भाटांना बक्षिसी


पूर्वीचे राजे, महाराजे, बादशाह

आपल्या सेवेतील भाट (स्तुतिपाठक), कवी, कलाकार, नर्तक, सरदार, सैनिक, ज्योतिषी आदी सेवेकर्‍यांच्या सेवेवर खूश झालेत की त्यांना हिरेमोत्यांचे हार, सोन्याचं कडं, कमरपट्टा, सुवर्णमुद्रा, दोन-चार गावांची मालकी असं काहीतरी बक्षिसी म्हणून देत असत. आताच्या लोकशाही व्यवस्थेतील राजे आपले भाट व सेवेकर्‍यांना या बक्षिसांऐवजी ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ असे सन्मान बहाल करतात किंवा राज्यसभा वा विधान परिषदेतील नियुक्ती बक्षीसस्वरूपात देतात. काळ बदलला. राजेशाही, बादशाही लयास जाऊनही अनेक वर्षे लोटलीत. मात्र सत्तेच्या दरबारातील भाटांचं स्थान कायम आहे. जे भाट राज्यकर्त्यांचं लांगूलचालन करतात, त्यांची आरती ओवाळतात अशांना सन्मानित करण्याची परंपरा आजही कायम आहे. अशाच काही भाटांची परवा राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली. घटनेच्या कलम ८0 नुसार साहित्य, कला, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आदी क्षेत्रात विशेष ज्ञान व कौशल्यप्राप्त असलेल्या बारा व्यक्तींची राष्ट्रपती राज्यसभेवर कुठल्याही निवडणुकीशिवाय थेट नियुक्ती करू शकतात. अर्थात राष्ट्रपती या नियुक्त्या करू शकत असले तरी केंद्रातील सत्तारूढ सरकारच्या सल्ल्यानेच त्यांना या नियुक्त्या कराव्या लागतात. अतिशय चांगल्या उद्देशाने घटनाकारांनी ही तरतूद घटनेत केली होती. साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा आदी क्षेत्रातील माणसं निवडणुकीच्या धामधुमीत उतरणे पसंत करणार नाहीत. निवडणुकीच्या राजकारणात कराव्या लागणार्‍या तडजोडी, बदमाशी त्यांना झेपणार नाहीत. त्यामुळे अशा प्रतिभावंत, कल्पक व्यक्तींच्या कौशल्याचा, ज्ञानाचा उपयोग देशाला कसा होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अशा व्यक्तींची थेट नियुक्ती करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले. सुरुवातीची काही वर्षे या आदर्श तत्त्वाचे व्यवस्थित पालन झाले. मात्र नंतर या नियुक्त्यांमधूनही आपली राजकीय सोय साधण्याचा प्रकार सत्तारूढ पक्षांनी सुरू केला. परवाच्या नियुक्त्याही याला अपवाद नाहीत. ऑलिम्पिक बॉक्सरपटू मेरी कोमचा अपवाद वगळता सुब्रह्मण्यम स्वामी, नवज्योत सिद्धू, स्वपन दासगुप्ता व अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांना भाजपाने भाटगिरीचे बक्षीस दिले आहे.

भारतीय राजकारणातील अत्यंत हुशार; पण तेवढंच वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या सुब्रह्मण्यम स्वामी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आग्रहाखातर राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. हॉवर्ड विद्यापीठाचे पदवीधर व अतिशय कुशाग्रबुद्धीच्या स्वामींची दिल्लीच्या राजकारणात ‘खुटीउपाड’ अशी ओळख आहे. जवळपास पाच दशकांपासून राजकारणात सक्रिय असलेले स्वामी १९९0-९१ मध्ये चंद्रशेखर पंतप्रधान असताना केंद्रात मंत्री होते. गांधी घराण्याचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळेच ते संघ परिवाराचे आवडते आहेत. १९७४ मध्ये जनसंघाच्या तिकिटावर ते पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर तीनदा लोकसभा आणि १९९८ मध्ये पुन्हा एकदा राज्यसभेवर ते निवडून आले होते. भाजपसोबत ते कायम राहिले असते, तर आज ते भाजपच्या पहिल्या फळीतील नेते असते. मात्र एका ठिकाणी स्थिर राहणे हा त्यांचा स्वभावच नाही. १९९८ मध्ये जयललिता व काँग्रेसची मोट बांधून अटलबिहारी वाजपेयींचे सरकार पाडण्यात त्यांचा मोठा वाटा होता. २0१३ पासून त्यांनी पुन्हा एकदा संघ परिवाराची पालखी खांद्यावर उचलली आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण त्यांनीच न्यायालयात नेले होते. आता सोनिया व राहुल गांधींना आरोपी करणारं ‘नॅशनल हेरॉल्ड प्रकरण’ त्यांनीच उचलून धरलं आहे. रोज वादग्रस्त वक्तव्य करणे हा त्यांचा आवडता छंद आहे. सध्या राममंदिराचा विषय त्यांनी पुन्हा ताजा केला आहे. या सर्व कामगिरीचे बक्षीस म्हणून संघाने त्यांना खासदारकी बहाल केली आहे. माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूची नियुक्ती ही पंजाबची आगामी निवडणूक लक्षात घेऊन गेली आहे. याअगोदर दोनदा भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आलेला सिद्धू क्रिकेटर म्हणून जेमतेम होता. वेस्ट इंडीजच्या तोफखान्यासमोर त्याची कशी तारांबळ उडत असे, हे क्रिकेटरसिकांना आठवत असेल. बाकी नवृत्तीनंतर समालोचक म्हणून तो धूम करतो आहे. इंग्रजी, हिंदीवर प्रभुत्व, शेरोशायरीचा अमाप साठा व हजरजबाबीपणामुळे त्यांचं समालोचन क्रिकेटरसिकांना आवडते. बोलबच्चन असलेला सिद्धू अनेक ‘रिअँलिटी शो’मध्ये दिसतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्याची अमृतसरची जागा अरुण जेटलींना दिल्यामुळे तो नाराज झाला होता. गेल्या काही महिन्यांत भाजपाविरुद्धची नाराजी त्याने बोलून दाखविली होती. मात्र मोदींची तारीफ करायला तो विसरला नव्हता. शिखांमध्ये लोकप्रिय असलेल्या सिद्धूूच्या बोलबच्चनगिरीचा फायदा करून घेण्यासाठी त्याची नियुक्ती झाली आहे. शिवाय पंजाबच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून त्याचे नाव समोर करण्याचाही भाजपाचा विचार आहे.

स्वपन दासगुप्ता हे देशातील एक ज्येष्ठ व हुशार पत्रकार आहेत. ‘स्टेट्समन’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’, ‘इंडिया टुडे’ या मोठय़ा माध्यमसमूहात त्यांनी काम केले आहे. भाजपा व संघविचारांचा ठाम पुरस्कर्ता अशी त्यांची ओळख आहे. लालकृष्ण अडवाणींची २00४ ची भारत उदय यात्रा व नंतर राजनाथसिंह यांच्या भारत सुरक्षा यात्रेच्या नियोजनात त्यांचा मोठा वाटा होता. बुद्धिवंतांमध्ये भाजपची वकिली करण्याचं बक्षीस त्यांना मिळालं आहे. अभिनेता सुरेश गोपी हा केरळमधील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘तुम्ही अब्जोपती बनू शकता..’ या लोकप्रिय टीव्ही शोचा तो सूत्रसंचालकही आहे. केरळमध्ये मोठय़ा संख्येने असलेल्या ‘नायर’ जातीचं प्रतिनिधित्व तो करतो. केरळच्या निवडणुकांत लाभ व्हावा हा शुद्ध हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातून नियुक्ती झालेले नरेंद्र जाधव हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आहेत. ‘आमचा बाप अन् आम्ही’ हे त्यांचं आत्मकथन प्रचंड गाजलं होतं. (आता या नियुक्तीनंतर ‘आमचा बाप आम्ही कसा बदलला..’, असं खासदार नरेंद्र जाधव यांचं नवं आत्मचरित्र येत आहे, अशी थट्टा सोशल मीडियात सुरू झाली आहे.) अनेक भाषांमध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर झालं आहे. पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरूही होते. पूर्व आयुष्यातील अभाव व कष्टाचं पुरेपूर भांडवल केल्यानंतर जाधव प्रस्थापितांमध्येच रमल्याचे दिसते. अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त जाधव हुशार असले तरी सत्तेच्या वतरुळात राहणे त्यांना आवडते. यूपीएच्या सत्ताकाळात नियोजन आयोग व राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या जाधव यांनी मोदी सरकार येताच त्यांचेही गुणगान गाणे सुरू केले होते. काही दिवसांपूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आमंत्रित केले होते. राष्ट्रहिताच्या अनेक मुद्यांवर बाबासाहेब व संघाचे विचार समान होते, असे वक्तव्य करून त्यांनी तेव्हा अनेकांना चकित केले होते. तेव्हाच त्यांची पुढची वाटचाल काय राहणार, याचा अंदाज आला होता. संघाच्या भाटगिरीचे बक्षीस त्यांना अखेर मिळाले. ते आता पावन झाले असतील. राज्यसभेसाठी सातवं नाव लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी अनुपम खेर, सलमान खानचे वडील सलीम खान व इंडिया टीव्हीचे रजत शर्मा या तीन नावांचा विचार सुरू आहे. हे तिघेही भाजप व मोदींची वकिली करण्यात कायम पुढे असतात. बघायचंय यापैकी कोणाचा नंबर लागतो ते. अर्थात यात नवीन काहीही नाही. याअगोदर काँग्रेसनेही हेच प्रकार केले आहेत. तसाही राष्ट्रपतींनी करावयाच्या नियुक्त्यांत आपल्या सरकारची पाठराखण करतील अशाच चेहर्‍यांना संधी द्यायची, हा अलिखित नियम आहे. स्वाभिमानी, ज्यांना स्वत:ची मतं, विचार आहेत, अशांना अभावानेच संधी दिली जाते. १९५२ नंतर राष्ट्रपतींनी आतापर्यंत १२४ व्यक्तींची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. यामध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश चेहरे शोभेचेच राहिले आहेत. राज्यसभेत भाटांचीच नियुक्ती होत असली तरी आतापर्यंतची यादी तपासली तर किमान त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील गुणवत्ता लक्षात घेतली गेली आहे. राज्याच्या विधान परिषदेत मात्र आनंदीआनंदच आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा या प्रवर्गातून मागीलवेळी ज्या बारा जणांची नियुक्ती केली, त्यामध्ये प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, राहुल नार्वेकर, ख्वाजा बेग, रामराव वडकुटे, जगन्नाथ शिंदे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, हुस्नबानू निझामउद्दीन, आनंदराव पाटील, रामहरी रुपणवार,जोगेंद्र कवाडे यांचा समावेश आहे. यापैकी कोणा एकाचे तरी नाव तुम्ही कला, साहित्य, संगीत, समाजसेवा या क्षेत्रांतील योगदानासाठी ऐकले आहे? नाही ना…महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना जनाची नाही, पण मनाचीही लाज उरली नाही, याचे हे लक्षण आहे.

7 thoughts on “भाटांना बक्षिसी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top