सोनियाद्वेषाने पछाडलेल्या संघ परिवाराला धक्का



2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पंतप्रधान होऊ देण्यास आपली काहीही हरकत नव्हती, या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या गौप्यस्फोटाने देशात एका नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. ‘टर्निग पॉईंट्स’ या आपल्या राष्ट्रपतिपदाच्या पाच वर्षांतील कारकिर्दीच्या आठवणी उलगडणार्‍या पुस्तकात कलामांनी आपण सोनियांना पंतप्रधानपदाची शपथ द्यायला राजी होतो, हे स्पष्ट केल्याने सोनिया गांधींच्या विरोधकांना विशेषत: भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराला जोरदार धक्का बसला आहे. आतापर्यंत अनेकांप्रमाणे संघ परिवाराचीही कलामांनी सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ दिले नाही, अशी समजूत होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नव्हतं. राष्ट्रपती भवनाच्या सचिवालयाने सोनिया गांधी यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यासाठी पत्राचा मसुदा तयार केला होता, ही माहिती समोर आल्याने आता डॉ. अब्दुल कलाम यांच्याबद्दल आदर ठेवावा की नाही, असा प्रश्न संघ परिवारा समोर निर्माण झाला असावा. गेले काही वर्ष डॉ. कलामांमुळेच सोनिया गांधींसारखी परदेशी मूळ असलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकली नाही. कलामांसारखा देशप्रेमी, स्वाभिमानी व्यक्ती राष्ट्रपतिपदावर असल्याने देश 2004 मध्ये मोठय़ा संकटातून वाचला, असे संघ परिवार सगळीकडे सांगत होता. मात्र खुद्द कलामांनीच या विषयातील सगळय़ा समजुतींवर बोळा फिरविल्याने संघ परिवाराचा चांगलाच मुखभंग झाला आहे.


2004 च्या निवडणुकीत प्रमोद महाजनांच्या ‘शायनिंग इंडिया’ आणि ‘फिल गुड’ फॅक्टरला न भुलता देशातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार पटकणी दिली होती. हे कमी की काय म्हणून कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. सोनिया गांधी पंतप्रधान होणार हे जवळपास स्पष्ट होते. तेव्हा भाजपा-संघाच्या नेत्यांनी केलेला थयथयाट हा देश अजूनही विसरला नाही. विचारी आणि सुसंस्कृत नेत्या म्हणून ओळखल्या जाणार्‍या आजच्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांचे वक्तव्य कधीच विसरता न येण्याजोगे आहे. ‘सोनिया गांधी जर पंतप्रधान होणार असेल, तर मी त्या पंतप्रधानपदावर असेपर्यंत जोगिणीसारखी राहील. रंगीत वस्त्राचा संपूर्ण त्याग करून पांढरे वस्त्र परिधान करेन. डोक्यावरील संपूर्ण केसांचे मुंडण करेल. कपाळाला कुंकू लावणार नाही’, असे त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या. बोलभांड नेत्या म्हणून प्रसिद्घ असलेल्या उमा भारतींनीही अशीच मुक्ताफळे उधळली होती. तेव्हाचे सरसंघचालक कुप. सी. सुदर्शन यांनी तर सार्‍या मर्यादा पार केल्या होत्या. ‘सोनिया गांधी या सीआयएच्या एजंट आहेत. त्यांचे पती राजीव गांधी व सासू इंदिरा गांधी यांच्या हत्येत त्यांचा हात आहे’, असा अतिशय हीन आरोप त्यांनी केला होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, विनय कटियार आणि इतरही संघ परिवारातील नेते वाट्टेल ते बोलत होते. सोनिया गांधीच्या द्वेषाने पछाडलेल्या या तथाकथित नेत्यांनी आपली संस्कृती काय आहे, हे देशाला दाखवून दिले होते. शरद पवार, पी. ए. संगमा या व इतर पक्षाच्या काही नेत्यांनीही तेव्हा सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उगाळत वेगळा सूर लावला होता.
त्या पाश्र्वभूमीवर सोनिया गांधींनी कॉंग्रेस खासदारांच्या सभेत आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकत पंतप्रधानपद स्वीकारायचे नाही, असा निर्णय घेतल्याचे जाहीर केल्यानंतर सोनिया गांधी विरोधकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. लोकसभा निवडणुकीतील लाजीरवाणा पराभव विसरून पडे तो भी उपर असा पवित्रा घेत सार्‍या भाजपेयींनी आनंदोत्सव सुरू केला होता. हे सारं राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या मुळेच होऊ शकलं, असं सांगत त्यांनी कलामांना हिरो केलं. 18 मे 2004 ला कलाम व सोनिया गांधींच्या राष्ट्रपती भवनाच्या भेटीत कलामांनी मी तुम्हाला पंतप्रधानपदाची शपथ देऊ शकत नाही, असे स्षष्टपणे सांगितल्याच्या कहाण्या तेव्हा प्रसूत झाल्या होत्या. तेव्हापासून कलाम हे संघ परिवारासाठी आयडॉल झाले होते. कलामांचा साधेपणा, त्यांची विद्वत्ता, शास्त्रज्ञ म्हणून असलेल्या हुशारीपेक्षा त्यांनी सोनिया गांधींना पंतप्रधान होऊ दिले नाही, या एकाच कारणाने ते संघ परिवारासाठी आदरणीय ठरले होते. आता परिवाराचं त्यांच्याबद्दल काय मत होते, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
कोलांटउडी घेण्यात हातखंडा असलेल्या भाजपा नेत्यांनी आपल्या बदललेल्या मतांची झलक दाखविणेही सुरू केले आहे. कधी काळी अटलबिहारी वाजपेयींना ‘मुखवटा’ म्हटल्यामुळे कायमचा अज्ञातवास वाटय़ाला आलेल्या गोविंदाचार्यांनी ‘डॉ. कलामांनी जेवढे उघड केले, त्यापेक्षा अधिक लपविले आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. भाजपाचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवींनी ‘सोनिया गांधींनी त्याग वगैरे काही केलेला नाही. त्याच सुपर पंतप्रधान आहेत. सत्तेचे सारे लाभ त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने घेतलेत’, अशी टीका केली आहे. या अशा प्रतिक्रिया पुढेही येणार आहेत. बाकी कलामांच्या पुस्तकाने एक चांगलं काम झालं आहे. सोनिया गांधी 2004 मध्ये पंतप्रधान झाल्या नाहीत, त्यासाठी कलाम कारणीभूत नाहीत, हे देशासमोर आले आहे. मात्र तरीही एक प्रश्न उरतोच. कलामांचा विरोध नव्हता, तर सोनिया गांधी पंतप्रधान का झाल्या नाहीत? अंतरात्म्याचा आवाज वगैरे यात काही दम नाही. विदेशी व्यक्ती पंतप्रधान होऊ नये, असे म्हणणार्‍यांचा एक मोठा वर्ग त्यावेळी देशात होता. त्या वर्गाची प्रतिक्रिया शिवाय भाजप व संघ परिवाराकडून झालेला टोकाचा विरोध यामुळे त्या हडबडून गेल्या असण्याची दाट शक्यता आहे. निर्णायक असं संख्याबळही त्यांच्याजवळ नव्हतं. मात्र सोनिया गांधी स्वत: त्यावेळची त्यांची मन:स्थिती उघड करीत नाही, तोपर्यंत या विषयातील औत्सुक्य कायम राहणारच आहे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत)

मो. 8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top