भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून लपूनछपून सुरू असलेली ‘भानगड’ अखेर चव्हाट्यावर आलीय. विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावरील
अविश्वास प्रस्तावाच्या रूपाने आतून कडी लावून सुरू असलेले हे संबंध जगजाहीर झाले. राजकारण आणि
माध्यमातील लोकांना भाजपा व राष्ट्रवादीतील ही ‘चुंबाचुंबी’ बर्याच काळापासून माहिती होती. मात्र भाजपा हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे अशी भाबडी समजूत असलेल्या भाजपाप्रेमींना ही कमळाबाईही इतरांप्रमाणे ‘भानगडबाज’ आहे, हे यानिमित्ताने कळले, हे बरे झाले. शिवाजीराव देशमुख यांचे या प्रकरणातील कॉमेन्टस् बोलकी आहे. ‘वाली-सुग्रीवाच्या भांडणात रामाने बाण मारण्याची गरज नव्हती’, असं ते म्हणाले. खरं तर त्यांनी भाजपाला ‘राम’ म्हणणं म्हणजे विनोदच झाला. भारतीय जनता पक्षाला राम आणि राममंदिर केवळ निवडणुकीच्या काहीकाळ अगोदर आठवतात, हे शिवाजीरावांना माहीत नाही असं नाही. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचाररूपी रावण संबोधणार्या भाजपाची प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीअगोदरपासूनची सलगीही त्यांच्या नजरेतून सुटली नसेल. बाकी शिवाजीरावांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावाचे सर्मथन करताना काँग्रेसमुक्त भारत मोहिमेचा भाग म्हणून आम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा दिला, हा भाजपाचा खुलासाही मजेशीर आहे. सर्वसामान्य जनता भाबडी, मूर्ख असते. त्यांना जे सांगाल ते पटते, असं भाजपाच्या नेत्यांना कायम वाटत असतं. त्या ठाम समजुतीचा भाग म्हणूनच हा असा खुलासा आला आहे. तसंही भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था असलेल्या संघपरिवाराचं एक वैशिष्ट्य आहे. ते ठासून खोटं बोलतात. आत्मविश्वासाने खोटं बोलतात. वारंवार खोटं बोलल्याने लोकांना ते खरं वाटायला लागतं या गोबेल्स नीतीवर त्यांचा ठाम विश्वास आहे. काश्मीरच्या निवडणुकीअगोदर कलम ३७0 बद्दल बोंबाबोंब करणार्या आणि सत्तेत आल्याबरोबर ते कलम हटविण्याच्या वल्गना करणार्या संघाने आता तो विषय चार वर्ष बाजूला ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. राममंदिराचा विषयही असाच थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे. यात आश्चर्य काहीच नाही. सत्तेसाठी ‘पार्टी विथ डिफरन्सचं’ आपलं सोवळं भाजपाने याअगोदरही अनेकदा गुंडाळून ठेवलं आहे.
त्यामुळे परवाच्या शिवाजीराव देशमुखांविरुद्धच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला भाजपाच्या पाठिंब्याचं नवल वाटण्याचं कारण नाही. भाजपा व राष्ट्रवादीतील या छुप्या प्रेमाची सुरुवात गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वीच झाली होती. नरेंद्र मोदी, शरद पवार, नितीन गडकरी व प्रफुल्ल पटेलांच्या भेटीगाठीतून भाजपा, राष्ट्रवादी व सोबतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नवीन युतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढायची, हे जवळपास निश्चित झालं होतं. शिवसेनेला युतीतून डच्चू द्यायचा यावर एकमत झालं होतं. मात्र या प्लॅनची खबर गोपीनाथ मुंडेंना लागली. त्यांनी उद्धव ठाकरेंना सावध केलं. त्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे राष्ट्रवादीबद्दलच्या प्रेमाला तेव्हा भाजपाला आवर घालावा लागला होता. मात्र शिवसेनेचं लचांड एकदाचं दूर करायचं, हे भाजपानं तेव्हाच ठरविलं होतं. त्यानुसार विधानसभा निवडणुकीदरम्यान हरेक प्रकारे अपमानित करून शिवसेनेसोबतची युती तोडण्यात आली. नंतर सरकार स्थापनेच्या वेळीही शिवसेनेला दूर ठेवणेच पसंत करण्यात आले. भाजपा-राष्ट्रवादीत ठरलेल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे राष्ट्रवादीने मागितला नसतानाही भाजपाला पाठिंबा घोषित केला. भाजपाने त्यावर कोणी स्वत:हून पाठिंबा दिला तर आम्ही काय करू शकतो, अशी मखलाशीही केली. जवळपास दीड महिनेपर्यंत हा तमाशा महाराष्ट्र पाहत होता. ज्या पक्षाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपा गेली पाच वर्ष अखंड आरडाओरड करीत होता, ज्या पक्षाचा उल्लेख नरेंद्र मोदींनी ‘नॅचरली करप्ट पार्टी’ असा केला होता, त्या पार्टीच्या पाठिंब्याची सर्वसामान्य जनतेत तीव्र रिअँक्शन उमटल्यानंतर आणि खुद्द भाजपा-संघ परिवारातही याबाबत कमालीची नाराजी आहे, हे लक्षात आल्याने नैतिक दडपणापोटी शेवटी शिवसेनेला सत्तेत सामावून घेण्यात आले होते. नाईलाजाने शिवसेनेला सत्तेत सहभाग दिला असला तरी प्रत्यक्षात काय सुरू आहे, हे सगळ्यांना दिसत आहे. शिवसेना सत्तेत असूनही रोज कुरबुर करते आहे. विरोधी पक्षासारखे सरकारला इशारे देत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते मात्र सत्तेत असल्यासारखे मजेत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार व सुनील तटकरे या दोन प्रमुख नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल भाजपाने अनेकदा सभागृह डोक्यावर घेतले होते. पाटबंधारे विभागातील घोटाळ्यांचे कागदपत्रं देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांनी अनेकदा सभागृहात फडकविले होते. त्यांचा तो आवेश पाहून हे सत्तेत आल्याबरोबर पवार व तटकरे हे दोघेही तुरुंगात असतील, असे वाटले होते. प्रत्यक्षात सारं सामसूम आहे. भाजपाचा कोणताच नेता आता पाटबंधारे विभागातील भ्रष्टाचाराबद्दल बोलायला तयार नाही. दुसरीकडे पवार व तटकरे मात्र सभागृहात भाजपा-शिवसेना नेत्यांच्या टोप्या उडवत आहे. पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरुवात खूप तावातावाने केली होती. प्रत्येक प्रकल्पाच्या कामाची चौकशी करू. दोषी कोणीही असो, त्याला तुरुंगात घालू वगैरे वगैरे… मात्र वरून कानपिचक्या मिळाल्यानंतर ‘दोषींवर कारवाई केली, तर पाटबंधारे विभागात काम करायला कर्मचारी उरणार नाही’, हे सांगण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे वा महाजन यांच्या तोंडाला पाचर बसण्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी व शरद पवार यांची युती आहे. एनकेनप्रकारे सत्तेच्या परिघात राहणं हीच प्राथमिकता असलेल्या आणि त्यासाठी कोणत्याही तडजोडी आणि कोणत्याही थराला जाणार्या शरद पवारांचं राजकारण समजून घेता येतं. शरद पवारांचं जाणता राजेपण आता दिल्लीतील सत्तेशी जुळवून घेण्यापुरतंच र्मयादित झालं आहे. मात्र त्यांच्याशी जुळवून घेण्यात भाजपाची काय मजबुरी आहे, हे भाजपाप्रेमींना कळणे जरा अवघडच आहे. मात्र ते समजून घेणं तितकंस कठीणही नाही. नरेंद्र मोदी, शरद पवार, नितीन गडकरी या तीनही नेत्यांचं एक वैशिष्ट्य आहे. हे तिघेही जाहीरपणे कायम सामान्य माणूस व शेतकर्यांच्या हिताच्या गोष्टी करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते उद्योजक व कॉर्पोरेट मंडळींचं हित सांभाळतात. पैसा हा राजकारणात किमया घडवून आणू शकतो, यावर या तिघांचाही ठाम विश्वास आहे. (लोकसभा निवडणुकीतील अनुभवाने साधेपणा, चारित्र्य, व नितिमत्तेची २४ तास माळ ओढणार्या संघ परिवारालाही पैसा बोलता है…हे आता चांगलेच कळले आहे.) अंबानी, अदानी, रुईया, टाटा-बिर्ला, व इतरही उद्योग जगतातल्या सर्व दिग्गजांची या तिघांसोबतही चांगलीच जवळीक आहे. कॉर्पोरेट जगतातील या मंडळींना भाजपा आणि राष्ट्रवादीने सोबत असलं पाहिजे, असं वाटते . तसंही भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे हितसंबंध जवळपास सारखे आहेत. या दोन पक्षांतील सलगीचं मूळ हे येथे आहे. त्यामुळे लिहून घ्या. पुढील पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या कुठल्याही घोटाळ्याची चौकशी होणार नाही. अजित पवार व सुनील तटकरेंचा बालही बाका होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खूप काही करायची इच्छा आहे. त्यांचे इरादेही चांगले आहेत. मात्र जे काही करायचं आहे ते मोदी व पवारांना विचारून आणि राष्ट्रवादीला सांभाळून घेऊनच करावं लागणार आहे. आणखी काही महिन्यांनंतर सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात व इकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा भाजपाला बाहेरून पाठिंबा हे चित्र दिसल्यास नवल वाटायचे अजिबात कारण नाही.
(लेखक दैनिक पुण्य नगरीचे कार्यकारी संपादक आहेत.)
भ्रमणध्वनी : ८८८८७४४७९६ |