सहमा सा है वतन..

अतिरेकी राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम शेवटी स्वत:चाच नाश करते, हा इतिहास आहे. हिंदुत्ववाद्यांची सुप्त इच्छा कट्टर मुस्लिम धर्ममार्तंडांसारखीच आहे. कट्टरतेच्या विषयात मुस्लिमांना आदर्श मानणार्‍या हिंदू धर्माभिमान्यांना स्वत:चाच आत्मघात करणारी कट्टरता अपेक्षित आहे का?
………………………………………………………………………………………………………………………………………..
                                                                 सहमा सा है वतन
                                                                 कि कुछ लोग खून मागते है
                                                                  कुछ लोग मुझ से मेरा
                                                                  भारतीय वजूद मागते है!

लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील घटनेनंतर

सोलापूर जिल्ह्यातील एका संवेदनशील मुस्लिम तरुणाने आपली अस्वस्थता, मनातला कल्लोळ या शब्दांत व्यक्त केलाय. वादग्रस्त जागेवर झेंडे लावण्यास मनाई केल्याने एका मुस्लिम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर जबरदस्तीने त्याच्या हातात भगवे झेंडे देऊन ‘मी मुसलमान असलो तरी आधी भारतीय आहे,’ असे वदवून घेण्याचा प्रकार पानगावात नुकताच घडला. काय कोण जाणे, या घटनेची फारशी चर्चा झाली नाही. काही अपवाद वगळता माध्यमांनीही याकडे काणाडोळाच केला. मात्र, या घटनेच्या निमित्ताने देशातील बहुसंख्य समाज मुस्लिमांकडे कुठल्या दृिष्टकोनातून पाहतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. नामवंत सामाजिक कार्यकर्ते व लेखक अमर हबीब नेहमी सांगतात, ‘तुम्ही कुठल्या समाजात, धर्मात जन्माला यावं हे तुमच्या हातात नसतं. मात्र, तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आलात, तर आपसूक देशप्रेमी, राष्ट्रवादी ठरता. मुस्लिमांना मात्र येथे प्रत्येक दिवशी देशभक्त, राष्ट्रप्रेमी असल्याचे सिद्ध करावं लागतं.’ सध्याच्या वातावरणात मुस्लिम समाजाची ही वेदना समजून घेण्याची कोणाची तयारी नाही. एखादा माणूस मुस्लिम असला म्हणजे तो देशद्रोही, गद्दारच असला पाहिजे, असं वातावरणच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ६८ वर्षांत जाणीवपूर्वक तयार करण्यात आलं आहे. ज्यांना एकही मुस्लिम मित्र नाही, जे कधी मुस्लिम वस्तीत जात नाहीत, ज्यांना मुस्लिमांचं जगणं माहीत नाही, जीवनपद्धती माहीत नाही.. अशांनी केवळ ऐकीव माहितीवर मुस्लिमांचं एक चित्र रंगवलं आहे. त्या चित्रात सातत्याने कट्टरतेचे, द्वेषाचे रंग भरण्याचं काम अव्याहत सुरू आहे. त्यामुळे मनात नकळतपणे जे विष निर्माण होतं, त्यातून पानगावसारखे प्रकार घडतात. काही महिन्यांपूर्वीच दिल्लीजवळच्या दादरी या गावात मोहम्मद अखलाक या गृहस्थाची घरात गोमांस असल्याच्या केवळ संशयावरून दगडाने ठेचून हत्या करण्याचा प्रकारही याच मानसिकतेतून घडला होता.
       देशात एक मोठा वर्ग आहे. त्याला असं वाटतं की, या देशातील प्रत्येक समस्येला मुस्लिम जबाबदार आहेत. येथील प्रत्येक मुस्लिमाची पाकिस्तानसोबत निष्ठा आहे. हे मुस्लिम नसते, तर देश आबादीआबाद असता. देशातून सोन्याचा धूर वगैरे निघाला असता, अशा भाबड्या समजुतीही अनेकांच्या डोक्यात आहेत. मुस्लिमांबद्दलचे गैरसमज घट्ट करण्यासाठी आतंकवादी कारवायांचे दाखले दिले जातात. ‘हर एक मुस्लिम आतंकवादी नही होता, लेकीन हर आतंकवादी मुस्लिम क्यू होता है?’, असे बुद्धिभेद करणारी वाक्ये पेरली जातात. विचारांपेक्षा भावना, अस्मिता महत्त्वाच्या वाटणार्‍या अजाणत्या वयातील पिढी या प्रचाराला बळी पडते. कळपात सामील करून घेतलेल्या त्या पिढीपर्यंत दुसरी बाजू कधी जाणारच नाही, याची काळजी घेतली जाते. त्या पिढीला हे कधी सांगितले जात नाही की, स्वातंत्र्यानंतरचा या देशातला पहिला आंतकवादी हल्ला हा राष्ट्रपित्यावरचा हल्ला होता. त्या हल्ल्यात ज्यांनी भेकडपणे राष्ट्रपित्याचा खून केला ते कथित राष्ट्रवादी होते. ते मुसलमान नव्हते. या देशात दोन कर्तबगार पंतप्रधानांचे खून झालेत, तेही कोणी मुसलमानांनी केले नाहीत. समाजाला विवेकवादी, विज्ञाननिष्ठ व निर्भय बनवण्याचं शिक्षण देण्यासाठी आयुष्यभर काम करणार्‍या नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या करणारेही मुसलमान नव्हते, तर धर्मप्रेमी, राष्ट्रवादीच होते, हे सांगण्याचीही तसदी कधी घेतली जात नाही. हिंदू समाजातील सारीच माणसं साधू, सज्जन नसतात. त्यांच्यातही आतंकवादी असतात. ते जसे महात्मा गांधी, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गीचा खून करू शकतात तसेच मालेगाव, ठाणे, समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोटही घडवतात, हे आजच्या पिढीला सांगितलं जात नाही. अतिरंजित इतिहास सांगून त्यांचं डोकं भडकवण्याचं काम तेवढं केलं जातं आहे. खरा इतिहास लपवून मुसलमानांची बाजू काळीकुट्ट रंगवण्याचंच काम तेवढं अव्याहत सुरू आहे. अनुकूल विचारांचं सरकार आल्याबरोबर आता एवढी वर्षेसाठवून ठेवलेल्या द्वेषाला, विखाराला उकळी देण्याचं काम जोरात सुरू आहे.
         हे सगळं सांगताना मुस्लिमांच्या कट्टरतेचं, धर्मांधतेचं सर्मथन करण्याचा अजिबात हेतू नाही. महम्मद बिन कासिम या पहिल्या मुस्लिम आक्रमकापासून १९४७च्या फाळणीदरम्यान झालेल्या निर्घृण हत्याकांडापर्यंत त्यांच्या पिसाटपणाच्या असंख्य कहाण्या आहेत. त्या जखमा हिंदू मनावर खोलपर्यंत आघात करून गेल्या आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी मुस्लिम अनुनयाचं राजकारण केल्यामुळे हिंदू मनावरील जखमा कधी बुजल्याही नाहीत. ग्रंथप्रामाण्य मानणार्‍या आणि इतिहासातच रमणार्‍या मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे केलेत, हे कट्टर हिंदू कधी विसरले नाहीत आणि इतर हिंदूंना ते विसरूही देत नाहीत. मुस्लिमांबद्दलचे गैरसमज वाढवण्याच्या प्रयत्नात मुस्लिमही हातभार लावतात, हे नाकारण्यात अर्थ नाही. आधुनिक सुधारणांकडे पाठ फिरवण्याच्या या समाजाच्या मानसिकतेने हिंदूमध्ये गैरसमज वाढण्यास मोठी मदत झाली. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा, आधुनिक शिक्षण अशा दोन-तीन गोष्टी स्वीकारून देशाच्या मुख्य प्रवाहात जर मुस्लिम समाज आला असता तर आज हिंदू कट्टरतावाद्यांना त्यांच्याविरुद्ध रान उठवणे शक्य झाले नसते. फाळणीनंतरच्या असुरक्षित वातावरणात मुस्लिम समाज प्रत्येक शहरात समूहाने वस्ती करून राहायला लागला आणि ‘हर एक गाव मे एक पाकिस्तान’ असा प्रचार करायला ते मोकळे झाले. खरं तर मुस्लिमांची कट्टरता ही इतरांपेक्षा त्यांच्यासाठी आज चिंतेचा विषय ठरली आहे. एकेकाळी अध्र्यापेक्षा जास्त जगावर राज्य करणारा मुस्लिम समाज धर्मांधता व कट्टरतेचे परिणाम भोगतो आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराण, सीरिया, लिबिया, ब्रह्मदेश, आखाती देशांमध्ये मुस्लिमांना रोजचं जगणं कठीण झालं आहे. इतरांशी लढून झालं आहे. त्यांना काफीर ठरवून देशाबाहेर हाकलून झालं. आता स्वत:लाच देशोधडीला लागण्याची पाळी लाखो मुस्लिमांवर आली आहे. अनेक देशांनी आपल्या सीमा बंद करून टाकल्या आहेत. उपासमारीमुळे मुलं, माणसं मरत आहेत. हे सारे परिणाम धर्माच्या नावावर कट्टर झाल्याचे आहेत.
    कट्टरतेच्या विषयात मुस्लिमांना आदर्श मानणार्‍या हिंदू धर्माभिमान्यांनाही अशी स्वत:चाच आत्मघात करणारी कट्टरता अपेक्षित आहे का? कोणी थोडा जरी वेगळा सूर लावला की तुम्ही हिंदू नाही का, तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमान नाही का, अशा प्रश्नांच्या फैरी झाडणारे तमाम मुस्लिमांच्या देशप्रेमाबद्दल, त्यांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल संशय निर्माण करत असतात. हिंदुत्ववाद्यांची सुप्त इच्छा कट्टर मुस्लिम धर्ममार्तंडासारखीच आहे. पाकिस्तानात ज्याप्रमाणे हिंदू वा इतर अल्पसंख्यकांना भरपूर छळ करून हुसकावून लावण्यात आलं वा त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास बाध्य करण्यात आलं, तसंच येथेही व्हावं, असं येथील सनातन्यांना नक्कीचं वाटतं. मात्र, ती गोष्ट अशक्यप्राय आहे. २५ कोटी मुसलमानांना हुसकावून टाकण्याचा विचार जर कोणी करत असेल तर ते दिवास्वप्नात रमले आहेत, असंच म्हणावं लागेल. असा प्रय▪झाला तर या देशाचे आणखी काही तुकडे पडतील, हे राष्ट्रवाद, देशप्रेमाच्या नावाखाली डोके भडकवणार्‍यांनी समजून घेतलं पाहिजे. मुस्लिमांनाच नाही, तर कोणालाही देशप्रेमाचे सर्टिफिकेट मागण्याचे धंदे त्यांनी बंद केले पाहिजे. अतिरेकी राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम शेवटी स्वत:चाच नाश करते, हा इतिहास आहे. शेवटी भारतातील सद्यस्थितीवर पाकिस्तानातील कवयित्री फहमिजा रियाज यांनी काही महिन्यांपूर्वी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही. त्यांनी लिहिलं होतं…

                                             तुम बिलकूल हम जैसे निकले, अब तक कहा छिपे थे भाई

                                              वही मूर्खता, वह घामडपण, जिस मे हमने सदी गवाई

                                              आखिर पहुँची व्दार तुम्हारे, अरे बधाई, बहोत बधाई

                                               भूत धरम का नाच रहा है, कायम हिंदू राज करोगे?

                                               सारे उल्टे काज करोगे, अपना चमन नाराज करोगे?

                                                तुम भी बैठे करोगे सोचा, पुरी है वैसी तयारी

                                                कौन है हिंदू, कौन नही है, तुम भी करोंगे फतवे जारी.. .
 

                                                (लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
                                                                                                             संपर्क – 8888744796

Scroll to Top