सावित्रीबाई, तुझ्या लेकींना खरंखुरं आत्मभान मिळू दे!

आदरणीय सावित्रीबाई
विनम्र अभिवादन!

आज तुझी जयंती. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आज तुझ्या  कर्तृत्वाची उजळणी होईल. तुझ्या  हयातीत  तुझं कधी कौतुक झालं नाही. उलट दगडधोंडे, शेण आणि निर्भर्त्सनाच तुझ्या  वाटय़ाला आली. आता एवढय़ा वर्षानंतर तुझं मोठेपण आम्हाला प्रकर्षाने जाणवतंय. इतिहासाच्या पानात सहज डोकावलं तरी तू  किती मोठं काम करून गेली  आहे , हे लक्षात येतं. काळाचे काटे उलटे फिरविण्याचं काम तू  तेव्हा 164 वर्षापूर्वी केलं. ज्या व्यवस्थेने येथील महिला व शूद्रांना माणूस म्हणून सारे अधिकार नाकारले होते, त्यांच्यासाठी तू  शिक्षणाची दारं उघडली. आज एवढय़ा वर्षानंतर तेव्हाचं ते दृष्य कल्पनेनं जरी डोळ्यासमोर आणलं तरी अंगावर काटा उभा राहतो.

 
 मानवी इतिहासात काही प्रसंग अमीट ठसा उमटवून जातात, त्यातला हा प्रसंग आहे. ज्या संस्कृतीचे गोडवे येथील काहीसमूह नेहमी गातात त्या समूहाने नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येला जाणीवपूर्वक शिक्षणाचा गंधही लागू दिला नव्हता. त्यांच्या जीवनात एका दिवसात तू  आणि ज्योतिबांनी क्रांती घडविली. जगात अशी क्रांती आजपर्यंत झाली नाही. तुझ्या त्या एका कृतीने संस्कृती-परंपरांचं लाखो वर्षाचं ओझं एका क्षणात उतरलं. हजारोंना आत्मभान मिळालं. त्यानंतर इतिहास घडला. समाजजीवनाच्या सार्‍या क्षेत्रांत आज तुझ्या लेकींनी आपला झेंडा रोवला. जमिनीपासून अंतराळापर्यंत असं कुठलंही क्षेत्र नाही की, जेथे तुझ्या  लेकी आज आढळत नाहीत. हे सारं घडू शकलं केवळ तुझ्यामुळे. हे सारं अभिमानास्पद आहे. तुझ्याबद्दल कृतज्ञतेने ऊर भरून यावं असंच आहे.

पण सावित्रीबाई, एक खंतही आहे. सनातनी आणि पुरुषप्रधान व्यवस्थेला आव्हान देत तू  महिलांना शिक्षणाचं, विचार करण्याचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य  मिळवून दिलं खरं, मात्र तुझ्या अनेक लेकींना तू किती मौल्यवान ठेवा पदरात टाकला याची जाणच नाही. तुझ्या कार्यकर्तृत्वामुळे त्या शिकल्या खर्‍या, पण त्यांच्या मेंदूची कवाडं अजूनही बंदच आहेत. त्यामुळे शिकल्यासवरल्या म्हणविणार्‍या अनेक महिला अजूनही विद्येची देवता म्हणून सरस्वतीला पुजतात तेव्हा त्यांची दया येते. सरस्वतीचं शिक्षणाच्या विषयात काय योगदान हा प्रश्नही सरस्वतीला पुजताना त्यांच्या डोक्यात कधी येत नाही. तुझ्यामुळे त्या शिकल्यात, नोकरीला लागल्यात, उद्योगधंदा करताहेत मात्र अजूनही विचार करणं काही त्या शिकल्यात, असं वाटत नाही. मध्यंतरी एका सामाजिक संस्थेने एक सर्वेक्षण केलं होतं. महिला कोणाला आदर्श मानतात, याची ती पाहणी होती. खेदाची गोष्ट सावित्रीबाई, त्या पाहणीत सिनेनटय़ांना जास्त मतं मिळालीत. अशा सर्वेक्षणांची विश्वासार्हता बाजूला ठेवली तरी तुझ्या कार्याबद्दल, तुझ्या संघर्षाबद्दल अजूनही 90 टक्के महिलांना जाण नाही.. सावित्रीबाई, शिक्षणाच्या अभावासोबत अंधश्रद्धांचं जोखड महिलांच्या गुलामगिरीस कारणीभूत आहे, असं तू सांगायची . पण शिकलेल्या महिला सुद्धा अजून त्यातून बाहेर यायला तयार नाहीत. उच्चशिक्षित म्हणविणार्‍या महिलाही सत्यनारायणाची पूजा करताना, चतुर्थीचे उपवास करताना आणि एखाद्या ज्योतिषासमोर हात पसरताना दिसतात, तेव्हा असं वाटते सावित्रीबाई, यासाठीच काय तू  दगडधोडय़ांचा मारा सहन केला?

सावित्रीबाई, अनेकदा असं वाटतं तुझ्यामुळे खूप सहजासहजी आमच्या महिलांना स्वातंत्र्य मिळालं. त्यांना स्वत:ला यासाठी काही झगडावंच लागलं नाही. त्यामुळे त्याचं मोलही त्यांना कळत नाही. शेजारच्या मुस्लिम देशांमध्ये बुरख्याआडच्या स्त्रियांना मूलभूत अधिकारासाठी झगडावं लागत असताना येथील संविधानाने सारे अधिकार दिलेत. मात्र ते अधिकार कसे वापरायचे हे काही त्या शिकल्या नाहीत. तू  , ज्योतिबा किंवा इतर महापुरुष मार्ग दाखवू शकता. मात्र चालायचं आपलं आपल्यालाचं असतं. महिलांनी शिकायचं कशासाठी? एक महिला शिकली, तर सारं कुटुंब शिकतं. कुटुंबावर संस्कार होतात. उत्तम समाजाची निर्मिती होते, असं तू  मानायची . पण सावित्रीबाई, सारंच बदललं आहे. एकीकडे तुझ्या अनेक लेकी संघर्षातून आपली नवीन वाट निर्माण करत असतानाच तुझ्या बर्‍याच शिकल्यासवरलेल्या लेकींची प्रायोरिटी बदललेली दिसतेय. त्या पुरुषांची भ्रष्ट नक्कल करताना दिसतात. जेवढय़ा अधिक शिकलेल्या स्त्रिया तेवढय़ा त्या अधिक आत्मकेंद्रित झालेल्या दिसतात. त्यांचं भावविश्व आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या कल्पना काही वेगळ्याच आहेत. आपलं करिअर, महागडय़ा साडय़ा, गाडय़ा आणि पाटर्य़ा हेच त्यांचं विश्व आहे. श्रीमंतांच्या दिवाणखान्यातील अन्य शोभेच्या वस्तूंएवढीच आपली किंमत आहे, याचं भान त्यांना नाही. एक मोठा स्त्रियांचा वर्ग अजूनही उपेक्षित, पिचलेला आणि अन्यायाने ग्रस्त आहे. आपला मदतीचा हात त्यांचं आयुष्य बदलू शकतो, हे त्यांच्या गावीही नाही. तुझ्या  जयंतीनिमित्त तुझ्या सार्‍या लेकींना तुझं कार्य आणि कर्तृत्व नेमकेपणाने समजून घेण्याची जाण यावी आणि तुझा वारसा त्यांनी अधिक सशक्तपणाने चालवावा, हीच अपेक्षा आहे.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी – 8888744796

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top