राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काही प्रश्न…

-अविनाश दुधे

 

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) बजावलेल्या भूमिकेची जोरात चर्चा आहे. संघाने लक्ष घातलं आणि बघा… चमत्कार घडला, असे संघाचे भाबडे कार्यकर्ते एकमेकांना सांगत आहेत.

संघाचा या निवडणुकीत रोल होता का? हो…संघाने महायुतीला विजयी करण्याकरिता कंबर कसली होती, यात दुमतच नाही. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमयेपासून प्रत्येक विभागाचे, जिल्ह्याचे संघचालक, विभाग प्रचारक, प्रांत प्रचारकापासून तालुका स्तरावरील कार्यकर्ते भाजप, शिंदेंसेना व अजित पवार गटाला विजयी करण्यासाठी भिडले होते. मोदी- शहांच्या सभा किती मर्यादित ठेवायच्या, हे सुद्धा लिमये आणि त्यांची टीम ठरवत होती.

संघाच्या प्रयत्नांमुळे महायुतीला एवढे घवघवीत यश मिळाले की लाडकी बहीण योजना आणि मतदारांना दिलेल्या भरघोस लक्ष्मीप्रसादामुळे चमत्कार घडला, याबाबत वाद-प्रतिवाद होऊ शकतात. तोपर्यंत संघ कार्यकर्त्यांना संघाच्या अचाट ताकतीच्या भ्रमात राहू द्यायला हरकत नाही.

प्रश्न वेगळे आहेत.

संघ गेल्या १०० वर्षापासून उत्तम माणूस आणि चारित्र्य निर्मितीच्या गोष्टी करतो आहे. उत्तम चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्यांच्या समूहातून हे राष्ट्र महान होईल वगैरे… मेंदू लॉक करून बसणाऱ्या संघ स्वयंसेवकांना सतत सांगत असतो.

पण विटंबना बघा. या निवडणुकीत संघाला भाजपसह, शिंदे सेना व अजित पवारांच्या भ्रष्ट, बदनाम, चारित्र्यहीन , सर्वांनी ओवाळून टाकलेल्या नमुनेदार नेत्यांच्या मागे आपली ताकत उभी करावी लागली. त्यांच्यापैकी अनेकांनी संघाला मनसोक्त शिव्या घातल्या आहेत. अशांनाही विजयी करण्यासाठी संघ झटला. त्यासाठी हिंदुत्त्वाची दुहाई देण्यात आली.

छगन भुजबळ, राणेंचे दोन्ही पुत्र, तानाजी सावंत, हसन मुश्रीफ, संतोष बांगर, संजय गायकवाड, संजय राठोड, रवी राणा, मदन येरावार अशा अनेक नमुनेदार महाभागांसाठी संघ कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक केला. ६०० पेक्षा जास्त मिटिंग घेतल्या, असे सांगितले जाते. वेगवेगळ्या माध्यमातून संघाचे ग्लोरिफिकेशन करण्यासाठी या अशा कथा कौतुकाने सांगितल्या जात आहेत.

हिंदुत्त्वाच्या नावावर ही अशी माणसं निवडून आणल्याने महाराष्ट्र व देश आता मुसलमानांपासून अगदी सुरक्षित झाला, असे संघ मानतो काय? की भारतीय जनता पक्षाप्रमाणेच आपल्या वॉशिंग मशीनमधून यासारख्या नेत्यांना काढलेत की ही नेतेमंडळी एकदम पवित्र, स्वच्छ होतील, असे संघाला वाटते?

गेल्या १० वर्षात इतर पक्षातील अनेक बदनाम नेत्यांना भाजपात घेण्यात आले. त्या नेत्यांच्या चारित्र्यात किती बदल झाला? की त्यांच्या संगतीने बीजेपी-संघाचे नेतेच बिघडलेत?

संघाला, भाजपाला चिंतनाची गरज आहे.

या निवडणुकीत अनेक वर्षांपासून संघाचे कट्टर स्वयंसेवक असकेल्या काही एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. बडनेरा मतदार संघात ४० वर्षापासून कट्टर संघ स्वयंसेवक असलेल्या तुषार भारतीयांनी रवी राणांविरुद्ध उमेदवारी दाखल केली होती. भारतीय हे गेल्या अनेक वर्षांपासून राणाच्या अनागोंदी राजकारणाविरुद्ध जीव तोडून एकाकी लढत आहे. मेहनत घेत आहेत.

मात्र उत्तम माणूस आणि चारित्र्यनिर्मिती करण्याचा दावा करणाऱ्या संघाने आपल्या या स्वयंसेवकाला ताकद नाही दिली. केवळ ३३०० मते त्यांना मिळाली. संघाचे अमरावतीचे संघचालक आणि इतर कार्यकर्ते राणांच्या विजयासाठी झटत होते. त्यांच्यासोबतब समन्वय ठेवून नियोजन करत होते.

असा प्रकार अनेक मतदारसंघात झाला. निष्ठेने, व्यवस्था बदलण्याच्या तळमळीने काम करणाऱ्या संघ स्वयंसेवकांच्या पाठीमागे संघ उभा नाही राहिला. तिथे त्यांनी मूल्यांपेक्षा व्यवहार पाहिला. जे निवडून येऊ शकतील, ते कितीही भ्रष्ट असो, गुंडगिरी करणारे असो, व्यवस्था मोडीत काढणारे असो त्यांच्या मागे ताकत लावण्यात संघाने धन्यता मानली.

हे असे करण्यामागे लॉजिक एकच सांगितले गेले-मुसलमानांचा धोका मोठा आहे. हिंदुत्व धोक्यात आहे. त्यामुळे आपलं सरकार येणे आवश्यक आहे. शरद पवारांसारख्या जातीयवादी नेत्याला पराभूत करण्यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी केल्या तरी त्या क्षम्य आहेत. भाजप, शिंदे सेना, अजित पवारांच्या बदनाम नेत्यांना पुढे लाईन दोरीत ठेवता येईल. आमचे मोदी-शहा, संघ ते आरामात करतील. पण गेल्या काही वर्षांची कहाणी काय सांगते? संघ संस्कारांचा काहीही फरक बाहेरून आयात केलेल्या नेत्यांवर होत नाही.

मात्र काल्पनिक राक्षसांना पराभूत करण्याच्या उन्मादात आपल्यातही राक्षस जन्माला येतो आहे, याचा मात्र संघाला- भाजपाला विसर पडतोय.

संघ कितीही आदर्श, मूल्य, तत्वांचे गोडवे गात असला तरी व्यवहारात संघ हा असाच वागतो हा इतिहास आहे. या वागण्याचे समर्थन करतांना इतिहासातील अनेक चाणक्यांची उदाहरणं द्यायला ते तत्पर असतातच.

संघाचे हे नैतिक पतन अनेक वर्षापासून सुरू आहे. संघाच्या १०० व्या वर्षात या पतनाचा वेग अचंबित करणारा आहे. काँग्रेसच्या विषयात अनेक वर्षांपूर्वी हे घडलं होतं, मात्र आम्ही इतरांपेक्षा वेगळे असा टेंभा मिरवणारे त्याच मार्गावर आहे.

काळ कोणाला माफ करत नाही. आज काँग्रेस जात्यात आहे. संघ-भाजप सुपात आहे, एवढाच तो फरक. आणखी काही वर्षाने गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, असे म्हणण्याची पाळी संघावर आली तर नवल वाटायला नको!

Scroll to Top