१९३६ ते १९४६ ही दहा वर्षे विदर्भातील सेवाग्राम हे चिमुकलं गाव देशाची अनधिकृत राजधानी होती. त्या काळात देशावर राज्य करणार्या सर्वशक्तिमान ब्रिटिश सरकारपासून देशातील लहानथोर सगळ्यांचं केंद्रस्थान केवळ सेवाग्राम आणि सेवाग्राम होतं. स्वातंत्र्यलढय़ाचे नायक पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, राजेंद्र प्रसाद, बादशहा खान, सी. राजगोपालचारी, सरोजिनी नायडू, आचार्य नरेंद्र देव असे सारे दिग्गज नियमित येथे पायधूळ झाडत असत. केवळ नेतेच नव्हे, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, समाजसेवक, उद्योजक, कलावंत, शिक्षक, शास्त्रज्ञ अशी हजारो माणसं चेटूक झाल्याप्रमाणे येथे येत असत.याचं कारण या सार्यांवर जादू करणारा ‘महात्मा’ येथे होता. ही निर्णायक वर्ष या संपूर्ण दशकात विदर्भातील वर्धा या जिल्हा ठिकाणापासून आठ किलोमीटर अंतरावरील सेवाग्राम हे चिमुकलं गाव देशाची अनधिकृत राजधानी होती, हे सांगितलं तर आजच्या पिढीचा चटकन विश्वास बसणार नाही. ती दहा वर्षे देशावर राज्य करणार्या सर्वशक्तिमान ब्रिटिश सरकारपासून देशातील लहानथोर सगळ्यांचं केंद्रस्थान केवळ सेवाग्राम आणि सेवाग्रामच होतं. स्वातंत्र्यलढय़ाचे नायक पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, बादशहा खान, सी. राजगोपालचारी, सरोजिनी नायडू, आचार्य नरेंद्र देव असे सारे दिग्गज नियमित येथे पायधूळ झाडत असे. केवळ नेतेच नव्हे, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, समाजसेवक, उद्योजक, कलावंत, शिक्षक, शास्त्रज्ञ अशी हजारो माणसं चेटूक झाल्याप्रमाणे येथे येत असतं. याचं कारण… या सार्यांवर जादू करणारा ‘महात्मा’ येथे होता. आपल्या सार्या प्रश्नांची उत्तर येथे मिळतील, असा ठाम विश्वास असणार्या वेगवेगळ्या प्रांतातील हजारो माणसांची जत्रा येथे दररोज भरत असे. येथे केवळ स्वातंत्र्यलढय़ाची आखणी होत नव्हती, तर भविष्याची स्वप्नही विणली जात होती. स्वतंत्र भारतातील गावं कशी असतील, ती गावं स्वयंपूर्ण कशी होतील, या दृष्टीने शिक्षण, आरोग्य, निसर्गोपचार, स्वयंरोजगार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण अशा अनेक विषयांवर प्रयोग होत होते. एक अद्भुत झपाटलेपण तेथे होते. गांधीजींचे सहकारी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अभ्यासक जे. सी. कुमारप्पा यांनी ‘the defacto capital of india since service of country is the function of capital city‘ या शब्दात सेवाग्रामचं सार्थ वर्णन करून ठेवलंय. त्या काळातील जे प्रत्यक्षदश्री आहेत त्यांना तेव्हाचे प्रसंग आठवलेत तरी ते अजूनही थरारतात. विचार करा. महात्मा गांधी, नेहरू, पटेल, आझाद, प्रसाद हे देशाचे भाग्यविधाते असलेले सारे नेते एकाच वेळी सकाळ-संध्याकाळ सेवाग्राम आश्रमासमोरील रस्त्यावर फिरताहेत. विचारविनिमय करताहेत. गप्पा, विनोद करताहेत. प्रसंगी वादविवादही होत आहेत. ही दृष्ये डोळ्यात साठवून ठेवणारी अनेक माणसं अद्यापही सेवाग्राममध्ये आहेत. आपणही सेवाग्राम आश्रम व त्या परिसरात जाऊन तो मंतरलेला काळ डोळ्यासमोर आणला की अगदी नकळतपणे तेव्हाच्या विश्वात आपण जाऊन पोहचतो. ३० एप्रिलला सेवाग्राम आश्रमाच्या स्थापनेला ८0 वर्षे पूर्ण झालीत. एका सुवर्णमयी इतिहासाचा साक्षीदार असलेला हा आश्रम तेव्हाच्या सार्या आठवणी, प्रसंग आपल्या उरात बाळगून अजूनही तसाच आहे. बरोबर ८0 वर्षांपूर्वी महात्मा गांधी येथे जेव्हा पहिल्यांदा आले होते तेव्हा हे गाव बर्यापैकी जंगलाने वेढले होते. येथे यायचं असल्यास पायी वा बैलगाडीने यावे लागत असे. पोस्ट ऑफिस, टेलिग्राफ ऑफिस अशा कुठल्याही सोयीसुविधा येथे नव्हत्या. गांधीजींचे उद्योजक मित्र जमनलाल बजाज यांच्या आग्रहाने गांधींनी आश्रमासाठी या जागेची निवड केली. दांडी यात्रेसाठी गांधीजींनी साबरमती आश्रम सोडला तेव्हा त्यांनी जोपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी या आश्रमात परत येणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. दांडी यात्रेच्या सत्याग्रहानंतर गांधीजींना दोन वर्षांचा तुरुंगवास झाला. तुरुंगात गांधीजींनी स्वतंत्र भारताची उभारणी कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, यावर भरपूर चिंतन केलं. जोपर्यंत देशातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होत नाही, तोपर्यंत देश सशक्त होऊ शकत नाही, असे गांधीजींना वाटायला लागले. यासाठी हजारो प्रशिक्षित कार्यकर्ते घडवले पाहिजे, हे त्यांनी ठरवले. आपल्या डोक्यात जे प्रयोग आहेत ते आधी एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष करून पाहिले पाहिजे, असा विचार त्यांनी आपल्या जवळच्या सहकार्यांजवळ बोलून दाखवला. तेव्हा जमनालाल बजाज यांनी त्यांना वर्धा शहराचे नाव सुचवले. वर्धा हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून देशाच्या चारही दिशेने येण्या-जाण्यासाठी हे सोयीचे ठिकाण असल्याने गांधीजींनी वर्धा शहराला पसंती दर्शवली. सुरुवातीला बजाज यांची वैयक्तिक वास्तू असलेल्या मगनवाडीत बापूंच्या सहकार्यांनी कामाला सुरुवात केली. ३0 एप्रिल १९३६ ला गांधीजींनी आता आश्रम ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आश्रम उभारण्याचा निर्णय घेतला. आश्रम उभारण्याअगोदर गांधीजींनी गावकर्यांना विश्वासात घेऊन आपण येथे कुठल्या पद्धतीचे काम करणार आहोत याची माहिती दिली. त्यानंतर आपल्या सहकार्यांना त्यांनी तीन अटी घातल्या. आश्रमाची उभारणी आपल्या सहकार्यांसह या परिसरातील माणसंच करतील. त्यासाठी या परिसरात असणारी साधनं व वस्तूचाच वापर झाला पाहिजे. तिसरं म्हणजे संपूर्ण खर्च ५00 रुपयांच्या वर जायला नको. गांधीजींच्या सूचनेनुसार सेवाग्राममध्ये आढळणारी पांढरी माती, बांबू, लाकूड, कवेलूचा वापर करून वेगवेगळ्या कक्षांची उभारणी करण्यात आली. सर्वात आधी ‘आदि निवास’ची उभारणी झाली. या आदि निवासच्या एका कोपर्यात गांधीजी राहत. दुसर्या कोपर्यात कस्तुरबा, तिसर्यात महादेव देसाई तर चौथा कोपरा येणारे अतिथी, कार्यकर्त्यांसाठी होता. आश्रमात येणार्यांची संख्या एवढी अधिक होती की, आदि निवास छोटे पडायला लागले. कस्तुरबांना एवढय़ा सार्या पुरुषांमध्ये राहायला संकोच वाटत असे. त्यामुळे जमनालाल बजाज यांच्याच सूचनेनुसार कस्तुरबांसाठी ‘बा कुटी’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या कुटीत कस्तुरबांसोबत महिला कार्यकर्त्या राहत असत.२ ऑगस्ट १९४२ या दिवशी ‘भारत छोडो’ मोहिमेकरिता कस्तुरबांनी गांधीजींसोबत मुंबईला प्रयाण केले. तो त्यांचा आश्रमातील शेवटचा दिवस होता. कस्तुरबा जेवढा काळ आश्रमात राहिल्या त्यांनी तेथे स्वत:ची वेगळी छाप सोडली. महात्माजींची कडक शिस्त सांभाळत पाहुण्यांची योग्य ती खातरदारी त्या करत असत. आश्रमात वेगवेगळ्या प्रकारचे पाहुणे येत असत. त्यांना आश्रमाची शिस्त माहीत नसे. अनेकदा मानवतही नसे. तेव्हा कस्तुरबा नियमांचा फार बागुलबुवा न करता त्यांचं वास्तव्य कसं सुखदायी होईल, याची काळजी घेत असत. सुभाषचंद्र बोस आश्रमात आले तेव्हा त्यांना काळा चहा फार आवडत नाही हे लक्षात येताच कस्तुरबांनी त्यांना साखर व दूध घातलेला चहा दिला होता. अर्थात महात्माजींची शिस्तही आश्रमात कायमस्वरूपी निवास करणार्यांसाठी अधिक होती. खान अब्दुल गफार खान हे वायव्य भारतातून आले होते. मांसाहार हा त्यांच्या जीवनशैलीचा नियमित भाग होता, हे लक्षात घेऊन बापूंनी त्यांना आश्रमात मांसाहार करण्याची परवानगी दिली होती. मात्र खानसाहेबांनी मांसाहार न करता आश्रमवासीयांसाठी असलेला आहार घेणेच पसंत केले होते, हा भाग वेगळा. आश्रमातील कामाचा विस्तार जसा जसा वाढत गेला तसं अधिक जागेची आवश्यकता भासायला लागली. गांधीजींना कार्यालयीन कामासाठीही जागेची कमतरता भासायला लागली. तेव्हा मीराबेनने आपली कुटी बापूंच्या हवाली केली. तीच आज ‘बापू कुटी’ म्हणून ओळखली जाते. या कुटीत एका चटईवर बसून चरख्यावर सूत विणता विणता गांधीजी येणार्या जाणार्यांसोबत संवाद साधत. स्वतंत्र कुटी मिळाल्याबरोबर गांधीजींनी आरोग्याच्या विषयात अनेक प्रयोग सुरू केलेत. आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल आजारी पडले तेव्हा त्यांच्यावर येथेच निसर्गोपचाराचे प्रयोग त्यांनी केले. आश्रमात असताना पावसाळ्याचा अपवाद वगळता गांधीजी कुटीबाहेर उघड्यावर झोपत असत. आश्रमातील कार्यकर्ते व पाहुण्यांनाही ते तसा आग्रह करत. एकदा लॉर्ड लिनलिथगो त्यांच्या भेटीसाठी आश्रमात आले. तेव्हा गांधीजींनी त्यांनाही उघड्यावर झोपण्याचा आग्रह केला. लॉर्ड लिनलिथगो यांना थंडी बाधण्याची भीती होती. मात्र असे काही होणार नाही, अशी हमी गांधीजींनी त्यांना दिली. त्यांच्या आग्रहाखातर भारताचा तेव्हाचा सर्वेसर्वा असलेला हा व्हॉईसरॉय उघड्यावर झोपला. याच लिनलिथगो यांनी गांधीजींसोबत कधीही संपर्क करता यावा म्हणून बापू कुटीत टेलिफोन लावून दिला. त्यासाठी वर्धेहून आठ किलोमीटर वायर ओढण्यात आली. कुटीसमोर पिंपळाच्या पुरातन वृक्षासमोर रोज सकाळ-सायंकाळ प्रार्थना करण्याचा परिपाठ गांधीजींनी घालून दिला. तो अजूनही सुरू आहे. १९३६ ते १९४६ ही दहा वर्षे सेवाग्राम आश्रम म्हणजे चैतन्याचा झरा होता. देश-विदेशातील शेकडो नामांकित माणसं गांधी नावाचं रसायन समजून घ्यायला येथे येत असत.२ ऑगस्ट १९४६ ला गांधीजींनी नौखाली जाण्यासाठी सेवाग्राम सोडलं तो त्यांचा आश्रमातील अखेरचा दिवस होता. जाताना लवकरच आपण परत येऊ असे सांगून गांधीजी गेले होते. मात्र नंतर नौखाली, बिहारच्या दंगली, फाळणी, स्वातंत्र्य, पुन्हा दंगली यामुळे ते बंगाल, दिल्लीतच अडकून पडलेत. नंतर थोडा निवांतपणा लाभताच २ फेब्रुवारी १९४८ ला त्यांनी सेवाग्राम आश्रमात परत जायचे ठरवले होते. मात्र नथुराम नावाच्या जनावराने ३0 जानेवारीला त्यांचा खून करून त्यांची जीवनयात्रा संपवल्याने ते कधीच परतू शकले नाहीत. गांधीजींच्या जाण्याने जवळपास दहा वर्षे चैतन्याने रसरसणारा सेवाग्राम आश्रम एका क्षणात सुन्न झाला. बधीर झाला. त्यांच्या जाण्यानंतर अजूनही त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार अनेक उपक्रम, प्रयोग येथे केले जातात. अर्थात पूर्वीचं चैतन्य आता येणे नाही. मात्र येथील प्रत्येक गोष्टीत बापूंचं अस्तित्व आजही ठळकपणे जाणवतं. ज्यांना कोणाला गांधी नावाच्या माणसात औत्सुक्य असेल, खरंच असा रक्तामासाचा माणूस झाला होता का, हे समजून घ्यायचं असेल, त्यांच्याबद्दल जसं सांगितलं जातं तसं तो महात्मा जगला तरी कसा, हे जाणून घ्यायचं असेल, तर किमान एकदा या आश्रमाला भेट द्यायलाच हवी. |