|
||
आठवडा लोटलाय. मात्र भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार प्रवीण पोटे यांच्या ठुमक्याची चर्चा अद्याप थांबायला तयार नाही. मित्रमंडळाने आयोजित केलेल्या दहिहांडीच्या कार्यक्रमात प्रवीण पोटे नागपूर व अमरावतीच्या नृत्यांगणांसोबत मनसोक्त, बेधुंद नाचले. (वर्तमानपत्रांतील त्यांच्या वेगवेगळ्या पोझेस पाहून त्यांच्या बेभान होण्याचा अंदाज येतो.) त्यांचं हे नाचणं काही मंडळींना मात्र चांगलंच खटकलं आहे. विशेषत: आता त्यांचा ज्या संघ परिवारात समावेश झाला आहे, त्यातील अनेकांनी या प्रकाराबद्दल नाकं मुरडली आहेत. (संस्कृती धोक्यात आली आहे, असे वाटणार्यांनी पोटेंचे नाचतानाचे फोटो संघ व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना मेल केले आहेत.) एका आमदाराला हे शोभतं का, असा त्यांचा सवाल आहे. प्रश्न मोठा अडचणीचा आहे. आमदाराने नाचावं की नाचू नये? बेधुंद, बेभान करणारं संगीत लागलं की, थिरकायला लागणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आता चिकणी चमेलीसारखं गाणं लागल्यावर कंबर हालणारचं हो.. प्रवीणभाऊ आमदार असले, तरी शेवटी ते सुद्धा माणूसच आहेत. त्यामुळे त्यांच्या नाचण्याचा एवढा बाऊ कशाला करायचा? त्यात प्रवीणभाऊ व त्यांच्या खास सोबत्यांना नाचायला मनापासून आवडतं. फक्त फडावर नाचल्यासारखे हावभाव एखाद्या आमदाराने सार्वजनिक ठिकाणी करायचे का, एवढाच वादविवादाचा विषय होऊ शकतो. आता नवीनच आमदार झाल्यामुळे डीजेचा गोंगाट, मदहोष करणारे वातावरण आणि सभोवताली नेहमीचे कंबर हालविणारे सोबती असल्याने आपण आमदार आहे, याचा प्रवीणभाऊंना विसर पडू शकतो. त्यांच्यावर टीका करणार्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. मात्र प्रवीणभाऊंनी आगामी काळात काळजी घेतली पाहिजे. ते आता एका वेगळ्या सोवळ्या संस्कृतीत गेले आहेत. तिथे बंद दाराआड काहीही केलं, तर चालतं. मात्र बोभाटा झाला की, ते आयुष्यभर पुरतं. गोपीनाथ मुंडेंना नाही का, बरखा, चौफुला प्रकरण अनेकवर्ष पुरलं. त्यांची कुंडली मांडतांना त्या प्रकरणाचा आर्वजून उल्लेख होतो. संघ परिवाराचं कसं आहे, निष्ठा, त्याग, चार्त्यि हे शब्द ते मंत्रासारखे जपत असतात. (प्रत्यक्षात त्यांची बांधिलकी यापैकी कुठल्याही शब्दाशी नसते, हा भाग वेगळा!) त्यामुळे त्यांच्या चौकटीबाहेर कोणी वागला की, त्यांना ते फारसं रूचत नाही. मागे नाही का, अटलबिहारी वाजपेयींनी ‘मी अविवाहित आहे, ब्रह्मचारी नाही’, असं जेव्हा सांगितलं होतं, तेव्हा तमाम संघीयांना किती धक्का बसला होता. तसे अलीकडच्या काही वर्षात परिवाराला धक्क्यावर धक्के पचविण्याची सवय झाली आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तेचा स्वाद घेतल्यानंतर प्रमोद महाजनांपासून, कल्याण सिंह, संजय जोशी, बंगारू लक्ष्मण आणि अलीकडच्या काळात कर्नाटक विधानसभेत मोबाईलवर ब्ल्यू फिल्म पाहणार्या आमदारांपर्यंत अनेकांनी संघ परिवाराला मोठे सांस्कृतिक हादरे (धक्का शब्द सौम्य होईल ना?) दिले आहेत. अमरावती जिल्ह्यातील नेत्यांचे पराक्रमही बरेच गाजले आहेत (ते पुन्हा कधीतरी..) मात्र तरीही माणसं स्खलनशील असतात. प्रत्येकाचे पाय मातीचेच असतात, हे वास्तव स्वीकारायला त्यांची तयारी नाही. आम्ही काही वेगळे, असाच टेंभा त्यांच्या वागणुकीत कायम दिसत असतो. अर्थात हे असं असलं तरी कसंही वागून चालणार नाही हे प्रवीणभाऊंनी लक्षात घेतलं पाहिजे. भाजपाचा आमदार असणं हे त्यांना मनापासून रूचत नसलं तरी भाजपाचा ठप्पा लागल्यानंतर त्या पक्षाचे तथाकथित तत्व, शिस्त आणि गुणधर्म याचं भान ठेवावं लागणार आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाचा आमदार हा रोल बाजूला ठेवला तरी तसंही सार्वजनिक जीवनातील आचरणाबाबत त्यांनी यापुढे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. आमदार असण्याच्या व्यतिरिक्त ते एका मोठय़ा शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आहेत. पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये शिकतात. त्या सार्या पोरांचं आपला अध्यक्ष कसा वागतो, याकडे लक्ष असणारच आहे. सकाळी महाविद्यालयात गजाननाच्या प्रार्थनेत तल्लीन होणारा माणूस सायंकाळी चिकनी चमेलीच्या गाण्यावर थिरकतो, ही विसंगती मुलांना व त्यांच्या पालकांना अस्वस्थ करू शकते. शिवाय आताच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली आहे. लंबी रेस का घोडा व्हायचा असेल, तर वरकरणी का होईना काही पथ्य पाळावे लागतात. आपल्याकडे बिहारच्या आमदारांसारखं वागून चालत नाही. एरवी ते कसेही आणि कितीही नाचले असते, तर त्याचा इश्यू झाला नसता. पण बाजूला तंग कपडय़ातल्या पोरी नाचत आहे आणि आमदार हात वर करून त्यांच्यासोबत ठुमके लावत आहे, हे नाही म्हटलं तरी खटकण्यासारखंच होतं. नावामागे ते पोटे पाटील असं लावत असले तरी पूर्वीच्या पाटलांसारखं वागलंच पाहिजे, असा नियम कोठे आहे? (लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत) मो. 8888744796 |