सरलेल्या आठवड्यात शिवसेना व अखंड महाराष्ट्रवाद्यांना धुळवडीच्या मुहूर्तावर अँड़ श्रीहरी अणे यांच्या नावाने बोंबाबोंब करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. तीनेक महिन्यांपूर्वी महाधिवक्तापदावर राहून ‘स्वतंत्र विदर्भा’चा पुरस्कार केल्याबद्दल अँड़ अणे मुंबई व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या रोषास बळी पडले होते. आता तर ‘स्वतंत्र विदर्भा’सोबत स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केल्याने अणेंचा एकदम ओवेसी करून त्यांना देशद्रोही ठरविण्यात आले. भाग्य त्यांचे की, त्यांची मान वा जीभ कापून आणणार्यांना कोणी बक्षीस ठेवले नाही. अणेंच्या वक्तव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रप्रेमाचे उमाळे काढणार्यांची गंमत वाटते. शिवसेना यात आघाडीवर आहे. ‘स्वतंत्र विदर्भा’चा विषय समोर आला की, लगेच १0५ हुतात्मे व मराठी अस्मितेची बात शिवसेनेकडून केली जाते. इतिहासाच्या वास्तव आकलनात शिवसेना नेहमीच कच्ची राहिली आहे. कुठल्याही विषयाला भावनिक वळण देऊन लोकांचे लक्ष भलतीकडेच वळविण्यात शिवसेनेचा हातखंडा आहे. १0५ हुतात्म्यांचा विषय कदाचित मुंबईत अपील होत असेल, विदर्भात मात्र तो मुद्दा चालत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्यान मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी ते १0५ बळी गेले होते. इतिहासाची पानं जरा चाळलीत तर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात विदर्भाचा फारसा सहभाग नव्हता, हे लक्षात येईल. विदर्भाची दुखरी नस काय आहे, हे जरा महाराष्ट्रवाद्यांनी समजून घेतली पाहिजे. १९५0 नंतर भारतात अनेक राज्यांची निर्मिती झाली. काहींनी प्रचंड संघर्ष करून स्वतंत्र राज्य मिळविले. काही राज्यांची निर्मिती राजकीय सोयीतून झाली. काही गरजेतून निर्माण झालीत. मात्र विदर्भ हा असा देशातील एकमेव प्रदेश आहे की ज्याने स्वत:चं स्वतंत्र राज्य (मध्यप्रांत), नागपूर ही सर्व सोयीयुक्त राजधानी, नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल अशा प्रदेशाचा त्याग करून महाराष्ट्रात विलीन व्हायला संमती दिली होती. मराठी भाषिकांचं एक राज्य ही भावनिक भूल आणि महाराष्ट्रात आलात तर अमुक देऊ, तमुक करू, अशा यशवंतराव चव्हाणांपासून अनेक नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून विदर्भ आपलं स्वतंत्र अस्तित्व विसरून महाराष्ट्रात आला होता. मात्र गेल्या ५५ वर्षांत या विषयात विदर्भाचा पार भ्रमनिरास झाला आहे. विदर्भाला काही देण्याऐवजी विदर्भाजवळ जे काही आहे ते ओरपण्याचंच काम एवढय़ा वर्षात झाले आहे. या विषयात विदर्भाचे नालायक, स्वकेंद्रित राजकारणी जेवढे कारणीभूत आहेत तेवढीच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची फक्त आपल्यापुरतं पाहण्याची अप्पलपोटी वृत्तीही आहे. पुणे-मुंबईच्या कोणत्याही पिढीतील नेते घ्या… पुणे, मुंबई, सातारा., सांगली, कोल्हापूर यापलीकडे महाराष्ट्र आहे, याचं भान त्यांच्या वागण्यात आणि निर्णयप्रक्रियेत कधी दिसलं नाही. शिवसेनेवाले मारे आता विदर्भाबद्दल प्रेम दाखवत आहेत. विदर्भ तोडणार्यांचे हात तोडू वगैरे बोलले जात आहे, पण शिवसेनेला विदर्भाचं किती प्रेम आहे, हे जरा तपासलं पाहिजे. काहीही कारण नसताना भावनिक लाटेवर स्वार होऊन विदर्भाने वेळोवेळी शिवसेनेच्या पदरात मतांचं दान टाकलं. भरभरून लोकप्रतिनिधी निवडून दिलेत. याबदल्यात शिवसेनेने विदर्भाला काय दिले? या एवढय़ा वर्षात विदर्भात रक्ताचं पाणी करून शिवसेना रुजविणार्या असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांपैकी एकालाही शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत नेतेपद द्यावं, असं शिवसेनाप्रमुखांना कधी वाटलं नाही. उद्धव ठाकरेंच्याही डोक्यात ते कधी येत नाही. मुंबईतील सुमार उपनेत्यांना विदर्भाची जहागिरी सोपविली जाते. तिथं मुंबईत कुत्रंही विचारत नसताना इकडे विदर्भ-मराठवाड्यातील त्यांची दादागिरी पाहण्याजोगी असते. अशा अनेक उपनेत्यांनी विदर्भ- मराठवाड्यातील अनेक कर्तबगार नेते कुजवून टाकलेत. शिवसेनेला दोनदा सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळाली, पण विदर्भाला काही भरीव देण्याची दानत सेनेनी कधी दाखविली नाही. पूर्वी प्रतापराव जाधव, गुलाबराव गावंडे, अशोक शिंदे यांची तर आता यावेळी सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम करणार्या संजय राठोड यांची राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली. मराठवाड्याकडे तर तुकडाही फेकला नाही. यावेळी जनतेतून निवडून न येऊ शकलेल्या विधान परिषदेतील ज्येष्ठांना कॅबिनेट मंत्रिपदाची झूल चढविण्यात आली. मात्र विदर्भ-मराठवाड्याला एखादं कॅबिनेट मंत्रिपद द्यावं, असं शिवसेनेला काही वाटलं नाही. दिवाकर रावते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. सत्ता नसली की, महिन्यातले २0 दिवस ते विदर्भात पडून असतात. मात्र आता सत्ता मिळाल्याबरोबर त्यांचं विदर्भप्रेम आटलं आहे. एसटीसारखं महत्त्वाचं खातं आहे. मात्र नवीन बसेस, वातानुकूलित बसेस सगळ्या तिकडे मुंबई, पश्चिम महाराष्ट्राक.डे विदर्भातील बसेसचे डबडे झाले आहेत. बसस्थानकांची हालत खस्ता आहे; पण रावतेंना आता विदर्भ -मराठवाडा आठवत नाही. थोडक्यात कॉंग्रेसप्रमाणेच विदर्भाचा केवळ वापर करून घ्यायचा एवढंच शिवसेनेचं धोरण आहे. मराठवाड्याच्या विषयातही शिवसेना काही वेगळं वागली असे वाटत नाही. मराठवाड्याने तर विदर्भापेक्षाही शिवसेनेवर अधिक प्रेम केले. खेड्यापाड्यात सेनेचा भगवा पोहोचविला. त्याबदल्यात मराठवाड्याला काय मिळालं? हिशेब सगळ्यांना माहीत आहे. असो! त्यामुळेच अँड़ अणे शिवसेनेला जरी महाराष्ट्रद्रोही वाटत असले तरी किमान विदर्भाला तरी ते वाटत नाही. त्यांनी विदर्भात घेतलेल्या भूमिकेला व्यापक सर्मथनच मिळत आहे. भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अणेंच्या तोंडातून ‘स्वतंत्र विदर्भ-मराठवाड्या’ची मागणी वदवून घेतली, असे तर्क मांडणार्यांची मुंबई-पुण्यात कमी नाही. त्यामध्ये माध्यमांतीलही अनेक विद्वान आहेत. मात्र अँड़ श्रीहरी अणेंची विदर्भाच्या विषयातील कमिटमेंट ज्यांना माहीत आहे, ते अशा तर्कटावर विश्वास ठेवणार नाहीत. या सगळ्या गदारोळात भाजपा ‘स्वतंत्र विदर्भ’ देणार का, हा कळीचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाचे विदर्भातील दोन्ही महत्त्वाचे नेते ‘स्वतंत्र विदर्भा’च्या बाजूचे आहेत. परिस्थितीही कधी नव्हे, एवढी अनुकूल आहे. शिवसेनेला सीरियस घेणे भाजपाने कधीचेच सोडले आहेत. मात्र आगामी काळात राजकीय परिस्थिती कशी राहते यावर ‘स्वतंत्र विदर्भा’चं भवितव्य अवलंबून आहे. तीन वर्षांनंतर विदर्भ देऊन जर महाराष्ट्रातील सत्ता गमावायची पाळी येणार असेल तर भाजपाचे अमित शहांसारखे बनिया नेते विदर्भ देताना शंभरदा विचार करतील. दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस विदर्भ झाल्याबरोबर फक्त पश्चिम नागपूर या आपल्या मतदारसंघाचेच नेते राहण्याची शक्यता आहे. विदर्भात सध्या नितीन गडकरींचं राज्य आहे. विदर्भातील भाजपाचे सारे प्रमुख पदाधिकारी गडकरींच्या अधीन आहेत. ‘गडकरी बोले तैसा विदर्भ भाजपा चाले’ अशी स्थिती आहे. अशा स्थितीत ‘स्वतंत्र विदर्भ’ झाला, तर आपण महत्त्व गमावून बसू, हे देवेंद्र फडणवीस चांगले जाणतात. समजा त्यांना समजले नाही तरी नरेंद्र मोदी व अमित शहा त्यांना चांगले समजावून सांगू शकतात. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाचे भवितव्य हे पुन्हा एकदा राजकीय सोय-गैरसोयीवरच अवलंबून असणार आहे. जय हो गडकरीजी… केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जसे आपल्या कामाच्या धडाक्याबद्दल प्रसिद्ध आहेत, तसेच वादग्रस्त बोलण्याबाबतही त्यांची ख्याती आहे. परवा नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘कर्ज न फेडणे म्हणजे फ्रॉड नव्हे! ‘असे सांगताना सरकारी बँकांचे अब्जावधी रुपयांचे कर्ज चुकवून परदेशात पळालेल्या विजय मल्ल्या यांचे अप्रत्यक्ष सर्मथन केले. यूपीएच्या सत्ताकाळात आपण किंगफिशर एअरलाईनला मदत करण्यासाठी प्रणव मुखर्जींना भेटायला गेलो होतो, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. गडकरींना उद्योगपतींचा, श्रीमंतांचा पुळका येतो ही आता नवीन गोष्ट राहिली नाही. भाजपाचे शरद पवार असलेल्या गडकरींचं वागणं हे देशातील उद्योगपतींचे अनधिकृत प्रवक्ते असल्यासारखं असतं. त्यामुळेच देशातील उद्योगपतींचे ते ‘ब्ल्यू ऑईज बॉय’ आहेत. येनकेन प्रकारे कुठलीही गोष्ट मॅनेज करून यशस्वी होणारी माणसं गडकरींना आवडतात. तसं बोधवाक्यच ं(?) त्यांच्या टेबलावरील पाटीवर वाचायला मिळतं. उद्योगपती-व्यापार्यांचं सर्मथन करताना ते टिकलेत, तर उद्योग-व्यापार कायम राहील. पर्यायाने सामान्य माणसाचा रोजगार कायम राहील, असं तत्त्वज्ञान गडकरी आणि त्यांच्या उपयोगितावादाच्या तत्त्वज्ञानाची भुरळ पाडणारे सांगत असतात; पण देशातील सामान्य माणसाच्या पैशाच्या जोरावर हरामखोरी करणार्यांना ‘फ्रॉड’ नाही म्हणायचं, तर ‘देशभूषण’ म्हणून त्यांचा सत्कार करायचा का, हेही जरा गडकरींना समजावून सांगितलं पाहिजे. |
Sir ekdum jakhmevar mith cholla tumhi senechya.. Haha . jabardast lekh ahe
Sir ekdum jakhmevar mith cholla tumhi senechya.. Haha . jabardast lekh ahe