रा.सू. ऊर्फ दादासाहेब गवई केरळच्या राज्यपालपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पांवर आधारित सविस्तर लेख दै. ‘पुण्य नगरी विदर्भ गौरव विशेषांक २0१३’ मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. हा लेख दादासाहेबांच्या निर्वाणप्रसंगी वाचकांसाठी पुन:प्रकाशित करीत आहोत- अविनाश दुधे
………………………………………………………………………………………………………………………………………….
|
||
रा.सू..ऊर्फ दादासाहेब गवई केरळच्या राज्यपालपदावरून निवृत्त होऊन आता दहा महिने झाले आहेत. जवळपास ३0 वर्षे विधान परिषद, १३ महिने लोकसभा, सहा वर्षे राज्यसभा अशी प्रदीर्घ संसदीय कारकीर्द, त्यानंतर पाच वर्षे बिहार आणि केरळच्या राज्यपालपदाच्या जबाबदारीनंतर दादासाहेब आता काहीसे निवांत आहेत. मात्र, अमरावतीच्या काँग्रेसनगरातील ‘कमलपुष्प’ या त्यांच्या बंगल्यावर पूर्वीसारखीच गर्दी. ८४ वर्षांचे दादासाहेब अजूनही दुपारपासून रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. वयोमानानुसार अनेक व्याधींनी त्यांना जखडले आहे. मात्र, उत्साहात काहीही कमतरता नाही. रात्री दोन-तीन वाजेपर्यंत काम करून सकाळी ११ वाजता पुन्हा कामाला जुंपून घेण्याची अनेक वर्षांची सवय जायला तयार नाही. एवढी वर्षे सत्तेच्या परिघात राहिल्यानंतर आता कुठलेही पद नाही, याची अजिबात रुखरुख नाही. चेहर्यावर समाधानी भाव. आता मागे वळून पाहताना कसे वाटते, या आपल्या प्रश्नाला चटकन उत्तर देतात, ‘मी खूप समाधानी आहे. आनंदी आहे. अपेक्षेपेक्षा भरभरून मिळालं.’ नकळत दादासाहेब भूतकाळात शिरतात. ‘दारापूरच्या एका सामान्य कुटुंबातील मी मुलगा. एवढं यश वाट्याला येईल याची खरंच कधी कल्पना केली नव्हती. आज जो काही रा.सू. गवई आहे, त्याला मोठं करण्यात अनेकांचा वाटा आहे; परंतु पायाभरणी मात्र माझ्या आई-वडिलांची आहे. आयुष्याच्या प्रारंभीच्या चरणात त्यांनी जो भरभक्कम आधार दिला, दिशा दिली, त्यामुळेच मी काही करू शकलो.’ रासूंचा जन्म लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा. गावात फटाके फुटत असताना हे जन्माला आले. सूर्यभानजी गवईंना चार मुलींनंतर मुलगा झाला, हे कळताच गावातील त्यांचे मित्र देवीलाल बेथरिया एवढे खूश झाले की, त्या आनंदाच्या भरात त्यांनी बंदुकीचे बार हवेत उडविले. अनेक वर्षांपर्यंत रासूंचे आई-वडील या प्रसंगावर बोलत असत. सूर्यभानजी गवई यांच्याकडे जेमतेम सात एकर शेती, मातीचं कौलारू छोटं घर, एक म्हैस एवढीच मालमत्ता होती. मात्र गावात त्यांच्या शब्दाला मान होता. त्यावेळची सामाजिक स्थिती, आजूबाजूला घडणार्या घटनांची त्यांना चांगली जाण होती. बाबासाहेबांचे विचार त्यांना माहीत होते. गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या कीर्तनाला ते मुलांना सोबत घेऊन जात असत. स्वत: निरक्षर असले तरी शिक्षणाचे महत्त्व ते जाणून होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या लाडक्या रामकृष्णाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी दारापूर, खोलापूर, अंजनगावातील शाळांत टाकले. त्यानंतर मॅट्रिकसाठी त्यावेळच्या अमरावतीतील प्रख्यात अँकॅडमिक स्कूलमध्ये अँडमिशन घेण्यात आली. रामकृष्णाकडून त्यांना विशेष आशा होती. ते नेहमी म्हणायचे, ‘माझा हा एक लाल म्हणजे पृथ्वीचं मोल’. सूर्यभानजींचा ‘लाल’, रामकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाला खरा आकार आला तो मात्र अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात. त्यांच्या नेतेगिरीचं बीजारोपण या महाविद्यालयात झालं. येथे त्यांनी ‘शेड्यूल कास्ट स्टुडंट फेडरेशन’ ही संघटना स्थापन केली. महारांनी गुरंढोरं वाहून न्यायची नाहीत. मेलेल्या जनावरांचं मांस खायचं नाही. सवर्णांच्या अंत्यविधीकरिता लाकडं न्यायची नाहीत. या त्यांच्या भूमिकेनं ते मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. त्यांना भाषणासाठी संपूर्ण विदर्भातून आमंत्रणं मिळायला लागली. कॉलेजमध्येच ते नेता म्हणून नावारूपास यायला लागले. त्यांच्या ‘गवई ग्रुप’चा कॉलेजमध्ये टेरर होता. कॉलेजचे दिवस म्हटले की, दादासाहेब खुलतात. ‘१९५२ ते ५६. मोठे मजेचे दिवस होते ते. मी फार मस्तीखोर होतो. भरपूर खोड्या करायचो. मी, प्रभाकर भेंडे, यशवंत शेरेकर, जांबुवंत धोटे, अण्णा वैद्य, बाळासाहेब घुईखेडकर, सुरेश भट, मधुकर केचे, बबनराव मेटे, डॅडी देशमुख… आम्ही सगळे मागेपुढे असू. सगळे जण हुशार व भन्नाट. प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटविला. ते दिवसच भारावलेले होते. गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सतत काही ना काही सुरू असे. कॉलेजमध्ये असतानाचा तुरुंगात जाण्याचा सिलसिला सुरू झाला.’ चळवळीचे नेतृत्व करण्यापासून स्नेहसंमेलनात नाटकं बसविण्यापर्यंत सर्व ठिकाणी पुढे राहणारे राजबिंडे गवई प्रेमात वगैरे पडले नाही का? या प्रश्नाला, ‘आपल्या प्रेमात कोण पडणार’, असं सफाईदार उत्तर देऊन ते सुटका करून घेतात. मात्र त्याचवेळी आपल्या सोबत्यांचे ‘वासुगिरी’चे किस्से रंगवून सांगतात. बलखंडे, भट नावाच्या मुलाला मुलीचं खोटं प्रेमपत्र दिल्यानं त्याची कशी पिटाई झाली, हे किस्से त्यांच्या तोंडून ऐकण्यात मजा आहे. महाविद्यालयीन जीवनात गवईंनी केवळ चळवळी व उचापतीच केल्या, असं जर कोणाला वाटत असेल, तर चूक आहे. या काळात जगातील सारे मोठे लेखक त्यांनी वाचून काढले. १९५६ मध्ये बाबासाहेबांनी धम्मक्रांती केल्यानंतर बदललेल्या सामाजिक स्थितीचे ते डोळसपणे अध्ययन करीत होते. हे सर्व करताना अभ्यासाकडे स्वाभाविकच दुर्लक्ष असे. मात्र त्यांना सर्व विषयांत गती होती. एकदा तेलंग नावाच्या इतिहासाच्या प्राध्यापकाने वर्गात उशिरा येण्याबद्दल सर्वांंसमोर त्यांचा अपमान केला. फालतू भानगडीत पुढे, अभ्यासाशी तुला काय देणेघेणे, अशा अर्थाची त्यांची कॉमेन्ट होती. रासूंनी ती लक्षात ठेवली. त्या वर्षी इतिहास या विषयात त्यांनी सर्वाधिक मार्क मिळविले. कृतीतून उत्तर देण्याचा रासूंचा हा स्वभाव त्यांचे नजीकचे लोकं जाणून आहेत. कॉलेज लाईफ संपेपर्यंत रासू नेता म्हणून चांगलेच नावारूपाला आले होते. शिक्षणानंतर नोकरीचा शोध असा नैसर्गिक क्रम. पण ‘नोकरी आपला मार्ग नाही’ हे त्यांनी केव्हाचेच ठरविले होते. ‘आपल्या घरची परिस्थिती फार चांगली होती अशातला भाग नाही. खरंतर नोकरी ही गरज होती. त्यावेळी लोकसेवा आयोगाकडून तुरुंग अधीक्षक आदी एक-दोन पदासाठी कॉल आले होते. सरकारी नोकरीचा मोह होऊ शकला असता. मात्र, वडील ठामपणे पाठीशी उभे राहिले. ‘काय होईल ते पाहू. तुला जे काय करायचं ते कर. तुझ्या मार्गावर चालत राहा’ या त्यांच्या शब्दाने हिंमत मिळाली,’ असे दादासाहेब सांगत होते. याचदरम्यान १९५९ मध्ये रासू चतुभरुज झाले. मूर्तिजापूरच्या सुदामजी इंगळेंची देखणी कन्या कमल रासूंच्या मनात ठसली होती. एके दिवशी आपले मित्र के.बी. शृंगारे यांच्यासह रासू भल्या पहाटे दौर्यावरून इंगळेंकडे धडकले. सुदामराव इंगळे हे रिपाइंचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे रासू व इतर नेत्यांची नेहमी ये-जा असे. कमलला हे नवीन नव्हते. त्या दिवशी रासू व त्यांच्या मित्रांनी तेव्हा दहावीत असणार्या कमलशी भरपूर गप्पा मारल्या. आवडीनिवडी विचारल्या आणि काही वेळातच लग्न ठरल्याची बातमी तिला वडिलांकडून मिळाली. ज्या गवईसाहेबांना एखाद्या कार्यक्रमात हार घालण्यासाठी कमल धडपडायची, त्याच साहेबांच्या गळ्यात हार घालून कायमची त्यांची होण्याची संधी कमलला मिळाली. २९ नोव्हेंबर १९५९ ला रासूंचं लग्न झालं. लग्न कसलं, जाहीर सभाच होती ती. जोग चौकात स्वागत समारंभ होता. संपूर्ण विदर्भातून पन्नास हजारांपेक्षा अधिक लोक लोटले होते. कोणालाही रासूंच्या लोकप्रियतेचा हेवा वाटावा असा तो कार्यक्रम होता. त्या काळात एवढा जंगी लग्नसमारंभ तालेवार घराण्यातच होत होता. येथे मात्र फरक होता. लोकांनी स्वत:च स्वत:च्या शिदोर्या आणल्या होत्या. दहा पैशापासून कपाट-भांडी असं बरंच प्रेझेंट आलं. त्यातून संसार उभा झाला. कमलताईंचं आगमन रासूंसाठी भलतंच भाग्यदायी ठरलं. आधीच वेगात असलेली त्यांची गाडी भरधाव वेगात धावायला लागली. मात्र संसाराची प्रारंभीची काही वर्षे संघर्षमयच होती. फ्रेजरपुर्यातील एका लहान भाड्याच्या घरात दोन भाऊ, बहीण यांना घेऊन रासूंचा संसार सुरू झाला. रासू तेव्हा इन्शुरन्स एजंटचं काम करीत असत. त्यातून महिन्याला जेमतेम १00 रुपये सुटत. घरी खाणारी तोंडं पाच, कार्यकर्त्यांंची सतत ये-जा. त्यामुळे ओढाताण होत असे. अशा परिस्थितीत संसाराचं गाडं व्यवस्थित चालविण्यात कमलताईंचा मोठा वाटा आहे. रासू त्यांचं हे ऋण कृतज्ञपणे नमूद करतात. ‘तिनं खूप सोसलं. आई-वडिलांनंतर माझ्या यशात कुणाचा मोठा वाटा असेल, तर तो कमलचा. प्रारंभीच्या काळात शिवणकाम करून तिनं संसाराला हातभार लावला. वसतिगृहात राहून स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं व राठी विद्यालयात शिक्षिकेची नोकरी केली. मुंबईवरून स्वस्त किमतीचे कपडे आणून ती येथे विकायची. त्यातून दोन पैसे सुटायचे. तिनं भरपूर खस्ता खाल्ल्या; पण मला कधी बोलली नाही. तिच्यामुळेच मी बाहेर काही करू शकलो. मुलांचं शिक्षण, मुलांवर संस्कार, आई-वडील, नातेवाईकांना जपणं, कार्यकर्त्यांंना सांभाळणं हे सारं तिनं नेटानं केलं. कुठलीही कुरकुर कधी केली नाही,’ असे दादासाहेब कमलताईंबद्दल भरभरून बोलतात. दादासाहेब १९६४ मध्ये पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले. चार वर्षांंनंतर १९६८ मध्ये ते विधान परिषदेचे उपसभापती झाले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. पुढे १९७८ मध्ये ते विधान परिषदेचे सभापतीही झाले. ‘या राजकीय यशात कोणाचा आशीर्वाद होता?’ ‘मला गॉडफादर असा कोणीच नाही. जे काही मिळविलं ते स्वत:च्या हिमतीवर. मात्र, माझे गुरू कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा मायेचा हात कायम पाठीवर असे. त्यांच्या दोन शब्दांनी लढण्याची जिद्द मिळे. वसंतराव नाईकांची मैत्रीही मी कधी विसरू शकणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या शह-काटशहाला उत्तर देताना वसंतरावांची साथ असायची.’ रासू या दोघांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. राजकीय आलेख सतत वर चढत असताना किती तडजोड करावी लागते? किती वाकावे लागते? या प्रश्नाला रासू वेगळं उत्तर देतात. ‘वाकणं वेगळं, तडजोड वेगळी. राजकारणात काही गोष्टी सहन कराव्या लागतात. काहींकडे दुर्लक्ष करावं लागतं. मात्र, बाबासाहेबांच्या विचारांशी कधी तडजोड करायची नाही, हे प्रारंभापासूनच ठरविलं होतं. ‘मी तशी तडजोड कधी केली नाही, याचा मला अभिमान आहे.’ हे खरंही आहे. जेव्हा कधी बाबासाहेबांच्या विचारांना कोणी छेडछाड करू पाहतो, त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेबाबत अनादर व्यक्त करतो तेव्हा रासू वाघ बनून त्यावर तुटून पडतात. राज्यसभेत त्यांची निवड झाल्यानंतर काही दिवसांतच भारताच्या संविधानाची समीक्षा करण्यात यावी, असा प्रस्ताव भाजपाचे रामदास आगरवाल यांनी मांडला होता. याचवेळी अरुण शौरी यांचे ‘Worshiping False God’ या बाबासाहेबांबद्दल विपर्यास्त विधान करणार्या पुस्तकाची बाहेर चर्चा होती. या दोन्ही घटनांमुळे रासू दु:खी होते, चिडले होते. संविधानाच्या समीक्षेविषयीचा प्रस्ताव जसा सभागृहात चर्चेला आला तेव्हा त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच ‘मी या ठरावाचा माझ्या दातांनी आणि नखांनी विरोध करतो,’ या भाषेत केली होती. अरुण शौरींच्या पुस्तकातील खोटारडेपणा सभागृहात पुराव्यासह सिद्ध करीत असताना भाजपाचे सदस्य त्यांना बोलू देत नव्हते. अडथळे आणीत होते. तेव्हा ‘मला जर सिद्ध करण्याची परवानगी नसेल, तर माझा निषेध मी असा व्यक्त करतो,’ असं म्हणून त्यांनी शौरींचे पुस्तक टराटरा फाडून त्याची पानं सभागृहात भिरकावली होती. विचारांशी तडजोडीचा विषय येतो तेव्हाच रासूअसा रुद्रावतार धारण करतात. एरवी रासूसारखा गोड माणूस नाही. एकापाठोपाठ एक पान खात गप्पांची मैफिल रंगविण्यात त्यांचा हातखंडा. तिकडं विडा रंगतो, इकडं गप्पा चर्चेला कुठलाही विषय वज्र्य नाही. नशीब-परमेश्वर या संकल्पनेबाबत विचारणा केली, तर त्या विषयात खोलात जाण्याचं ते टाळतात, ‘जे पेरलं ते उगवतं’ यावर आपला विश्वास असल्याचं ते सांगतात. स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे लोटली तरी गरिबी कायम आहे. लोकांच्या जातीपातीच्या विषयातील पीळ अद्याप गेला नाही. राजकीय लोकशाही आहे; पण सामाजिक व आर्थिक लोकशाही अद्याप दूर आहे. या सर्व विषयांनी रासू अस्वस्थ होतात. आयुष्य पुन्हा नव्यानं जगण्याची संधी मिळाली, तर ‘आतापर्यंंत जसा मी जगलो तसाच जगेन’ हे सांगताना, ‘माणसानं मोठं झाल्यानंतरही ज्या पायर्यांनी वर आलो त्या पायर्या विसरू नयेत’ हे आवर्जून सांगायला ते विसरत नाहीत. ८४ वर्षांंच्या आयुष्यात समाधानाचे, आनंदाचे अनेक क्षण रासूंच्या आयुष्यात आले. मात्र नागपूरची ‘दीक्षाभूमी’ हा त्यांचा सार्थ अभिमानाचा विषय आहे. ‘दीक्षाभूमीची उभारणी मनस्वी समाधान देऊन गेली. जगाच्या इतिहासात आजपर्यंंत घडली नसेल अशी जी रक्तहीन क्रांती बाबासाहेबांनी केली, त्या ठिकाणी अद्भुत स्मारक व्हावं असं वाटत होतं. बाबासाहेबांच्या लाखो अनुयायांनी ते स्वप्न साकारण्यास मदत केली,’ असे ते सांगतात. ‘वैयक्तिक आयुष्यात सर्वोच्च क्षण म्हणाल, तर मुलगा भूषणचं हायकोर्टाचा न्यायाधीश होणं. न्यायाधीश म्हणून निवड झाल्यानंतर तो काहीसा संभ्रमात होता. मी त्याला एवढंच म्हटलं, ‘सुप्रीम कोर्टात वकिली करून महिन्याला लाखो रुपये कमावशील; पण येथे समाजातील उपेक्षित गरिबांना न्याय देऊन तू खर्या अर्थानं डॉ. बाबासाहेबांचं काम करशील. त्यानं माझा सल्ला मानला.’ दादासाहेब भूषणबद्दल अभिमानानं सांगत असतात. आयुष्याच्या या वळणावर रासू कृतार्थ आहेत. खूप वर्षांंनंतर मिळालेला निवांतपणा ते एन्जॉय करताहेत. आठवड्यातून दोन-तीनदा शेतीवर जातात. संगीत ऐकतात.आणि हो… विडा रंगवीत गप्पांची मैफिल जमवतात. (लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.) भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |