राहुल गांधी इंदिराजींच्या वाटेवर?

वर्तमान राजकारण हे एका अर्थाने इतिहासाची पुनरावृत्तीच

असते. आणीबाणीनंतर काँग्रेसची धूळधाण उडून जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांचा विश्‍वास परत मिळविण्यासाठी इंदिरा गांधी संपूर्ण देशाच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. बिहारमधील बेलचीत अत्याचारग्रस्त दलितांच्या भेटीसाठी कमरेएवढय़ा पाण्यातून मार्ग काढत हत्तीच्या पाठीवर बसून त्यांनी नदी पार केली होती. विदर्भ ही काँग्रेसला बळ देणारी भूमी आहे, अशी काँग्रेसमध्ये समजूत असल्याने इंदिराजींनी तेव्हा विदर्भाचाही दौरा केला होता. हा इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे त्यांचे नातू आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या काँग्रेसला पुनर्जीवित करण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच देशव्यापी दौर्‍यावर निघाले आहेत. चार दिवसांपूर्वी १६ किलोमीटर पायी चालून केदारनाथाचे दर्शन घेतल्यानंतर मंगळवारी त्यांनी रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवास करून पंजाब गाठले. आज गुरुवारी विदर्भात रणरणत्या उन्हात ते आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भेटीगाठी घेणार आहेत. ५६ दिवसांच्या अज्ञातवासानंतर जणू नवीन साक्षात्कार झाल्याप्रमाणे राहुल गांधी सुसाट निघाले आहेत. अर्थात हे असे दौरे, सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेण्याचे प्रकार ते पहिल्यांदा करताहेत अशातला भाग नाही. त्यांच्या म्हणजे संयुक्त लोकशाही सरकारच्या कार्यकाळातही रोजगार हमी योजनेच्या कामावर माती उचलण्यापासून दलित कुटुंबाच्या घरी मुक्काम करण्यापर्यंत आणि मुंबईत लोकलने प्रवास करण्यापासून देशात सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कलावतीच्या घरी भेट देण्यापर्यंत अनेक प्रकारे त्यांनी सामान्य माणसांसोबत जवळीक साधण्याचा प्रय▪केला. यासोबतच आपल्या काँग्रेस पक्षातील दलाल संस्कृतीवर वेळोवेळी तीव्र नापसंती व्यक्त करतानाच काही प्रसंगी तत्कालीन सरकारला निर्णय बदलविण्यासही त्यांनी भाग पाडले होते. मनमोहन सिंग सरकारच्या शेवटच्या काळात न्यायालयाने दोषी ठरविलेल्या कलंकित लोकप्रतिनिधींना वाचविण्याबाबतचा वटहुकूम पत्रकार परिषदेत फाडून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. विरोधकांनी या सार्‍या प्रयत्नांची ‘पब्लिसिटी स्टंट’ अशी संभावना केली असली तरी राहुल गांधी यांचा राजकीय प्रवास जवळून न्याहाळणारे अभ्यासक, पत्रकार त्यांच्या सिन्सिअँरिटीची ग्वाही देतात. राहुल गांधींचे इरादे नेक आहेत. त्यांना हा देश, येथील समस्या, सामान्य माणसांचं जगणं समजून घेऊन त्यावर मार्ग काढावयाचा आहे, असे त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सांगतात. काँग्रेसमधील पैसा, दलाली, घराणेशाहीचं प्रस्थ त्यांना निपटून काढायचं आहे, असंही सांगितलं जातं. त्यांच्या या संकल्पाबाबत अविश्‍वास दाखविण्याचं काही कारण नाही. फक्त राहुल गांधी याची सुरुवात कधी करणार आणि थेट मैदानात उडी घेऊन चांगलं-वाईट जे काही होईल त्याची जबाबदारी स्वत:च्या शिरावर कधी घेणार हा प्रश्न आहे. राहुल गांधी हे काही आता राजकारणात नवखे नाही. खासदार म्हणून आता त्यांची तिसरी टर्म सुरू आहे. गेली १0 वर्षे राष्ट्रीय राजकारणात ते महत्त्वाच्या स्थानी होते. सरकारच्या निर्णयप्रक्रियेत हवे ते बदल घडवून आणू शकतील, एवढा त्यांचा रुतबा नक्कीच होता. मात्र कलंकित लोकप्रतिनिधीबाबतचा वटहुकूम कचर्‍याच्या पेटीत टाकण्याच्या कृतीव्यतिरिक्त ठोस काही करताना ते दिसले नाहीत. मनमोहन सिंग सरकारच्या १0 वर्षांच्या कार्यकाळात सरकार व सोनिया गांधी आणि राहुल गांधी व त्यांचे सल्लागार समांतर चालताना दिसलेत. राहुल गांधी बाहेरून किंवा पक्षाच्या व्यासपीठावर नैतिक हितोपदेश करायचेत. मात्र प्रत्यक्ष सरकारमध्ये येऊन किंवा पक्षाची धुरा थेट हातात घेऊन सरकार किंवा काँग्रेसच्या व्यवस्थेत बदल करण्याची हिंमत काही ते दाखवू शकले नाहीत. मनमोहन सिंग सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारून सरकारमध्ये यावे, अशी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांची इच्छा होती. मात्र राहुल गांधींनी त्याकडे पाठ फिरविली. ते बाहेरूनच काय करायला हवे आणि काय नाही, याचे पाठ काँग्रेसजणांना गिरवीत बसले. बाहेरून बोलणं नेहमीच सोपं असतं. प्रत्यक्ष सत्तेत किंवा व्यवस्थेत गेल्याशिवाय तेथील चित्र बदलण्यात काय अडचणी आहेत, आदर्श आणि व्यवहारात काय फरक असतो, हे कळत नाही. राहुल गांधींनी तो अनुभव घ्यायला हवा होता. मात्र त्यांनी ते टाळलं. चांगलं जे काही होईल त्याचं श्रेय गांधी घराण्याच्या शिरपेचात रोवायचं आणि वाईट झालं तर ते पक्षाच्या माथी मारायचं, या काँग्रेसच्या टिपिकल कार्यसंस्कृतीला तेही बळी पडलेत. 
  गेल्या काही वर्षांतील राहुल गांधींचे कार्यक्रम, कार्यपद्धती, भाषणं यांचा अभ्यास केला तर त्यांची ‘थिंक टँक’ इतिहासाचाच आधार घेते आहे, हे लक्षात येते. राहुल गांधींचे पणजोबा पंडित नेहरू आणि आजी इंदिरा गांधी कोणत्या प्रसंगी कसे वागत याचा अभ्यास करून राहुल गांधींचे कार्यक्रम ठरविले जातात. मात्र राहुल गांधींच्या थिंक टँकने इतिहासातील एका गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या दोघांनीही प्रतिकूल परिस्थितीतही आव्हानांकडे कधी पाठ फिरविली नाही. फाळणीनंतर देशात गांधी-नेहरूंबद्दल प्रचंड असंतोषाचे वातावरण असताना एकदा नेहरू गांधींची भेट घेऊन घरी निघण्यासाठी कारमध्ये बसत नाही तोच मार डालो… मार डालो… गांधी को मार डालो… अशा घोषणा सुरू झाल्या. बाहेरचा जमाव प्रचंड खवळला होता. काहीही होऊ शकेल अशी स्थिती होती. अशा वातावरणात नेहरू कारच्या बाहेर आले आणि थेट जमावाच्या नजरेला नजर देत ज्याने कोणी ही घोषणा दिली त्याने गांधींना मारण्याअगोदर मला मारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान दिले. प्रचंड संतापलेला तो जमाव एका क्षणात शांत झाला. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींबद्दलही देशात असेच संतापाचे वातावरण होते. त्या जिथे जात तिथे निदर्शने होत.लोकं गोटमार करत. मात्र त्याची फिकीर न करता इंदिराजी देशभर सर्वसामान्य माणसात मिसळल्या. शेवटी अडीचच वर्षांत देशातील जनतेने पुन्हा सत्ता त्यांच्या हाती सोपविली. राहुल गांधींच्या मातोश्री सोनिया गांधी यांचंही उदाहरण अनुकरणीय आहे. त्यांनी जेव्हा राजकारणात एंट्री घेतली तेव्हा परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. विरोधक आणि पक्षातलेही लोक ‘गोरी चमडीवाली’, ‘विदेशी बहू’ या शब्दात त्यांना डिवचत होते. रोमन लिपीत लिहून आणलेलं भाषण वाचून दाखवतात म्हणून त्यांची टर उडविली जात होती. काँग्रेस आता संपली अशी घोषणा उन्मत्त भाजपेयी करत होते. अशा वातावरणात त्या टिकून राहिल्या. आपल्या र्मयादेसह चिकाटीने त्या लढल्यात.भाजपाचा उन्माद त्यांनी लोकांच्या लक्षात आणून दिला. पाचच वर्षांत सार्‍या टीकेंना पुरून उरत त्यांनी काँग्रेसला सत्तेत परत आणले. राहुल गांधींना गिरवायचा असेल तर पंडितजी, इंदिराजी आणि सोनियाजींचा हा जबाबदारी स्वीकारण्याचा आणि कोणत्याही परिस्थितीला थेट भिडण्याचा धडा गिरवायला हवा. तुमचे इरादे कितीही नेक असले तरी चांगल्या-वाईट परिस्थितीत तुम्ही मैदानात असता की नाही, याकडे जनता बारकाईने लक्ष ठेवून असते. राजकारण हा पॉर्टटाईम जॉब नाही. मूड असला तर लोकांच्या घरी-दारी जायचे, त्यांच्या घरी जेवायचे आणि मूड नसला तर महिनोमहिने परदेशात गायब राहायचे, हे येथे चालत नाही. नरेंद्र मोदींना काँग्रेसवाले कितीही ‘फेकू’ वा ‘नौटंकी’ म्हणोत, मात्र जनतेत मिसळण्याची वा त्यांच्यासोबत संवाद साधण्याची एकही संधी ते सोडत नाही. संवादाच्या सर्व पारंपरिक व आधुनिक साधनांचा ते खुबीने वापर करतात. राहुल गांधींचे पणजोबा व आजीच्या तुलनेत राहुल गांधींसमोरचं आव्हान अधिक कठीण आहे. नेहरूंसमोर परिस्थितीचं आव्हान होतं. मात्र त्यांना सर्मथ असे राजकीय विरोधक नव्हतेच. इंदिरा गांधींनी आणीबाणीसारखी घोडचूक करूनही चार दिशेला चार तोंडं असणार्‍या विरोधकांमुळे अडीच वर्षांतच सत्ता परत मिळवता आली. राहुल गांधींचं तसं नाही. भाजपासारखा कॅडरबेस पक्ष, त्याला देशपातळीवर असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ, मोदींसारखा चतुरस्त्र नेता असं आव्हान त्यांच्यासमोर आहे. यांना पुरून उरायचं असेल तर राहुल गांधींना लढण्याची व जबाबदारी स्वीकारण्याची जिगर दाखवावी लागेल. राहुल गांधींच्या सुदैवाने काँग्रेसची आता आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती होऊ शकत नाही. त्यामुळे पक्ष संपूर्णपणे ताब्यात घेऊन स्वत:ला हवे ते बदल घडविण्याची संधी त्यांच्याजवळ आहे. पक्षाची सूत्रे स्वत:कडे घेऊन पुढील चार वर्ष संपूर्ण देश पिंजून काढला तर स्थिती बदलायला वेळ लागणार नाही. भूमी अधिग्रहण विधेयक आणि सरकारमधील अनेक वाचाळ मंत्र्यांमुळे भाजपा सरकारबद्दलचं मत बदलायला तशीही सुरुवात झाली आहे. राहुल गांधी चिकाटीने लढलेत, पाच वर्ष सतत जनतेच्या सातत्याने संपर्कात राहिले तर नवीन इतिहास ते लिहू शकतात. फक्त त्यांची ती तयारी आहे का, एवढाच प्रश्न आहे
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top