सनातनला आता तरी चाप लावा!

सनातन संस्था ही ‘मानवी बॉम्ब’ तयार करणारी संघटना आहे. ही संघटना संमोहनाचा वापर करून साधकांचे ब्रेनवॉश करते आणि त्या साधकांचा वापर पुरोगामी विचारांचे नेते व कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी केला जातो. प्रसंगी त्यांच्या हातून खून, बॉम्बस्फोटही घडविले जातात.‘           अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी अवघ्या दोन-चार वाक्यात ‘सनातन’ संस्थेचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे. श्याम मानव यांनी सनातनच्या कार्यपद्धतीबाबत जी खळबळजनक माहिती दिली त्यावरून सध्या मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्यांवर जबरदस्त वाद-प्रतिवाद सुरू आहेत. खरं तर श्याम मानव यांनी ही गोष्ट पहिल्यांदा सांगितली अशातला भाग नाही. नरेंद्र दाभोळकरांची हत्या व त्यापूर्वी ठाणे व मालेगावात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर मानव

यांनी उघडपणे सनातनवर संशय व्यक्त करून ही संघटना किती भयंकर आहे, हे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. मात्र सरकार, पोलीस, माध्यम कोणीही त्यांना फार गंभीरतेने घेतले नव्हते. मानव हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात, त्यामुळे ते पुरोगामी… आणि पुरोगाम्यांना हिंदूहितासाठी काम करणार्‍या संघटनांबद्दल आकस असणार, याच दृष्टिकोनातून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.आता समीर गायकवाडच्या अटकेनंतर पोलिसांच्या हाती सनातनबद्दल रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असताना उशिरा का होईना श्याम मानव यांचं म्हणणे गंभीरतेने घेतले जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. दाभोळकर यांच्या हत्येनंतर मारेकरी का सापडत नाहीत याबद्दल राज्यभर संताप व्यक्त होत असताना श्याम मानव यांनी सनातन संस्था ही संमोहित प्रशिक्षित साधकाकडून कसे गुन्हे घडवून आणते याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. ‘सनातन आपल्या सर्मपित साधकांना संमोहनाच्या माध्यमातून कुठली माणसं धर्मविरोधी आहेत, राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, हे वारंवार सांगते. त्यानंतर अशा माणसांना संपविणे हे परमेश्‍वरी कृत्य आहे, असे वारंवार त्यांच्यावर बिंबवून त्यांच्या हातून खून घडवून आणला जातो. अशा खून करणार्‍या व्यक्तीला संमोहन तंत्राच्याद्वारे सूचना देऊन तू हा गुन्हा केलास नाही, असे सांगत त्याच्या मेंदूतील ते कृत्य पुसून काढले जाते. त्यामुळे आपण असं काही केलं याचाच संबंधिताला विसर पडतो. परिणामी पुरावेही मिळत नाही. त्यामुळे दाभोळकर व पानसरे या दोघांच्याही खुनात आरोपी मिळणे कठीण जाईल,’ हे श्याम मानवांनी तेव्हा सांगितले होते. श्याम मानव यांच्या प्रतिपादनातील पहिल्या भागाबद्दल दुमत नव्हतं. जगभर आपल्या विरोधकांना संपविणारे हुकूमशहा आणि दहशतवादी संघटनांचे नेते आता आणि पूर्वीही अप्रत्यक्षपणे संमोहन-सजेशन या तंत्राचा वापर करूनच गुन्हेगारी कृत्य घडवून आणतात, हा इतिहास आहे. भूतकाळात हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांनी याच तंत्राचा वापर करून लाखो माणसं संपविली. एखादा व्यक्ती वा समुदाय देश, धर्म, परंपराविरुद्ध आहेत हे वारंवार बिंबवून द्वेषाची पेरणी करायची त्यानंतर त्यांना संपविणे हेच परमेश्‍वरी कार्य आहे हे सांगून सामूहिक हत्याकांड घडवून आणण्याची कित्येक उदाहरणं आहेत. जगभरातील मुस्लिम दहशतवाद्यांच्या संघटना याच पद्धतीने आपल्या विरोधकांच्या नृशंस हत्या करत आहेत. अमुक एका समुदायाला संपविलं की तुम्हाला जन्नत प्राप्त होईल, अशा सूचना वारंवार देऊन मुस्लिम दहशतवादी संघटना काम करत असल्याचे आपण पाहतो. अलीकडच्या काही वर्षांत मुस्लिम संघटना या तंत्राचा सर्वाधिक वापर करत आहेत. ‘आयसीस’ वा ‘बोको हराम’सारख्या संघटनांनी याच तंत्राचा वापर करून जगभर दहशत निर्माण केली आहे. लिट्टे व खलिस्तानी मुव्हमेंटनेही याच तंत्राचा वापर केला होता. महात्मा गांधींच्या हत्येच्या विषयातही असाच प्रकार घडला होता. महात्मा गांधी हे एका धर्माचा अनुनय करतात. समाजसुधारणेचा आग्रह करतात. त्यामुळे ते जिवंत राहणं हिंदू धर्मासाठी अत्यंत घातक आहे, असे विष तेव्हाच्या काही सनातन्यांच्या डोक्यात घुसवून देण्यात आलं होतं. त्यातून त्यांच्या हत्येचे अनेक प्रयत्न झालेत.
   श्याम मानव यांच्या प्रतिपादनातील दुसर्‍या भागाबद्दल जरा वाद आहे. संमोहन-सजेशन तंत्राच्याद्वारे गुन्हा घडवून आणल्यानंतर ज्याच्या हातून ते कृत्य घडविले जाते, त्याच्या मेंदूतून ते पुसले जाऊ शकते का, त्याला त्याचा विसर पडू शकतो का, याबद्दल संमोहनशास्त्रज्ञ, मानसोपचार व मेंदूतज्ज्ञांमध्ये दुमत आहे. श्याम मानव हे मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम आहेत. कॉम्प्युटरमधून मेमरी काढून घेण्याप्रमाणे आयुष्यातील एखादा प्रसंग अँम्नेशिया क्रिएट (स्मृतिलोप) करून पुसून टाकला जाऊ शकतो, हा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे संमोहित करून गुन्हेगारी कृत्य घडवून आणता येत नाही आणि ते कृत्य संबंधिताच्या मेंदूतून पुसून टाकता येते हा दावा अगदीच हास्यास्पद असल्याचे सनातन आणि इतर काही संघटनांचे मत आहे. या विषयात अभ्यासक अधिक प्रकाश टाकू शकतील. मात्र सनातनने आपल्या साधकांना अशा प्रकारची कृत्ये घडविण्यास, दुर्जनांच्या नाशाच्या लढाईस तयार करण्यास उद्युक्त केले याचे असंख्य पुरावे आहेत. गेल्या काही महिन्यातील ‘सनातन प्रभात’चे अंक जरी चाळलेत तरी सनातनने आपल्या साधकांना खुनासारखे प्रकार घडविण्यास कशी फूस दिली हे लक्षात येते. दाभोळकर व पानसरे यांच्या हत्येअगोदर त्यांचे फोटो ‘सनातन प्रभात’च्या बेवसाईटवर टाकून त्याच्यावर फुली मारण्याचे प्रकार सनातनने केले आहे. श्याम मानव, जितेंद्र आव्हाड अशा अनेकांना धर्मविरोधी ठरवून सनातनने त्यांच्या साधकांना यापुढील टार्गेटही निश्‍चित करून दिले आहेत. सनातनच्या साहित्याचा बारकाईने अभ्यास केल्यास असे कृत्य घडवून आणण्यासाठीची सनातनची तयारीही लक्षात येते. प्रत्येक गाव, शहर, जिल्हा, राज्य अशी दुर्जनांची यादी तयार करून त्यांच्या नाशाच्या कृतीला सन २000 पासून प्रत्यक्ष सुरुवात करा, अशी चिथावणीच सनातनने दिली आहे. २,000 नंतरच्या अनेक दहशतवादी कृत्यांमागील सनातनची प्रेरणा या साहित्यात आहे. केवळ सनातनच्या साहित्यावरून या संघटनेवर बंदी आणता येईल, एवढे ते साहित्य स्फोटक आहे. मात्र सरकारने सनातनविषयी दुर्लक्ष केले हे अगदी स्पष्ट आहे. राज्यात १५ वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडी सरकार यासाठी सर्वाधिक दोषी आहे. यांच्याच कार्यकाळात सनातन वाढली. फोफावली. श्याम मानव आणि इतरांनी सनातन आणि त्यांच्या कार्यपद्धतीबाबत भरभक्कम पुरावे देऊनही तत्कालीन राज्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दाभोळकरच्या हत्येनंतर श्याम मानवांनी शरद पवार, आर. आर. पाटील यांना अगदी सविस्तरपणे काय काय झालं असू शकेल, याबाबत माहिती दिली होती. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना याबाबत विश्‍वासात घेण्यात आले होते. मात्र सरकारमध्ये हिंमतच नव्हती. तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा विषय अतिशय कॅज्युअली घेतला हे आता समोर येत आहे. आता दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या तिघांच्या हत्येनंतरही राज्यकर्त्यांना शहाणपण आले असे दिसत नाही. सनातनवर बंदी आणणे शक्य नाही, अशी भाषा अजूनही सुरू आहे. खरं तर दाभोळकरांच्या हत्येनंतर सनातनच्या आश्रमांवर धाडी टाकून प्रमुख पदाधिकार्‍यांना ताब्यात घेतले असते तर पानसरे, कलबुर्गीचे बळी गेले नसते. किमान आता सनातनच्या सहभागाचे पुरावे समोर आले असतानाही सरकारने कठोर कारवाईची हिंमत दाखवायला हवी. सनातन ही हिंदू धर्म रक्षण व उन्नतीसाठी काम करणारी संघटना असल्याचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात काळाचे काटे उलटे फिरवून हिंदूंना मध्ययुगीन काळात नेण्यात सनातनला रस आहे. यामुळे हिंदूविरोधी ठरण्याची भीती न बाळगता फडणवीस सरकारने कठोरपणे सनातनचा बंदोबस्त केला पाहिजे. आता जर हे झालं नाही तर भविष्यात सनातन संस्था हिंदूंची ‘आयसीस’ वा ‘बोको हराम’ झाली तर आश्‍चर्य वाटण्याचं कारण नाही.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

1 thought on “सनातनला आता तरी चाप लावा!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top