महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्हं दिसत नाहीय. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रं आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर या विषयात जोरदार वाद-प्रतिवाद सुरू आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेने अतिशय जोरकसपणे हा विषय लावून धरला आहे. जेम्स लेन प्रकरणात २00४ मध्ये जशी स्थिती निर्माण झाली तशी काहीशी स्थिती आता निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्याबद्दल चुकीची आणि विकृत मांडणी करणार्या पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर कसा होतो, हा ब्रिगेडचा सवाल आहे. या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारलाही आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. संभाजी ब्रिगेडचे पुरंदरेंबद्दल प्रामुख्याने चार आक्षेप आहेत. नंबर एक-पुरंदरे यांनी आपल्या ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकात जिजाऊंच्या चारित्र्याबद्दल गैरसमज निर्माण होतील, असा मजकूर लिहिला आहे. जेम्स लेनच्या पुस्तकात जिजाऊंबद्दल प्रसिद्ध झालेल्या अवमानजनक मजकुराचे कर्तेकरविते हे पुरंदरेच होते, असे बिग्रेडचे ठाम मत आहे. पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात मराठा व कुणबी स्त्रियांची जाणीवपूर्वक बदनामी केली आहे, हा त्यांच्याबद्दल दुसरा आक्षेप आहे. पुरंदरेंनी त्यांच्या शिवचरित्राच्या मांडणीत शिवाजी महाराज हे मुस्लिमद्वेष्टे होते, या पद्धतीची मांडणी करताना मुस्लिमांबद्दल संताप निर्माण होईल असे अनैतिहासिक प्रसंग लिहिले आहेत., हा तिसरा आक्षेपाचा विषय आहे. महाराजांच्या सैन्यात हजारो मुस्लिम होते. त्यांचे अनेक जवळचे सहकारीही मुस्लिम होते. असे असतानाही मुस्लिमद्वेष निर्माण करण्यासाठी पुरंदरेंनी जाणीवपूर्वक इतिहासाचा अपलाप केला आहे, असे ब्रिगेड म्हणते. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद चिघळण्यात याच पुरंदरेंचा सिंहाचा वाटा होता., हा पुरंदरेंवर चौथा आक्षेप आहे.
विशेष म्हणजे पुरंदरेंवर आरोप करताना आणि त्यांना पुरस्कार देण्यावर आक्षेप घेताना संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि इतर समविचारी संघटना ठोस पुरावे घेऊन मैदानात उतरल्या आहेत. पुरंदरेंच्याच पुस्तकातील उतारे वेगवेगळ्या माध्यमातून ते शब्दश: मांडत आहेत. राजा शिवछत्रपती पुस्तकात पुरंदरे एकेठिकाणी ते लिहितात-‘पंतांचे शहाजीराजांवर, आईसाहेबांवर, शिवबावर, भोसले कुटुंबावर असे प्रेम होते, स्वामी आणि सेवक हे नाते नव्हतेच उरलेले. पंत म्हणजे भोसल्यांच्या कुटुंबातलेच. राजांच्या घरातले ते मानाचे, धाकाचे, दरार्याचे, मायेचे व ममतेचे वडिलधारी पुरुष होते… राजांचा (शहाजीराजांचा) आणि त्यांचा स्वभाव राजकारणात सारखाच होता. आईसाहेबांवर ते फार माया करीत. ही बाई अशी तशी नाही. हिची जडणघडण काही वेगळीच आहे, हे त्यांनी ओळखले होते. शिवबावर तर खुद्द शहाजीराजांचाही नसेल एवढा जीव पंतांचा होता… ते अधूनमधून कधी कधी स्वत:च्या संसारातही लक्ष घालीत. पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, गोत्र शांडिल्य, तर खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे आणि शिवबांचे गोत्र एकच होते.’ हा मजकूर शंभर टक्के खोडसाळ आहे. या परिच्छेदात पुरंदरेंनी बिटविन द वर्ड जे काही मांडण्याचा प्रय▪केला आहे, ते संतापजनकच आहे. हा मजकूर कितीही सकारात्मक घेण्याचा प्रय▪केला तरी ‘पंत देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, गोत्र शांडिल्य, तर खरे म्हणजे त्यांचे, आईसाहेबांचे आणि शिवबांचे गोत्र एकच होते.’ या ओळींचा अर्थ काय काढायचा हे जरा पुरंदरे आणि त्यांच्या सर्मथकांनी महाराष्ट्राला समजावून सांगितलं पाहिजे. पुस्तकातील ‘सकळ पृथ्वी आंदोळली’ या प्रकरणात कुणबी स्त्रियांचा उल्लेख करताना ‘बर्या, नीटस, गोर्या जातीवंत कुणबिणी’ बाजारात सहज ‘पंचवीस होनांस पांच’ विकत मिळत होत्या, असे पुरंदरेंनी लिहून ठेवले आहे. या उल्लेखालाही इतिहासात कुठे आधार नाही. मुसलमान राजवट आणि मुसलमान राज्यकर्ते किती क्रूर होते यावर पुस्तकात शेकडो पाने खर्ची झाली आहेत. मात्र नूर बेग, दौलत खान, सिद्दी हिलल, मदारी मेहतर अशा असंख्य मुसलमान सहकार्यांनी महाराजांना जिवावर उदार होऊन साथ दिली, हे वास्तव पुरंदरेंनी पुस्तकात कुठेही मांडलं नाही. महाराष्ट्रभर शिवकथा सांगतानाही हे वास्तव त्यांना सांगावसं वाटलं नाही. अफजल खानाचा वध पुरंदरे ठिकठिकाणी रंगवून सांगत होते, मात्र त्याअगोदर त्यांच्यावर वार करणार्या कृष्णाजी कुळकण्र्याचे डोके महाराजांनी उडविले होते, हे ते सोयीस्करपणे लपवीत असत.
अशी लपवाछपवी पुरंदरेंनी अनेक प्रसंगांबाबत बेमालूमपणे केली आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद चिघळविण्यातही त्यांची मोठी भूमिका आहे. शिवजंयतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाच्या इतिहासकारांच्या समितीत बाबासाहेब पुरंदरे होते. वा. सी. बेंद्रे, न. र. फाटक, ग. ह. खरे, द. वा. पोतदार व पुरंदरे यांच्या समितीने सन २000 मध्ये १९ फेब्रुवारी १६३0 ही शिवरायांची जन्मतारीख असल्याचा अहवाल शासनाला दिला. मात्र शासनाच्या समितीत तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी व्हावी, अशी भूमिका घेणार्या पुरंदरेंनी आपले मित्र कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांना तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी केली पाहिजे, असे पत्र देऊन मुद्दाम घोळ निर्माण केला. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी अमरजित पाटील यांनी काही वर्षांपूर्वी या दुटप्पीपणाबद्दल एका जाहीर कार्यक्रमात पुरंदरेंना विचारणा केली तेव्हा त्यांच्याजवळ समाधानकारक उत्तर नव्हते. याबाबत त्यांनी लेखी माफीनामाही पाटील यांना लिहून दिला होता. संभाजी ब्रिगेडने हा सर्व इतिहास व पुरंदरेंच्या पुस्तकातील वादग्रस्त मजकूर महाराष्ट्रासमोर आणून त्यांना महाराष्ट्र भूषण देण्यास विरोध का आहे, हे ताकदीने मांडले. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. दुसरीकडे पुरंदरे व त्यांचे सर्मथक मात्र कुठलाही समाधानकारक प्रतिवाद करू शकले नाही. दोन दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीवर श्रीमंत कोकाटे पुरावे समोर ठेवून नेमकेपणाने बाजू मांडत असताना पांडुरंग बलकवडे, देशपांडे हे पुरंदरे सर्मथक असंबद्ध युक्तिवाद करत होते. सोशल नेटवर्किंगवरही केवळ ब्राह्मणविरोधातून हा प्रकार घडत असल्याचा युक्तिवाद पुरंदरे सर्मथकांकडून केला जात आहे. संभाजी बिग्रेड आणि त्यांची मातृ संघटना मराठा सेवा संघाचा आतापर्यंतचा ब्राह्मणविरोधाचा इतिहास पाहता या वादाला ‘ब्राह्मण विरुद्ध अब्राह्मण’ असं स्वरूप येणं अगदी स्वाभाविक होतं. त्यातूनच पुरंदरे ब्राह्मण आहेत म्हणून ब्रिगेडतर्फे त्यांना विरोध केला जात आहे, असा बुद्धिभेद काही मंडळी करत आहेत. संभाजी बिग्रेड व सेवा संघ ब्राह्मणांचा राग करतात. देशातील प्रत्येक समस्येला ब्राह्मणच जबाबदार आहेत, अशी मांडणी त्यांच्याकडून होते, हे सत्य असले तरी या पुरंदरे प्रकरणात केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून ब्रिगेड त्यांना विरोध करत आहेत, असे म्हणता येत नाही. पुरंदरेंच्या चुकीच्या इतिहास लेखनाबद्दल आणि जिजाऊंबद्दल अप्रत्यक्षपणे त्यांनी जे अवमानजनक लिखाण केले आहे त्याबद्दल ब्रिगेडवाल्यांचा संताप जुना आहे. फार तर या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामुळे तो पुन्हा उफाळून आला एवढं म्हणता येईल. मात्र संभाजी बिग्रेडने या विषयात पुरंदरेंना विरोध करण्याची भूमिका घेतल्याने महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगामी मंडळी तोंडाला पट्टी लावून बसली आहे. संभाजी बिग्रेडच्या मुद्याचं सर्मथन केलं तर आपण जातीयवादी किंवा ब्रिगेड सर्मथक ठरू की काय, अशी भीती त्यांना वाटत असावी. खरं तर महाराष्ट्राला कुठल्याही परिणामाची चिंता न करता सत्य निर्भीडपणे मांडणार्या विचारवंतांची परंपरा आहे. मात्र या विषयात सारे पुरोगामी विचारवंत मूग गिळून बसले आहेत. बाबासाहेब पुरंदरेंनी चुकीचा इतिहास मांडला. जातीय चष्म्यातून घटनांची मांडणी केली, इतिहासाची मोडतोड केली, हे सांगितलं तर ब्राह्मण विरोधक ठरण्याची भीती मनात बाळगण्याचं काही कारण नाही. खरं तर ब्राह्मण समाजातील संशोधक, विचारवंत व पुरोगामी विचारधारेच्या मंडळींनीही या विषयात स्पष्टपणे बोललं पाहिजे. बहुजनांच्या क्षुल्लक चुकांबाबतही रान उठविणारे आणि सुजाण म्हणविणारे ब्राह्मण आपल्या जातीबांधवांच्या चुकांबद्दल, वर्णवर्चस्वाबद्दल कधी बोलत नाही, निषेध करत नाही, असे सेवा संघ कायम सांगत असतो. ते चुकीचं आहे, हे यानिमित्ताने दाखवून देण्याची संधी आहे.
त्याचवेळी संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघानेही या विषयाकडे जातीच्या चष्म्यातून पाहणं टाळलं पाहिजे. खरं तर आपल्या कार्यकर्त्यांची ती सवयच ब्रिगेडने मोडीत काढण्याची गरज आहे. या प्रकरणातब्रिगेडचे प्रमुख पदाधिकारी जरी पुराव्यांचा आधार घेऊन केवळ मुद्यावरच बोलत असले तरी कार्यकर्ते मात्र या वादाला ब्राह्मणविरोधी स्वरूप देत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. या विषयात ज्यांनी काही वेगळा सूर लावला, त्यांना एकदम पुरंदरे सर्मथक ठरवून त्यांच्याबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषेचा वापर सुरू आहे.अशांना आवरलं पाहिजे. इतिहासाची मांडणी आपल्या सोयीनं करण्याचा प्रय▪झाल्यास सारंच मुसळ केरात जाते. गेल्या १६ वर्षांत १२ ब्राह्मण व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला हे सांगताना त्या १६ वर्षांत राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा, दलित व बहुजन माणूसच होता हेही लोकांना सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पुरंदरेंना विरोध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अवमान करण्याचं कारण काय? केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून? महाराष्ट्र भूषण पुरस्कार निश्चित करणारी समितीचे प्रमुख सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे आहेत. उज्ज्वल निकम, वासुदेव कामत, मंगल कांबळे, राजीव खांडेकर, दिलीप वेंगसरकर, वल्सा नायर, अजय आंबेकर हे समितीचे अन्य सदस्य होते. विरोध करायचा तर या सर्वांचा केला पाहिजे. शरद पवार, सुनील तटकरे व इतर अनेक नेत्यांनीही या विषयात गोलमोल भूमिका घेतली आहे. त्यांचाही विरोध केला पाहिजे. केवळ राज ठाकरे, लता मंगेशकरांना नाव ठेवून कसे चालेल? विनोद तावडे मराठा आहेत आणि मराठा आरक्षणाविषयातील न्यायालयीन लढाईत ते पुढाकार घेताहेत म्हणून त्यांच्याबद्दल नरम भूमिका आणि राज्याच्या प्रमुखपदावर ब्राह्मण व्यक्ती आहे म्हणून सरसकट त्यांना खलनायक ठरवायचा प्रय▪होत असेल तर ब्रिगेडच्या या लढाईला अर्थ उरणार नाही हा आपला तो परका असा विचार करून वेगळी भूमिका घेणार्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून आपले म्हणणे खरे ठरत नसते. या लढाईत व्यक्ती आणि जात बाजूला ठेवली पाहिजे. मुद्दे आणि पुरावे हेच केंद्रस्थानी असले पाहिजे. नाही तर अखेर ती द्वेषाचीच लढाई ठरेल.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६
gr8 article!