आत्मवंचनेच्या चक्रात अडकला की, एकतर तो खोट्या अभिमानात जगतो किंवा स्वत:ची कीव करून घेतो. या दोन्ही परिस्थितीत वास्तवासोबत त्याची फारकत होते. अशा मनोवस्थेत आपल्यासमोरच्या खर्या समस्यांना भिडण्याऐवजी काल्पनिक शत्रू आणि समस्यांना कारणीभूत ठरवून स्वत:चीच फसवणूक केली जाते. मराठा समाजाचं सध्या असंच काहीसं होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागात मराठा समाजाचे अभूतपूर्व मूकमोर्चे निघत आहेत. या समाजातील बहुसंख्य स्त्री-पुरुष संतापून एकजुटीने रस्त्यावर उतरत आहेत. आता खूप झालं…अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे, असा भाव प्रत्येकाच्या मनात आहे. केवळ मराठाच नव्हे, तर इतर समाजातही ज्यांना मान्यता आहे, अशी माणसंही या मोर्चांच्या यशस्वितेसाठी हिरिरीने झटत आहेत. या सगळ्या प्रकारात आक्षेप घ्यावा असं काही नाही. लोकशाहीत प्रत्येक व्यक्ती, समाजाला आपल्या मागण्यांसाठी मोर्चे काढण्याचा, लढे उभारण्याचा हक्क आहे; मात्र या समाजाचा संताप नेमका कोणाविरुद्ध आहे, समाजावर अन्याय करणारे नेमके कोण? याबाबत मोर्चेकर्यांमध्येच कमालीची संदिग्धता आहे.
मराठा समाज एकाएकी एवढा का संतापला? हा संताप काही प्रश्नांबाबत आहे? प्रस्थापित मराठी नेत्यांबाबत आहे? की विद्यमान राज्य सरकारबाबत आहे? याबाबत गोंधळच गोंधळ आहे. वेगवेगळ्या गावात, शहरात स्वयंस्फूर्तीने हे मोर्चे निघत आहेत, हे सांगितलं जात असलं तरी ते मात्र काही खरं नाही. यामागे शंभर टक्के योजकता आहे. सुपीक डोकं आहे. अर्थात, यामागील कर्तेधर्ते हळूहळू दृष्टिपथास येत आहेत. खरंतर उघडपणेही समोर येऊन त्यांनी हे केलं असतं, तर काही बिघडलं नसतं; पण त्यांची काही गणितं असतील. ठिकठिकाणच्या मोर्चांमध्ये सामील होणार्या आणि त्याचं नियोजन करणार्या तरुणपिढीसोबत बोललं की, मोर्चांना एवढा प्रतिसाद का मिळतोय, हे लक्षात येतं. कोपर्डी हे एक निमित्त आहे. संताप इतर गोष्टींचा आहे. नंबर एक म्हणजे अँट्रॉसिटी कायद्याबद्दल समाजात भयंकर चीड आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये या कायद्याचा दुरुपयोग करून मराठा समाजाला वेठीस धरलं जातं, दहशतीत ठेवलं जातं, अशी अनेकांची तक्रार आहे. ती रास्तही वाटावी, अशी अनेक उदाहरणं समाजातील मंडळी पोटतिडकीने सांगतात. समाजात धुमसत असलेला दुसरा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार याविषयाबाबत अजिबात गंभीर नाही. किंबहुना, या सरकारला मराठा आरक्षण नकोच आहे, असे अनेकांचे ठाम मत आहे. सुप्रीम कोर्टाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर फडणवीस सरकारने या विषयात युक्तिवादासाठी चांगले वकील दिले नाहीत. या सरकारला मराठय़ांचा शक्तिक्षयच करायचा आहे, ही बहुसंख्य मराठय़ांची भावना आहे. शेतीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी शिक्षण, नोकरीतील आरक्षण आपल्या कामी पडू शकलं असतं; मात्र या सरकारमुळे ते होत नाहीय, याचा मराठा समाजात मोठा संताप आहे. तिसरा एक मुद्दा आहे जो उघडपणे बोलून दाखविला जात नाही; पण तो आहेच. तो म्हणजे, राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे. त्याला मराठय़ांच्या समस्या कळणे शक्यच नाही. त्याच्याजवळ सलगीने, हक्काने काही बोलता येत नाही, हेही एक महत्त्वाचं दुखणं आहे.
या महत्त्वाच्या मुद्यांशिवाय मराठा समाजाची आणखी एक ठसठसणारी जखम आहे. एवढी वर्षे समस्त समाजाचं नेतृत्व करणार्या मराठा समाजाला अलीकडे पाहिजे तसं गंभीरतेने घेतलं जात नाही. सर्वांना सोबत घेऊन चालत असताना आपल्यावर जातीयवादाचे, सरंजामशाहीचे आरोप केले जातात. आपल्या पाटील-देशमुखीवर विनोद केले जातात, असे या समाजाला वाटते. बदललेल्या परिस्थितीत आपला वारंवार मानभंग केला जात आहे आणि तो मुद्दामहून केला जात आहे, अशी भावना समाजात निर्माण केली गेली आहे. ‘सैराट’ चित्रपटानंतर तो चित्रपट आहे हे विसरून ज्या पद्धतीची प्रतिक्रिया मराठा समाजातील काही घटकांकडून आली होती, त्यावरून समाजाला मानभंग होण्याचं दु:ख कसं अस्वस्थ करते आहे, हे लक्षात आलं होतं. सध्याचं सरकार आणि हे सरकार चालविणारा संघपरिवार जाणीवपूर्वक आपल्याला अपमानित करत आहे. वर्षानुवर्षे समाजात असलेलं आपलं मानाचं स्थान हिसकावून घेण्याचा प्रय▪करत आहे, असे मराठा समाजाला वाटत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या खदखदीतून हे लाखोंचे मोर्चे निघत आहेत.
पण खरंच वास्तव काय आहे? मराठा समाजाचा कोणी मुद्दामहून मानभंग करतो आहे काय? समाजावर खरंच अन्याय होतो काय? वास्तव तसं नाहीय. मुख्यमंत्रिपदावर जरी ब्राह्मण असला तरी सत्तेत मराठय़ांचा वाटा मोठाच आहे. (फडणवीस सरकारने सहकार व साखर कारखानदारीतल्या भानगडीत हात टाकल्यामुळे मराठा नेत्यांना मानभंग झाल्याचं वाटू शकतं.) बाकी क्षेत्रात मराठे थोडेफार माघारले असतील, तर त्याची काही कारणं आहेत. अनेक वर्षांपर्यंत मराठा समाजाने उत्पन्नासाठी शेतीशिवाय दुसर्या कुठल्या पर्यायाचा विचारच केला नाही. शेती त्याच्या प्रगतीतील अडसर आहे, हे अलीकडे त्याला कळायला लागले. दरम्यानच्या काळात बाकी समाजाने भरपूर कात टाकली. गेल्या काही वर्षांत केवळ दलितच नव्हे, तर वेगवेगळ्या समाजातील माणसं आपल्या कर्तबगारीने, मेहनतीने समाजजीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपली जागा तयार करताहेत. काळाची पावलं नेमकेपणाने ओळखून ते वाटचाल करत आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन ते नवीन क्षितिज गाठताहेत. अर्थात, मराठा समाजातील नवीन पिढीसुद्धा हे करते आहे. तीसुद्धा जातीपातीच्या विळख्यातून बाहेर पडून व्यापक होते आहे; मात्र मराठा समाजात एक मोठा वर्ग असा आहे की, ज्याला काळानुरूप वेगात होणारं परिवर्तन पचनी पडणं जड चाललंय. तो आपल्या जुन्या इतिहासात, जुन्या वैभवाच्या आठवणीत रमतो आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण आपल्या मानसिकतेमुळे मागे पडतो हे कबूल करण्याची त्यांची तयारी नाही. त्यामुळे अगदी छोट्या-मोठय़ा गोष्टीमुळे त्याला मानभंग झाल्यासारखं वाटतं.
या मानभंगाच्या शल्यातून समाजातील तरुणपिढीच्या डोक्यात ज्या विषयांची पेरणी होत आहे, ती चिंताजनक आहे. या मोर्चाबाबत सोशल मीडियावर जो काही प्रचार-प्रसार सुरू आहे त्यात जातीचा खोटा अभिमान आणि अभिनिवेशाशिवाय दुसरं काही नाही. जी जात केवळ जीवशास्त्रीय योगायोगाने प्राप्त होते, त्याचा अभिमान बाळगण्याची शिकवण देऊन पडद्याआडून राजकारण करणारे नेते तरुण पिढीला कुठे नेणार आहे, त्यांचं त्यांनाच माहीत. मराठा समाज जर आज थोडाफार माघारला असेल तर त्याला दुसरं कोणी जबाबदार नाही. समाजातील प्रस्थापित नेत्यांची स्वत:पुरतं पाहण्याची वृत्ती आणि समाजाच्या एकंदरीतच पारंपरिक मानसिकतेने समाज माघारतो आहे, हे परखड सत्य सांगायची कोणाची तयारी नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत सगळ्या चांगल्या-वाईट गोष्टींचे परिणाम सगळ्याच समाजावर सारखेच होताहेत. मराठय़ांवर त्यात जास्त अन्याय होतो आहे, अशी समजूत करून घेणे म्हणजे स्वत:चीच फसवणूक करणे होय. मराठा समाजातील प्रस्थापित नेतृत्वाने एवढी वर्षे बहुजनवादाच्या नावाखाली आपले हितसंबंध सुरक्षित राहतील, याची काळजी घेतली. आता मराठा समाजातील जो वर्ग अद्यापही परिस्थितीशी झगडत आहेत, त्यांच्या अस्मितेला हवा घालत, त्यांच्या भावनांचा उद्रेक घडवून आपल्या दुकानदारीला धक्का लागणार नाही, याचे नियोजन प्रस्थापित करताहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे परिस्थितीचे चटके भोगत असलेल्या खर्याखुर्या वंचित मराठा समाजाला आणि केवळ जोशात असलेल्या युवापिढीला यामागचं राजकारण कळत नाहीय. या मोर्चाच्या मालिकेतून मराठा समाजाच्या न्याय्य मागण्या किती मार्गी लागतील माहीत नाही; मात्र यातून निर्माण होणार्या दबावातून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर उलथापालथ होणार हे निश्चित.
(लेखक दैनिक पुण्यनगरीच्या अमरावती -अकोला आवृत्तीचे संपादक आहेत)
मराठा समाज एवढा का संतापलाय?
कुठलाही व्यक्ती वा समाज अस्मिता वा
अतिशय अभ्यासपुर्ण लेख
factual story.
एकदम बरोबर आहे सर ! याला आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रात झालेली सत्तापालट. आज पूर्ण सत्ता भाजपा कडे आहे ज्यात प्रामुख्याने मराठा समाज कमी आहे हेही एक कारण असावा या मोर्च्यांमागे.
AVINASH KHUAP CHANGALE VISHASHALESHAN KELE AHES ABHINANADAN
samajik sankramanache baryapaiki javal janare vishleshan ! yatun ha samajacha mahatwacha ghatak paristhitila samajun ghet asel, tar yaat vavage kahi nahi.
Chhan lekh,