|
|
भारतीय जनता वरकरणी अतिशय साधी-भोळी, कुठलाही अन्याय निमूटपणे सहन करणारी, आमिष व प्रलोभनाला सहज बळी पडणारी दिसत असली तरी या जनतेची राजकीय समज विलक्षण आहे. योग्य वेळ आली की ती सारे हिशेब चुकते करते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा या सत्तेची मस्ती चढलेल्या मुजोर सेनापतींच्या नेतृत्वाखाली चौफेर उधळलेला भारतीय जनता पक्षाचा वारू दिल्लीतील जनतेने रोखला.
निव्वळ रोखलाच नाही, तर पार भुईसपाट करून टाकला आहे. गेली नऊ महिने सातव्या आसमानात गेलेल्या संघ परिवारातील अर्धवट वाचाळांना दिल्लीतील या निकालाने एका क्षणात जमिनीवर आणलं आहे. पंतप्रधान, डझनभर केंद्रीय मंत्री, पाच राज्यांचे मुख्यमंत्री, १५0 खासदार, संघ परिवारातील वेगवेगळ्या संघटनांचे ५0 हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते, धर्मजागरणवाले आणि अंबानी, अदानींचे अब्जावधी रुपये या सगळ्या फौजफाटेला अरविंद केजरीवाल नावाचा एक फाटका माणूस पुरून उरला. हे कसं झालं याबाबत वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांमध्ये नामवंत संपादक, विचारवंत, राजकीय विश्लेषक आपापल्या मतांच्या पिचकार्या सोडत आहेत. मात्र मत-मतांतराच्या या सगळ्या गदारोळात आपचे नेते योगेंद्र यादव यांची जुनून आणि मस्ती-पैसा यांच्यात जेव्हा जेव्हा लढाई होते तेव्हा जुनूनचाच विजय होतो, ही प्रतिक्रिया अगदी सर्मपक वाटते. अगदी काल-परवापर्यंत दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा एवढा दारुण पराभव होईल, असं भाजपाच्या कट्टर विरोधकांना आणि आपच्या कट्टर सर्मथकांनाही वाटत नव्हतं. अगदी योगेंद्र यादवही आपला ५१ जागाच देत होते. मात्र शेवटच्या पाच-सहा दिवसांत वातावरण बदललं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची बेफाम वक्तव्यं, केजरीवालांची जात काढण्याचे प्रकार, अतिशय खालच्या स्तरावर जाऊन केलेला अप्रचार, कोट्यवधी रुपये उधळून केलेल्या पान-पानभर जाहिराती हे सगळे उबग आणणारे आणि तेवढीच चीड निर्माण करणारे प्रकार जनता बारकाईने पाहत होती. अलीकडच्या काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वशक्तिमान असल्यासारखं वागणं-बोलणं, या देशातील जनतेच्या उद्धारासाठीच माझा जन्म झाला आहे, असा आविर्भाव, मला कोणीच प्रश्न विचारू शकत नाही आणि मी कोणाला उत्तर द्यायला बांधिल नाही, हा देहबोलीतून व्यक्त होणारा उर्मटपणा हे सगळं जनता मूकपणे न्याहाळत होती. त्यामुळेच त्यांनी मोदी व भाजपाला अद्दल घडविण्याचा निर्धार केला होता आणि त्याचमुळे केजरीवाल व आपविरुद्ध वेगवेगळ्या बदनामतंत्राचा वापर करूनही भाजपाला मतदारांनी साफ झोपविले.
दिल्लीअगोदर झालेल्या हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड व त्याअगोदरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ज्या तंत्राचा वापर करून निवडणुका जिंकल्यात, तेच तंत्र त्यांनी येथेही वापरलं. प्रचंड पैसा, भाजप व संघ कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, जाहिरातींचा भडिमार, विरोधकांबद्दल अपप्रचार व धार्मिक उन्माद या जोरावर भाजपाने त्या निवडणुका जिंकल्या होत्या. मात्र या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाची लढाई काँग्रेससोबत होती. काँग्रेसच्या शासनकाळातील प्रचंड भ्रष्टाचार, अनागोंदी, निष्क्रिय कारभार व घराणेशाहीमुळे जनता विटली होती. संतापली होती. त्या पार्श्वभूमीवर सबका साथ, सबका विकासची घोषणा देत, गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा ढोल पिटत नरेंद्र मोदी आले. संघ परिवार आणि कॉर्पोरेट घराण्याच्या योजकतेतून बघता-बघता ते देशव्यापी झाले. काँग्रेसवर चिडलेल्या लोकांनी त्यांना भरभरून मतांचं दान दिलं. मात्र मोदींच्या डोक्यात हे यश भिनलं. कधी काळी संघ प्रचारक असलेले व खादीचे कपडे घालणारे मोदी दहा लाखांचा सूट घालायला लागलेत. दिवसातून तीनदा डिझायनरने डिझाईन केलेले स्टायलिश कुर्ते ते मिरवायला लागलेत. ही अशी काही दिवसांत बदलणारी माणसं भारतीय जनतेला रुचत नाही. त्यात सबका साथ..सबका विकास हा प्रमोद महाजनांच्या शायनिंग इंडिया प्रमाणेच केवळ एक नारा आहे आणि मोदी निव्वळ बोलघेवडे आहेत, हे लोकांच्या लक्षात यायला लागलं. परवाच भाजपाचेचे नेते व ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनी मोदींच्या विकासाच्या घोषणांबाबत बोलताना स्वयंपाकघरात नुसतीच भांडी वाजतात, जेवण मात्र बाहेर येत नाही, अशी खोचक टिपणी केली होती. ते खरंही आहे. सत्तेवर येऊन नऊ महिने झालेत पण आवर्जून सांगावा असा कुठलाही बदल अजूनतरी दिसत नाही. सत्तेचं एक नमुनेदार वैशिष्ट्य असतं. ती ज्यांना मिळते ते जुन्या अनुभवांवरून काहीच शिकत नाही. नरेंद्र मोदी सत्तेवर आल्याबरोबर २00४ मध्ये लोकांनी भाजपाला पटकनी का दिली होती आणि २0१४ मध्ये काँग्रेसवर एवढे वाईट दिवस का आलेत, याचा काहीही विचार न करता नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकांना गृहीत धरायला लागले. मात्र दिल्लीत अपप्रचार करायला समोर काँग्रेस नव्हती. ज्यांची पाटी बर्यापैकी कोरी आहे आणि ज्यांच्या प्रामाणिकपणा व सचोटीवर लोकांचा अजूनतरी विश्वास आहे, अशा आपसोबत त्यांचा मुकाबला होता. मात्र वर्षभरापूर्वी आपने मिळविलेल्या यशाचा विसर पडलेले भाजपेयी त्यांना हिनवायला लागले. कन्फुज नेते, डिफ्युज पार्टी या शब्दात त्यांची खिल्ली उडवायला लागले. उपद्रवी गोत्र या शब्दात केजरीवालांची जात काढायला लागलेत. या माजोरी आणि मस्तीला मतदारांनी सणसणीत उत्तर दिले. आप ला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं.
दिल्लीत आपने मिळविलेले नेत्रदीपक यश हे भाजपाची मस्ती उतरविण्यापुरतंच र्मयादित नाही, तर भारतीय राजकारणाला वेगळं वळण मिळू शकेल, असं हे यश आहे. भाजपा, काँग्रेस वा सध्या अस्तित्वात असलेले सगळे राजकीय पक्ष हे थोड्याफार फरकाने सारखेच आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा या सूत्रांभोवतीचं त्यांचं सारं राजकारण फिरतं. भाषा सामान्य माणसांची करायची, हितसंबंध मात्र उद्योजक आणि काही प्रभावशाली मंडळींचे सांभाळायचे. जाती-धर्माच्या नावाखाली सामान्य मतदारांच्या भावना भडकवायच्या असा प्रकार सगळीकडे आहे. ममता बॅनर्जीपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि शिवराज चव्हाणपासून नवीन पटनाईकांपर्यंत कोणी त्याला अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल व ‘आप’ राजकीय व्यवस्थेतील पारदर्शकता व साधेपणाचा जो आग्रह धरतात तो वेगळा आहे. चेकद्वारे मिळालेली देणगी व सार्वजनिकरीत्या मिळालेल्या पैशातूनच निवडणुका लढविणे, पक्षाकडे आलेला पैसा कुठल्या माध्यमातून आला हे जाहीर करून त्या पैशाचा हिशेब सार्वजनिक करणे, दारू व पैसा न वाटता निवडणूक लढविणे, गुन्हेगारांना तिकीट नाकारणे या विषयात आप आग्रही आहे. आतापर्यंत लढविलेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी या सर्व बाबींचे बर्यापैकी पालन केले आहे. सार्वजनिक कामे कशी व्हावीत, लोकप्रतिनिधींकडून शासकीय सुविधांचा दुरुपयोग होऊ नये, यासाठी त्यांनी एक संहिताही तयार केली आहे. अर्थात राजकीय व्यवस्थेतील बदलाबाबत निश्चयी असलेला आप हा काही पहिला पक्ष नाही. बहुतेक राजकीय पक्ष सुरुवातीच्या काळात ही अशीच भाषा करतात. साधेपणा आणि पारदर्शकतेचा आग्रह धरतात. मात्र एकदा सत्तेत रुळलेत की, राजकारणातील व्यवहार बघता-बघता त्यांच्यातील आदर्शवाद संपवून टाकतो. केजरीवाल या विषयात अपवाद ठरतील का, हे बघणं रंजक ठरणार आहे. केजरीवाल पर्सनल हिरो बनण्याचा नाद धरतात की, व्यवस्था बदलाबाबत आवश्यक ती पावलं उचलतात, यावर त्यांचं यश अवलंबून राहणार आहे. आप आणि केजरीवाल सार्वजनिक व राजकीय व्यवस्थेतील ज्या बदलांविषयी आग्रही आहेत त्यापैकी ५0 टक्के गोष्टींची पूर्तता जरी ते पाच वर्षांच्या सत्ताकाळात करू शकलेत, तर भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा बदलू शकतो. देशातील जनतेने आज ज्याप्रमाणे आपच्या पदरात घवघवीत यशाचं दान टाकलं तसं थोड्याफार फरकाने अनेकांच्या पदरात टाकलं आहे. पण अखेर ते सारे प्रवाहपतीतच ठरल्याचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर ‘आप’ आणि केजरीवालांनी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ताकद दाखविल्यास खरोखरच नवा इतिहास घडू शकतो.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |