…………………………………………………………………………………………………………………………………………..
आपल्याकडे ब्राह्मणांच्या सनातनी सोवळ्या वृत्तीची
कठोर चिकित्सा होते. मराठय़ांच्या कट्टर जातीयवादावर प्रहार केले जातात. अस्मितेच्या नावाखाली दलित समाज जोपासत असलेल्या जातीयतेचीही खुलेआम चर्चा होते. मुस्लिमांचा धर्मवेडेपणा तर सर्वांच्याच टीकेचा विषय असतो. मात्र समाजात बहुसंख्य असलेल्या ओबीसींमधील जातीय आणि धार्मिक पिळाबाबत क्वचितच चर्चा होते. अठरापगड जाती व इतरही अनेक छोट्या-मोठय़ा जातींचा समावेश असलेल्या ओबीसींची जीवनशैली, त्यांच्या परंपरा, त्यांची दैवतं, त्यांचे अभिमानाचे, आस्थेचे, अस्मितेचे विषय याबाबत अपवादात्मक झालेला अभ्यास सोडला, तर फार गांभीर्याने कधी विचार झाला नाही. इतिहासात डोकावलं तर आपला काम-धंदा तेवढा व्यवस्थित करायचा यात ओबीसींनी समाधान मानलं आहे. सत्ता किंवा व्यवस्थेची सूत्रे आपल्या हाती आली पाहिजेत, ही आकांक्षा त्यांनी कधी बाळगली नाही. अलीकडच्या काही वर्षात ओबीसींमधील काही जातींमध्ये आपल्या हक्काबाबत जागरुकता निर्माण झाली असली तरी आपापल्या जातीचे मेळावे आयोजित करण्यापुरती ती मर्यादित आहे . समाजव्यवस्थेत निर्णायक संख्येने असलेल्या या घटकाला आपल्या निर्णायकतेचं भान अद्यापही आलं नाही. समाजशास्त्र अभ्यासकांच्या मते हा घटक अनुकरणप्रिय आहे. समाजातील ज्या प्रभावी आणि उच्च जाती आहेत त्या जातींची संस्कृती, प्रथा-परंपरा, चालीरिती, देव-दैवतं, सण-उत्सवांच अनुकरण ओबीसींनी केलं आहे. हे करताना उच्च जातींची टोकदार अस्मिता व धार्मिक-जातीय कडवेपणापासून हा समाज आतापर्यंत संपूर्णत: नाही तरी बर्यापैकी दूर राहिला होता. धर्म हा वैयक्तिक आस्थेचा विषय असतो. त्यातून उन्माद निर्माण करायचा नसतो. डोकी भडकवायची नसतात, हे भान नकळतपणे या समाजाच्या वागणुकीतून दिसत असे. गेल्या काही वर्षात मात्र हे चित्र बदलताना दिसतंय. अलीकडे घडलेल्या-घडविलेल्या अनेक घटनांबाबत हा समाज ज्या आक्रमकतेने क्रिया-प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतो त्यावरुन ओबीसींमधल्या मोठय़ा घटकाला ‘गर्व से कहो हम हिंदू है… ‘ची लागण झाली आहे, हे स्पष्ट दिसते आहे.
जरा बारकाईने विचार केला तर संघ-भाजपा परिवाराच्या रामजन्मभूमी आंदोलनापासून ओबीसी कट्टर होण्यास सुरुवात झाली. तेव्हा ओबीसीतील अनेक जाती-जमातीचे तरुण डोक्याला भगवी पट्टी बांधून मंदिर वही बनायेगे.. चे नारे देत रस्त्यावर उतरले होते. अयोध्येत जे मारले गेलेत त्यातही त्यांचा समावेश होता. अयोध्येत राम मंदिर बांधल्याने आपलं आयुष्य कसं बदलेल किंवा देशाचं भवितव्य कसं उज्वल होईल याबद्दल काहीही माहिती नसलेले ओबीसी तरुण संघ परिवाराच्या जाळ्यात तेव्हापासून अलगद अडकलेत. पुरोगाम्यांना काही वाटो, याविषयात संघ परिवाराला शंभर टक्के मार्क दिले पाहिजेत. समाजात बहुसंख्य असलेल्या ओबीसींच्या डोक्यात धर्मवेडेपण, अस्मितेचे विषय घुसवलेत, तर आपलं हिंदू राष्ट्राचं स्वप्न साकार होऊ शकते, हे त्यांनी बरोबर हेरलं. ओबीसींचं आज जे कट्टर हिंदूकरण होताना दिसते आहे, ती एका योजनाबद्ध प्रयत्नांची फलश्रृती आहे. २५ वर्षापूर्वी जेव्हा देशातील प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक संस्था संघटनांमध्ये उच्चवर्णीय जातींचं वर्चस्व होतं, त्यावेळी संघ परिवाराने ओबीसी कार्डाचा वापर करणं सुरु केला. सत्तेची कधीही चव न चाखलेल्या या समाजाला सत्तेत सहभाग देऊन सत्तेची चटक लावली. (वसंतराव भागवतांच्या संकल्पनेतला महाराष्ट्रातला माधव (माळी, धनगर, वंजारी) प्रयोग याच प्रयत्नांचा भाग होता.) त्याचवेळी संघ परिवारातील संघटनांमध्ये त्यांना महत्वाची पदं देण्यास सुरुवात झाली. हे करताना ओबीसींसाठी कधीही महत्वाचे विषय नसलेले राम मंदिर, गोहत्या बंदी, गंगा नदी शुद्धीकरण, मुस्लिम द्वेष असे अनेक विषय सातत्याने त्यांच्या डोक्यात पेरणे सुरु झाले. देशभक्ती-राष्ट्रवादाच्या भ्रामक कल्पनांचाही मारा सुरु झाला. इतिहासात कधीच अस्तित्वात नसलेली भारतमाता अस्तित्वात आली. वंदे मातरम् आणि भारत माता की जय… अशा घोषणा देणं हे राष्ट्रभक्तीचे निकष आहेत, हे त्यांच्या डोक्यात बिंबविण्यात आलं. या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे ओबीसींना धर्माच्या, अस्मितेच्या जाळ्यात अडकवून पुन्हा एकदा उच्चवर्णीयांची मिरासदारी प्रस्थापित करण्याच्या संघाच्या प्रयत्नांना यश येतं आहे. हे नाकबूल करण्यात अर्थ नाही.
संघ परिवाराला हे यश का मिळालं याची कारणंही समजून घेतली पाहिजेत. ब्राह्मण, मराठा, दलित या समाजात प्रबोधनकारी विचार मांडणार्यांची मोठी परंपरा आहे. ओबीसी मात्र महात्मा फुल्यांचा अपवाद वगळता धार्मिक गुलामगिरी काय असते हे सांगणार्या परिवर्तनवादी विचारांपासून बर्यापैकी दूर आहे. त्यांच्यावर उच्चवर्णीयांनी लादलेल्या परंपरा, समजुतींचा मोठा पगडा आहे, हे संघाने नेमकेपणाने ओळखले. त्यानंतर एक विशिष्ट आराखडा तयार करुन ओबीसींच्या कट्टर हिंदूकरणाचा प्लान तयार करण्यात आला. धर्म ही अत्यंत प्रभावी गोष्ट आहे धर्माच्या प्रभावी उपयोगातून निर्बुद्ध माणसांची फौज, तर तयार करता येतेच शिवाय धर्मसंघटना आणि धार्मिक प्रचारातून राजकीय, धार्मिक आणि आर्थिक सत्ताही मिळविता येते, हेही संघ परिवाराच्या लक्षात आले. जेव्हा देशातील बहुसंख्य राजकीय पक्ष, महत्वाच्या सामाजिक संघटना सार्वजनिकरित्या धर्माचा उदोउदो करण्याची गरज नाही. धार्मिक प्रथा-परंपरा, आस्था हे वैयक्तिक विषय आहेत. परमेश्वराचं अस्तित्व हे सुद्धा ज्याच्या त्याच्या मानण्याचा विषय आहे, अशी जाहीर भूमिका घेऊन होत्या तेव्हा संघ परिवाराने उघडपणे धार्मिक आस्थेला हात घालणं सुरु केलं. देशातील तमाम साधू, साध्वी, बुवा, महाराज, परमपूज्य यांचा गोतावळा जमा करुन आपला धर्म कसा धोक्यात आहे. त्यामुळे सर्वांनी एक कसं आलं पाहिजे, याची हाकाटी देणं सुरु केलं. आज ओबीसी ज्या कट्टरतेने व्यक्त होत आहेत, ते या प्रयत्नांचं यश आहे. खरं तर मुस्लिम काही वेगळं करत नाही. ज्या मुस्लिमांच्या कट्टरतेबद्दल नाकं मोडली जातात त्यांना उत्तरं देण्यासाठी त्यांचाच धर्मवेडेपणाचा मार्ग संघ परिवाराने अवलंबविला. या मार्गात विचाराला, विवेकाला स्थानच नसते. धर्माचे ठेकेदार जे सांगतील ते समाज मेंढराप्रमाणे ऐकत असतो. मुस्लिम राष्ट्रांमध्ये एखादा मुल्ला-मौलवीने अमुक एक धर्मविरोधी आहे. याने पैगंबराची, कुराणाची निंदा केली आहे, असे सांगितले की, कुठलीही शहानिशा, चौकशी न होता त्याला फासावर लटकविले जाते. भरचौकात गोळ्या घातल्या जातात. आपल्याकडेही आता समाजाला खरं ते सांगणार्या, धार्मिक उन्मादापासून रोखणार्या विचारवंतांना, सामाजिक कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याचे प्रकार सुरु झालेच आहे. कोणी वेगळं काही मांडलं की तो धर्माचा शत्रू आहे, देशविरोधी आहे, असं सर्टिफिकेट देण्याची एजंसीही संघ परिवारातल्या संस्थांनी घेतली आहे. परवाच्या कन्हैय्या प्रकरणात त्याच्याबद्दल ज्यापद्धतीचा तिरस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्यातून हिंदूंच्या, ओबीसींच्या तालिबानीकरण करण्याच्या प्रयत्नाला जबरदस्त वेग आला आहे, हे लक्षात येतं.कन्हैयाबद्दल ज्यांच्या मनात विखार आहे त्यात ओबीसींची संख्या मोठी आहे. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहिल्या की ते लक्षात येतं.कन्हैय्याला देशद्रोही ठरविणार्या ९0 टक्के लोकांनी त्याचे ओरिजनल भाषण ऐकले नाही. तो नेमकं काय म्हणाला, त्याने काय घोषणा दिल्या, त्याच्या भाषणाच्या मूळ रेकार्डिंगमध्ये कसे-कसे बदल झालेत हे काहीही समजून न घेता त्याला बदनाम करणे सुरु आहे. त्याची बाजू घेणार्यांनाही हे हिंदू तालिबानी सोडत नाहीत. गेल्या आठवड्यात याच स्तंभात कन्हैयाच्या भाषणाने संघ परिवार कसा उघडा पडला याचं विश्लेषण केल्यानंतर प्रस्तुत लेखकाला अत्यंत खालच्या स्तरावरील शिविगाळीला, धमक्यांना सामोरे जावे लागले. विचारांचा प्रतिवाद विचाराने, अभ्यासाने करता येतो याचं भान कुठेच नाही. हिंदूविरोधी, देशविरोधी ठरविलं की मुद्यांना उत्तर देण्याची गरजच उरत नाही. अलीकडे तर संघ परिवारातील संस्था झुंडशाहीवर उतरल्या आहेत. वेगळा विचार मांडणार्या कुठल्याही व्यक्तिविरोधात झुंडीने शाब्दीक हल्ला चढविण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. यात ओबीसी बळी पडतो आहे.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत. )
very well jotted down, your columns puts up realty and your are doing it very candidly. Hats of to you, Avinashji!
You have been expressing truth candidly and that is very relevant. Hats off to you Avinashji!