं. १९८३ च्या भारत दौर्‍यात यांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. तेव्हा रिचर्ड्स हा विवाहित होता. तरीही या दोघांनीही उघडपणे आपल्या संबंधांची कबुली दिली होती. मात्र हे प्रकरण फार काळ चाललं नाही. दरम्यान, रिचर्ड्सपासून निना गुप्ताला गर्भधारणा झाली होती. निनाने कुठलीही लपवाछपवी न करता अपत्याला जन्म दिला. मुलीचं नाव मसाबा ठेवलं. वडिलाचं नाव म्हणून तिने विव्ह रिचर्ड्स याचेच नाव दिलं. ही मसाबा आता नामांकित फॅशन डिझायनर आहे. निना गुप्ताने नंतर लग्न केले नाही. रिचर्ड्स अजूनही भारतात आला की, निना आणि मसाबा यांना न चुकता भेटतो. पाकिस्तानचा क्रिकेटपटू आणि आता ‘तहेरीक ए इन्साफ’ या राजकीय पक्षाचा प्रमुख असलेला इम्रान खान आणि एकेकाळची हॉट अभिनेत्री झीनत अमान यांचं प्रेमप्रकरणही १९८0 च्या दशकात भरपूर गाजलं. हे दोघेही देखणे व सेक्सी होते. दोघे लग्न करणार अशी चर्चा त्यावेळी जोरात होती. मात्र लवकरच हे प्रकरण संपलं. झीनतने पुढे मजहर खानशी लग्न केलं. इम्रान खानने भरपूर प्रेमप्रकरणं करत इंग्लंडच्या उमराव घराण्यातील जेमिमा गोल्डस्मिथ हिच्याशी लग्न केलं. आठ दहा वर्षांनंतर ते लग्न तुटलं. नुकतंच त्याने वयाच्या ६१ व्या वर्षी लंडनमधील पाकिस्तानी वंशाच्या रेहाना खान या टीव्हीवरील वृत्त निवेदिकेशी दुसरं लग्न केलं आहे. झीनतचं पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत लग्न झालं नाही. मात्र रिना रॉयने या अभिनेत्रीने मोहसीन खान या पाकिस्तानच्या सलामीच्या फलंदाजासोबत १९८३ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही घरून विरोध होता. लग्नानंतर हे दोघेही काही वर्ष पाकिस्तानात होते. मात्र लग्नानंतर मोहसीनच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यामुळे ते भारतात परत आले. मोहसीनने मग रिनाच्या सल्ल्याने हिंदी चित्रपटात नशीब आजमावले. ‘जन्नत’, ‘लाटसाब’, ‘साथी’, ‘गुनेहगार कौन’, ‘फतेह’ आदी हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले. मात्र त्याला चित्रपट रसिकांनी स्वीकारले नाही. तोपर्यंत त्यांच्या संसाराचेही रंग उतरले होते. परिणामी त्यांच्यात घटस्फोट झाला. आता मोहसीन पाकिस्तानात आहे. रिना मुंबईत मुलगी जन्नतसोबत राहते.

त्याच काळात गाजलेली आणखी एक लव्ह स्टोरी म्हणजे सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाचे संचालक रवी शास्त्री व ‘बेताब’ गर्ल अमृता सिंग यांची. अमृता रवी शास्त्रीसोबत लग्न करणार असे खात्रीने सांगणार्‍यांची संख्या त्यावेळी कमी नव्हती. रवी व अमृताने आपल्यातील प्रेमसंबंधांची तेव्हा जाहीर कबुलीही दिली होती. मात्र काही काळातच दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या.रवी शास्त्रीने रितू सिंग या तरुणीसोबत लग्न केले. अमृता सैफसोबत विवाहबद्ध झाली. पुढे सैफने तिला घटस्फोट दिला. नंतर त्याने करिना कपूरसोबत लग्न केले. आता अमृता मुलांसोबत राहते. रवी शास्त्रीनंतर अझरुद्दीन व संगीता बिजलानी या दोघातील प्रेमप्रकरणही क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्रीत भरपूर गाजलं. १९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा अतिशय लाजाळू असलेला अझर ‘स्टार’ झाल्याबरोबर एकदम बदलला. त्याने नौरिन या आपल्या देखण्या पत्नीला तलाक देऊन संगीता बिजलानीसोबत विवाह केला. तोपर्यंत संगीताचे सलमान खानसह दोघातिघांसोबत प्रेमप्रकरणं पार पडली होती. त्यांच्या लग्नाला आता १९ वर्ष होत आहे. मध्यंतरी या दोघात मतभेद झाले आहेत. अझर बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाच्या प्रेमात पडला आहे, अशा बातम्या होत्या. मात्र सध्या तरी हे लग्न टिकून आहे. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिलदेव हेही काही काळ अभिनेत्रींच्या प्रेमजाळ्यात अडकले होते. गावस्करचे नाव लिना चंदावरकरसोबत जोडले गेले होते. कपिलदेव सारिकाच्या प्रेमात होता. मात्र हे दोन्ही प्रकरणं जास्त काळ चालले नाहीत. सध्याच्या भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही अभिनेत्रीसोबत प्रेमरंग उधळले आहेत. बंगाली अभिनेत्री देवश्री रॉय हिच्यासोबतच्या त्यांच्या प्रेमप्रकरणाने त्याकाळी वर्तमानपत्रांमध्ये भरपूर जागा घेतली होती. माजी कर्णधार सौरभ गांगुलीही काही काळ नगमाच्या प्रेमात होता. त्यामुळे त्याची पत्नी डोनासोबत त्यांचे गंभीर मतभेद झाले होते.

क्रिकेटपटूंच्या सध्याच्या पिढीत केवळ विराट कोहलीचंच अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण सुरू आहे, अशातला भाग नाही. भारताला एक दिवसीय व टी-२0 मध्ये विश्‍वविजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनीही याला अपवाद नाही. २00८ मध्ये एका टी-२0 सामन्यासाठी दीपिका पदुकोनला त्याने खास पाहुणी म्हणून आमंत्रित केलं होतं तेव्हा त्यांच्यात काहीतरी सुरू आहे, अशी कुजबूज सुरू झाली होती. त्यानंतर लक्ष्मी नावाच्या दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबतही त्याचे अफेअर होते, असे सांगितले जाते. मात्र त्याने लग्न मात्र आपली बालपणाची मैत्रीण साक्षीसोबतच केलं. इकडे धोनीनंतर दीपिका युवराज सिंगच्या प्रेमात पडली. आज विराट आणि अनुष्काचं प्रकरण जसं गाजत आहे, तसाच प्रकार २00८ मध्ये युवराज आणि दीपिकाबाबत होता. दीपिका तेव्हा त्याला भेटायला ऑस्ट्रेलियाला गेली होती. मात्र लवकरच हे प्रकरण संपलं. युवराज आणि दीपिका दोघांनाही प्रत्येक काही महिन्यानंतर नवीन व्यक्तीच्या प्रेमात पडण्याची खोड आहे. युवराजनंतर दीपिकाने रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्लासोबत काही महिने घालविले. सध्या ती रणवीर कपूरसोबत फिरते आहे. दीपिकासोबतच्या प्रकरणानंतर युवराज किम शर्मा या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. हे दोघे लग्न करणार अशी चर्चा होती. मात्र युवराज सिरियस नाही हे लक्षात येताच केनियन उद्योगपती अली पंजाबीसोबत लग्न करून किम मोकळी झाली. वसीम अक्रम- सुश्मिता सेन, हरभजनसिंग-गीता बसरा, जहीर खान-ईशा शर्वानी, श्रीशांत-रिया सेन या प्रकरणांचीही भरपूर चर्चा झाली. क्रिकेट आणि सिनेइंडस्ट्री हे दोन्ही ग्लॅमरस क्षेत्र आहेत. स्वाभाविकच चुंबकाप्रमाणे क्रिकेटर आणि अभिनेत्री एकमेकांकडे ओढले जातात. त्यामुळे ही अशी प्रेमप्रकरणं चालत राहणार आहे.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Scroll to Top