विदर्भात राष्ट्रवादी काय दिवे लावणार?

एकमेकांना भरपूर इशारे-प्रतिइशारे दिल्यानंतर अखेर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आली आहे. आघाडी करणे हे दोन्ही पक्षांसाठी अपरिहार्यच होते. एकत्र लढूनही यावेळी सत्ता मिळण्याची आशा नसताना स्वतंत्र लढलं तर आपलं आहे, ते दुकान बंद करण्याची पाळी येऊ शकते, एवढं राजकीय भान शरद पवारांजवळ नक्की आहे. बाकी गेल्या काही दिवसातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाषा मजेशीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सोमवारी विदर्भात येऊन गेले. राष्ट्रवादीची २८८ जागांवर लढण्याची तयारी असून १४४ जागांपेक्षा एक जागा आम्ही कमी घेणार नाही. कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशी सध्या ठिकठिकाणी वाजवत असलेली कॅसेट त्यांनी येथेही वाजवली. कार्यकर्त्यांमध्ये हवा भरण्यासाठी या अशा जाहीर वल्गना करायच्या असतात. आघाडीतील सहयोगी पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी व्यूहरचना म्हणूनही अशी आक्रमक भाषा वापरायची असते, हे समजून घेता येतं, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे?


 राष्ट्रवादीने कितीही आत्मविश्‍वास दाखवला तरी २00 जागांवर उभे करण्याइतकेही दमदार उमेदवार त्यांच्याजवळ नाही. २८८ जागा लढवू म्हणायला ठीक आहे. माणसं आणणार कुठून? पश्‍चिम महाराष्ट्र व काही प्रमाणात मुंबई, ठाणेच्या थोड्या फार जागा सोडल्या तर इतर भागात लढत देऊ शकतील असे उमेदवारच राष्ट्रवादीजवळ नाही. दावेदारांची गोष्ट वेगळी. ते प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक पक्षात डझनाने असतात. मात्र निवडणूक जिंकू शकतील, किमान लढत देऊ शकतील असे उमेदवार राज्याच्या बहुतांश भागात राष्ट्रवादीजवळ नाही. आपण विदर्भाचच पाहू. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. २00९ च्या निवडणुकीत त्यापैकी केवळ चार जागांवर राष्ट्रवादी विजयी झाली होती. मनोहर नाईक (पुसद), अनिल देशमुख (काटोल), राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) आणि प्रकाश डहाके (कारंजा) हे राष्ट्रवादीचे विदर्भातील आमदार आहेत. या चौघांपैकी मनोहर नाईक व अनिल देशमुख हे राष्ट्रवादीच्या ताकदीमुळे विजयी झाले होते, असं म्हणणं धाडसाचेच होईल. लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार ज्याप्रमाणे कुटुंबाची पुण्याई वा वैयक्तिक करिश्म्यावर निवडून आले, तसाच प्रकार नाईक व देशमुखांबाबत असतो. ते कुठल्याही पक्षात असले वा कुठलंही चिन्ह असले तरी ते निवडून येतात. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीची नेमकी ताकद किती आहे, हे लक्षात येतं.

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात अध्र्या जागा आम्ही मागू, असे तटकरेंनी सांगितलं. मात्र हे सांगताना विदर्भात खरंच आपली काही ताकद आहे काय, याचा त्यांनी विचार केला असेल का, याबाबत शंकाच आहे. गेल्या निवडणुकीतील चार जागांमध्ये भर पडावी यासाठी राष्ट्रवादी वा त्यांच्या नेत्यांनी पाच वर्षांत काहीही केलं नाही. उलट काही ठिकाणी असलेली ताकद खच्ची करण्याचा प्रय▪झाला. विदर्भातील एकेका जिल्ह्याची स्थिती तपासून पाहू. अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी मोर्शी व बडनेरा हे मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येतात. यापैकी मोर्शीत विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व शरद पवारांचे जुनेजाणते साथीदार हर्षवर्धन देशमुख यांच्यामुळे राष्ट्रवादी चांगली लढत देऊ शकते. बाकी इतर सात मतदारसंघात राष्ट्रवादीचं नामोनिशाण नाही. ज्या संजय खोडकेंनी केवळ अमरावतीच नाही तर पश्‍चिम विदर्भात राष्ट्रवादी रुजविण्याचा प्रय▪केला त्यांना अत्यंत अपमानस्पद पद्धतीने पक्षाबाहेर घालवून राष्ट्रवादीत निष्ठावंत व मेहनत करणार्‍यांना काय ट्रिटमेंट मिळते, हे अजितदादांनी दाखवून दिलं. खोडकेंच्या जाण्यामुळे अमरावतीत राष्ट्रवादी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांपुरती र्मयादित आहे. त्यापैकी एकामध्येही पक्षाची ताकद वाढविण्याची क्षमता नाही. मोर्शी आणि बडनेर्‍यात रवी राणा सोडले तर इतर ठिकाणी राष्ट्रवादीजवळ डिपॉझिट वाचवू शकेल, असाही उमेदवार नाही. लगतच्या यवतमाळात पुसदमध्ये मनोहर नाईक सोडले तर यवतमाळ, वणी, राळेगाव, आर्णी, दिग्रस, उमरखेड या मतदारसंघात राष्ट्रवादीजवळ दमदार उमेदवार नाही. फार झालं तर यवतमाळात संदीप बाजोरिया लढू शकतात. वणीत संजय दरेकरांचं नाव आहे, पण ते कुठल्याही क्षणी शिवसेनेत प्रवेश करतील, अशी स्थिती आहे. मनोहर नाईकही द्विधा मन:स्थितीत आहे. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर डोरा टाकला, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. ते नितीन गडकरींच्या संपर्कात असल्याचंही सांगितलं जातं. निवडणुकीच्या अगोदर ते भाजपात जातील, अशी शपथेवर सांगणार्‍यांची संख्या पुसदमध्ये भरपूर वाढली आहे.

वर्‍हाडातील वाशीममध्ये कारंजाची जागा राष्ट्रवादीजवळ आहे. तेथे विद्यमान आमदार प्रकाश डहाके व सुभाष ठाकरे हे दोन चांगले पर्याय पक्षाजवळ आहे. डहाकेंबद्दलच्या नाराजीमुळे ठाकरेंच्या नावाचा विचार होऊ शकतो. रिसोडमध्ये बाबाराव पाटील खडसे चांगले उमेदवार ठरू शकतात. मात्र वाशीममध्ये बोंबाबोंब आहे. अकोल्यात एक अकोला पूर्वची जागा सोडली तर अकोला पश्‍चिम, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर या जागांवर लढण्यासाठी राष्ट्रवादीजवळ सक्षम उमेदवारच नाही. अकोला पूर्वमध्ये मात्र शिरीष धोत्रे व श्रीकांत पिसे पाटील ही दोन नावं त्यांच्याजवळ आहे. गेल्या निवडणुकीत मूर्तिजापूरची जागा राष्ट्रवादीने लढविली होती, पण यावेळी पहिल्या दोनमध्ये येईल, असा एकही उमेदवार त्यांच्याजवळ नाही. बुलडाण्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती आहे. सिंदखेडराजात राजेंद्र शिंगणेंसोबत तोताराम कायंदे आणि रामप्रसाद शेळकेंचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. बुलडाणा जिल्हा बँकेच्या बदनामीमुळे शिंगणेंनी सिंदखेडराजा सोडायचं ठरविलं, तर या नावांवर विचार होऊ शकतो. जातीच्या समीकरणामुळे राजेंद्र शिंगणे बुलडाण्यात चांगले उमेदवार होऊ शकतात, असे मानणार्‍यांची संख्या मोठी आहे. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती नरेश शेळके यांचंही नाव बुलडाण्यासाठी आघाडीवर आहे. जळगाव जामोदात लोकसभेत पराभूत झालेल्या डॉ. कृष्णराव इंगळेंचा पर्याय पक्षासमोर आहे. बाकी मलकापूर, चिखली, मेहकर, खामगावात कोणालाही तिकीट दिलं तरी पहिल्या तीनमध्येही येऊ शकेल, असं नाव राष्ट्रवादीजवळ नाही.

पश्‍चिम विदर्भानंतर पूर्व विदर्भाचा विचार केला, तर तिकडे राष्ट्रवादीची हालत आणखी खराब आहे. उपराजधानी नागपुरातील सहाही जागांवर २00९ मध्ये काँग्रेस लढली होती. आता पूर्व, पश्‍चिम, दक्षिण या जागांची मागणी राष्ट्रवादी करत असली तरी गेल्या पाच वर्षांत पक्षाने नागपुरात संघटनात्मक बांधणी अशी काही केली नाही. अलीकडच्या काळात पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढेंचे पूर्व नागपुरातील वेगवेगळे उपक्रम सोडलेत, तर बाकी पक्ष पदाधिकार्‍यांचं अस्तित्व वर्तमानपत्रांच्या बातम्यांपुरतं र्मयादित असतं. त्यामुळे राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर सार्‍याच ठिकाणी त्यांचे उमेदवार तिसर्‍या, चौथ्या क्रमांकावर दिसतील. नागपूर ग्रामीणमध्येही काटोल, हिंगण्याचा अपवाद सोडला तर रामटेक, कामठी, उमरेड, सावनेरमध्ये हेच चित्र आहे. काटोलमध्ये अनिल देशमुख व हिंगण्यात रमेश बंग मजबूत उमेदवार असतील. बाकी ठिकाणी भाजप-सेना, काँग्रेसवाले राष्ट्रवादीला डोकं वर काढू देणार नाही. वर्धा जिल्ह्यात वर्धा व हिंगणघाटच्या जागांसाठी राष्ट्रवादीजवळ चांगले उमेदवार आहेत. वर्धेत गेल्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले सुरेश देशमुख तर हिंगणघाटात माजी आमदार राजू तिमांडे किंवा सुधीर कोठारींचा चांगला पर्याय आहे. मात्र आर्वी, देवळी मतदारसंघ लढवायचं ठरविलं तर नावं शोधावे लागतील. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी व राजुरा हे दोन मतदारसंघ सोडले तर राष्ट्रवादीसाठी बाकी आनंदीआनंदच आहे. ब्रह्मपुरीत वामनराव गड्डमवारांचे चिरंजीव जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार आणि राजुर्‍यात माजी आमदार सुदर्शन निमकर दमदार उमेदवार राहू शकतात. बाकी चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, चिमूरमध्ये काही खरं नाही. गडचिरोलीत अहेरीमध्ये एक धर्मरामबाबा आत्राम सोडले तर आरमोरी आणि गडचिरोलीत उमेदवार नाही. प्रफुल्ल पटेलांचं कार्यक्षेत्र असलेल्या भंडारा-गोंदियातही राष्ट्रवादी काही दिवे लावू शकतील, अशा स्थितीत नाही. साकोलीत प्रफुल्लभाईंचे उजवे हात मानले जाणारे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडेंचा अपवाद वगळता भंडारा, तुमसरमध्ये राष्ट्रवादीला काही आशा नाही. तुमसरमध्ये नाना पंचबुद्धे उमेदवार असू शकतात. राखीव असलेल्या भंडार्‍यात शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले दीपक गजभिये हा चांगला पर्याय आहे. गोंदियात तिरोड्याची जागा जिंकण्याची राष्ट्रवादी आशा बाळगू शकते. गेल्या निवडणुकीत थोड्याफार मतांनी राष्ट्रवादीला ती जागा गमवावी लागली होती. आताच्या लोकसभा निवडणुकीतही गोंदियात फक्त तिरोड्यानेच प्रफुल्लभाईंना लीड दिली. बाकी गोंदिया, अर्जुनी मोरगाव व आमगावात राष्ट्रवादीजवळ भक्कम उमेदवार नाही. थोडक्यात विदर्भात राष्ट्रवादीची ही अशी गोळाबेरीज आहे. काँग्रेससोबत आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र लढलेत तरी आहे त्या जागांमध्ये वाढ होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही.

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top