साध्या माणसांच्या मोठय़ा कहाण्या

सत्ता कोणतीही असो, धार्मिक सत्ता, आर्थिक सत्ता, दंड सत्ता.. ती गाजविणार्‍या माणसाचा एक रुबाब असतो. त्यातही ती राजकीय सत्ता असली की, विचारूनका. सरकारी लाल दिव्याची गाडी, शासकीय बंगला, पोलीस बंदोबस्त, वीज, पाणी, टेलिफोन आदी अनेक सुविधा एकदम फुकट. शब्द झेलायला शेकडो शासकीय नोकर, नजर टाकली की, रांगायला तयार असलेली मेंढरंरूपी माणसं…अशा अनेक सोयीसुविधांमुळे आपल्याकडे नेते सत्ता मिळविण्यासाठी मरमर करतात. सत्तेचं दुसरं नावचं जणू उपभोग असावं, असंच सत्तेवर असणार्‍या माणसांचं वागणं असतं. त्यामुळेच कदाचित ‘सत्ता भोगणं’, असा वाक्यप्रचार प्रचलित झाला असावा. 


 आपल्या देशाला अशा उपभोगाची हजारो वर्षांची प्रदीर्घ परंपराच आहे. सत्तेकडे पाठ फिरविणारे गौतम बुद्ध, प्रभू रामचंद्र आणि उपभोगशून्य स्वामी म्हणून ओळखले जाणारे शिवाजी महाराज, असे काही मोजके अपवाद सोडलेत, तर पोथी-पुराणातील सारे राजे-नवाब आणि संस्थानिकांची वर्णनं सुखोपभोगात चिंब भिजलेले राज्यकर्ते, अशीच आहे. अशा ‘भोगी’ राज्यकर्त्यांच्या देशात एखादा अरविंद केजरीवाल सत्तेसोबत येणारी गाडी, बंगला, पोलीस अशा सार्‍या सुविधा नाकारतो, त्याची स्वाभाविकच बातमी होते. अर्थात अशा प्रकारचे वागणारे केजरीवाल हे काही पहिलेच राज्यकर्ते नाहीत. सत्ता हे सुखोपभोगाचं साधन आहे, असं मानणार्‍यांची संख्या प्रचंड असली, तरी सत्तेचा उपयोग स्वत:साठी न करता समाजातील शेवटच्या माणसाच्या उत्थानासाठी करायचा असतो, याचं भान ठेवणार्‍यांचीही संख्या देशात कमी असली, तरी आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांचाच विचार केला, तर त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्याबद्दल सांगता येईल. ते १४ वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. सायकलवरून रोज ते मंत्रालयात येतात. त्यांच्या बँक खात्यात जमा असलेले २,३00 रुपये पकडून त्यांच्याजवळची चल-अचल संपत्ती केवळ अडीच लाखाची आहे. ४३२ स्क्वेअर फुटाच्या जागेत टीनपत्र्याचं शेड घातलेलं त्यांचं घर आहे. देशातील सर्वात ‘दरिद्री मुख्यमंत्री’ असा त्यांचा लौकिक आहे. मुख्यमंत्री म्हणून जे काही मानधन, भत्ते त्यांना मिळतं, ते सारं पक्ष निधीत जमा करून लोकांसाठीच त्याचा उपयोग ते करतात. केजरीवालांसारखेच आयआयटीयन असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकरही साध्या वागण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. तेसुद्धा कुठलाही शासकीय तामझाम न बाळगता जनतेत मिसळतात. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही अशाच आहेत. मुख्यमंत्री बंगल्याऐवजी काली घाट परिसरातील आपल्या जुन्या घरात त्या राहतात. खासगी कामासाठी अजूनही मारुती झेन ही स्वत:ची गाडी त्या वापरतात. केंद्रीय रेल्वेमंत्री असतानाही त्या शासकीय गाडीचा वापर करत नसत.

राजकारणात हा साधेपणा बाळगणार्‍या बहुतेक नेत्यांचे आदर्श हे अर्थातच महात्मा गांधी आहेत. भारताचे निर्माते म्हणून ओळखले जाणार्‍या गांधीजींच्या दीर्घ राजकीय आयुष्याकडे नजर टाकली तर लक्षात येतं की, त्यांचं सारं आयुष्य आश्रम, तुरुंग किंवा रेल्वे असं तीनच ठिकाणी गेलं आहे. या तीनही ठिकाणी माणसांची अफाट गर्दी असायची. त्यामुळे खासगी असं काही नसायचंच. महात्माजींचा रेल्वेतला प्रवासही तिसर्‍या वर्गातून होत असे. त्यांचा आहार आणि कपडेही साधेच असायचे. गांधींचे प्रिय शिष्य जवाहरलाल नेहरूंच्या आवडीनिवडी मात्र सुखोपभोगाकडे झुकणार्‍या होत्या. त्यांना जगातील सर्व चांगल्या गोष्टी आवडायच्या. नेहरू गांधींना आश्रमात भेटायला आले म्हणजे, त्यांना साखर घातलेला चहा द्यायचा, असे गांधीजी कस्तुरबांना सांगायचे. आश्रमात नेहरूसाठी कमोडचीही व्यवस्था केली जायची. पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या निवासासाठी शंभर खोल्यांचं तीन मूर्ती भवन निवडलं होतं. नेहरूंप्रमाणेच पाकिस्तानचे निर्माते महम्मद अली जीना यांनाही शानशौकीचं जीवन आवडायचं. ते गरीब मुसलमानांचे नेते असले तरी त्यांचं राहणं मात्र संस्थानिकांसारखं असायचं. मुंबईत मलबार हिलला त्यांचा जिना हाऊस म्हणून मोठा बंगला होता. (अजूनही आहे.) ते आणि त्यांची बहीण फातिमा असे दोघेच त्या बंगल्यात राहत असले, तरी नोकरांची संख्या मात्र २५ होती. जिना कधीही फस्र्ट क्लासशिवाय प्रवास करायचे नाहीत. खाण्यापिण्याच्या विषयातही ते फार चोखंदळ होते. वाईन आणि मांसाहार त्यांना रोज लागायचाच. लोकांमध्ये फार मिसळायलाही त्यांना आवडायचं नाही. तरीही ते प्रचंड लोकप्रिय होते. जीना, नेहरूंचा अपवाद सोडला, तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा पहिल्या काही दशकातील नेत्यांचं वागणं साधेपणाकडे झुकणारंच होतं. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद, नेहरूनंतरचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, गृहमंत्री वल्लभभाई पटेल कमालीचे साधे राहायचे. राजेंद्र प्रसादांनी राष्ट्रपती भवनातील केवळ एक खोली स्वत:साठी ठेवली होती. (भारतर▪एपीजे अब्दुल कलामही आपल्या कार्यकाळात असेच वागले. राष्ट्रपती भवनातील सारे वायफळ खर्च त्यांनी बंद केले होते. स्वत:च्या नातेवाईकांच्या आतिथ्याचा खर्चही त्यांनी राष्ट्रपती भवनाच्या कोषागारात जमा केला होता.) लालबहादूर शास्त्रींनी तर कुटुंबासाठी काहीही मागे ठेवलं नव्हतं. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला नोकरीसाठी वणवण फिरावं लागलं. तीच गोष्ट वल्लभभाईंची. त्यांच्या मृत्यूच्यावेळी ते काँग्रेसचे कोषाध्यक्षही होते. त्यांच्याजवळ पक्षाला मिळालेली ३५ लाख रुपये देणगी होती. ते सारे पैसे त्यांनी आपली मुलगी मनुबेन पटेलजवळ देऊन नेहरूंना द्यावयास सांगितले. पटेलांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीची खूप परवड झाली. पैशाअभावी तिच्या शेवटच्या आजारपणात तिला उपचारही मिळाले नाही. अहमदाबादच्या रस्त्यावर तिचा मृत्यू झाला.

स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या काही दशकात केवळ गांधीवादीचं नव्हे, तर समाजवादी, साम्यवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सार्‍याच संघटनांचे नेते साधेपणानेच वागायचे. तेव्हा साधेपणा हे जगण्याचं मूल्यचं मानलं जायचं. साम्यवादी पक्षाचे सारे खासदार, आमदार लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारं सारं वेतन, भत्ते पक्षाकडे जमा करायचे. विशेष म्हणजे अजूनही ते तसेच करतात. या बदल्यात पक्ष त्यांचा सारा वैयक्तिक खर्च करतो. त्यासाठी महिन्याला एक ठरावीक रक्कम त्यांना दिली जाते. गमतीने असं म्हटलं जातं की, साम्यवादी खासदारांची एकमेव कुठली चैन असेल, तर ती म्हणजे सिगारेट. दिवसभर बौद्धिक चर्चा करत असल्याने कदाचित त्यांना सिगारेट लागत असाव्यात. आज सर्वांत श्रीमंत पार्टी अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे (तेव्हाचा जनसंघ) नेतेही तेव्हा खूपच साधेपणाने जगायचे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांना पक्ष कार्यालयात स्वत:चे कपडे धुतांना अनेकांनी पाहिले आहेत. भाजपा नेत्यांची वागणूक, संस्कृती प्रमोद महाजनांनी बिघडवली, असे भाजपा कार्यकर्ते सांगतात. ते खरंही आहे. एका साध्या शिक्षकाचा मुलगा व एकेकाळी संघाचे प्रचारक असलेल्या महाजनांच्या डोक्यात दिल्लीतील सत्ता एवढी भिनली की, त्यांना संघ परिवाराच्या सर्व तत्त्वं, मूल्यांचा विसर पडला. पुढे त्यातच त्यांचा बळी गेला. समाजवाद्यांमध्ये तर साधेपणाने वागणार्‍यांची लांबच लांब यादी आहे. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, नरेंद्र देव, अशोक मेहता, मधू लिमये, मधू दंडवते, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, जॉर्ज फर्नांडिस, असे कित्येक नावं सांगता येतात. जॉर्ज फर्नांडिस देशाचे संरक्षणमंत्री असतानाही त्यांच्या बंगल्यावर कुठलीही सुरक्षाव्यवस्था नसे. त्यांच्या बंगल्याची दारे लोकांसाठी २४ तास उघडी राहत. महाराष्ट्रालाही ही साधेपणाची परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अतिशय साधेपणाने राहत. ते गेले तेव्हा त्यांच्या पासबुकात फक्त तेरा हजार रुपयांची शिल्लक होती. एक बहुमोल संपत्ती मात्र त्यांनी जपून ठेवली होती. ती होती वेगवेगळ्या विषयांवरील ५0 हजार पुस्तकं. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असाच साधा माणूस. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धोतर-बंडी घालून सातार्‍या, सांगलीसोबतच्या माणसासोबत गप्पा रंगविणारे दादा अजूनही अनेकांना आठवतात. एस. एम. जोशी, दत्ता पाटील, मृणाल गोरे, गणपत देशमुख हे तेव्हाचे दिग्गज विरोधकही याचं परंपरेतले. या नेत्यांना एसटीने फिरण्यात कधी लाज वाटली नाही. विदर्भातही असे बरेच नेते होऊन गेलेत. माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवारांना लोकांनी मुख्यमंत्रिपदावरून बाजूला झाल्यानंतर एसटीने प्रवास करताना पाहिलं आहे. सुदामकाका देशमुख, रामचंद्र घंगारे, पंढरीनाथ पाटील, सदाशिवराव ठाकरे अशी इतरही अनेक नावे सांगता येतील. तब्बल ३0 वर्षे विधानपरिषद गाजविलेल्या बी. टी. देशमुखांनीही साध्या व पारदर्शक वागणुकीचा आदर्श घालून दिला आहे. आयुष्यात मिळविलेला प्रत्येक पैसा कुठून आला आणि कुठे खर्च झाला, याचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा मतदारांसमोर सार्वजनिक करणारा हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे.(येथे एक गोष्ट मात्र सांगितली पाहिजे. साधे वागणारे सारेच नेते दूरदृष्टीचे व देशाला दिशा देणारे वगैरे असतात असे नाही. सोबतच चांगलं आयुष्य जगण्याची आवड असणारे सारेच नेते अय्याश असतात, असंही नाही. पंडित नेहरूंसारख्या अनेक नेत्यांनी देशाच्या प्रगतीचा पाया घातला हे विसरता येत नाही.)

केजरीवालांच्या निमित्ताने या सार्‍या साधेपणाने वागणार्‍या नेत्यांचं स्मरण झालं असलं तरी एकंदरीत नेत्यांच्या भाऊगर्दीत हे असं वागणार्‍यांची संख्या एखादा टक्काच आहे. बाकी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये ४0 लाखांची गाडी घेऊन फिरणारे आणि सरकारी सोयीसुविधांचा लाभ घेऊन, फुकटचा रुबाब झाडणारेच आहेत. याउलट चित्र परदेशात आहे. तिथे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान वा मंत्री सामान्य माणसापेक्षा वेगळा वागताना सहसा आढळत नाही. तेथील जनताही त्यांना काही वेगळी ट्रीटमेंट देत नाही. त्यामुळेच सर्वशक्तिमान अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सहजपणे आपल्या उपाध्यक्षाला घेऊन अध्यक्ष कार्यालयासमोरच्या रेस्टारंटमध्ये पिझ्झा खाताना आणि स्वत:चं बिल स्वत: देतानाही दिसतो. इतर नागरिकांप्रमाणेच वर्षाच्या शेवटी कुटुंबासोबत १५ दिवसांची सुटी घेतानाही तो दिसतो.तेथे त्याकडे कोणी नवलाने पाहत नाही. अमेरिकेचेच माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आता वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून जात असतात. पण त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला कुठे काही बाधा येत नाही. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना काही वर्षांपूर्वी जेव्हा पद सोडावे लागले, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांसारखे ते मेट्रोने घरी गेले होते. परदेशात या गोष्टी काही वेगळ्या मानल्याच जात नाही. स्वित्झर्लंडमध्ये कुठल्याही मंत्र्याला वाहन वा सुरक्षा व्यवस्था नसते. ते रेल्वे वा बसने आपल्या कार्यालयात येतात. न्यूझीलंडमध्ये पंतप्रधान सर्वसामान्यांप्रमाणे मार्निंग वॉकला दिसलेत, तर कोणाला आश्‍चर्य वाटत नाही. ज्या ब्रिटनने आपले नेते व नोकरशहांना साहेबांसारखे वागणे शिकविले त्यांच्या देशातही खासदार, मंत्री हे सारेच सर्वसामान्यांसारखेच वागतात. लंडनच्या मेट्रोत अनेक खासदार, मंत्री प्रवास करताना दिसतात. जगात अशी असंख्य उदाहरणं आहेत. तेथील जनतेनं त्यांच्या नेत्यांना छोटं ठेवलं आहे, त्यामुळे ते देश मोठे झाले आहेत. आपण मात्र खुज्या नेत्यांना डोक्यावर घेतल्यामुळे ते कारण नसताना मोठे झाले आहेत. देश मात्र अधिकाधिक छोटा होतो आहे. केजरीवालांच्या निमित्ताने यात काही बदल होण्याची आशा बाळगायची?

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे

कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top