मनोवेधक मंगळ ग्रहावरची अभिमानास्पद झेप

                                             

क भारतीय म्हणून अभिमान वाटावा असे जे मोजके क्षण असतात त्यापैकी एक क्षण बुधवारी सकाळी भारतवासीयांच्या वाट्याला आला. भारताची मंगळ मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली. ज्या देशातील २५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या अजूनही उघड्यावर शौचाला जाते, त्या देशासाठी हा क्षण निश्‍चितपणे अभिमानास्पद आहे. अमेरिका, रशिया व युरोपियन युनियन यांनाच आतापर्यंत जे साध्य झालं ते भारताने अत्यंत कमी खर्चात व भारतीय साधनांच्या जोरावर करून दाखविलं, हे खूप महत्त्वाचं आहे. मंगळावरील आतापर्यंतच्या ५१ पैकी केवळ २१ मोहिमा यशस्वी झाल्या हे पाहता भारताचं अवकाश तंत्रज्ञानातील कौशल्य यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झालं आहे. 



भारतासारख्या देशासाठी ही मोहीम वेगळ्या अर्थानेही अतिशय महत्त्वाची आहे. मंगळाबद्दल भारतीयांमध्ये जेवढे गैरसमज असतील तेवढे क्वचितच इतर देशातील असतील. आपल्या देशातील ज्योतिषी नावाचे माणसाचे भूत-भविष्य जाणणारे मानवप्राणी मंगळ ग्रहाला कायम अनिष्ट ग्रह मानत आले आहेत. अशा अनिष्ट ग्रहावर सर्वाधिक अशुभ काळ मानल्या जाणार्‍या पितृपक्षात मंगळ यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्याने तमाम ज्योतिषी व सनातन्यांच्या सणसणीत थोबाडीत बसली आहे. या मोहिमेमुळे भारताचा नावलौकिक वाढायचा तो वाढो, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आर्थिक फायदा व्हायचा तो होवो, मात्र यानिमित्ताने मंगळ ग्रहाबद्दल जी माहिती समोर येईल त्यातून मुलामुलींच्या कुंडलीत मंगळ नावाचा जो प्रकार असतो, तो बोगस असतो. त्यामुळे त्याच्या किंवा तिच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाही, हा प्रकाश जरी काही लाख भारतीयांच्या डोक्यात पडला तरी आपल्यासाठी ही मोहीम यशस्वी ठरली, असं आपण मानूया.

‘मॉर्स ऑर्बायटर मिशन’ (मॉम) या नावाने ओळखल्या जाणार्‍या भारताच्या मंगळ मोहिमेची अनेक वैशिष्ट्यं आहेत. भारतीयांनी आतापर्यंत मंगळाच्या शांतीसाठी जेवढे पैसे खर्च केले असतील त्यापेक्षा अतिशय कमी खर्चात म्हणजे ४५0 कोटी रुपये या मोहिमेचा खर्च आहे. चार दिवसांपूर्वीचं २१ सप्टेंबरला अमेरिकेचं ‘मार्स मावेन’ हे मंगळ यान मंगळाच्या अंतराळ कक्षेत पोहोचलं, त्याचा खर्च जवळपास ४५00 कोटी रुपये आहे. भारत व अमेरिकेची ही दोन्ही यान मंगळावर थेट उतरली नसून ते मंगळाभोवती भ्रमण करणार आहेत. अमेरिकेचे यान मंगळावर कधीकाळी असणारे पाणी कुठे गेले याचा शोध घेण्यासोबतच भविष्यात तेथे मानव वस्ती उभारता येणे शक्य आहे का, याची शक्यता आजमावून पाहणार आहे. २0३७ पर्यंत अमेरिकेला मंगळावर मानव पाठवायचा आहे. भारताचे मंगळ यान तेथील भूकवच, मंगळावरील मिथेन वायूचं प्रमाण, मंगळाच्या वातावरणातील कणांच्या संरचनेचे मोजमाप या विषयाचा अभ्यास करणार आहे. भारताचे मंगळ यान ५ नोव्हेंबर २0१३ रोजी श्रीहरिकोटाच्या अंतराळ संशोधन केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल या रॉकेटच्या साहाय्याने या मंगळ यानाला सर्वप्रथम पृथ्वीभोवती धृवीय कक्षेत नेण्यात आले. टप्प्याटप्प्याने ही कक्षा वाढविण्यात आली. जेव्हा यानाला पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ओलांडून मंगळाच्या दिशेने जाऊ शकेल एवढी गती मिळाली तेव्हा त्याची दिशा बदलून यानाला ३0 नोव्हेंबर २0१३ ला मंगळाच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. या दिवशी यानाने सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या सीमेत प्रवेश केला होता. तेव्हापासून इस्रोचे वैज्ञानिक २४ तास डोळ्यात तेल घालून या यानाच्या प्रवासाकडे लक्ष ठेवून होते.

मंगळ यानाचा मंगळाच्या अंतराळ कक्षेत जाण्याचा प्रवास हा यानाने जवळपास १0 महिने १९ दिवसांत पूर्ण केला. या अशा मोहिमेत शेवटचे काही क्षण फार महत्त्वाचे आणि तेवढेच उत्कंठावर्धक असतात. याचं कारण यानाला कुठल्याही ग्रहाच्या कक्षेत स्थापित करताना त्या यानाचा वेग कमी करावा लागतो. हे करताना थोडी जरी चूक झाली तर ते यान त्या ग्रहावर आदळून निकामी होते किंवा सूर्यमालेत दूर कुठेतरी भिरकावले जाते. अशा परिस्थितीत त्या यानाचे काय होते, हे कधीच माहीत पडत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे यान एवढय़ा दूर अंतरावर गेलं की, त्या यानापासून पृथ्वीवर संदेश यायला भरपूर वेळ लागतो. त्या कालावधीत काय झाले हे कळायला काहीच मार्ग नसतो. आज पंतप्रधानांपासून टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण पाहत असलेल्या सर्वांना ही उत्कंठा अनुभवायला मिळाली. सकाळी ७ वाजून १७ मिनिट, ३२ सेकंदाला यानाचा वेग कमी करण्याकरता यानातील लिक्विड अपोगी मोटार चालू करण्यात आली. यानाचा २२ किमी प्रति सेकंदाचा वेग १.१ किलोमीटर इतका कमी होईपर्यंत ती मोटार सुरू ठेवणे आवश्यक होते. मोटार सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनंतर यान मंगळाच्या मागे गेल्यामुळे ते अंतराळ संशोधन केंद्रातील स्क्रीनवर दिसणे बंद झाले. त्याचे सिग्नलही मिळणेही पूर्णत: बंद झाले होते. हा क्षण सर्वांचे ब्लडप्रेशर वाढविणारा होता. सुमारे १२ मिनिटानंतर सिग्नल मिळणे सुरू झाले. इंजिन सुरू असल्याचेही स्पष्ट झाले. ७.३७ ला यान मंगळ ग्रहाच्या छायेबाहेर निघाले आणि थोड्याच वेळात ते मंगळाच्या कक्षेत व्यवस्थित स्थापित झाल्याची माहिती मिळाली आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इतिहासात नवीन शिरपेच खोवला गेला.

भारतासाठी हा निश्‍चितपणे हरखून जावा असा प्रसंग आहे. मात्र मंगळाचा वेध घेण्याचे प्रय▪खूप आधीपासून सुरू झाले आहेत. अमेरिकेने ‘मरिनर ४’ हे अवकाश यान १९६४ मध्ये मंगळाकडे पाठविले होते. त्यानंतर रशियाने १९७१ मध्ये ‘मार्स २’ आणि ‘मार्स ३’ असे दोन यान मंगळावर पाठविले होते. मात्र हे यान मंगळावर उतरल्यानंतर काही सेकंदातच त्यांचा पृथ्वीसोबत संपर्क तुटला होता. १९७५ मध्ये अमेरिकेने ‘व्हायकिंग’ या मोहिमेंतर्गत ‘व्हायकिंग १ व २’ यशस्वीपणे मंगळावर उतरविले होते. या वायकिंग यानांनी सर्वप्रथम मंगळावरील रंगीत छायाचित्रे पाठविली होती तसेच मंगळाच्या पृष्ठभागाचे नकाशेही बनविले होते. यानंतर ‘मार्स पाथफायंडर’, ‘मार्स ऑब्झर्व्हर’, ‘सोजनर’ असे अनेक यान पाठविण्यात आलेत. ‘स्पिरीट’ आणि ‘अपॉच्यरुनिटी’ या यानांनी पाठविलेली माहिती आणि फोटोतून मंगळावर कधीकाळी वाहते पाणी असावे, असे निष्कर्ष काढण्यात आले. सर्वात अलीकडे नासाने ‘फोनिक्स लँडर’ हे यान पाठविले होते. हे मंगळाच्या उत्तर धृवीय प्रदेशात उतरले होते. या यानाने तेथे खोदकामही केले. या यानावर सूक्ष्मदश्री कॅमेरा होता जो मानवी केसांच्या एक हजारांश लहान छायाचित्रे काढू शकत होता. त्या यानाने पाठविलेल्या फोटोतूनच मंगळावर बर्फ होता व आताही असू शकतो, या निष्कर्षावर शास्त्रज्ञ आले आहेत. अशा अनेक मोहिमा आतापर्यंत झाल्या आहेत. अमेरिका व युरोपियन स्पेस एजन्सीजने भविष्यातही अशा मोहिमांची आखणी केली आहे. अब्जावधी रुपये खचरून या मोहिमा कशासाठी, तेथील दगडधोंड्यांचे फोटो काढण्यासाठी या मोहिमा असतात काय? असे प्रश्न व्यावहारिक प्रश्न भारतीय मनांमध्ये नक्की उमटत असतील, पण त्याचं उत्तर असं आहे की, पृथ्वीनंतर मानवी जीवनाचा प्रारंभ करता येऊ शकेल, अशी जागा मंगळच असल्याचा शास्त्रज्ञांना विश्‍वास आहे. काही कोटी वर्षांनंतर सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होईल, त्यावेळी मंगळावर माणसाला वस्ती करता येईल, असे शास्त्रज्ञांना वाटतेय. आपल्या पुढच्या पुढच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठीच त्यांची ही तयारी चाललीय. आपल्या पिढीला चिंता नाही ना… मग कशाला त्रास करून घ्यायचा, असं जरी आपल्याला वाटत असलं तरी अवकाश तंत्रज्ञानाचं, खगोलशास्त्रीय घडामोडींचं हे जग अतिशय रोचक आणि उत्कंठावर्धक आहे. एखाद्या खगोल अभ्यासकाकडून किंवा चांगल्या शिक्षकाकडून ते नक्की समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एक तर नक्कीच लक्षात येईल की, कोणत्याही ग्रहाला कोणाच्या कुंडलीत येऊन बसायला वेळ नसतो आणि कोणाच्यामागे साडेसाती लावण्यातही त्याला रस नसतो.
                                                               मंगळ… मंगळ

कुंडलीत मंगळ आहे या कारणाने अनेक भारतीय मुलींच्या आयुष्याची माती करणारा मंगळ हा सूर्यमालेतील चौथ्या क्रमांकाचा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रहही म्हटलं जातं. हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. सूर्याचा उपग्रह असलेला मंगळाचा इतर कुठल्याही ग्रहाप्रमाणे माणसाच्या आयुष्यावर चांगला-वाईट असा कुठलाही परिणाम होत नाही. मंगळ जेव्हा पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो तेव्हा तो आपल्यापासून सुमारे ५.५७ कोटी किलोमीटर अंतरावर असतो. २२ किलोमीटर प्रति सेकंद या गतीने जाणार्‍या यानाला तेथे पोहोचायला दहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे एवढय़ा प्रचंड अंतरावरून हा मंगळ कुंडलीत मंगळ असलेल्या मुलींचे वा त्यांच्या नवर्‍याचे काहीही बिघडवू शकत नाही, याची शंभर टक्के खात्री बाळगा. इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा आहे. मंगळाचे आकारमान पृथ्वीच्या १५ टक्के तर वस्तुमान ११ टक्के आहे. मंगळाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ पृथ्वीवरील महासागर वगळून राहिलेल्या जमिनीपेक्षा थोडे कमी आहे. मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर २३ कोटी किमी आहे. मंगळावरील एक दिवस पृथ्वीपेक्षा थोडा मोठा म्हणजे २४ तास ३९ मिनिटे ३५.२४ सेकंद एवढा आहे. मंगळाचे वर्ष मात्र ६८७ दिवसांचे म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असते. मंगळावरील गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीच्या ३८ टक्के आहे. त्यामुळे पृथ्वीवर एखाद्याचे वजन ६८ किलो असेल तर ते मंगळावर फक्त २६ किलो भरेल. मंगळावरील वातावरण अतिशय थंड म्हणजे उणे ८९ ते उणे ३१ यादरम्यान असते. मंगळावरील वातावरण ९५.३ टक्के कार्बन डाय ऑक्साईड आणि २.७ टक्के नायट्रोजन आणि उरलेले २ टक्के इतर वायूंचे आहे. ऑक्सिजनचे प्रमाण केवळ 0.२ टक्के आहे. मंगळाचा पृष्ठभाग अनेक मनोवेधक गोष्टींनी भरलेला आहे. ऑलिंपस मॉन्स असे नाव दिलेला मंगळावरील मृत ज्वालामुखी त्याच्या पायथ्यापासून २६ किमी उंच आहे. पायथ्याशी त्याचा घेर जवळजवळ महाराष्ट्राएवढा आहे. सूर्यमालिकेतील हा सर्वात लांब-रुंद आणि उंच पर्वत आहे. एव्हरेस्टच्या जवळपास तिप्पट. मंगळावर दर्‍याखोर्‍याही भरपूर आहेत. त्यातील कित्येक दर्‍या १0 किलोमीटर खोलीच्या आहेत.
 
(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top