काँग्रेसला शहाणपणा येण्याची शक्यता नाही

इतिहास व वर्तमानाची नेमकी जाण असलेले ख्यातनाम

 इतिहासकार व लेखक रामचंद्र गुहा यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या स्थितीचं नेमकं वर्णन केलं होतं. ”इंदिरा गांधींनी १९७५ नंतर काँग्रेस पक्षाचे रूपांतर एका कुटुंबाच्या दुकानात केले, तेव्हापासून काँग्रेसमध्ये मानसिक परावलंबनाची संस्कृती निर्माण झाली. या घराण्याशिवाय आपला पक्ष जिवंत राहू शकत नाही, असे पक्षाच्या इतर नेते व कार्यकर्त्यांना वाटायला लागले. तेथूनच काँग्रेसचे पतन सुरू झाले,” असे रोखठोकपणे सांगताना गुहा यांनी काँग्रेसच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले होते. काँग्रेस पक्ष निवडणुकीतील यशासाठी एवढय़ा दयनीयपणे गांधी-नेहरू कुटुंबावर का अवलंबून असतो? तो पक्ष गांधी-नेहरूंना विसरून का जाऊ शकत नाही? असे प्रश्नही गुहांनी उपस्थित केले होते. मात्र काँग्रेस याबाबत काही विचार करेल, याची शक्यता फारच कमी आहे.

………………………………………………………………………………………………….
   आसाम,पश्चिम बंगाल, केरळ, पुडुचेरी व तामिळनाडू या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेत. तामिळनाडूचा थोडाफार अपवाद वगळता बहुतांश एक्झिट पोलचे अंदाजही बरोबर निघालेत. या निकालानंतर पुन्हा एकदा काँग्रेसमुक्त भारताची चर्चा सुरू झाली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या निकालामुळे काँग्रेसमुक्त भारताच्या वाटचालीत आणखी दोन पावलं पुढे पडली, अशी प्रतिक्रिया दिली. ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही भाजपाची लोकसभा निवडणुकीतील घोषणा असली आणि त्यामागचा उद्देश काँग्रेसला खिजवणे असा असला तरी काँग्रेसची सध्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे, हे काँग्रेसचा कट्टर सर्मथकही अमान्य करणार नाही. आता कर्नाटक हे एकमेव मोठं राज्य आणि हिमाचल, उत्तरांचल, मेघालय, मणिपूर, मिझोराम अशी पाच छोटी राज्य काँग्रेसजवळ आहेत. काँग्रेसचा कारभार ज्या पद्धतीने चालला आहे ते पाहता या स्थितीत नजीकच्या काळात सुधारणा होण्याची कुठलीही चिन्हं दिसत नाही. उज्ज्वल इतिहास आणि समृद्ध परंपरा असलेल्या काँग्रेसचा र्‍हास होणं हे लोकशाहीसाठी चिंताजनक असलं तरी काँग्रेसचं नेतृत्व आणि त्यांची कार्यपद्धती आजच्या स्थितीला जबाबदार आहे. त्यामुळे त्यासाठी ऊर बडविण्यात अर्थ नाही. 
    एखादा मृत्यूकडे वाटचाल करत असलेला रुग्ण एकाएकी मरत नाही. फार पूर्वीपासून त्याची लक्षणं जाणवायला सुरुवात होते. काँग्रेसच्या विषयातही हे लागू पडते. २00४ ते २0१४ ही दहा वर्षे केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार असल्याने ही लक्षणं ठळकपणे दिसत नव्हती. मात्र याची सुरुवात केव्हाचीच झाली होती. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपासून याची सुरुवात झाली. १९९१ च्या निवडणुकीदरम्यान राजीव गांधींची हत्या झाली होती. असे असतानाही त्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळविण्यात अपयश आले होते. तेव्हापासून २00९ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस एकाही लोकसभा निवडणुकीत १५0 जागाही मिळवू शकला नाही. मधल्या काळात प्रादेशिक पक्षांच्या साथीने त्यांनी कशीबशी सत्ता राखली. गेल्या निवडणुकीत तर काँग्रेसने नीचांक गाठला. राज्यांच्या पातळीवर विचार केला तर देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात गेल्या ३0 वर्षांपासून काँग्रेसला सत्ता मिळविता आली नाही. सत्ता जाऊ द्या, काँग्रेस तिथे दुसर्‍या-तिसर्‍या क्रमांकावरही नाही. लगतच्याच बिहारमध्येही १९९0 पासूनच काँग्रेस कुठेच नाही. तिथेही तिसरा-चौथा क्रमांकच असतो. पश्‍चिम बंगालमध्ये १९७७ पासून काँग्रेसचं नामोनिशाण नाही. आधी कम्युनिस्ट पक्ष आणि आता ममता बॅनर्जी त्यांना डोकं वर काढू देत नाही. दक्षिणोत तामिळनाडूत १९६९ पासूनच काँग्रेसला भुईसपाट करून टाकण्यात आलं आहे. तिथे आलटून पालटून कधी अण्णा द्रमुक (जयललिता) तर कधी द्रमुक (करुणानिधी) असा खेळ सुरू असतो. गुजरातमध्ये १९९५ पासून केवळ भाजपा आहे. ओडिशात २000 पासून बिजू जनता दलाच्या नवीन पटनायकांचंच राज्य आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्ये २00३ पासून काँग्रेसविरोधी बाकावरच आहे. नाही म्हणायला राजस्थान, आंधप्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल प्रदेश, केरळमध्ये काँग्रेसला अधूनमधून सत्ता मिळाली आहे. मिळते आहे. मात्र एकंदरीत गेल्या २५ वर्षांतील काँग्रेसचा आलेख हा घसरताच आहे. ही घसरण या निवडणुकीने आणखी तीव्र केली आहे.
    इतिहास व वर्तमानाची नेमकी जाण असलेले ख्यातनाम लेखक रामचंद्र गुहा यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या या स्थितीचं नेमकं वर्णन केलं होतं. त्यांनी गेल्या तीन दशकांतील काँग्रेसच्या अवनीतीचं विश्लेषण करताना काँग्रेस पक्ष निवडणुकीतील यशासाठी एवढय़ा दयनीयपणे गांधी-नेहरू कुटुंबावर का अवलंबून असतो? तो पक्ष गांधी-नेहरूंना विसरून का जाऊ शकत नाही? असे प्रश्न उपस्थित केले होते. गांधी-नेहरू कुटुंबाचा करिष्मा आता ओसरतो आहे, हे स्पष्टपणे नमूद करताना ”मतदार जसजसा अधिक तरुण होतो आहे तसे जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी काय केले होते किंवा इंदिरा गांधींनी देशासाठी कसे बलिदान दिले, याच्याशी त्याला फार देणेघेणे नाही. तरुण पिढीला वारसा-वंशावळचे फार अप्रूप उरले नाही,” असे गुहांनी रोखठोकपणे सांगितले होते. ”इंदिरा गांधींनी १९७५ नंतर काँग्रेस पक्षाचे रूपांतर एका कुटुंबाच्या दुकानात केले, तेव्हापासून काँग्रेसमध्ये मानसिक परावलंबनाची संस्कृती निर्माण झाली. या घराण्याशिवाय आपला पक्ष जिवंत राहू शकत नाही, असे पक्षाच्या इतर नेते व कार्यकर्त्यांना वाटायला लागले. तेथूनच काँग्रेसचे पतन सुरू झाले.” रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसच्या नेमक्या दुखण्यावर बोट ठेवले आहे. मात्र अशा विश्लेषणाचा काँग्रेसवर काहीही फरक पडत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांनी काँग्रेस इतिहासजमा झाली, तर आश्‍चर्य वाटायचे काही कारण नाही. 
   अर्थात, देश काँग्रेसमुक्त होण्याकडे वाटचाल करत असताना तो भाजपयुक्त होत आहे का? त्याचे उत्तर अद्याप तरी ‘नाही’ असे आहे. भाजप विस्तारत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचा जनाधार वाढत आहे. मात्र एकेकाळच्या काँग्रेसप्रमाणे देशव्यापी होण्यासाठी भाजपाला अद्यापही भरपूर पापड बेलावे लागणार आहेत. तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओरिसा, बंगाल, बिहार या मोठय़ा राज्यांमध्ये आणखी अनेक वर्षे स्वबळावर सत्ता मिळविण्याचं स्वप्न भाजपा पाहू शकत नाही, अशी स्थिती आहे. केंद्रातही आज जेवढय़ा जागा भाजपाला मिळाल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत ते कायम ठेवू शकतील याबाबत शंका आहे. अलीकडच्या काळात भाजपा राजकीय समीकरणं उत्तमपणे जुळवीत असल्याने त्यांना राजकीय यश मिळते आहे. आसाममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या यशात सिंहाचा वाटा असला तरी व्यवहारात ‘आसाम गण परिषद व बोडो पीपल फ्रंट’ यांना सोबत घेतल्याचा त्यांना मोठा फायदा झाला. काश्मिरात ‘पीडीएफ’सोबत भाजपाची युती होईल, असे काही वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते, तर त्याला लोकांनी वेड्यात काढले असते. पण आपले सारे पारंपरिक आग्रह बाजूला ठेवून भाजपाने तेथे सोयरीक जुळविली. महाराष्ट्रातही भाजपाच्या १२२ आमदारांपैकी ५३ आमदार ऐन निवडणुकीच्या वेळी अन्य पक्षातून आले आहेत. भाजपाची ही लवचीकता त्यांना यश मिळवून देत आहे. सत्तेच्या राजकारणासाठी का होईना भाजपा व्यापक होत असेल आणि आपल्या मातृसंस्थेच्या संकुचित, विषमतावादी विचारांना बाजूला ठेवण्याची तयारी दाखवत असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. भारतीय जनता पक्ष अलीकडच्या काळात जे राजकीय यश मिळवत आहे त्यात तडजोडी आणि लवचीकतेसोबतच त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा मोठा वाटा आहे. यश-अपयशाची पर्वा न करता भाजपा आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे भाजपा विस्तारत आहे. काँग्रेस अजूनही गांधी-नेहरू कुटुंबाच्या पूर्वपुण्याईच्या भरवशावर यशाची अपेक्षा करत असताना भाजपा मेहनत, नियोजनआणि लवचिकतेच्या  जोरावर यशस्वी होत आहे. भाजपा विचाराने पारंपरिक असला तरी  निवडणुकीच्या राजकारणाच्या विषयात कृतीतून तो रॅशनल आहे, हा याचा अर्थ आहे.
   चार राज्यांच्या निवडणूक निकालातून काही गोष्टी अतिशय स्पष्टपणे समोर आल्या आहेत. देशातील मतदारांचा काँग्रेसबद्दल प्रचंड भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसच्या एवढय़ा वर्षांच्या कारभाराबद्दल जनता त्यांना माफ करायला तयार नाही, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेससोबत एवढी वर्षे दलित, आदिवासी आणि मुसलमान हा जो पारंपरिक मतदार होता त्यांनी काँग्रेसला पर्याय शोधला आहे. काँग्रेसला तोड म्हणून त्यांनी प्रादेशिक पक्षांचा हात धरला आहे. जे प्रादेशिक पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा करतात त्यांच्याकडे दलित, अल्पसंख्याक व आदिवासींचा ओढा वाढतो आहे. तृणमूल काँग्रेस व जयललितांना मिळालेल्या विजयातून ही बाब स्पष्ट होते. तृणमूल काँग्रेस व अण्णा द्रमुकची याअगोदरची कारकीर्द भ्रष्ट कारभाराने गाजली असतानाही या घटकांनी त्यांना मोठय़ा प्रमाणात मतदान केल्याने त्यांना पुन्हा सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे. तिसरी गोष्ट म्हणजे केंद्रात अनेक राज्यांमध्ये भाजपा सत्तेत असली तरी देशाच्या अनेक भागात अजूनही मतदार भाजपाबद्दल तिटकारा बाळगून आहे. भाजपाबद्दल तेथील लोकांना अजिबात आपलेपणा वाटत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. देशाची सत्ता आणखी काही बरीच वर्षे आपल्याजवळ ठेवण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या भाजपासाठी हा इशारा आहे. एकंदरीत चार राज्यांच्या निवडणूक निकालाने आगामी काळात देशाचं राजकारण चांगलंच रंगतदार होणार याचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top