भारत होतोय नोमोफोबियाचा शिकार

बातमी क्रमांक १

बंगळुरू – एका महाविद्यालयात प्राध्यापक असणारे अजय शेट्टी सकाळचं महाविद्यालय आटोपलं की घरी येतात. जेवण करतात आणि त्यानंतर करमत नाही म्हणून कॉम्प्युटरवर बसतात. फेसबुक, ट्विटर व इतर सोशल नेटवर्किंग साईटवर लॉगइन होतात. त्यानंतर सायंकाळ उलटून जाते तरी ते त्यातच व्यस्त असतात. घरादाराचं सारं भान विसरून ते त्या आभासी जगात रमलेले असतात. त्यांचा शाळकरी मुलगा रोहण दुसर्‍या रूममध्ये लॅपटॉपवर वेगवेगळे गेम्स खेळत असाच रमला असतो. तासन्तास उलटून जातात, पण त्याला बाहेरच्या जगाचं भान नसतं. त्याची आई व प्रा. अजय यांच्या पत्नी अंजली बापलेकांसोबत बोलायला अनेकदा त्यांच्या रूममध्ये जातात. पण ते दोघे तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. सतत कॉम्प्युटरवर डोळे खिळून असल्याने दोघांचेही डोळे जड झालेले दिसतात. दोघांनाही काही सांगायला गेल्यास दोघेही चटकन ओरडतात. चिडतात. रात्री झोपेतही ते अस्वस्थ असतात. अलीकडे त्यांना रागही लवकर येतो.

बातमी क्रमांक २

पुणे – दहावीला ९६ टक्के गुण मिळविणारी अंकिता अकरावीच्या परीक्षेत कशीबशी उत्तीर्ण झाली. बारावीच्या परीक्षेतही दहावीसारखेच उत्तम यश मिळविण्यासाठी आई-वडिलांनी लावून दिलेल्या क्लासेसमध्येही तिची गैरहजेरी वाढली आहे. महाविद्यालयातही तिचं लक्ष नसल्याची तक्रार वर्गशिक्षकांकडून आली आहे. पहिलीपासून दहावीपर्यंत उत्तम यश मिळविणारी, मेहनती आणि सिनिअर म्हणून ओळखल्या जाणार्‍या आपल्या मुलीला झालं तरी काय, हा प्रश्न पालकांना पडला आहे. मैत्रिणी, शिक्षकांसोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर लक्षात आलं आहे की, अंकिता दिवसभर व्हॉट्सअपवर चॅटिंग करीत असते. प्रत्येक काही सेकंदानंतर तिचं लक्ष मोबाईलच्या स्क्रीनकडे जाते. महाविद्यालयात मोबाईल सायलेंट मोडवर टाकून तिचं तेच काम सुरू असतं. ट्यूशन क्लासमध्येही तोच प्रकार. शेवटी आई-वडील तिच्यापासून स्मार्ट फोन काढून घेतात.

बातमी क्रमांक ३

भोपाळ – लग्नाला १६ वर्ष झालेल्या जोडप्यातील पत्नी श्रीहंसा पोलिसात तक्रार देतेय की, आपला नवरा दिवसभर व्हॉट्सअपवर असतो. व्हॉट्सअपवर त्याच्या अनेक मैत्रिणी आहेत. त्यांच्यासोबत तो सतत चॅट करतो. अश्लील मेसेजेसही पाठवितो. अनेक महिलांसोबतचे त्याचे छायाचित्रंही त्याच्या स्मार्टफोनमध्ये आहे. या नवर्‍यापासून घटस्फोट मिळावा, अशी मागणी तिने तक्रारीत केली आहे.

बातमी क्रमांक ४

दिल्ली – येथे प्रकार उलटा आहे. आपली पत्नी सतत फेसबुकवर असते, अशी येथील पतीराजाची तक्रार आहे. आंघोळीला जाताना बाथरूममध्येसुद्धा ती मोबाईल घेऊन जाते. आपल्या व मुलांना जेवायला वाढायला सुद्धा तिला वेळ नसतो. पाहावं तेव्हा ती मोबाईलमध्ये डोळे घालून असते. तिचे बरेच पुरुष मित्र असल्याचीही त्याची तक्रार आहे. पत्नीच्या या सवयीमुळे कंटाळून जाऊन तो तिला माहेरी पाठवितो. मात्र तिथेही तिची सवय कायम राहिल्याने शेवटी त्याने घटस्फोटासाठी दावा ठोकलाय.

बातमी क्रमांक ५

कोलकाता – बास्केटबॉल या खेळात अव्वल असणारा राजेश मागील काही महिन्यांपासून एकाएकी खेळाबद्दल उदासीन झालाय. सध्या तो घरीही फार कमी वेळ राहतोय. पोरगा नेमकं करतो काय, याचा शोध घेतला असता तो दिवसभर घरानजीकच्या सायबर कॅफेत असतो, हे लक्षात आलंय. तिथे तो काय करतो याची आई-वडिलांनी चौकशी केल्यावर धक्कादायक माहिती मिळते. राजेश सायबर कॅफेत दिवसभर कॉम्प्युटर गेम खेळतो. त्यात तो आता एवढा तरबेज झाला आहे की, तो कॅफेकडून बेटिंग लावतो आणि त्यातून आपला खर्च काढतो.
या व या पद्धतीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांत तुमच्या वाचनात आल्या असतील. देशात स्मार्ट फोनधारकांची संख्या १५ कोटींवर पोहोचली असताना आणि डिजिटल क्रांतीने आयुष्यात आमूलाग्र बदल होत असतानाच मोबाईल व इंटरनेट अँडिक्शनचे हे भयानक प्रकार समोर आले आहेत. थोडं डोळसपणे आजूबाजूला पाहिलं, तर लक्षात येईल की, या बातम्यांमधील वर्णन केलेली माणसांसारखी माणसं आपल्या आजूबाजूला अगदी आपल्या घरातही मोठय़ा संख्येने आहेत. देशात इंटरनेट ग्राहकांची संख्या अतिशय वेगात वाढत असताना इंटरनेटचं व्यसन लागलेल्यांची संख्याही तेवढय़ाच वेगात वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. कॉम्प्युटर आणि मोबाईलवर इंटरनेटची सोय असलेल्या स्त्री-पुरुषांपैकी ७८ टक्के व्यक्ती दिवसातील ८ ते १0 तास इंटरनेटवर घालवितात. त्यापैकी बहुतांश वेळ फेसबुक, व्हॉट्सअप, कॉम्प्युटर गेम्स आणि शॉपिंगच्या वेबसाईटवर सर्फिंग करण्यात ते घालवितात, असे सर्वेक्षण सांगते. धक्कादायक गोष्ट म्हणजे फेसबुक व व्हॉट्सअपमुळे अनोळखी स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमात पडण्याचे व त्यांच्यात संबंध निर्माण होण्याचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर वाढले असल्याची बाबही या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. इंटरनेट व मोबाईलच्या या व्यसनाने चांगलंच गंभीर स्वरूप धारण केलं आहे. बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँण्ड सायन्स या संस्थेने मोबाईल फोनचं व्यसन लागलेल्या व्यक्तींचं वर्णन नोमोफोबिया (No Mobile-Phone Phobia) असं केलं आहे. हे असे व्यक्ती मोबाईलशिवाय अजिबात राहू शकत नाही. रात्री झोपताना बेडवर मोबाईल बाजूला घेऊन ते झोपतात. आंघोळीला व टॉयलेटला जातानाही ते मोबाईल सोबतच घेऊन जातात. मोबाईलची बॅटरी संपल्यावर, मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्यास, मोबाईलच्या प्रीपेड अकाऊंटमधील पैसे संपल्यास किंवा मोबाईल हरविल्यास ही माणसं प्रचंड अस्वस्थ होतात. आपण आता जगापासून तुटलो आहे, असं त्यांना वाटायला लागतं. ते प्रचंड अस्वस्थ होतात. बाहेरच्या आभासी जगासोबत कायम Connected राहण्याची लत लागलेल्या या अशा नोमोफोबिया रुग्णांची आणखी काही लक्षणं आहेत. ही माणसं कायम फोन चाजिर्ंगवर ठेवतात, प्रत्येक दोन-चार मिनिटानंतर व्हॉट्सअप, मेसेंजर किंवा मेसेज बॉक्समध्ये नवीन मेसेज आला का, याकडे यांचं कायम लक्ष असतं. घरी वा बाहेर असताना मोबाईल वाजला नाही तरी घंटी वाजत तर नाही ना, असे यांना सतत वाटत असते. कुठल्या कार्यक्रमात, रुग्णालयात वा इतर कुठे काही कारणांमुळे मोबाईल बंद ठेवावा लागल्यास ही माणसं सैरभैर होऊन जातात. कार वा बाईक चालविताना हे सतत कानाला मोबाईल लावून असतात.

ही अशी मोबाईल व इंटरनेटची व्यसन लागलेली माणसं ओळखणं फार सोपं आहे. ही माणसं घरात वा समूहात असतांनाही त्यांचं लक्ष कायम मोबाईलकडे असते. हे घरातील सदस्यांशी फार न बोलता कॉम्प्युटर वा मोबाईलवर डोळे रोखून असतात. त्यांना याविषयात कोणी टोकल्यास ते खोटं बोलतात. नाही मी आताच ऑनलाईन आलो, असं त्यांचं उत्तर असतं. ही अशी माणसं कुठल्याही विषयात एकाग्र होऊ शकत नाही. क्षुल्लक गोष्टीने ते चिडतात, संतापतात. निराशही लवकर होतात. यांचे डोळे सतत जडावलेले दिसतात. त्यांच्या व्यक्तित्वात कायम थकवा व आळस दिसतो. इंटरनेटचं हे असं व्यसन दारू वा ड्रग्जसारखं असतं, असे संशोधक सांगतात. एकदा सवय लागली की ते नियंत्रणाबाहेर जाते. यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. या रुग्णांजवळून मोबाईल काढून घेतला तर ते खूप अस्वस्थ होतात आणि चिडचिड करतात. अशांवर उपचार करणं खूप कठीण जातं. या अशा इंटरनेट अँडिक्ट झालेल्या व्यक्तींचं हे व्यसन सोडविण्यासाठी बंगळुरूमध्ये देशातील पहिलं इंटरनेट डी-अँडिक्शन क्लिनिक सुरू झालंय. सुरुवातीच्या बातम्यांमध्ये उल्लेख केलेले प्रा. अजय शेट्टी, त्यांचा मुलगा रोहण, पुण्याची अंकिता, कोलकात्याचा बास्केटबॉलपटू राजेश असे एकूण ३३ रुग्ण सध्या तेथे उपचार घेत आहेत. हे अशा प्रकारचे क्लिनिक सुरू झाल्याने रोज नवनवीन इंटरनेट अँडिक्ट तिथे दाखल होत आहेत. आपणही यापद्धतीचं अँडिक्ट झालो आहे का, हे लगेच तपासा. वर नमूद केलेल्या लक्षणांपैकी काही लक्षण आपल्यात असतील, तर आताच सावध व्हा. स्मार्ट फोन, इंटरनेट ही साधनं आपल्या सोयीसाठी आहेत, आपलं स्वास्थ्य गमाविण्यासाठी नाही, याचं भान असू द्या.

(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत)

भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top