अभिनव भारत संघटनेने गांधी हत्येची नव्याने चौकशी करा़ अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे़ यानिमित्ताने पुन्हा एकदा इतिहासाची पानं खंगाळली जात असेल, तर चांगलंच आहे़ त्यातून देशातील जनतेला सत्य काय आहे, हे कळलं तर आनंदच आहे़. आता आपल्या विचारांचं सरकार असताना सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग नाही, असे न्यायालयाच्या वा सरकारने गठीत केलेल्या आयोगाच्या तोंडून सावरकरवाद्यांना अधिकृतपणे वदवून घ्यायचं आहे़ मात्र याहीवेळेस एक ‘गांधी’ त्यांच्या आड येणार आहे़.
…………………………………………………………………………………………………………………………………..
सावरकरवाद्यांची खदखद अखेर बाहेर पडली़. सावरकरांचे विचार
प्रमाण मानून त्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या अभिनव भारत संघटनेने गांधी हत्येची नव्याने चौकशी करा, त्यासाठी नवीन आयोग स्थापन करून गांधीहत्येमागील कारस्थानामागे कोण होते याचा शोध घ्यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे़. गांधीहत्येमागचं कारस्थान, त्यामागचे कर्तेधर्ते केव्हाच जगासमोर आले असताना अभिनव भारत संघटनेमध्ये आता एकदम गांधी हत्येमागील कारस्थानाचा शोध घेण्याची धडपड का निर्माण झाली का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो़. गांधी हत्येमागील कारस्थानाची सखोल चौकशी करणाऱ्या जीवनलाल कपूर आयोगाने गांधीहत्येत सावरकरांचा सहभाग असल्याचे निसंदिग्धपणे नोंदवून ठेवले आहे़. तो उल्लेख वगळण्यात यावा आणि सावरकरांवरील कलंक दूर व्हावा, ही त्यांची याचिकेतील मुख्य मागणी आहे़ ही मागणी लक्षात घेतली, तर ‘अभिनव भारत’ची धडपड कशासाठी आहे, हे लगेच लक्षात येतं. अर्थात सावरकरवाद्यांची तगमग आणि धडपड समजण्याजोगी आहे़. एनडीए सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सावरकरांची प्रतिमा संसदेत लागली़ अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांचं स्मारकही उभारण्यात आलं. आताच सरकार त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याबाबतही विचार करत आहे़. सावरकरांची महानता देशातील जनसमूहावर ठसविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे़. असे असताना गांधीहत्येचा सखोल अभ्यास करणारे तटस्थ चिकित्सक व संशोधक मात्र काहीही झालं तरी सावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक कधीच पुसला जाणार नाही, हेच सांगतात़ सावरकरवाद्यांचं मूळ दुखणं हे आहे़.
गांधीहत्या, त्यामागील कारस्थान, गुन्हेगार हे सारं केव्हाच इतिहासजमा झालं असताना हा विषय आता नव्याने का समोर आला याची कहाणी मोठी रंजक व समजून घेण्याजोगी आहे़ ‘आम्ही सारे’ फाऊंडेशन या संस्थेने फेब्रुवारी २०१५ मध्ये सेवाग्राम येथे ‘गांधी समजून घेताना़…’असे एक शिबीर आयोजित केले होते़. त्या शिबीरात गांधीजींचे पणतू व सुप्रसिद्ध लेखक तुषार गांधी यांनी ‘गांधीहत्येमागील षडयंत्राची कहाणी’ या विषयावर बोलताना गांधीहत्येची सुनावणी ज्यांच्या विशेष न्यायालयात झाली त्या न्यायमूर्ती आत्माचरण दास यांच्या निकालपत्रातील तपशील आणि कपूर आयोगाचे निष्कर्ष याची सविस्तर माहिती देताना गांधीहत्येत सावरकर व आरएसएसच्या लोकांचा कसा सहभाग होता, हे अतिशय जबाबदारीने मांडले़. त्या शिबीराला सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक आणि सावरकरांचे विचार बाजूला ठेवून देशाला एकही पाऊल पुढे टाकता येणार नाही, अशी मांडणी करणारे अभ्यासक, लेखक शेषराव मोरेही उपस्थित होते़. तुषार गांधी यांची मांडणी ऐकताना ते प्रचंड उद्विग्न झालेले दिसत होते़. त्यांचे भाषण संपल्यानंतर ते म्हणाले, ‘हा माणूस चुकीची मांडणी करतो आहे़ गांधीजींचा पणतू असल्याने भावनिक होऊन तो काहीही सांगतो आहे़’ . यावर उपस्थित शिबीरार्थीनी, ‘तुषार गांधी यांनी अनेक पुरावे देऊन हा विषय मांडला आहे़ तुम्ही पुरावे देऊनच हे खोडून काढा’, अशी विनंती त्यांना केली़. तेव्हा मोरेंनी मी सविस्तर पुस्तक लिहून तुषार गांधींनी सावरकरांवर केलेले आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करेल, असे सांगितले़. मात्र त्यावेळी ते चांगलेच अस्वस्थ झाल्याचे जाणवत होते़. त्यानंतर काही काळातच अंदमान येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली़. त्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोरेंनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली़. ‘महात्मा गांधी यांच्या हत्येत जर सावरकर यांचा हात होता, असं जर कोणी म्हणत असेल, तर त्याच्याविरूद्ध फौजदारी खटला दाखल केला पाहिजे’, असे औचित्यहिन वक्तव्य त्यांनी तेथे केले. त्यानंतर पुढे पुणे, यवतमाळ, अमरावती, नागपूर येथेही त्यांनी तशी मागणी केली़. न्यायालयाने १९४९ मध्येच सावरकरांची निर्दोष मुक्तता केली असताना कपूर आयोगाच्या निष्कर्षावरून सावरकरांना दोषी ठरविणे चुकीचे आहे, असे मोरेंचे म्हणणे आहे़. दुसरीकडे तुषार गांधी महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिरून गांधीहत्येत सावरकर व आरएसएसचा हात आहेच, हे पुराव्यांसह सांगत आहे़. तुषार गांधी यांनी याविषयात ‘लेटस् किल गांधी’ हे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे़. हे पुस्तक येऊन आता जवळपास नऊ वर्ष झालेत़. पुस्तकाची अभ्यासक व चिकित्सक वाचकांमध्ये जोरदार चर्चा झाली़ मात्र सर्वसामान्य माणसांपर्यंत हे पुस्तक गेलं नव्हतं. मात्र जेव्हापासून तुषार गांधींनी महाराष्ट्रभर फिरून गांधीहत्येचा कट आणि त्यातील सावरकर व आरएसएसचा सहभाग लोकांना सांगणे सुरू केले़ तेव्हापासून हिंदुत्ववादी व सावरकरप्रेमी प्रचंड अस्वस्थ आहेत़. नागपुरात तुषार गांधींच्या भाषणानंतर ‘ अभिनव भारत’च्या कार्यकत्र्यांनी त्यांचा पुतळा जाळला होता़. इतर ठिकाणही त्यांना विरोध झाला़. काँग्रेसचे एजंट म्हणून त्यांना हिनविणे सुरू झाले़. इतरही वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे प्रतिमाभंजन करण्याचे प्रकार सुरू आहेत़ मात्र असे असूनही त्यांच्या ठिकठिकाणच्या व्याख्यानांना प्रचंड गर्दी लोटत आहे़. त्यामुळे आता तुषार गांधी ज्या कपूर आयोगाचा हवाला देऊन सावरकरांवर आरोप करतात, त्या आयोगाच्या निष्कर्षातून सावरकरांचे नाव वगळण्यासाठी अभिनव भारतची ही याचिका आहे़. खरं तर हा प्रयत्नच अतिशय हास्यास्पद आहे़.
जीवनलाल कपूर आयोगाच्या अहवालात सावरकरांना गांधीहत्येच्या प्रयत्नाची कल्पना होती व त्यांचा त्या कटात सहभाग होता, याचे अनेक पुरावे नोंदविले असले तरी तत्कालिन किंवा नंतरच्या कुठल्या सरकारने त्या अहवालावरून काही कारवाई केली, अशातला भाग नाही़. कपूर आयोगाचा अहवाल १९६९ मध्ये प्रसिद्ध झाला़. सावरकरांचं निधन १९६६ मध्ये झालं. त्यामुळे केवळ अभ्यासकांच्यासाठी तो अहवाल उरला़. बस एवढंच़. त्यामुळे सावरकरवाद्यांनी खरं तर अस्वस्थ होण्याचे कारण नाही़. मात्र इतिहासातील पापं कुठल्याही फॅसिस्टांना अस्वस्थ करत असतात़. त्यामुळे आपल्याविरूद्ध जे काय पुरावे असतील त्याचे नामोनिशान मिटवून टाकायचं, हा त्यांचा प्रयत्न असतो़. हायकोर्टातील याचिका हा याच प्रयत्नाचा भाग आहे़. पण काय काय मिटवणार, कसे मिटवणार? गांधीहत्येच्या खटल्यात सावरकरांविरूद्ध असलेल्या साक्षी व पुराव्यांना दुजोरा वा पुष्टी न मिळाल्याने केवळ तांत्रिक कारणांमुळे ते निर्दोष सुटले आहेत़ .गांधी खून खटला व जीवनलाल कपूर आयोगाच्या अहवालाच्या कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केल्यास कुठलाही तटस्थ माणूस याच निष्कर्षावर पोहोचतो़. ३० जानेवारी १९४८ ला गांधीजींचा खून झाला़ त्याअगोदर २० जानेवारीला त्यांच्या प्रार्थनासभेत बॉम्बस्फोट झाला़ त्या प्रकरणात मदनलाल पाहवाला अटक करण्यात आली होती़. पोलीसांना दिलेल्या जबानीत त्याने आपण सावरकरांना भेटूनच दिल्लीत आलो होतो, असे स्पष्ट सांगितले होते़. तपास अधिकारी जमशेट नगरवाला यांनी तेव्हाचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांना सावरकरांना अटक करण्याची परवानगी मागितली होती़. मात्र सावरकरांचं मराठी जनमानसातील स्थान लक्षात घेऊन मोरारजींनी त्यांना नकार दिला होता़. भाजपाने आता खासदार केलेल्या स्वपन दासगुप्ता या ज्येष्ठ पत्रकाराने २०१२ मध्ये टीव्हीवरील एका चर्चेत बोलताना , भाजपा नेते लालकृष्ण अडवाणींचा संदर्भ देऊन ‘मोरारजी देसाईंच्या माहितीनुसार सावरकर गांधी हत्येच्या कटात सामील होते’, अशी माहिती अडवाणीजींनी आपल्याला दिली होती, असे सांगितले होते़. गांधीहत्येच्या खटल्यातील सुनावणीतही नथुराम गोडसे व नारायण आपटे गांधीहत्येच्या काही दिवस अगोदरपर्यंत सावरकरांना वारंवार भेटत होते, ही बाब समोर आली आहे़. या प्रकरणातील एक आरोपी दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार झाला होता़. त्याची तपशीलवार उलटतपासणी केल्यानंतर न्यायालयाने त्याला विश्वासार्ह माफीचा साक्षीदार करून घेण्यास होकार दिला होता़. त्याने आपल्या साक्षीत १५ जानेवारीचा १९४८ चा एक प्रसंग सांगितला आहे़. ‘दीक्षितजी महाराजांच्या देवळाच्या आवारात नारायण आपटेने आपल्याला सांगितले की, तात्याराव सावरकर म्हणाले की, गांधीजींना संपविलेच पाहिजे़. आणि ही जबाबदारी त्यांनी आमच्यावर सोपविली़’ . १७ जानेवारीचा आणखी एक प्रसंग सांगताना बडगेने न्यायालयाला सांगितले की, ‘त्यादिवशी नथुरामने आम्हाला सांगितले की, दिल्ली जाण्यापूर्वी सावरकरांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी आपण जाऊ़. त्यानुसार ते सगळे सावरकर सदनात गेले़. तेथे बडगेला तळमजल्यावर वाट पाहायला सांगून गोडसे व आपटे पहिल्या मजल्यावर गेले़ १० मिनिटांनी परत आल्यानंतर तात्यारावांनी आपल्याला यशस्वी होऊन या, असा आशिर्वाद दिल्याचे त्या दोघांनी आपल्याला सांगितले़. तात्यारावांनी असे भविष्य केले आहे की, गांधीजींची शंभर वर्षे भरली़ आता आपले काम निश्चित होणार, यात शंका नाही़’ .बडगेने असे अनेक प्रसंग सांगितले़. मात्र सावरकर आणि गोडसे-आपटेंच्या भेटीतील चर्चेबाबत बडगेने जे सांगितले , त्याला दुजोरा देणारी दुसरी कोणाची साक्ष नाही, केवळ एवढ्या तांत्रिक कारणावरून सावरकरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली़. खरं तर पुढे कपूर आयोगासमोर सावरकरांचे अंगरक्षक आप्पाराप कासार आणि सचिव गजानन दामले यांनी साक्ष नोंंदविली तेव्हा त्यांनीही बडगेने सांगितलेल्या माहितीला दुजोरा दिला होता़ बडगेने ज्या तारखा सांगितल्या त्या तारखांना ते सावरकरांना भेटायला आले होेते़ एवढेच नव्हे, तर ते अनेकदा सावरकरांकडे सल्लामसलतीसाठी येत असतं, हेही सांगितले होते़. कागदपत्रात असे अनेक पुरावे सावरकरांच्याविरोधात आहे़ अर्थात सावरकरप्रेमींना ते मान्य नाहीत़. हे सारे पुरावे खोडून काढण्यासाठी ही याचिका आहे़. मात्र यानिमित्ताने पुन्हा एकदा इतिहासाची पानं खंगाळली जात असेल तर चांगलंच आहे़. त्यातून देशातील जनतेला सत्य काय आहे, हे कळलं, तर आनंदच आहे़. आता आपल्या विचारांचं सरकार असताना सावरकरवाद्यांना गांधीहत्येत सावरकरांचा सहभाग नाही, असे न्यायालयाच्या वा सरकारने गठीत केलेल्या आयोगाच्या तोंडून अधिकृतपणे वदवून घ्यायचं आहे़. मात्र याहीवेळेस एक ‘गांधी’ त्यांच्या आड येणार आहे़. तुषार गांधी यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे जाहीर केले आहे़. आपल्याला या प्रकरणात आपले म्हणणे मांडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ते न्यायालयाकडे करणार आहेत़.