वादग्रस्त जेठमलानी

देशातील भ्रष्ट राजकारणी, अट्टल गुन्हेगार आणि धनाढय़ांचे लाडके वकील असलेल्या राम जेठमलानी आपल्या प्रतिष्ठित अशिलांच्या सुटकेसाठी कुठल्याही पातळीवर जातात, हे देशातील जनता जाणते. त्यासाठी आवश्यकता पडली तर कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. राम जेठमलानींचा इतिहास ज्यांना माहीत आहे, त्यांना यात काही नवलही वाटत नाही. मात्र तरीही अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणप्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामबापूंच्या सुटकेसाठी जेठमलानींनी परवा न्यायालयात ज्या अफाट बुद्धीचे दर्शन घडविले त्याने सारा देश स्तब्ध झाला आहे. ‘बापूंवर आरोप करणार्‍या मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा दुर्धर आजार जडला आहे. त्या मानसिक विकृतीमुळे तिला परपुरुषांना एकांतात भेटण्याची इच्छा होते,’ असा दावा त्यांनी न्यायालयात केला. जेठमलानींच्या या दाव्यावर अत्यंत संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. सुप्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ‘त्या तरुणीचा ‘तो’ आजार बरा करण्यासाठी, तर आसारामकडून बलात्कार करण्यात आला नाही ना?’, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया नोंदविली आहे. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आसारामप्रमाणे जेठमलानींनाही तुरुंगाचा रस्ता दाखवा, या शब्दात तरुणाई आपला संताप व्यक्त करत आहे. मात्र जनतेच्या संतापाचा वा देशातील जनभावनेचा विचार करण्याची जेठमलानींना कधीच आवश्यकता वाटली नाही. ‘देशातील बहुसंख्य जनता एखाद्याला गुन्हेगार मानते याचा अर्थ तो दोषी आहे, असा होत नाही,’ असा त्यांचा नेहमीचा युक्तिवाद राहिलेला आहे.

इंदिरा गांधी, राजीव गांधींचे मारेकरी, संसदेवर हल्ला करणारे दहशतवादी, अफजल गुरू, दाऊद इब्राहिम अशा गुन्हेगारांचे वकीलपत्र घेण्याबद्दल राम जेठमलानींना कधीही पश्‍चात्ताप वाटला नाही. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबत आपले विचार स्पष्टपणे नमूद केले होते. ‘मी नेहमीच स्वतंत्रपणे विचार करतो. मी माझा आत्मा आणि शहाणपणा कोणाकडेही गहाण ठेवत नाही. मी माझ्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार कोणाचा बचाव करायचा हे ठरवितो. देशातील बहुसंख्य जनता एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार मानते त्यामुळे एखादा वकील जर त्याचे वकीलपत्र घेण्यास कचरत असेल वा त्यासाठी स्वत:ला दोषी मानत असेल तर तो व्यावसायिक आचारसंहितेचा भंग करण्यासाठी स्वत:च दोषी ठरतो.’ जेठमलानी साहेबांचे विचार हे असे महान असल्याने त्यांनी एखाद्याने देशाविरुद्ध गंभीर कट रचला वा देशाच्या पंतप्रधानांची हत्या केली, अशा कोणाचेही आरोपपत्र स्वीकारण्यास मागेपुढे पाहिले नाही. नामवंत स्मगलर हाजी मस्तान, शेअर घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहता, केतन पारेख, मॉडेल जेसिका लालची हत्या करणारा मनू शर्मा, गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणातील आरोपी गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शहा, हवाला घोटाळ्यातील आरोपी भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, २ जी स्पेक्ट्रम घोटाळय़ातील मंत्री एम.कनिमोझी, कर्नाटक खाण घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री बी. येदियुरप्पा, आयपीएलचे प्रवर्तक ललित मोदी, रामदेवबाबा आणि आता आसारामबापू अशा शेकडो नामवंत गुन्हेगारांचे वकील म्हणून त्यांची ख्याती आहे. जेठमलानींच्या आजपर्यंतच्या या गाजलेल्या खटल्यांची माहिती घेतली तर त्यांची आपल्या विचारांबद्दलची कमिटमेंट (!) किती उच्च दर्जाची आहे, हे लक्षात येईल.नैतिकता-अनैतिकतेचा घोळ ते कधीच घालत नाही. आपल्या युक्तिवादाने समोरचा माणूस उद्ध्वस्त होत असेल तर त्याची फिकीर मी का करायची, हा त्यांचा सवाल आहे. आपल्या अशिलाला विजय मिळवून देणे आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे ते मानतात. त्यामुळेच अडचणीत सापडलेल्या धनाढय़, भ्रष्ट गुन्हेगारांना त्यांचा मोठा आधार वाटतो. त्याच कारणामुळे ते देशातील सर्वाधिक महागडे वकील आहेत. काही मिनिटांच्या एका सुनावणीसाठी न्यायालयात उभे राहण्यासाठी ते ४0 लाख रुपये घेतात. आज वयाच्या ९0 व्या वर्षीही त्यांची बुद्धी अतिशय टोकदार आहे. बालपणापासूनच ते तैलबुद्धीचे होते. सध्याच्या पाकिस्तानातील सिंध प्रांतात शिकारपूर येथे १९२३ मध्ये जन्मलेल्या जेठमलानींना प्रखर बुद्धीमुळे १३ व्या वर्षीच त्यांना मॅट्रिकची परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी कायद्याची पदवी घेतली. तेव्हा वकिलीची सनद प्राप्त करण्यासाठी २१ वय असणे आवश्यक होते. मात्र जेठमलानींची बुद्धिमत्ता लक्षात घेऊन त्यांना १८ व्या वर्षीच वकिली करण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हापासून गेली ७२ वर्षे हा माणूस सतत कायद्याच्या लढाया लढतो आहे. एक साधा वकील ते देशाचे कायदेमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. याच अटलबिहारी वाजपेयींविरुद्ध त्यांनी २00४ च्या निवडणुकीत लखनौमध्ये निवडणूक लढविली होती. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने साथ देऊनही ते तेव्हा पराभूत झाले होते.

देशातील नंबर एकचे वकील असूनही त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा नेहमीच ठेवली आहे. १९७१ पासून ते निवडणुका लढवीत आहे. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत तेव्हाचे कायदेमंत्री एच.आर. गोखलेंना मुंबई उत्तर-पश्‍चिम मतदारसंघात पराभूत करून ते पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर ८0 च्या निवडणुकीतही ते विजयी झाले होते. १९८८ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. सध्या राजस्थानातून ते राज्यसभेवर आहेत. राजकारणात त्यांचं फारसं कोणाशीच कधी पटलं नाही. मात्र अदभूत वकिली कौशल्य आणि उपद्रवमूल्यांमुळे राजकीय पक्ष त्यांना नेहमी जवळ करत आले आहे. भारतीय जनता पक्षासोबत त्यांचा बर्‍यापैकी घरोबा राहिला आहे. मात्र वेळोवेळी भाजपच्या नेत्यांवर टीका केल्यामुळे त्यांची हकालपट्टीही झाली आहे. अटलबिहारी वाजपेयींना ते कधीच पसंत नव्हते. मात्र अडवाणींच्या आग्रहाखातर त्यांनी जेठमलानींना मंत्रिमंडळात घेतले होते. पुढे याच अडवाणींवर त्यांनी प्रखर टीका केली होती. काही महिन्यांपूर्वी नितीन गडकरींवर टीका केल्यामुळे भाजपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. काही वर्षांपूर्वी ‘भारत मुक्ती मोर्चा’, ‘पवित्र हिंदुस्थान कझगाम’ या बॅनरखाली त्यांनी राजकीय पक्ष स्थापनेचाही प्रय▪केला. आपल्याला भारताचा राष्ट्रपती व पंतप्रधान व्हायचं आहे, असंही त्यांनी अनेकदा बोलून दाखविलं आहे.

कायम वादात राहणं जेठमलानींना आवडते. वादग्रस्त या शब्दाला समानार्थी शब्द जेठमलानी आहे, असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही. आणीबाणीदरम्यान त्यांनी इंदिरा गांधींवर अतिशय प्रखर टीका केली होती. तेव्हा केरळ हायकोर्टाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढल्याने ते कॅनडात पळून गेले होते. वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन सरन्यायाधीश आदर्श सेन आनंद आणि अँटर्नी जनरल सोलो सोराबजीसोबत वाद निर्माण झाल्याने वाजपेयींनी त्यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. काही वर्षांपूर्वी ‘प्रभू रामचंद्र हा अतिशय वाईट नवरा होता,’ असे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. ‘काही लोकांच्या संशयाखातर आपल्या पत्नीला सोडणारा राम चांगला नवरा असूच शकत नाही. बायकोला १४ वर्षे वार्‍यावर सोडणारा लक्ष्मण, तर त्यापेक्षाही वाईट आहे,’ असे ते म्हणाले होते. शांत राहणं त्यांच्या स्वभावातच नाही. आठ वर्षांपूर्वी आता आपण राष्ट्रीय हिताचा कुठला महत्त्वाचा विषय असला तरच एखादा खटला स्वीकारू असे त्यांनी घोषित केले होते. मात्र काही दिवसांतच त्यांना आपल्या बोलण्याचा विसर पडला. जेसिका लालची हत्या करणार्‍या मनू शर्माचं वकीलपत्र घेतल्यानंतर त्यांनी आज आसारामपीडितेच्या चारित्र्याबाबत त्यांनी ज्याप्रकारे संशय निर्माण करण्याचा प्रय▪केला, तसाच प्रय▪जेसिका लालबाबत केला होता. त्यानंतर नामवंत पत्रकार करण थापर यांनी आपल्या ‘डेविल्स अँडव्होकेट’ या आपल्या गाजलेल्या कार्यक्रमात मनू शर्माची केस स्वीकारण्यात कुठलं राष्ट्रीय हित आहे, असा प्रश्न केला असता त्यांनी थापर यांना घराबाहेर घालविण्याची धमकी दिली होती. (‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही अडचणीचा प्रश्न विचारल्याने त्यांनी असेच धमकावले होते.) आता आसारामबापूंच्या अटकेमुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय हित धोक्यात आले, असे जेठमलानींना वाटले असण्याची शक्यता आहे. शेवटी ते देशातील सर्वात बुद्धिमान वकील आहेत.

(लेखक दैनिक पुण्य नगरीच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी-८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top