मोदींना आणखी वेळ दिला पाहिजे!

भारतीय माणूस बहुतांश विषयांमध्ये अगदी सरळधोपट पद्धतीने विचार करतो. एखाद्या व्यक्तीच्या कामाचं वा कर्तृत्वाचं मोजमापही तो अशाच सरळसोट पद्धतीने करतो. मुळात आपल्याला माणसांकडे माणूस म्हणून पाहायची सवयच नाही. राजकारण, समाजकारण, चित्रपट, साहित्य, कला, क्रीडा या क्षेत्रातील नामांकित माणसांकडे तर आपण आणखीणच वेगळ्या पद्धतीने पाहतो. या लाईमलाईटमधील माणसांना एकतर आपण नायकाच्या फ्रेममध्ये बसवून संपूर्ण श्‍वेतधवल रंगात रंगवितो किंवा खलनायक करून काळाकुट्ट रंग त्याला फासतो. खरंतर व्यवहारात कुठलाही माणूस संपूर्णत: काळा वा पांढरा कधीच नसतो. तो अधेमधे कुठेतरी असतो. वेगवेगळ्या लोकांचे या माणसांबद्दलचे अनुभव संमिश्र असतात. एखादा नामवंत एखाद्या व्यक्तीसाठी, समूहासाठी देवदूत असतो. त्याचवेळी दुसर्‍या काही माणसांसाठी तो आयुष्य उद्ध्वस्त करणारा नीच, कपटी, लबाड माणूस असतो. शेवटी एखाद्याच्या वाट्याला त्या प्रसिद्ध व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वातील कुठले शेड्स आलेत, यावर त्याचं आकलन ठरतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक वर्षाच्या कारकिर्दीचं विश्लेषण करतानाही हा असाच काहीसा प्रकार होतो आहे. 
   सध्या देशभरातील वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या व इतर

माध्यमांतही मोदींचं पंतप्रधानपदाचं एक वर्ष कसं राहिलं यावर भरपूर चर्चा झडत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आपली मते मांडत आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता मोदींबद्दल टोकाची मत व्यक्त करणार्‍यांची संख्या अधिक आहे. मोदींचे भक्त आणि भाट केवळ एका वर्षात मोदींनी देशाला नवीन वळण कसं दिलं, अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल कसा घडतो आहे, याच्या खर्‍याखोट्या कहाण्या रंगवून सांगत आहेत. दुसरीकडे मोदीविरोधकही काही कमी नाहीत. त्यांना मोदींमध्ये काहीही चांगलं दिसत नाही. हा माणूस एक नंबरचा फेकू आहे. खोटं रेटून बोलणं एवढंच त्यांना छान जमते. गेल्या वर्षभरात त्यांनी केवळ फेकाफेकी केली. स्वत:चा उदो-उदो करून घेतला, अशी प्रखर टीका ते करताहेत. मोदीसर्मथक जसे मोदींच्या तथाकथित कर्तृत्वाच्या खर्‍याखोट्या कहाण्या सांगताहेत त्याच पद्धतीने विरोधकही तोच खोटानाटा प्रकार अवलंबून मोदींची प्रतिमा जेवढी मलिन करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

या परस्परविरोधी मतांच्या गदारोळात नेमकं सत्य आहे, हे समजून घेण्यात सामान्य माणसाचा अतिशय गोंधळ उडतो आहे. सर्वप्रथम मोदींचे विरोधक काय म्हणतात ते पाहिलं पाहिजे. मोदींच्या बहुतांश टीकाकारांनी एक पंतप्रधान म्हणून त्यांच्या कारकिर्दीच विश्लेषण करण्याऐवजी सामाजिक अंगानेच त्यांची जास्त चिरफाड केली आहे. मोदींचे विरोधक मोदींचा पूर्वेतिहास विसरायला अजिबात तयार नाही. २00२ मधील गुजरातमधील मुसलमानांच्या रक्तरंजित हत्याकांडांचा नायक पंतप्रधानपदावर पोहोचला तरी त्याला माफ करता येणार नाही, अशीच या विरोधकांची भूमिका आहे. त्यामुळे मोदींचं इतर कुठलंही कर्तृत्व समजून घ्यायची त्यांची अजिबात तयारी नाही. हा माणूस देशाची निधर्मी ढाचा, संविधानाची, लोकशाहीची चौकट मोडायला निघाला आहे, अशीच त्यांची धारणा आहे. गेल्या वर्षभरात जगभरात मोदींचं भरपूर कौतुक झालं असलं तरी यांनी मोदींच्या नावावर कायमस्वरूपी फुली मारली आहे. त्यामुळे मोदींच्या प्रत्येक निर्णयाची, हालचालीची नकारात्मक दृष्टीने चिरफाड करायची आणि नंतर मोदींविरोधात जेवढा विरोधी प्रचार करता येईल तेवढा करायचा हे जणू मिशन असल्यासारखं त्यांचं वागणं आहे. मोदीविरोधकांना लोकशाही मूल्यांबद्दल असलेली कळकळ, संविधानबाह्य सत्ताकेंद्रांबद्दल असलेली चीड, शिक्षण, इतिहास, सामाजिक सुधारणा या विषयात काटे उलटे फिरविण्याबाबतच्या प्रयत्नांबाबत असलेला तीव्र संताप समजून घेता येतो. हे सर्व प्रकार कुठल्याही सुजाण नागरिकांना अस्वस्थ करावे असेच आहेत. या सगळ्या विषयांना ताकदीने विरोध झालाच पाहिजे. मात्र मोदीविरोधक ज्या आक्रस्ताळी पद्धतीने हे सगळं करत आहे, त्याचं नवल वाटते. २४ तास विचार आणि मूल्यांचे गोडवे गाणारे विचारवंत, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांचा विचार व विवेकावरचा विश्‍वास उडाल्यासारखं त्यांचं वागणं आहे. एवढी वर्ष संघ परिवार जे करत होता तीच ही पुरोगामी म्हणविणारी मंडळी करत आहे. संघ परिवाराने कायम द्वेषाचं, समाज तोडण्याचं काम केलं, असं त्यांच्याबद्दल ही मंडळी बोलतात. आता मोदींना विरोध करणारी मंडळी वेगळं काही करत नाही. तेही मोदींचा, संघ परिवाराचा टोकाचा द्वेष बाळगूनच सारी मांडणी आणि प्रचार करताहेत. मोदी आणि संघ परिवाराला अभ्यासाने, विचाराने आणि विवेकाने उत्तर देऊन त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर मांडता येऊ शकतो, पण तसं न करता प्रत्येक गोष्टीला विरोध करून संघ परिवारासारखाच खोटानाटा प्रचार करण्याची रणनीती पुरोगाम्यांनी अवलंबली आहे. ही मंडळी ज्या लोकशाही मूल्यांचे गोडवे गातात त्याबद्दल त्यांना आदर आहे, असे त्यांच्या वागण्यात दिसत नाही. देशातील बहुसंख्य जनतेने लोकशाही पद्धतीने मोदींना पाच वर्षांसाठी निवडले आहे. आता एक वर्षानंतर जे ओपिनियन पोल-सर्व्हे वगैरे झालेत त्यातही लोकांच्या मनावर अजूनही मोदींचं गारुड आहे, असं लक्षात येतं आहे. असं असताना ते स्वीकारण्याची तयारी का नाही? जोपर्यंत आपल्याला अनुकूल अशा घटना घडतात तोपर्यंत लोकशाही संस्था वगैरेंबद्दल आदर बाळगायचा मात्र संस्था आपल्या विरोधकांच्या हातात गेल्यानंतर चडफडाट करायचा हे कुठल्या मूल्यांमध्ये बसते? मोदी विरोधकांच्या अशा आक्रस्ताळी वागण्यातून मोदींचा कळप मजबूत होण्याचेच काम होणार आहे. या अशा वागण्यामुळेच लोकसभा निवडणुकांदरम्यान देश कशा पद्धतीने विचार करतो आहे हे पुरोगाम्यांच्या, विचारवंतांच्या लक्षात आले नव्हते. मोदींच्या पूर्वेतिहासाबद्दल अनेकांना प्रचंड संताप आणि आक्षेप असला तरी त्याच इतिहासामुळे ते अनेकांचे हिरोही आहेत, हे कटू असलं तरी सत्य आहे. या देशात सध्या निर्णायक संख्येत पोहोचलेला मध्यमवर्ग कसा विचार करतो हेच अनेकांच्या लक्षात येत नाहीय. त्यामुळेच परिस्थितीचं आकलन करण्यातही गफलत होते. आता मोदी सर्मथक म्हणताहेत त्याप्रमाणे वर्षभरात देशाला खरंच ‘अच्छे दिन’ आलेत का, हेसुद्धा तपासून पाहिलं पाहिजे. मोदींनी निवडणूक प्रचार काळात खूप काही रंजक घोषणा केल्या असल्या तरी सामान्य माणसाला त्याचं रोजचं जीवन सुसह्य व्हावं, जीवनावश्यक वस्तू स्वस्त किमतीत मिळाव्यात, माफक चैन करता यावी एवढीच अपेक्षा असते. त्याचे अच्छे दिनाची व्याख्या हीच असते. (मोदी कुठल्या विचाराचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा सामाजिक अजेंडा काय आहे, याच्याशी सामान्य माणसाला काही देणे-घेणे नसते.) हा निकष लावून विचार करायचा झाल्यास या वर्षभरात गेल्या सरकारच्या तुलनेत मोठा बदल असा कुठलाच झाला नाही. महागाई वाढली नाही, हे खरं आहे, पण त्यासाठी मोदी सरकारने काही केलं म्हणण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव घसरल्याने भाव स्थिर राहिले. अर्थात मोदींनी वर्षभरात काहीच केलं नाही हे म्हणणेही चूक आहे. अनेक विषयांत ठोस काहीतरी करण्याची धडपड मोदी नक्कीच करत आहेत. त्यांच्या सततच्या परदेश दौर्‍याबद्दल भरपूर टीका आणि विडंबन झालं असलं तरी एक ठोस प्लॅन घेऊन ते वेगवेगळ्या देशात फिरलेत आणि स्वत:ची एक कणखर नेता म्हणून छाप सोडली, हे नाकारण्यात अर्थ नाही. संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणुकीत वाढ, रेल्वेच्या पायाभूत संरचनेत खासगी गुंतवणुकीला मुभा, विमा क्षेत्रात परकीय गुंतवणूक, रस्ते आणि दळणवळणाची प्रलंबित कामे मार्गी लावून अनेक नवीन कामे हाती घेणे या त्यांच्या उपलब्धी नक्कीच सांगता येतील. मोदी मंत्रिमंडळातील ९0 टक्के मंत्री कळसूत्री बाहुले असले तरी नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू हे मंत्री व्हिजन ठेवून काम करताहेत.आगामी दोन-वर्षांत त्यांच्याकडे जे विभाग आहेत त्यामध्ये आमूलाग्र बदल होतील, असे दिसते आहे. (आता हे लोक संघाशी संबंधित आहेत म्हणून त्यांचं दिसत असणारं काम आणि त्यांची कमिटमेंट नाकारायची असेल, तर मग हरकत नाही.) मोदी स्वत:ही भरपूर कामे करत आहेत. मात्र सर्व काही स्वत:भोवती गुरफटून घेण्यामुळे आणि सहकारी मंत्र्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य नसल्याने अनेक विषयातील निर्णय प्रक्रिया थंडावली आहे. मोदींवर हुकूमशहा असल्याची आणि संपूर्ण अधिकारांचं पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीकरण झाल्याची टीका होत आहे. ते खरंही आहे. मात्र मंत्र्यांना भरपूर स्वायत्तता आणि अधिकाराच्या विकेंद्रीकरणामुळे झालेले घोटाळेही आपण पाहिले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर लोकशाही चौकटीत र्मयादित हुकूमशाहीच्या या प्रयोगाचे काय निकाल येतात, हेही तपासून पाहायला हरकत नाही. (यामुळे एकदम देशाची लोकशाही चौकट वगैरे मोडीत निघेल याची काळजी करण्याचं काही कारण नाही.) बाकी मोदी जादूई चिरागप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात चमत्कार घडवेल ही अपेक्षा स्वाभाविकच फोल ठरली. एवढय़ा मोठय़ा देशात असे चमत्कार घडतही नसतात. मोदींनी स्वत:च लोकांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्याने अनेकांची निराशा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सोशल नेटवर्किंगवर दिसायला लागले आहे. भूमी अधिग्रहण कायदा आम्ही म्हणू त्याच स्वररूपात संमत झाला पाहिजे या त्यांच्या अट्टहासामुळे त्यांच्या लोकप्रियततेला ग्रहण लागणे सुरू झाले आहे. हा माणूस उद्योजकांचा हितकर्ता आहे, त्यांचे हितसंबंध जपण्यात मोदींना रस आहे, हा राहुल गांधींचा प्रचार लोकांच्या पचनी पडत आहे. बाकी गेल्या वर्षभरात मोदींनी अनेक आघाड्यांवर छाप सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांचे सहकारी मंत्री वाटेल ते बरळत असले तरी मोदींनी स्वत:वर भरपूर नियंत्रण ठेवलं. हेडगेवार-गोळवलकर हे त्यांचं मातृकूल असलं तरी सार्वजनिकरीत्या मोदींनी गांधी आणि गौतम बुद्धांचेच गोडवे गायिलेत. (अर्थात ही त्यांची मजबुरीही आहे.) सार्वजनिक ठिकाणी वावरताना अमेरिका व पाश्‍चात्त्य राष्ट्रप्रमुखांची नक्कल करण्याचा आणि सहज वागण्याचा त्यांचा प्रयत्नही प्रशंसनीय आहे. बराक ओबामासारखं घाईघाईत विमानाच्या पायर्‍या चढणे, मुलांसोबत, नेत्यांसोबत सेल्फी काढणे, ड्रम वाजविणे अशा प्रकारातून त्यांनी जोरदार प्रतिमा निर्मिती केली. मात्र आता नव्याचे नऊ दिवस संपले आहेत. आता येणार्‍या वर्षांमध्ये त्यांचं अधिक कठोर विश्लेषण होणार आहे. ज्या उद्योजक आणि मध्यमवर्गीयांनी त्यांना डोक्यावर घेतलं त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही, तर ते खाली पाडायलाही कमी करत नाही. मोदींची आता खर्‍या अर्थाने परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे मोदींच्या कार्यकर्तृत्वाचा निकाल आताच जाहीर करण्याची घाई करण्यापेक्षा त्यांना आणखी वेळ दिला पाहिजे.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

1 thought on “मोदींना आणखी वेळ दिला पाहिजे!”

  1. अविनाशजी, मनातले विचार मांडल्यासारखं वाटलं अगदी . कंसातल्या
    वाक्यात विशेष जान आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top