भारतीय राजकारण आणि राजकारण्यांचा मनोभूमिकेचा ज्यांना उत्तम अभ्यास आहे, त्यांना मात्र यामुळे अजिबात धक्का बसला नाही़. हजारो-लाखोंच्या सभा गाजविणारे, जनमाणसांवर ज्यांची अतिशय उत्तम पकड आहे, असे शेकडो नेते प्रत्यक्ष आयुष्यात कुठलेतरी महाराज, तांत्रिक वा आध्यात्मिक गुरुच्या चरणी लीन होतात़. आपली सारी बुद्धिमत्ता, तडफ, धडाडी त्यांच्यासमोर गहाण ठेवतात, हा या देशातील नेत्यांचा इतिहास आहे़. कुठल्याही पक्षाचे वा विचारसरणीचे नेते याला अपवाद नाहीत़. (असलेच तर थोडेफार कम्युनिस्ट) इंदिरा गांधी या आजपर्यंतच्या भारतातील सर्वाधिक मजबूत नेत्या मानल्या जातात़. तरुण असतानाचा त्यांचा पत्रव्यवहार, भाषणं आणि आचरणही तपासलं, तर त्या आपल्या वडिलांप्रमाणेच विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नेत्या होत्या, हे लक्षात येतं. मात्र राजकारणातील अस्थिरता, शह-काटशह, वैयक्तिक आयुष्यातील आघात यामुळे नंतरच्या काळात त्या तंत्र-मंत्र, धार्मिक अनुष्ठानाच्यामागे लागल्या होत्या़. त्यांची अत्यंत जवळची मैत्रिण पुपुल जयकर यांच्या पुस्तकात यावर विस्ताराने लिहिण्यात आले आहे़. इंदिराजी पंतप्रधान असताना धीरेंद्र ब्रह्मचारी या वादग्रस्त तांत्रिकाला पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुक्त प्रवेश असे़. इंदिरा व
संजय गांधी यांच्या जिवाला धोका आहे़ त्यांचा नाश करण्यासाठी त्यांचे विरोधक गुप्त जागी गूढ तांत्रिक विधी करतात, अशा अफवा ब्रह्मचारी यांनी इंदिराजींच्या कानावर घातल्या होत्या़. विरोधकांचे तांत्रिक विधी निष्प्रभ करण्यासाठी प्रत्युत्तर म्हणून आपल्यालाही काही विधी करावी लागतील, असे सांगून धीरेंद्र ब्रह्मचारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानीच तंत्र-मंत्र विधी केले होते़. बरीच वर्ष या धीरेंद्र ब्रह्मचारीचा इंदिराजींवर प्रभाव होता़ नंतर संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर हा धीरेंद्र ब्रह्मचारी बोगस आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होते. मात्र मधल्या काळात हा तांत्रिक चांगलाच प्रभावी व धनवान झाला होता़. हिमाचल प्रदेशमध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने त्यांना आश्रमासाठी भूखंड दिला होता़. त्यांनी स्वत:साठी विमानही घेतलं होतं. एवढंच नव्हे, तर कुठलीही परवानगी न घेता शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखानाही या महाभागाने उभारला होता़. धीरेंद्र ब्रह्मचारीनंतर काही काळ महर्षी महेश योगी यांचाही इंदिराजींवर मोठा प्रभाव होता़. मन:शांतीसाठी आध्यात्मिक गुरु जे़ कृष्णमूर्ती यांच्याकडेही त्या अनेकदा जात असे़.
राजकारणातील कायमची अस्थिरता, विरोधकांच्या षडयंत्राची भिती, कोणाबद्दलही विश्वास न वाटणे या गोष्टीमुळे भलेभले विचारी मानले जाणारे राजकारणी मंत्र-तंत्र व बुवा-महाराजांच्या नादी लागतात़. अनेकदा घरातील जवळची नातेवाईक मंडळी वा जवळचे कार्यकर्ते अमुक एक महाराज वा तांत्रिक अतिशय ताकदवर आहे़ तो सर्व विधी व्यवस्थित पार पाडून विरोधकांचा बिमोड करेल़ उगाच रिस्क कशाला घ्यायची, असे सांगून राजकारण्यांना मांत्रिक व महाराजांचे भक्त बनवितात़. देशातील व महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक धुरंधूर पुट्टपुर्थीच्या सत्यसाईबाबांच्या नादी कसे लागले होते, हे सर्वांना माहीत आहे़ माजी पंतप्रधान नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती ए़पी़जे़ अब्दुल कलाम, माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण, शिवराज पाटील निलंगेकर , माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे असे शेकडो नेते सत्यसाईबाबांच्या चरणावर लोटांगण घालत असे़. आपण
महाराष्ट्रातील राजकारण्यांबाबत सांगायचं झाल्यास राज्यातील बरेच नेते मागील दशकात इंदोरच्या भय्यू महाराजांच्या भजनी लागल्याचं आपणं पाहिलं आहे़. या भैय्यू महाराजांच्या भक्तांमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे़. दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यांचे कट्टर विरोधक नारायण राणे, राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे यांच्यासह राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व सेनेचे बहुतांश नेते इंदोरला नित्यनेमाने वारी करत असे़. कोणत्या नेत्याला कधी अनुकूल दिवस आहेत, कधी वाईट काळ आहे, त्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, हे महाराज नेमकेपणाने सांगतात, असे सांगितले जाते़. १९९९ ते २००४ या काळात भय्यू महाराज जोरात होते़. महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा तेव्हा मोठा प्रभाव होता़. त्याकाळात पक्षाचं तिकीट मिळविण्यासाठी कार्यकर्ते पक्षाच्या नेत्यांकडे जाण्याऐवजी भय्यू महाराजांच्या इंदोरच्या आश्रमात जात असे़. महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांवरही महाराजांनी मोहिनी घातली होती़. गेल्या काही वर्षात मात्र महाराजांचा प्रभाव ओसरला आहे़. नाही म्हणायला विधानसभा निवडणुकीअगोदर जागावाटपाच्या चर्चेच्यावेळी भाजपाला १५१ जागा मागायच्या़ त्यापेक्षा एक जागा कमी घ्यायची नाही, असा सल्ला भय्यू महाराजांनीच आदित्य ठाकरेंना दिला होता़. ठाकरे त्यावर ठाम राहिले़ मात्र पुढे काय झाले, हे सर्वांनाच माहीत आहे़. असो़! आपल्याकडे सर्वच नेत्यांचा एक महाराज असतो, हे महत्वाचं. शेवटी काय़़… आपले नेते आपलंच प्रतिनिधीत्व करतात़. आपल्याकडे जसं प्रत्येक कुटुंब बिनडोकपणे कोणत्या ना कोणत्या बुवा-महाराज-तांत्रिकाला आपल्या आयुष्याची सर्व सूत्रे सोपवून देतात़़. तसंच नेत्यांचंही़. त्यामुळे नितीशकुमार काही वेगळं करत आहे, असं मानायचं कारण नाही़.
सव्वाशे कोटी जनतेचे प्रतिनिधीत्व करतो याचा साफ विसर पडून हे नेते कोणताही सामान्य जादूगर करु शकेल, असे प्रयोग करणाऱ्या सत्यसाईबाबांना शरण जात असे़. बाबांचा आशिर्वाद मिळाला की कृतकृत्य होऊन हे नेते नव्या जोमाने कामाला लागत़. अशोक चव्हाण यांनी तर कहर केला होता़. त्यांनी मुख्यमंत्री झाल्याझाल्या आपल्या सरकारी निवासस्थानी सत्ससाईबाबांची पाद्यपूजा केली होती़. (ही पाद्यपूजा पुढे त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवू शकले नाही, हा भाग वेगळा़) सत्यसाईबांबाव्यतिरिक्त तांत्रिक चंद्रास्वामी, स्वामी नित्यानंद, आसारामबापू, स्वामी रामपाल, माँ आनंदमयी अशा अनेकांनी राजकारण्यांना मोहिनी घातली आहे़. सद्याच्या भाजपा सरकारमधील अनेक नेत्यांना बाबा रामदेव हे देशातील सर्वात ताकदवर महाराज वाटतात़. सुरुवातील योगासनापुरते मर्यादित असणारे हे बाबा आता बिनधास्त कुठल्याही विषयावर बोलतात़. इतर सर्व बुवा-महाराजांप्रमाणेच हेही अफाट संपत्तीचे धनी आहेत़. अगदी परदेशातही समुद्रातील बेटच्या बेटं त्यांनी विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे़.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत़)