सुखविंदर कौर ते राधेमॉं:एक रंजक प्रवास

नकली संत-महाराजांचं उदंड पिक येणार्‍या आपल्या देशात सद्या राधेमॉं ही नवीन बाई महाराज प्रचंड गाजत आहे. गेल्या तीन-चार दिवसात वेगवेगळ्या वृत्त वाहिन्यांचे पडदे या राधेमॉंने व्यापून टाकले आहेत. एखाद्या सिनेनटीसारखी देखणी आणि ग्लॅमरस असलेली ही राधेमॉं आतापर्यंत पंजाब, दिल्ली, मुंबईतील आपल्या भक्तांपुरती मर्यादित होती. मात्र गेल्या मंगळवारच्या रात्री हरिव्दारच्या जुन्या आखाडय़ाने राधेमॉंना दिलेली महामंडलेश्वर पदवी लगेच परत घेतल्याने या रहस्यमयी राधेमॉंबद्दल संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली आहे. कोण ही राधेमॉं? संत वतरुळात अतिशय मानाची मानली जाणारी महामंडलेश्वर पदवी तिला तडकाफडकी मिळते कशी, आणि काही संतांच्या प्रखर विरोधानंतर ती मागे का घेतली जाते, या प्रश्नांचे उत्तरं शोधण्याच्या उत्सुकतेने राधेमॉंची जी कुंडली बाहेर आली आहे, ती मोठी वेधक आहे. आपल्याला भगवान शंकरांचं वरदान आहे आणि आपण दुर्गादेवीचा अवतार आहे, असे सांगणारी ही राधेमॉं ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’, याच परंपरेतील आधुनिक संत आहे. चटकदार खास डिझाईन करण्यात आलेली लाल साडी, मनगटावर कोपरापर्यंत लाल बांगडय़ा, कपाळावर उभा लाल टीका, लाल लिपस्टिक, लाल नेल पॉलिश आणि हातात लालच गुलाबाची लाल फुलं अशा देखण्या अवतारात स्वत:चा दरबार भरविणार्‍या राधेमॉंचे आज देश-विदेशात हजारो भक्त आहेत.

एक सर्वसामान्य तरुणी ते राधेमॉं हा तिचा प्रवास मोठा रंजक आहे. पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यातील दोरांगला या गावात 3 मार्च 1969 रोजी जन्म झालेल्या राधेमॉंचं मूळ नाव सुखविंदर कौर आहे. पंजाबच्या वीज विभागात अधीक्षक अभियंता राहिलेल्या सरदार अजितसिंह यांची ही कन्या. लहान असतांना तिला सारे ‘बब्बू’ या नावाने बोलावित. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुखविंदरचं तिच्या वडिलांनी 17 व्या वर्षीच होशियारपूरच्या मोहन सिंग या तरूणासोबत लगA लावून दिलं. हा मोहन सिंग भावाच्या मिठाईच्या दुकानात काम करे. त्यांच्या कुटुंबाचे इतरही काही व्यवसाय होते. मोहन सिंगपासून तिला दोन मुलंही झाली. संसार व्यवस्थित सुरू असतांनाच मोहन सिंग हा अधिक पैसे कमविण्यासाठी कतारची राजधानी दोह्यात गेला. तेथून सुखविंदरच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. नवरा परदेशात गेल्यानंतर तिने काही दिवस शिलाईकाम सुरू केलं. त्याचदरम्यान 1991 मध्ये ती नजीकच्याच मुकेरिया येथील परमहंस निवासातील वयोवृद्ध महंत रामदिन यांच्या संपर्कात आली. तिची देवभक्ती व समर्पणभाव पाहून त्यांनी तिला दीक्षा दिल्याचं सांगण्यात येतं. याच रामदिनबाबांनी सुखविंदरचं राधेमॉ असं नामकरण केलं. तिथेच ती काळी जादू आणि इतर प्रकार शिकल्याचे सांगण्यात येते. याच मुकेरियात तिने प्रारंभी दरबार (माता की चौकी)भरवायला सुरूवात केली. या दरबारात भक्तांच्या वेगवेगळ्या समस्यांवर उपाययोजना सांगणं तिने सुरू केलं अन् काही दिवसात बघताबघता ती माताजी झाली. मुकेरियानंतर पंजाबातील वेगवेगळ्या शहरात राधेमॉंची चौकी लागायला सुरूवात झाली. दिल्ली जवळच असल्याने दिल्लीचेही भक्त यायला लागले. अशाच एका रामभज अग्रवाल या भक्ताने राधेमॉंला दिल्लीत येण्याचा आग्रह केला. राधेमॉ दिल्लीत तीन वर्ष त्यांच्या घरी राहिल्या. तेथेही त्यांची चौकी लागायला सुरूवात झाली.

अशा या चौक्या व दरबारांची कीर्ती पसरायला आपल्या देवभोळ्या देशात वेळ लागत नाही. दरम्यानच्या काळात मुंबईतही राधेमॉंचे भक्त तयार झाले होते. 2002 मध्ये मुंबईच्या ग्लोबल अँडव्हरटायझिंगचे मालक शिव गुप्ता राधेमॉला मुंबईत घेऊन आले. राधेमॉंला मुंबईत आल्यानंतर त्यांनी पहिलं कुठलं काम केलं असेल, तर जाहिरातीच्या तंत्राप्रमाणे राधेमॉंच संपूर्ण मेकओव्हर करायला प्रारंभ केला. तोपर्यंत साधे रंगरूप असलेल्या राधेमॉंचा त्यांनी संपूर्ण कायापालट केला. त्यांनी तिला अतिशय ग्लॅमरस लुक दिला. राधेमॉंचे कपडे, दागिने, डोक्यावरचा मुकू ट, हातातला छोटा त्रिशूल, बोटातल्या सात हिर्‍यांच्या अंगठय़ा खास डिझाईनरकडून तयार करून घेण्यात आल्या. यातील बहुतांश गोष्टी लाल रंगाच्या असतील याची काळजी घेण्यात आली. त्यानंतर गोरेगावच्या मैदानात राधेमॉंच मुंबईतील पहिलं प्रेझेटेन्शन आयोजित करण्यात आलं. (त्याअगोदर गुप्तांच्या जाहिरात कंपनीने संपूर्ण मुंबईभर राधेमॉंचे होर्डिग लावून जबरदस्त वातावरण निर्मिती केली.)खास क्रेनच्याव्दारे नाटय़मयरित्या राधेमॉंला भक्तांसमोर पेश करण्यात आलं. त्यादरम्यान संपूर्ण मैदानात लाल प्रकाश सोडण्यात आला. बॅकग्राऊंडला खास तयार करून घेण्यात आलेलं ‘राधे मॉं दया करो, सर पे मेरे हाथ धरो..’ या हे गाणं वाजत होतं. या मार्केटींगला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. एका दिवसात राधेमॉंला हजारो श्रीमंत भक्त मिळाले. तेव्हापासून राधेमॉंने मुंबईतच बस्तान ठोकलं आहे. शिव गुप्तांच्याच बोरिवली येथील पाच मजली घरात त्या राहतात. त्या घराला ममतामयी राधेमॉ निवास असं नाव देण्यात आलं आहे. घराचे वरचे दोन मजले संपूर्णत: राधेमॉंच्या आणि त्यांच्या शिष्यगणांच्या ताब्यात आहे. सर्वात वरच्या मजल्यावर राधेमॉंची खास गुफा असल्याचे सांगण्यात येते. तिथे म्हणे, त्या साधना करतात. गुप्तांच्याच घरी प्रत्येक शनिवारी रात्री उशीरापर्यंत राधेमॉ चौकी भरवितात. तिथे शेकडो भक्त समस्या घेऊन येतात आणि भरभरून दान देऊन जातात.

राधेमॉं आपल्या भक्तांसोबत कधीही काहीही बोलत नाही. फक्त स्मितहास्य करत राहतात. आपल्या नातीच्या वाढदिवसी गाणे तेवढं गातात. त्यानंतर इंग्रजीत ‘भक्तो, आय लव्ह यू, फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट’ असं काहीतरी बोलतात. एरवी चेहर्‍यावर मंद हास्य ठेवून त्या भक्तांना आशिर्वाद तेवढय़ा देतात. या राधेमॉंच्या काही सवयी मोठय़ा मजेशीर आहेत. त्यांच्या चौकीत जेव्हा भक्तीसंगीत सुरू होते, तेव्हा त्या तालावर त्या मस्त थिरकतात. जोरदार नाचतात.(यु टय़ूबवर राधेमॉंचे भरपूर व्हिडीओ आहेत.) मंचावर जोरदार उडयाही मारतात. यादरम्यान हातात छोटा त्रिशूल कायम असतो. राधेमॉंचे अनेक भक्त भक्तीभावाने राधेमॉंना उचलून घेतात. त्यांना छातीशी कवटाळतात आणि नाचायला सुरूवात करतात. भक्त याला ‘राधेमॉंची कृपा’ समजतात. राधेमॉंचे पावलं जमिनीवर लागू नये म्हणून भक्त त्यांना मिठीत घेऊन एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेतात, असे सांगितले जाते. राधेमॉंची जेव्हा चौकी लागते तेव्हा त्यांच्याभोवती त्यांचे खास शिष्य म्हणविल्या जाणारे ‘छोटी मॉं’ वा ‘टल्लू बाबा’ असतात. राधेमॉंपर्यंत पोहाचायच असेल, तर या दोघांच्या संमतीशिवाय जाणे कठीण असते. छोटी मॉं म्हणून ओळखली जाणारी त्यांची ही शिष्या मुकेरन या गावातीलच आहे. 15 वर्षापूर्वी ती राधेमॉंच्या संपर्कात आली. तेव्हापासून ती सोबतच आहे. टल्लूबाबा हा राधेमॉंचा सर्वात खास सेवेदार असलेला तरूण फगवाडय़ाचा आहे. 12 वर्षापूर्वी राधेमॉं आणि छोटी मॉं फगवाडय़ाच्या दौर्‍यावर असतांना टल्लूबाबांच्या वडिलांनी राधेमॉंमुळे प्रभावित होऊन त्याला राधेमॉंच्या सेवेत ठेवल्याचे सांगण्यात येते. कुठल्याही बुवा-महाराजांप्रमाणेच राधेमॉंचेही अनेक व्हीआयपी भक्त आहेत. कॉंग्रेसचे खासदार संजय निरूपम, ख्यातनाम गायक दलेर मेहंदी, हंसराज हंस, अभिनेत्री डॉली बिंद्रा, जाहिरात विश्वातील पल्र्हाद कक्कड हे राधेमॉंच्या दरबारात नियमित हजेरी लावतात. ‘राधेमॉंची एनर्जी लेव्हल, स्पिरिच्युअल लेव्हल काही वेगळी असल्याची प्रचिती आपल्याला आली आहे’ असे कक्कड सांगतात. महामंडलेश्वर पदवीमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या राधेमॉंने आपल्याभोवती गूढ वातावरण तयार केलं आहे. त्या काहीच बोलत नसल्यामुळे त्यांच्याबाबत सर्वानाच कुतूहल आहे. फक्त इतर बंडलबाज महाराजांप्रमाणेच ‘अगर तुम भक्त हो और श्रद्धा से आए हो तो मै ज्ञान देती हू. जो तुम को ग्रहण करना है. ये स्ट्रीक भगवान का वरदान है की देवी, जो तेरी श्रद्धा से, सच्चे मनसे तेरी नऊ चौकी पे हाजिरी लगाएगा, उसकी सारी मनोकामना मै पुरी करूंगा. करता वो है, यश मेरा हो जाता है’, असं गोलमाल त्या बोलतात.’ मी काहीच करत नाही, ‘जे काही होतं ते शिव भगवान करतात’, असं सांगणार्‍या राधेमॉंची दुकानदारी सद्या चांगलीच तेजीत आहे. भारतातील इतर कुठल्याही बुवा-महाराजांप्रमाणे त्यांचंही काही बिघडण्याची सुतराम शक्यता नाही. उलट गेल्या आठ दिवसात मिळालेल्या अफाट प्रसिद्धीने त्यांचं दुकान अधिक फळण्याफुलण्याचीच दाट शक्यता आहे.
                                                  महामंडलेश्वर पदवीसाठी वाट पहावी लागणार 
हरिव्दारच्या दशनामी आखाडय़ाने राधेमॉंला गेल्या मंगळवारच्या रात्री ‘महामंडलेश्वर’ ही पदवी प्रदान केली होती. आखाडा परंपरेत महामंडलेश्वर या पदवीला अतिशय महत्व आहे. हिंदू धर्मपरंपरेचं कसोशीने पालनं करणार्‍या आणि प्रचार करणार्‍या संतांना ही पदवी दिली जाते. देशात सद्या 80 संतांजवळ ही पदवी आहे. या संतांनी आद्य शंकराचार्यांचं वैदिक धर्म प्रसाराचं काम करावं, असं अपेक्षित असते. हिंदूंच्या कुठल्याही मोठय़ा धार्मिक आयोजनात महामंडलेश्वरांना मोठा मान असतो. कुंभमेळ्यादरम्यान हत्ती किंवा रथावर स्वार होऊन हे महामंडलेश्वर साधूंसोबत शाही ह्यानाला जातात. फारच कमी महिला संतांना ही पदवी बहाल केली जाते. राधेमॉंला ही पदवी दिल्यानंतर त्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर राधे गुरू मॉं गिरीजी महाराज या नावाने ओळखल्या जाणार होत्या. मात्र मध्यरात्री तडकाफडकी त्यांना महामंडलेश्वर घोषित केल्याने संतवतरुळात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. राधेमॉं या पदवीसाठी लायक नाही, असा आक्षेप, जुना आखाडय़ाचे महामंत्री हरि गिरी यांच्यासह अनेकांनी घेतला. त्यानंतर लगेचच राधेमॉंची पदवी परत घेण्याची घोषणा करण्यात आली. आता संतांची एक समिती गठित करण्यात आली असून तीन महिन्याच्या अभ्यासानंतर ते राधेमॉंला महामंडलेश्वर पदवी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतील.महामंडलेश्वर पदवीसाठी वाट पाहावी लागणार 

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक आहेत.)

मो.8888744796

     

Scroll to Top